खिल्लार गाय
![]() खिल्लार गाय | |
![]() | |
मूळ देश | भारत |
---|---|
आढळस्थान | पंढरपूर, मंगळवेढा, आटपाडी, सांगोला, खानापूर, कवठे महाकाळ, जत, सोलापूर, सांगली, चडचण, अथणी, विजापूर. पुणे, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, बेळगाव, बिजापूर, धारवाड, गुलबर्गा, बागलकोट |
मानक | agris-IS |
उपयोग | शेतीकाम, शर्यत, अवजड वाहतूक आणि लांबपल्ल्याच्या प्रवासाला उपयुक्त |
वैशिष्ट्य | |
वजन |
|
उंची |
|
आयुर्मान | २५ वर्ष |
डोके | मोठे, लांब आणि फुगीर कपाळ |
पाय | लांब आणि काटक |
शेपटी | लांब, शेपूटगोंडा काळा व झुपकेदार |
तळटिपा | |
प्रांतानुसार खालील मुख्य उपजाती आहेत - काजळी खिल्लार, कोसा खिल्लार, गाजरी खिल्लार, हरण्या खिल्लार, इत्यादी. | |
|
खिल्लार किंवा खिल्लारी गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून, प्रामुख्याने महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर व या जिल्ह्यांच्या सीमेलगत असणाऱ्या कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो.[१]
हा महाराष्ट्रातील लोकप्रिय गोवंशांपैकी एक असून या गोवंशाला महाराष्ट्राची शान असे म्हणतात.[२] या गोवंशात प्रांतानुसार खालील मुख्य उपजाती आहेत - काजळी खिल्लार, कोसा खिल्लार, गाजरी खिल्लार, हरण्या खिल्लार, इत्यादी. या गोवंशाच्या गायी इतर गोवंशापेक्षा कमी दूध देतात अशी समजूत आहे. पण योग्यप्रकारे पैदास केल्यास यांचे दूध कमालीचे वाढते हे सिद्ध झाले आहे. या वंशाची गाय दिवसाला ३ ते ६ लिटर दूध देते. तसेच जर मुक्तगोठा असेल आणि वासरू सोबत असेल तर यांना दिवसातून ५-६ वेळा पान्हा फुटतो. पण इतर गोवंशापेक्षा या खिल्लार गोवंशाचे दूध हे आरोग्यास उत्तम आहे. आज महाराष्ट्रामध्ये दिवसाला १० लिटर दूध देणाऱ्या देखील जातिवंत खिल्लार गाई पाहायला मिळतात.
शारीरिक रचना[संपादन]
या गोवंशाचा रंग सहसा पांढरा असतो. काही प्रमाणात किंचीत मळकट रंग सुद्धा आढळतो. कातडी घट्ट चितकलेली व चमकदार असते. कातडीवरील केस चमकदार व बारीक असतात. यांची उंची जवळपास १४०-१५० सें मी पर्यंत असते. शिंगे गुलाबी, काळसर, लांब आणि पाठीमागे निमुळते असतात. कर्नाटक खिल्लार मध्ये शिंगे लहान निमुळती व मुळाशी जवळ असतात. तर माणदेशी खिल्लार मध्ये जाडजूड व मुळाशी थोडे दूर अशी शिंगे असतात. काटक शरीर व तापट स्वभाव यामुळे हे बैल अनेकदा मारके असतात. डोळे काळे व लांबट आकाराचे असतात. चेहऱ्याच्या तुलनेत कान लहान व शेवटला टोक असते. मान लांब व रुंद असते. गळ्याची पोळी म्हणजे गलकंबल मोठे नसते. वशिंड म्हणजे खांदे मध्यम असतात. माणदेशी खिल्लारचे वशिंड मध्यम असते. उत्तम आरोग्य असणाऱ्या या प्रजातीचे खूर गच्च व काळे असतात. शेपूट लांबलचक सापासारखे व शेपूटगोंडा काळा व झुपकेदार असतो. बैल मजबूत व तापट असल्याने हा गोवंश शर्यती व शेतीच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट मानला जातो.[३] दुष्काळी परिस्थितीत टिकून राहणारी ही प्रजाती आहे.[४]
