सेंट मार्क
हा लेख ख्रिश्चन धर्म या प्रकल्पाचा एक भाग आहे |
ख्रिश्चन धर्म |
---|
सेंट जॉन मार्क हा येशू ख्रिस्ताचा भक्त होता. या मार्कने बायबलमधल्या नव्या करारातले दुसरे प्रकरण, मार्ककृत शुभवर्तमान (गोस्पेल ऑफ मार्क) लिहिले.
येशू ख्रिस्ताचा सर्वात जवळचा शिष्य पीटर हा येशूच्या निधनानंतर ज्युडिआचा राजा हेरॉड(Herod)च्या तडाख्यातून कसाबसा निसटून रोमला पोहोचला, त्या वेळी त्याने जॉन मार्कला आपल्याबरोबर रोमला नेले. इ.स. ४९ मध्ये मार्क अलेक्झांड्रिया येथे पोहोचला. तिथे त्याने चर्च ऑफ अलेक्झांड्रिया स्थापन केले व तो त्या चर्चचा पहिला बिशप झाला. हाच मार्क आफ्रिकेतील ख्रिश्चन धर्माचा संस्थापकही समजला जातो. अलेक्झांड्रिया आणि उत्तर आफ्रिकेत ख्रिश्चन धर्माचा प्रसार होऊ लागल्यावर, तिथल्या पूर्वीच्या मूर्तिपूजक धर्ममार्तंडांना ही आपल्यासाठी धोक्याची सूचना असल्याचे जाणवू लागले. या धर्ममार्तंडांच्या हस्तकांनी इ.स. ६८ मध्ये मार्कच्या गळ्याभोवती दोर आवळून त्याला अलेक्झांड्रियाच्या रस्त्यांमधून फरफटत नेले. मार्कला फरफटत नेत असतानाच तो मृत झाल्याने त्यांनी त्याचे शरीर अलेक्झांड्रियाजवळच्या समुद्रात फेकून दिले.
मार्कच्या मृत्यूनंतर त्याला संतपद देण्यात आले. सेंट मार्कचे समुद्रात असलेले अवशेष दोन व्हेनिशियन व्यापाऱ्यांनी व दोन ग्रीक साधूंनी इ.स. ८२८ साली पळवले व व्हेनिसच्या डोजच्या ताब्यात दिले. पुढे व्यापारामुळे व्हेनिस शहर अर्थसंपन्न झाल्यावर सर्व व्हेनिसवासीयांनी मार्क याला व्हेनिसचे ग्रामदैवतपद देण्याचे ठरविले. व्हेनिसमधील एका चौकाला सेंट मार्क चौक ऊर्फ पिआझ्झा सान मार्को असे नाव देऊन तेथे ग्रॅनाईटच्या दोन स्तंभांवर व्हेनिसच्या दोन द्वारपालांचे प्रतीकात्मक पुतळे उभे केले. त्यंपैकी एका स्तंभावर सोनेरी पंखधारी सिंहाचा पुतळा आहे. सोनेरी पंखधारी सिंह हे व्हेनिसचे ग्रामदैवत सेंट मार्क याचे प्रतीक समजले जाते.
सेंट मार्क चौकातच सेंट मार्क बॅसिलिकाची भव्य आणि बायझंटाइन स्थापत्य शैलीची, काहीशी वेगळी वाटणारी इमारत आहे. हा सेंट मार्क चौक म्हणजे व्हेनिसमधील सतत गजबजलेले आणि सर्वाधिक ऐतिहासिक महत्त्वाचे ठिकाण आहे.