Jump to content

कॅथोलिक चर्चचे पवित्र साक्रामेंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
YOUCAT (युवा श्रद्धाग्रंथ ) जीवन ज्योती प्रकाशन , या पुस्तकातून खालील बरेच संदर्भ घेतले आहेत.
Seven Sacraments Rogier

ख्रिस्तसभेची सात साक्रामेन्ते किंवा संस्कार

कॅथोलिक धर्मानुसार ख्रिस्तसभेची सात पवित्र साक्रामेंत किंवा संस्कार आहेत. ख्रिस्ती धर्मात ख्रिस्त हाच मूळ संस्कार असल्याने विविध संस्काराचा हेतु ख्रिस्ताशी ऐक्य साधणे हाच असतो हे संस्कार तीन भागात .[१]विभागले गेले आहेत. बाप्तिस्मा, दृढीकरण आणि ख्रिस्तशरीर या संस्काराद्वारे व्यक्ती ख्रिस्ती श्रद्धावंतांच्या समूहात प्रवेश करते म्हणून त्यांना प्रवेश साक्रामेंते असे म्हणतात. प्रायश्चित संस्कार (कुमसार साक्रमेंत) आणि रुग्णाभ्यंग संस्कार यांना आरोग्याची साक्रामेंते असे म्हणतात. तर गुरुदीक्षा आणि लग्न ही साक्रामेंते मिशनकार्याची किंवा ऐक्याची साक्रामेंते म्हणून ओळखली जातात.

१. बाप्तिस्मा (स्नानसंस्कार)[संपादन]

1. बाप्तिस्मा (स्नानसंस्कार)

बाप्तिस्मा हा विधी (साक्रामेंट) ही ख्रिस्ती जीवनाची सुरुवात समजली जाते. यास इंग्लिशमध्ये बॅप्टिझम म्हणतात. बाप्तिस्मा हा ख्रिस्ती जीवनातील पायाभूत संस्कार असून इतर सर्व संस्कारासाठी लागणारी ती मूलभूत पात्रता होय. हा संस्कार मुळपापाच्या जन्मजात कलंकापासून आपणास मुक्त करते. बाळाच्या बाप्तिस्म्यामद्धे बाळाच्या वतीने पालक आपली श्रद्धा प्रकट करतात. मुला किंवा मुलीचा जन्म झाल्यावर २-३ आठवड्यांनी चर्चेमध्ये धर्मगुरू त्याच्या किंवा तिच्या डोक्यावर तीन वेळा पवित्र पाणी शिंपडतात व मी तुला पिता , पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावाने बाप्तिस्मा देतो .असे म्हणतात. हा विधी बायबलमधील नव्या करारात असलेल्या मत्तय (मॅथ्यू) (२८:१९) या अध्यायात आला आहे.[२]

२. पवित्र ख्रिस्तशरीर (कम्युनियन)[संपादन]

2. पवित्र ख्रिस्तशरीर (कम्युनियन)

पवित्र ख्रिस्तशरीर (कम्युनियन) हा संस्कार (साक्रमेंत) ख्रिस्ती धर्मातील अतिमहत्वाचा संस्कार आहे. पवित्र ख्रिस्तशरीर हे बाप्तिस्मा आणि दृढिकरण याप्रमाणे दिले जाणारे तिसरे धर्मप्रवेश साक्रामेंत आहे. पवित्र मिस्साबलिदानात हा संस्कार साजरा केला जातो . प्रभू ख्रिस्ताच्या क्रूसावरील बलिदानाची स्मृती म्हणून हा मिस्साबलिदान विधी साजरा केला जातो. भाकर आणि द्राक्षरस ही ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचे प्रतीक म्हणून या विधित वापरले जाते. धर्मगुरू जेव्हा तत्वपालटाचे शब्द उच्चारतात तेव्हा या प्रतिकांचे प्रत्यक्ष ख्रिस्ताच्या शरीरात आणि रक्तात रूपांतर होते अशी ख्रिस्ती श्रद्धा आहे. ख्रिस्तसभेच्या इतिहासात या भाकरीचे आणि द्राक्षारसाचे रूपांतर मानवी मांस आणि रक्तात झाल्याचे अनेक चमत्कार घडल्याचे दिसून येते. इटली येथील लांसियानो येथे इसवी सन ७५० मध्ये ख्रिस्तशरीराचा पहिला चमत्कार घडला होता. सुवार्ता मासिकात या विषयावर लिहिलेला नोवेम्बर २००० सालचा खालील लेख संदर्भासाठी खाली नमूद करीत आहे.