खिल्लार गोवंशाचे उपप्रकार[संपादन]
- काजळी खिल्लार: ज्या बैलाची / गाईची शिंगे, डोळ्याचा कड़ा, पापण्या, नाकपूड़ी, खुर, शेपुटगोंडा इत्यादी गोष्टी काजळा प्रमाणे गड़द काळे असतात व शरीर पांढरे शुभ्र असते त्यांना काजळी खिल्लार म्हणून संबोधले जाते. हा खिल्लार गोवंशाचा उपप्रकार प्रामुख्याने सोलापूर जिल्हातील पंढरपुर भागात जास्त प्रमाणात आढळून येत असल्यामुळे याला पंढरपुरी खिल्लार म्हणून सुद्धा ओळखले जाते
- कोसा खिल्लार: कोसा हे रंगाचे वर्णन असुन हा रंग फ़िकट बाज़रीच्या रंगा सारखा असतो. चेहऱ्या वरील ठीपक्या (चित्रापणा) मूळे गाय/बैल तसेच वासरू आकर्षक व लक्ष वेधक ठरतात. चेहऱ्या वरील ठीपक्याची रचना फ़िकट, पांढऱ्या रंगावर कोसा रंगाचे ठीपके किंवा कोसा रंगाचा चेहऱ्यावर उभा पट्टा ज्याला मोरकाना असेही म्हटले जाते. मानेचा, पायांचा आणि मांडी वर कोसा रंग पोटावरील रंगाच्या तूलनेत गडद असतो. डोळ्याच्या कड़ा, नाकपूड़ी यांचा रंग ठराविक नसुन तो फ़िकट काळा किंवा लालसर आढळतो. शिंगाचा रंग हा शेंड्या कड़ील भागात काळा आणि ख़ाली पांढरा/गुलाबी आढळतो. खुर काळे, शेपुट गोंडा काळा असतो. सांगली जिल्हातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ व सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, पंढरपूर या तालूक्यामध्ये तसेच कर्नाटक राज्यातील चडचण व आजूबाजूचा प्रदेशात या जातीची पैदास मोठ्या प्रमाणावर केली जाते
- हरण्या खिल्लार: या उपजातीचे नाव तिच्या वर्ण / रंगावरून प्रचलित झालेले आहे. या उपप्रकाराचे सर्व गुणधर्म इतर खिल्लार सारखेच असतात. केवळ शरीराच्या तांबूस म्हणजेच सारंग हरणासारख्या रंगामूळे ‘हरण्या खिल्लार’ असे संबोधले जाते. इतर खिल्लारच्या तूलनेत या उपजातीचा आढळ कमी आहे.
- गाजरी खिल्लार: या उपजातीत बैलाची/गाईची शिंगे, डोळ्याचा कड़ा, पापण्या, नाकपूड़ी, खुर, शेपुटगोंडा इत्यादी गोष्टी गाजरा प्रमाणे फ़िक़ट गुलाबी रंगाच्या असतात व शरीर पांढरे शुभ्र असते त्यांना गाजरी खिल्लार म्हणून संबोधले जाते. ही खिल्लारची उपजात प्रामुख्याने कर्नाटक राज्यातील विजापूर व त्या लगतच्या महाराष्ट्रातील भागात जास्त आढळून येते.
उत्तम पैदाशीसाठीचे नियम[संपादन]
उत्तम पैदाशीसाठी खिल्लार पालकाने सर्वप्रथम आपली गाय खिल्लारचा कोणत्या उपजाती मध्ये मोड़ते, हे जाणून घेतल पाहिजे व त्यानुसार त्या उपजातीचा वळूची निवड केली पाहिजे. उदा: काजळी गाईच्या मालकाने शक्यतो कोसा /हरन्या / गाजरी वळू कड़ून आपली गाय रेतन करने टाळावे.
वळू निवडताना त्यात पुढील निकष पाळावेत
- फ़ाउंडेशन (पाया): तळ/खुर बैलाचे पाय सरळ आणि एका रेषेत असावे वाकड़े नसावेत. खुर काळे दगडा सारखे घट्ट मज़बूत असावेत. दोन पायांमध्ये योग्य अंतर असावे.
- शरीर: शरीर बांधा पीळदार, चपळ, तसेच पाठीचा कणा एक समान असावा, चढ़ उतार असलेला नसावा
- वशिंड: गोलाकार महादेवाचा पिंडी सारखे असावे, जास्त मोठे नसावे मध्यम आकाराचे असावे व एक बाजुला झुकलेले नसावे.
