वारकरी संप्रदाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
विठ्ठल-रखुमाई

वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणार्‍या लोकांचा संप्रदाय.

वारी म्हणजे काय?[संपादन]

वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारी करणार्‍या व्यक्तीस वारकरी म्हणतात. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादश्यांना होते. वारी करणारा तो 'वारीकर' म्हणून ओळखला जातो. ही वारी अर्थातच पंढरपूर वारी होय. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत.

इतिहास[संपादन]

पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पान्दारीच्या वारीची परंपरा होती.त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो.ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेवून सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. संत वांग्मय अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणतात- "पंढरपूर वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय.वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे,किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे.वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे."[१] ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुले हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला ;परंतु संप्रदायाचा आंद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच.भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते. या इतिहासाचे पुढील कालखंडात विभाजन करता येईल-

१. ज्ञानदेव पूर्व काळ-भक्त पुंडलिकाचा काळ

२. ज्ञानदेव-नामदेव काळ

३. भानुदास-एक्नाथांचा काळ

४.तुकोबा-निळोबा यांचा काळ

५. तुकारामोत्तर तीनशे वर्षांचा काळ

प्रकार[संपादन]

वारीचे दोन प्रकार आहेत.

 • आषाढी वारी - सर्व संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरात आपापल्या गावाहून येतात.
 • कार्तिकी वारी - संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून आपापल्या गावाला जातात.

माघी व चैत्री वा-याही होतात.[२]

माळकरी/वारकरी[संपादन]

आपले कर्तव्यकर्म निष्ठेने करीत असता भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ धारण करावी.नित्य स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा.नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा.संतांचे ग्रंथ वाचावेत.देवाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे.भजन-कीर्तनात सहभाग घ्यावा. पंढरपूर वारी करावी तसेच एकादशीव्रत करावे.सात्विक आहार,सत्वाचरण करावे.परोपकार आणि परमार्थही करावा.जीवनातील बंधनातून ,मोहातून हळूहळू बाजूस होवून पांडुरंगाशी एकरूप व्हावे ,नामस्मरण करावे असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे.[३]

पालखी सोहळा[संपादन]

हैबतबाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख.ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीला सध्याचे शल्याचे वैभव प्राप्त करून देण्यात हैबतबाबा हे प्रवर्तक आहेत.हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटाने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली.तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे.[४]

आळंदी-पंढरपूर पालखीचे वेळापत्रक[संपादन]

देहू-पंढरपूर पालखीचे वेळापत्रक[संपादन]

नियोजन[संपादन]

वारकरी महावाक्य[संपादन]

वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय! असा जयघोष केला जातो. स्थानपरत्वे या जयघोषात "पंढरीनाथ 'भगवान' की जय" असा भेद आढळतो. अनेक ठीकाणी "माउली ज्ञानेश्वर महाराजक की जय" , "जगद्गुरु तुकाराम महाराजक की जय", "शान्तीब्रह्म एकनाथ महाराजक की जय" अशी विविधता आधलते. या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हटले जाते.

साहित्यातील चित्रण[संपादन]

देहू व आळंदीहून दरवषी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात. ही परंपरा शेकडो वर्षांची असून पत्रकार कवी दशरथ यादव यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा सिनेमाही तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते, .त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे.

याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००३ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दि्ग्‍दर्शनासाठीचा आणि चित्रपट दिग्‍दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.

वारकर्‍यांच्या संस्था आणि संघटना[संपादन]

 • वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र राज्य
 • अखिल भारतीय वारकरी मंडळ
 • कर्नाटक वारकरी संस्था
 • कुंभमेळा वारकरी आखाडा परिषद
 • जागतिक वारकरी शिखर परिषद
 • तुकाराम महाराज पालखी सोहळा (संस्था)
 • दिंडी, वारकरी, फडकरी संघटना
 • देहू गाथा मंदिर (संस्था)
 • फडकरी-दिंडीकरी संघ
 • राष्ट्रीय वारकरी सेना
 • वारकरी प्रबोधन महासमिती
 • वारकरी महामंडळ
 • ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा - दिंडी समाज
 • ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान

वारकरी कीर्तनकारांची यादी[संपादन]

प्रमुख मठ[संपादन]

वारकरी संतांनी मठांच्या माध्यमातून सांस्कृतिक केंद्रे उभारून वारकरी संप्रदाय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे व आजही करीत आहेत. महाराष्ट्रातील असे काही प्रमुख मठ व त्यांची देवस्थान संस्थाने पुढीलप्रमाणे.

चित्रदालन[संपादन]

वारीसदृश इतर परंपरा[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

सन्दर्भ[संपादन]

 1. नेरकर अरविंद-होय होय वारकरी (१९९८) ग्रंथाली प्रकाशन
 2. नेरकर अरविंद, होय होय वारकरी
 3. नेरकर अरविंद,होय होय वारकरी (१९९८) ग्रंथाली प्रकाशन
 4. नेरकर अरविंद-होय होय वारकरी (१९९८) ग्रंथाली प्रकाशन

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.