यूखरिस्टमध्ये ख्रिस्ताची उपस्थिती

(लेखक : फादर नाझरेथ गाब्रू)

(सुवार्ता नोव्हेंबर २०००)

इसवी सन ७५० च्या सुमारास इटलीमधील लांसियानो येथील एक बेझिलियन मठवासी ख्रिस्तशरीरातील प्रत्यक्ष प्रभू ख्रिस्ताच्या अस्तित्वाबद्दल, उपस्थितीबद्दल साशंक होते. मिस्साबलिदांनाच्या वेळी तत्वपालटाचे शब्द उच्चारल्याबरोबर भाकर व द्राक्षरस यांचे रूपांतर प्रभू ख्रिस्ताच्या मांसात व रक्तात होते यावर विश्वास ठेवणे त्यांना कठीण जात होते, पण एक चांगले व भक्तिपूर्ण धर्मगुरू म्हणून त्यांनी ख्रिस्तसभेच्या शिकवणुकीप्रमाणे मिस्साबलिदान साजरे करणे कधी थांबवले नाही. ते चालूच ठेवले आणि देवाने आपल्या मनातील हा अविश्वास, ही शंका काढून टाकावी म्हणून त्यांनी त्याची करुणा भाकली. एके दिवशी ते मठवासी मिस्साबलिदान साजरे करीत असताना तत्वपालटाचे शब्द ऊचारल्यानंतर, अक्षरशः भाकरीचे रूपांतर मांसात व द्राक्षरसाचे रूपांतर रक्तात झाले. घडला प्रकार पाहताच ते प्रथम थोडावेळ दडपून गेल्यागत झाले नंतर लगेच भानावर येऊन त्यांनी उपस्थित भाविकांना प्रभूने जे काही घडऊन आणले होते ते पाहाण्यासाठी वेदीजवळ येण्यास आमंत्रण दिले. बदललेले तत्व (सत्व) त्या वेळी सेवन केले गेले नाही. भाकरीचा मांसात व द्राक्षरसाचा रक्तात जो पालट झाला होता, तेच नंतर पाच लहान विषम गोळ्यात घट्ट झाले, थिजले. ते एका मौल्यवान हस्तिदंती पेटीत ठेवण्यात आले. इसवी सन १७१३ साली चांदीच्या एका नक्षीदार दर्शकपात्रात (Monstrance) त्याची स्थापना करण्यात आली. लांसियानो येथील संत फ्रान्सिस तीर्थमंदिरात आजही त्या तत्वांचे आदरपूर्वक जतन केले जात आहे. बऱ्याच वर्षानी ख्रिस्तसभेला या जतन केलेल्या तत्वांचा (Substance) मूळ जातीस्वभाव (Nature) काय आहे याची खात्री करून घ्यायची होती. आधुनिक शास्त्रज्ञानी त्याचे काळजीपूर्वक व शास्त्रशुद्ध परीक्षण करून आपला निर्णय द्यावा, अशी विनंती करण्यात आली. १९७० साली नोव्हेंबर महिन्यात वैद्यकीय तज्ञाचे एक पथक चौकशीसाठी व तपास करण्यासाठी बोलवण्यात आले. प्राध्यापक ओडोआर्डो लिनोली हे त्या पथकाचे अध्यक्ष होते. तपासणीच्या व संशोधनाच्या सुरुवातीला सदर प्रकाराबद्दल त्यांच्या मनात थोडा संशयच होता. परंतु डिसेंबरच्या मध्यावर त्यांनी तीर्थमंदिराच्या संचालकाना आपला पहिला संदेश पाठऊन दिला. तो अगदी छोटेखानी पण नाट्यपूर्ण असा तार संदेश होता:

“प्रारंभी शब्द होता आणि शब्द देह झाला.”