- चेहरा: निमुळता लांब व कपाळ अरुंद असावे. डोळे पाणेदार, भावपूर्ण आकर्षक असावे. कान लहान असावे, लांब नसावे, कमीत कमी चेहरापासुन ४५ अंशात असावे त्यामुळे एकंदरीत चेहरा आकर्षक वाटतो
- शिंग: शिंगाची लांबी शरीराला शोभेल अशी असावी. शिंगाचा रंग काळसर असावा, जाडी कमी असावी
- बेंबी: आटोपशीर पोटाला चिकटून असावी, मूत्रविसर्जनाचीं जागा लोंबती नसावी
- छाती: भारदस्त रुंद असावी, पुढील दोन पायांमधील भाग जास्त फूगिर नसावा
- गळकंबळ (पोळी): शक्य तितकी पातळ असावी, तसेच छाती आणि कंठा जवळ पोळी एकदम कमी असावी.
- शेपुट: शेपुट ही जाड़ीला उगमापासुन गोंड्या पर्यंत बारीक निमुळती असावी. लांबी गुडघ्या पर्यंतच असावी, शेपुट गोंडा गुडघ्यापासुन खाली रहावा, झूपकेदार असावा.
- चौकः चौक म्हणजे बैलाचा/गाईचा पाठिवरचा मागचा बाजूचा भाग जो रुंद पसरट असावा. शेपटाचा बाजुला जास्त उतार नसावा.
खिल्लार वळूचे निकष[संपादन]
आज्ञाधारक खिल्लार वळू कसा करावा[संपादन]
खिल्लार वळूला आज्ञाधारक करण्यासाठी दिवसातील जास्तीत जास्त वेळ म्हणजे ८ तास तरी त्या वळू सोबत घालवावा. वैरण, पाणी हे त्या एकाच व्यक्तीने करावे, त्याला हाक मारणे, त्याला गोंजारने कि जेणेकरून त्याला तुमची सवय झाली पाहिजे.
खिल्लारची पैदास केंद्रे (तालुके)[संपादन]
- महाराष्ट्र: पंढरपूर (काजळी खिल्लार, अंशतः कोसा खिल्लार), मंगळवेढा (कोसा/धनगर खिल्लार), आटपाडी (कोसा खिल्लार), सांगोला (काजळी, कोसा खिल्लार), खानापूर, कवठे महाकाळ (कोसा खिल्लार), जत (कोसा खिल्लार)
- कर्नाटकः चडचण (गाजरी, कोसा खिल्लार), अथणी, विजापूर (गाजरी खिल्लार)
टीप: सोलापूर, सांगली जिल्ह्याच्या सीमेलगतच्या इतर जिल्ह्यामध्ये देखील खिल्लारची पैदास केली जाते, ही सर्व खिल्लारची पैदास करणारे मूळ प्रमुख तालुके आहेत.
जातिवंत खिल्लार वळू[संपादन]
महाराष्ट्रातील काही जातिवंत खिल्लार वळूंच्या (थैमाल, जवळा गाव) नावावर जास्तीत जास्त १७/१८ गाई एका दिवसाला नेसर्गीक रेतन करण्याचे रेकॉर्ड देखील आहे. काही वळूनी (सिद्धापूरची खाण) त्यांच्या १५ वर्षाच्या आयुष्यात जवळपास ११,००० पेक्षा जास्त गाई देखील नेसर्गीक रेतन केलेल्या आहेत. सध्या खिल्लार गोवंशामध्ये पंढरपूर जवळील सिद्धापूर गावातील खिल्लार खान सर्वात जास्त प्रसिद्ध आणि जुनी मानली जाते. या सिद्धापूर खाणीतील सर्वात जास्त पैदास आज महाराष्ट्र आणि कर्नाटकात पाहायला मिळते.
खिल्लार यात्रा, प्रदर्शन, बाजार[संपादन]
दरवर्षी खिल्लार यात्रांना सुरुवात होते ती म्हणजे कार्तिक वारी/पंढरपूर यात्रेपासून आणि यानंतर दर १५ दिवसांच्या अंतरावर इतर जिल्यातील सर्व गावांच्या यात्रांना देखील सुरुवात होत असते. महाराष्ट्रातील प्रदर्शनात फक्त काजळी खिल्लार या उपजातीला निवड प्रक्रियेत गणले जाते, बाकीच्या उपजाती कोसा खिल्लार, गाजरी खिल्लार, हरण्या खिल्लार यांना निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले जात नाही. पण कर्नाटक मधील घटप्रभा या प्रदर्शनात सर्व उपजातीला प्राधान्य दिलेले पाहायला मिळते. भविष्यात या सर्व उपजातीला महाराष्ट्रामध्ये देखील प्रदर्शनात प्राधान्य मिळेल अशी आशा शेतकरी वर्गाला आहे.
