Jump to content

जनार्दन स्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जनार्दन स्वामी (शके १४२६ - १४९७) हे एकनाथ महाराजांचे गुरू होते. औरंगाबाद जवळील

देवगिरी किल्ल्याचे ते किल्लेदार होते. 

थोर दत्तोपासक श्रीजनार्दनस्वामी इस्लामी सत्तेत देवगिरी अथवा दौलताबाद येथे अधिकारावर राहून दत्तोपासनेचा प्रसार करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. फाल्गुन वद्य ६ शके १४२६ रोजी यांचा जन्म चाळीसगावच्या देशपांडे घराण्यात झाला. शके १४४७ मध्ये त्यांनी एकाच कुलगोत्रातील दोन मुलींशी लग्न करून गृहस्थाश्रमास प्रारंभ केला. भगवच्चिंतन, स्नानसंध्यादि कर्मे, अतिथिसेवा, राजकार्य आणि सावित्री-रमा या दोन स्त्रियांशी संसार; असा त्यांचा जीवनक्रम होता. राजकारणात नित्य दगदग, वसुली, अधिकारी लोकांची ताबेदारी, यवनांची लहर, इस्लामी लोकांशी संबंध यांतून त्यांना मार्ग काढायचा होता. स्वधर्मनिष्ठा राखायची होती. घरातील दत्तोपासना वाढवायची होती. कृष्णातीरी अंकलखोप, कुरवपूर, वाडी, औदुंबर इत्यादी दत्तस्थानांना ते भेटी देत असत. अंकलखोप येथे त्यांना दत्तात्रेयांचा अनुग्रह झाला.

देवगिरीच्या जवळच पाचसहा मैलांच्या परिसरात शुलभंजन शिखराच्या सपाटीवर शिवमंदिरे आहेत. तेथेच सूर्यकुंड नावाचे एक तळे आहे. याच भागात सहस्रलिंग म्हणूनही एक स्थान आहे. दाट झाडी व एकान्त यांमुळे जनार्दनपंत दत्तध्यानासाठी येथे येत असत. . अनेकांना या ठिकाणी साक्षात्कार होत असत. याच ठिकाणी जनार्दनस्वामींना दत्तांचा साक्षात्कार झाला. दत्तावधूताने कलियुगातील पहिला शिष्य जनार्दन केला असे नाथांनी म्हटले आहे. या दत्तसाक्षात्काराचे वर्णन संत एकनाथ यांनी आपल्या एकनाथी भागवतात केले आहे.

काव्यरचना आणि मठस्थापना[संपादन]

जनार्दनस्वामींची काही स्फुट रचना असावी. ‘आत्मनात्मविवेकसार’ नावाचा एक ओवी वृत्त वापरून ग्रंथ त्यांनी पंचीकरणावर लिहिलेला आहे. उपनिषदवेदान्त भावगीता त्यांनी रचिली असल्याचे कन्नडकर वि. बा. जोशी आपल्या ‘श्रीसंत जनार्दनस्वामी’ या चरित्रग्रंथात सांगतात. जनीजनार्दन, रामाजनार्दन, एकाजनार्दन अशा काही शिष्यांचा परिवारही त्यांच्याबरोबर असे. पैठण, देवगिरी, काशी इत्यादी ठिकाणी जनार्दनस्वामींचे संबंध आहेत.

नाथांनी काशीस ब्रह्मघाटापाशी जनार्दन मठाची स्थापना केली. देवगिरी येथे, मानपुरी मठात, बीडपटांगण मठात, परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथील मठात, नाशिकच्या तपोवनातील मठात, जनार्दनस्वामींच्या मठांची परंपरा चालू आहे. उमरखेड, संभाजीनगर, कमळनुरी तालुक्यातील शेवाळे, देवपैठण (निंबराजांचे), कारंजा अशा अनेक ठिकाणी जनार्दनस्वामींच्या दत्तोपासनेच्या परंपरा चालू आहेत. जनार्दनस्वामींची समाधी अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडीला नसून देवगिरीलाच असल्याचे संशोधक सांगतात.

कर्मयोगी जनार्दन स्वामी[संपादन]

देवगिरीवर येऊन जनार्दनस्वामीनी यवनसेवा पत्करली. या एका प्रसिद्ध स्थानाभोवती जनार्दनस्वामी व एकनाथ यांच्या अनेक रम्य व भावगर्भ स्मृती एकवटलेल्या आहेत. दुर्गातीर्थ व श्रीगोरक्षगुहा ही दोन स्थाने भाविकांना सुखविणारी होती. जनार्दनपंतांनी यवनसेवा पत्करूनही आपली धार्मिक वृत्ती सोडली नाही. नित्याचे आन्हिक, गुरुचरित्र, ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथांची पारायणे, नामस्मरण व राजकारण यांत त्यांचे चित्त रंगून गेले होते. गोरक्षगुहा व गडाखाली सहस्रस्तंभ देवीजवळचे स्थान या ठिकाणी एकान्तात त्यांची ध्यानधारणा चाले. जनार्दनस्वामींचे नैष्ठिक आचरण व दत्तभक्ती यांचा प्रभाव यवनसत्तेवरही असावा. असे सांगतात की, त्यांना व यांच्या परिवारास सोयीचे व्हावे म्हणून देवगिरीच्या आसपास शुक्रवारऐवजी गुरुवारी सुट्टी असे.

जनार्दनस्वामींनी राजकारण, परमार्थ व प्रपंच योग्य रीतीने सांभाळून शके १४९७ च्या फाल्गुन वद्य ६ रोजी आपला अवतार संपविला. त्यांचा जन्म, त्यांना दत्तदर्शन, नाथांना बोधदान आणि समाधियोग यांचा दिवस फाल्गुन वद्य ६ हाच आहे, आणि आणखी नवल असे की, एकनाथांच्या समाधीचा दिवसही फाल्गुन वद्य ६ असाच आहे.

दत्तोपासना[संपादन]

अशा रीतीने जनार्दनस्वामींपासून महाराष्ट्रात दत्तोपासनेची एक शाखा समृद्ध झालेली दिसली. एकनाथांनी दत्तभक्ती विठ्ठलभक्तीत मुरवून टाकली असली तरी जनार्दनस्वामींच्या कृपेने जागृत झालेला दत्तभक्तीचा धागा अतूट होता. ‘धन्य गुरू जनार्दन । स्वानंदाचें जें निधान’ नाथांनी यासाठी म्हटले आहे. आपणांस ज्ञानबोध दत्तात्रेय-जनार्दन यांच्याकडूनच मिळाल्याची ग्वाही देताना एकनाथांनी म्हटले आहे,

‘जनार्दनाचा गुरू । स्वामी दत्तात्रय दातारू ॥ त्यांनी उपकार केला । स्वानंदाचा बोध दिला ॥ सच्चित्सुखाचा अनुभव । दाखवला स्वयमेव ॥ एकाजनार्दनी दत्त । वसे माझ्या ह्रदयांत ॥’

एकनाथ महाराजांच्या प्रत्येक कवनाशेवटी 'एका जनार्दनी' असा स्वतःचा आणि आपले गुरू जनार्दन स्वामी यांचा नामनिर्देश असतो. गुरू परंपरा :- आदिनारायण

अत्री

दत्तात्रेय

जनार्दन

एकनाथ

बाह्य दुवे[संपादन]

एकनाथ महाराजांचे चरित्र (लेखक - केशव अध्यापक)