४ मार्च १९७१ रोजी वैद्यकीय तज्ञाचा संपूर्ण अहवाल तयार झाला. या अहवालात पुढील गोष्टींचा निर्वाळा देण्यात आला:

१. मांस हे खरे मानवी जातीचे मांस आहे, रक्त हे खरे मानवी रक्त आहे.

२. हे मांस मानवी हृदयाच्या स्ंनायुमय धातूचा (Myocardium) अंश आहे.

३. हे मांस व रक्त मानवी जातीचे आहे.

४. या मांसाचा व रक्ताचा रक्तगट एकच आहे (AB).

५. या रक्तात जशी ताज्या रक्तामध्ये ओजस द्रव्ये ज्या प्रमाणात आढळतात त्याच नैसर्गिक प्रमाणात आढळली. या रक्तात पुढील प्रकारचे धातू आढळले: क्लोरीनमिथ, फॉस्फरस(स्फुरयुक्त), मग्नेशियम, पोट्याशियम, सोडीयम आणि कॅल्शियम .

मांस आणि रक्त हे जतन केलेले आहे. गेली बाराशे वर्ष अगदी नैसर्गिक स्वरुपात ती ठेवली होती (कोणत्याही प्रकारच्या रासायनिक संरक्षक प्रक्रियेशिवाय) आणि वातावरणातील व जीवशास्त्रातील घटकांच्या परिणामाला ती अगदी खुली असताना ती तशाच अवस्थेत शाबूत आहेत ही एक अद्भुत घटना आहे. शेवटी एवढेच म्हणावे लागेल की पडताळा करण्यास आवाहन केले असता, लांसियानो येथील ख्रिस्तशरीर चमत्काराच्या सत्यतेला विज्ञानाने खात्रीपूर्वक व परीपूर्ण असा प्रतिसाद दिला आहे.” पवित्र ख्रिस्तशरीरात प्रभू खराखुरा व पुर्णपणे उपस्थित असतो. जुलै १९८१ मध्ये लुर्डेस येथील आंतरराष्टीय ख्रिस्तशरीर संमेलनाला दूरदर्शनवरील संदेशात पोप जॉन पौल द्वितीय म्हणाले होते, “हे अत्यंत महत्वाचे आहे की, प्रभूच्या शब्दाचे संपूर्ण सामर्थ्य सांभाळून, ख्रिस्तसभेची, धर्मपंडितांची, धर्मपरिषदांची अधिकृत शिकवण यांची सर्वसंमत परंपरा आणि श्रद्धावंतांचा सर्वसाधारण विश्वास यांनी त्यांचा सतत स्वीकार केलेला आहे व समजून घेतलेले आहे की, क्रूसावर खिळलेला व पुनरुत्थित झालेला प्रभू खराखुरा व संपूर्णपणे पवित्र ख्रिस्तशरीरात उपस्थित असतो व जोपर्यंत भाकरीचे व द्राक्षंरसाचे अस्तित्व टिकून राहते तोपर्यंत तो उपस्थित असतो. आपल्याकडून केवळ महान आदरच नव्हे तर त्याची वंदना व आराधनादेखील व्हायला हवी. ते ख्रिस्तसभेचे हृदय आहे, तिच्या उत्साहाचे गुपित आहे. म्हणून तर या रहस्यावर तिने अत्यंत काळजी पूर्वक नजर ठेवायला हवी व त्याच्या पुर्णत्वाबद्दल ग्वाही द्यायला हवी.” [३]

३. दृढिकरण संस्कार[संपादन]