- वार्षिक यात्रा, प्रदर्शन, बाजार यांचा क्रमवार: कार्तिक वारी (पंढरपूर), इस्लामपूर, खटाव (कर्नाटक), होर्ती, महूद, नागोबा, जत, पुसेगाव, जवळा, रायबाग, सोलापूर, विजापूर, खरसुंडी, सांगोला, चडचण, माघी वारी, पिलीव, अकलूज, चिंचणी, लोणी (कर्नाटक), करगणी, अथणी, हेबलहट्टी, जामखंडी, खरसुंडी (चैत्र), कोळे, उमदी, माडग्याळ, उगर, घटप्रभा (कर्नाटक)
गाय/बैलांचे वय कसे ओळखतात[संपादन]
- आदत : १ ते २४ महिने (दुधाचे दात)
- २ दाती : 24 महिन्यापासून पुढे 4 ते 6 महिने
- ४ दाती : 30 ते 36 महिने
- ६ दाती : 36 ते 42 महिने (प्रत्येक खोंड एवढे दिवस नाही घेत दात लावायला, काही खोंड कमी दिवसात पण ६ दात लावतात)
- जुळुकः ४२ ते ४८ महिने (या वयात बैल आला कि त्याला बैल संपला किंवा दाताला जुळला असे देखील म्हणतात)
कशा दिसतात या उपजाती[संपादन]
वापर[संपादन]
प्रचंड ताकद आणि वेगवान असलेले या जातीचे बैल प्रामुख्याने शर्यतींसाठी वापरले जातात.[५]
जन्मापासून ते १ वर्षापर्यंत कालवड व खोंड संगोपन[संपादन]
- जन्मल्यानंतर स्वच्छ पुसून गाई समोर चाटायला ठेवावे.
- वासाराचा तोंडातील घाण काढावी, कान स्वच्छ करून फुंकावे.
- दाताने वशिंड ओढू नये.
- कासरा पायाला न बांधता गळ्यातच बांधावा.
- गाईचे झार/वार पडल्यावर वासरू पाजावे.
- नाळ सुकून पडेपर्यंत कुत्र्यांपासून वासरांना लांब ठेवावे.
- गाईंचा चीक वासराला जास्तीत जास्त पाजावा.
- गाईला सकस आहार देऊन दूध आवश्यक मिळावं वासारला याची काळजी घ्यावी.
- एखाद्या गाईला दूध कमी असल्यास शक्यतो वासराला शेळीचे दूध पाजावे बाटलीने.
- वासराचे शेण पातळ होत असेल तर दूध कमी पाजावे पचन होईल एवढेच द्यावे.
- स्वच्छ कोरड्या जागी बांधावे
- शिंग घासणार नाही अशी जागा निवडावी.
- दात उगवायला सुरुवात झाल्यावर माती/खडे खाण्याचा प्रयत्न करतात त्यावर लक्ष ठेवावे.
- गवत किंवा पालेदार चारा टाकावं चघळायला सुरुवात झाल्यावर.
- शक्यतो वासरू दिवसातून २-३ वेळा पाजावे.
- मोकळ्या पटांगणात खेळायला सोडावे
- खोंड जर का स्वतःची लघवी पीत असेल तर त्या जागेवर शेण लावून त्यापासून परावृत्त करावे.
- खनिज कमतरता भरून काढण्यासाठी बाजारात मिळणारी चाटण वीट समोर ठेवावी.
- वैरण खायला सुरू केल्यावर थोड थोड खुराक द्यावा शेंग पेंड , मका भरडा अगदी प्रमाणात पचेल एवढाच.
- ४ महिन्यानंतर जंत निर्मूलन करावे
- गाई पुन्हा गाभण गेल्यावर दूध कमी झाल्यास वासराला इतर आहार वाढवावा.
- भूक वाढीसाठी लिवर टॉनिक वापरावे.
- लहानपणापासून धुण्याची सवय लावावी.
- कालवडिला खरारा करून कासेत हात घालायची सवय लावावी. भविष्यात धार काढायला सोपे जाते.
