Jump to content

महापौर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नगराध्यक्ष या पानावरून पुनर्निर्देशित)

'महापौर' हा मराठी शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचवला आहे. त्‍यापूर्वी किंवा त्याआधी महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या सभागृहाच्या नेत्याला मेयर असे म्हणत असत. इतर राज्यांत अजूनही मेयर असे म्हणतात. पाश्चात्त्य देशांमध्ये महापौराला प्रथम नागरिक असे म्हणून मान देतात किंवा देण्यात आला आहे.

भारतांतील शहरांमधले महापौर हे पद केवळ शोभेचे असते. या पदाला कोणतेही खास अधिकार नसतात. केवळ सरकारी समारंभांना हजेरी लावणे, छोट्याछोट्या समारंभांचे किंवा स्पर्धांचे उद्घाटन करणे आणि नगरपालिकेच्या शाळांत वह्या-पुस्तके किंवा बक्षिसे वाटणे या पलीकडे त्याचा उपयोग करून घेतला जात नाही.

महाराष्ट्रातील महापालिकेत निवडून आलेले सभासद आपल्यातल्या एका सभासदाला नेता म्हणून निवडतात. या नेत्याला शहराचा 'महापौर' असे म्हणतात. महापौर हा सभासदांमधून मतदानानेच निवडला गेला पाहिजे आणि त्याचा कार्यकाळ महापालिका सभागृहाच्या कार्यकालाइतकाच असायला हवा. परंतु सध्या महाराष्ट्रात, राज्याच्या राजकीय पक्षाचा एखादा मोठा नेता आपल्या मर्जीतल्या माणसाची महापौर म्हणून नेमणूक करतो आणि त्याचा कार्यकाल एक वर्ष, दीड वर्ष, किंवा आणखी किती कमी किंवा जास्त असावा ते ठरवतो.

भारतातील इतर महापालिकांत महापौराची निवड वेगवेगळ्या पद्धतीने होते. उत्तर प्रदेशात आणि आणखी काही राज्यांत महापौर हा शहराच्या सर्व नागरिकांकडून थेट निवडणूक पद्धतीने निर्वाचित केला जातो. लंडन आणि न्यू यॉर्कमध्येही महापौरासाठी थेट निवडणूक होते किंवा होत असते. मात्र इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार एकूण अकरा शहरांपैकी नऊ शहरांतील नागरिकांनी महापौराची थेट निवडणूक नसावी असा कौल दिला आहे. फक्त ब्रिस्टॉल आणि डोनकॅस्टर हा दोनच शहरांतील नागरिकांना महापौराची थेट निवडणूक हवी आहे किंवा हवी असते.