३. दृढिकरण संस्कार

हा ख्रिस्ती धर्मातील आणखी एक महत्वाचा संस्कार (साक्रमेंत) आहे. या वेळी बाप्तिस्मा संस्कार करताना दिलेली वचने पुन्हा एकदा वदऊन घेतली जातात. दृढिकरण संस्कार हा बाप्तिस्मा संस्काराची परिपूर्णता मानली जाते. [४]

४. प्रायश्चित संस्कार (कुमसार साक्रमेंत)[संपादन]

४. प्रायश्चित संस्कार (कुमसार साक्रमेंत)

पाप करणे हा मानवी स्वभाव आहे. परंतु पापाची कबुली देणे आणि त्याची क्षमा मागणे आवश्यक असते . त्यासाठी प्रायश्चित संस्कार ख्रिस्ती धर्मात अनिवार्य समजला जातो. या साठी दिक्षित धर्मगुरू पाशी आपली पापे कबूल करून त्याबद्दल क्षमा मागितली जाते आणि पुन्हा अशी पापे न करण्याचा निर्धार व्यक्त केला जातो. आणि धर्मगुरू ख्रिस्ताच्या वतीने त्याला त्या पापांची क्षमा करतात. ही वैयक्तिक पापे गुप्त ठेवण्याचे बंधन प्रत्येक धर्मगुरुला पाळावे लागते. [५]

५. गुरुदीक्षा संस्कार[संपादन]

५. गुरुदीक्षा

ख्रिस्ती धर्मात गुरुदीक्षा हा सुद्धा एक महत्वाचा संस्कार असून तो परमेश्वराचे पाचारण असलेल्या व्यक्तिलाच निवडता येतो. हा संस्कार निवडलेल्या धर्मगुरुला आजन्म अविवाहित राहावे लागते. बहुतेक सारी ख्रिस्ती धर्मकृत्ये हे दिक्षित धर्मगुरू पार पाडतात. [६]

६. लग्न किंवा विवाह संस्कार[संपादन]

६. लग्न संस्कार

विवाह संस्कारात स्त्री आणि पुरुष परमेश्वरासमोर आणि त्याच्या ख्रिस्तसभेसमोर परस्परांवर प्रेम करण्याचे आणि आयुष्यभर साथ संगत करण्याचे वचन एकमेकांना देत असतात. या संस्कारात स्त्री पुरुषांनी कोणतीही सक्ती नसताना मोकळ्या मनाने आणि स्वेछेने संमती दिली आणि कोणत्याही प्रकारचा अडथळा स्त्री पुरूषांना लग्न करण्यापासून वंचित ठेऊ शकत नसेल तरच हे लग्न वैध ठरत असते. .[७]

७. रुग्णाभ्यंग संस्कार[संपादन]

रुग्णाभ्यंग संस्कार

गंभीररित्या आजारी व मरणासन्न अवस्थेत असलेल्या कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तिला रुग्णाभ्यंग साक्रमेंत देता येतो. प्रार्थनेच्या वातावरणात कपाळाला आणि तळहातांना पवित्र आशीर्वादित तेल लावणे हा या संस्कारातील महत्वाचा विधी असतो. .[८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Catechism of the Catholic Church - IntraText". www.vatican.va. 2024-04-07 रोजी पाहिले.
  2. ^ [१]
  3. ^ http://www.vatican.va/archive/ENG0015/__P3W.HTM
  4. ^ http://www.vatican.va/archive/ccc_css/archive/catechism/p2s2c1a2.htm
  5. ^ http://www.intratext.com/IXT/ENG0017/_P3F.HTM
  6. ^ US Conference of Catholic Bishops. Compendium: Catechism of the Catholic Church. USCCB Publishing. p. 93. ISBN 978-1-57455-720-6.
  7. ^ https://www.wordproject.org/bibles/mar/41/10.htm#0
  8. ^ http://www.vatican.va/archive/ENG1104/_P3M.HTM