- 10-12 महिने वय झाल्यावर गरज असल्यास नाक टोचून घ्यावे.
- बांधताना मोरकिचा वापर करावा, केवळ वेसनीला बांधणे टाळावे.
- खोंड झुपण्या योग्य झाल्यावर त्याला मोठ्या शहाण्या बैलासोबत झुपुन छकडीचा सराव द्यावा.
खिल्लार आणि हल्लीकर यांमधील फरक[संपादन]
हल्लीकार ही मूळची दक्षिण कर्नाटकात म्हैसूर जवळ आढळणारी प्रजात आहे व ती महाराष्ट्रात म्हैसुरी या नावाने प्रचलीत आहे. ह्या जातीचे बैल काटक व चपळ असल्यामुळे यांचा वापर शर्यतीसाठी होतो. याच कारणामुळे हल्लीकार म्हणजेच म्हैसुरी बैलांचा वापर पश्चिम महाराष्ट्र मध्ये फायनल व घाटातील शर्यत या प्रकारांमध्ये वाढू लागला. काही बैल चांगले पळायला लागल्यामुळे हळू-हळू या जातीचा वापर वाढू लागला. पण सृष्टी निर्मात्याने प्रत्येक प्रजाती ही त्या त्या प्रदेशाचा भौगोलिक परस्थितीनुसार निर्माण केली आहे, हे लक्षात घेता आपल्यासाठी खिल्लार आणि त्यांच्यासाठी हल्लीकार उपयुक्त आहे.
खिल्लार आणि हल्लीकर यांमधील फरक
प्रदेश:
- खिल्लार प्रदेश: सोलापूर जिल्हा (पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस) सांगली जिल्हा (आटपाडी, कवठे महाकाळ, जत), सातारा जिल्हा (माण, खटाव, म्हसवड), कर्नाटक जिल्हा (विजापूर)
- हल्लीकार प्रदेश: म्हैसूर जिल्हा (पेरियापट्टांना), रामानगर जिल्हा (मागडी, कनकपुरा), मंड्या जिल्हा (नागामंगला)
उपजाती:

- खिल्लार उपजाती: काजळी खिल्लार, कोसा खिल्लार, हरण्या खिल्लार, गाजरी खिल्लार
- हल्लीकार उपजाती: १. सुजी मलिंगे हल्लीकार, २. बेट्टादापूरा हल्लीकार, ३. गुज्जी मावू किंवा करदल्ली हल्लीकार, ४. अमरावती हल्लीकार, ५. जाला हल्लीकार
रंग:

- खिल्लार रंग: खिल्लार मध्ये पांढरा, कोसा, हरणा रंग आढळतात त्यावरूनच उपजातींचे वर्गीकरण होते. खिल्लार मध्ये कोसा व हरणा बैल बडवल्या नंतर पूर्णतः पांढरे होतात.
- हल्लीकार रंग: हल्लीकर मध्ये काळा, गडद कोसा, हरणा रंग आढळतात. हल्लीकर बैल बडवल्या नंतर फिक्कट कोसा किंवा काळसर रंग धारण करतात.
पाय:

- खिल्लार पाय: पायाच्या हाडांची जाडी जास्त असते.
- हल्लीकार पाय: पायाच्या हाडांची जाडी कमी असते.
कांबळ:

- खिल्लार कांबळ: कांबळचा आकार मध्यभागी चंद्रकार असतो.
- हल्लीकार कांबळ: गळ्यापासून छातीपर्यंत एका सरळ रेषेत असते.
चेहरा:
- खिल्लार चेहरा: खिल्लारचा चेहरा हल्लीकारच्या तुलनेत मोठा आणि कपाळ रुंद व फुगीर असते.
- हल्लीकार चेहरा: एकदम निमुळता असतो आणि कपाळ अरुंद असते.
शिंग:
- खिल्लार शिंग: खिल्लारची शिंग बाकदार आणि पाठीमागच्या बाजूला झुकलेली असतात. शिंगाचे बुडामधील अंतर हल्लीकारचा तुलनेत जास्त असते.
- हल्लीकार शिंग: शिंग बहूतांश सरळ आणि पुढच्या बाजूला झुकलेली असतात. शिंगाचे बुडामधील अंतर अतिशय कमी असते.
शरीर:
- खिल्लार शरीर: हल्लीकारच्या तुलनेत शरीरं जाडजूड आणि धष्टपुष्ट असते.
- हल्लीकार शरीर: खिल्लारच्या तुलनेत शरीरं सडपातळ असते.
वशिंड:
- खिल्लार वशिंड: मोठे आणि गोलाकार असते.
- हल्लीकार वशिंड: लहान असते.
मोठा लक्षा सारख्या म्हैसूर बैलांचा यशामुळे शर्यत क्षेत्रामध्ये म्हैसूर बैलांचा वापर वाढू लागला. याचाच विचार करून व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात म्हैसूर वासरांची आवक करून विक्री चालू केली. परंतु प्रत्येक शर्यत शौकिनाला म्हैसूर बैलाकडून ते यश संपादन करता आलं नाही. काही बैल चांगले पळायला सुद्धा लागले, परंतु खूप थोड्या कालावधी नंतर त्यांचा पळ कमी झाला, तर बहुतांश वासर ही पळालीच नाहीत. त्यामुळं जास्त प्रमाणात शेतकऱ्यांची निराशा झाली. एखादा खिल्लार बैल किंवा वासरू शर्यतीत पळण्यास असमर्थ ठरले, तरी त्याचा वापर इतर शेती उपयोगी कामांमध्ये करण्यात येतो. हे म्हैसूर बैल/वासरू यांच्याबाबतीत करता येत नाही कारण शेतीकामासाठी बैल जोड वापरणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली पसंती ही खिल्लार बैलांनाच आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गाईंना म्हैसूर बैल रेतन करून पैदास करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातही काही विशेष यश मिळाले नाही.
सृष्टी निर्मात्याने दक्षिण कर्नाटकाच्या भौगोलिक परस्थितीनुसार त्यांना हल्लीकार प्रजात विकसीत करून दिलेली आहे. त्याच प्रमाणे पश्चिम महाराष्ट्राला खिल्लार, गुजरातला गीर, हे असे असताना काही शेतकरी/शर्यत प्रेमी गोष्टीला विरोध करून हल्लीकार(म्हैसूर) आणि खिल्लारचां रेतन करत आहेत. यातून जन्माला येणारी पैदास ही खिल्लारचां अस्तित्वाला धोका निर्माण करत आहे. भविष्यात हे असच चालत राहील, तर मूळ खिल्लार गुणधर्म नष्ट होऊन आपल्या हाती फक्त एक क्रॉस ब्रीड राहील, की जिचा काहीच उपयोग नसेल. आपली खिल्लार ही कोणत्याच बाबतीत हल्लीकर पेक्षा कमी नाहीये. शर्यत क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेले अनेक खिल्लार बैल आहेत. आपली खिल्लार महाराष्ट्राची शान एवढी समृद्ध, सुंदर असताना म्हैसूरचां मोह कशासाठी.....?
चारा[संपादन]
- मका: मकेची वैरण जनावरांना कणस चिकामध्ये दाना नुकताच भरायला सुरू असलेल्या अवस्थेत असताना चारा म्हणून वापरावी. या अवस्थेत असलेली मकेची वैरण जनावरांना खूप मानवते गाईं मध्ये दूध वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरते. दाणा पूर्ण परिपक्व झाल्यानंतर कणीस मोडून फक्त केंबाल / सरमाड वापरावे.
- कडवळः ही वैरण ज्वारीची असून साधारण 2.5‑3 महिन्यानंतर निसवून स्थिर झाल्यानंतर कणीस आल्यानंतर ही वैरण गुरांना घालायला सुरुवात करावी कवल्या अवस्थेत वैरण म्हणून वापरले तर ते पचनी पडत नाही व पातळ शेण पडते. पक्व अवस्थेत असताना याला विशिष्ट प्रकारची गोडी असल्यामुळं जनावरे खूप आवडीनी खातात. उन्हाळ्यात हिरव्या चारा म्हणून याचा जास्त वापर होतो.
- मेथी घासः मेथीघासाची उपयुक्तता विविध अंगी पहावयास मिळते कारण त्याचा हिरवा चारा म्हणून वर्षभर पुरवठा होऊ शकतो. त्याच प्रमाणे वाळलेल्या अवस्थेतील अवशेष सुद्धा जनावरांना उपयुक्त ठरतात.
- कडबाः ज्वारीचे कणीस मोड्य ल्या नंतर राहिलेल्या सुक्या चाऱ्याला कडबा म्हणतात. सुक्या चाऱ्यामध्ये अतिशय पौष्टिक म्हणून कडबा वापरतात. दैनंदिन किमान एक पेंडी तरी याच वापर करावा म्हणजे जनावरांचा रवंथ चांगला होऊन जनावर पाणी भरपूर पिण्यास याची मदत होते.
- हत्ती घास हा एक संकरित चाऱ्याचा प्रकार आहे. वर्षभर हिरवा चारा सहज रित्या उपलब्ध होण्याचा चांगला पर्याय आहे. यामध्ये अनेक जाती बाजारात कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत.
खुराक[संपादन]
- सरकी पेंड सरकी पासून तेल काढल्यानंतर राहिलेला चोथा जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरता येतो. हे देण्यासाठी ढेप किमान 2‑3 तास पाण्यात भिजत ठेवावी लागते नंतर ती जनावरांना देता येते. दुग्ध उत्पन्नासाठी याचा वापर उपयुक्त ठरतो.
- गहू भुसा गव्हाचा मळणी नंतर राहिलेला भुसा जनावरांचा खुराक म्हणून वापर करतात. गव्हाचे पीठ सुधा वापरू शकतो.
- गोळी पेंड मका, डाळी आणि इतर कच्चा मालाचे मिश्रण करून बनवली जाते. काही जनावर शेंग पेंडीला असलेल्या कडवट वास आणि चवीमुळे खात नाहीत अशांना गोळी पेंड हा उत्तम पर्याय आहे. दूध वाढीसाठी याचा वापर उपयुक्त ठरतो.
- शेंग पेंड अतिशय उच्च प्रथिनयुक्त असा हा स्त्रोत आहे. शेंगदाण्यचे तेल काढून उरलेला चोथा म्हणजे शेंग पेंड. याचा वापर केल्यामुळे जनावर तंदुरुस्त आणि आरोग्यदायी राहण्यास मदत होते.
- मका भरडा मकेचे पीठ किंवा भरडा याचा खुराकामध्ये समावेश केला तर खूप फायदेशीर ठरते. दूधवाढीसाठी मकेचं पीठ / भरडा खूप महत्वाचे ठरते.
- सातू काही भागामध्ये याला कट्याल, खपली गहू म्हणतात. अतिशय चिकट आणि ताकतवर असत. बैलामध्ये शरीराला घट्ट पणा आणण्यासाठी खूप उपयुक्त ठरते.
देशी गोवंशाची सद्यःस्थिती आणि आव्हाने[संपादन]
- पशुगणनेच्या ताज्या आकडेवाडीनुसार (२०१९) गोधनाच्या बाबतीत महाराष्ट्र पाचव्या स्थानावर.
- मागील पशुगणनेच्या (२०१२) तुलनेत गोवंशात ९.६३ टक्क्यांनी घट.
- राज्य पातळीवर देशी गाईंच्या एकूण संख्येत ८. ७ टक्क्यांनी घट. बैलांच्या संख्येत २९.६३ टक्क्यांनी चिंताजनक घट.
- पशुसंवर्धनात पैदासक्षम नर आणि माद्या यांच्या संख्येतील समतोल हा नेसर्गीक संवर्धन करण्याचा हेतू महत्वाचा. या पार्श्वभूमीवर देशी गोवंशाचे संवर्धन हा कळीचा मुद्दा आहे.
महाराष्ट्रातील गाईंची जातीनिहाय गणना
महाराष्ट्रातील गोवंश | १९ वी पशुगणना -२०१२ | २० वी पशुगणना -२०१९ (अंदाजे संख्या) |
---|---|---|
खिल्लार | १२,९३,१८९ | ५,८२,३२८ |
देवणी | १,२६,६०९ | १,१०,५२९ |
लाल कंधारी | ४,५६,७६८ | ९५,३०२ |
गवळाऊ | १,४५,७७९ | ५०,९३६ |
डांगी | १,०४,५५८ | १,०३,०६९ |
प्रसिद्ध वंशावळ खिल्लार क्षेत्राची[संपादन]
कोडमुर्ग सोन्या(शिंगमोडकं), श्रीशैल दळवाई, तिकोंडी | ||||||||||||||||
गुरूबसू तेली, गाव: संख, ता जत, जि सांगली,तासगाव चॅम्पियन | ||||||||||||||||
मूळ उगमस्थान - गाव: कर्जाल, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर | ||||||||||||||||
मुदक्काप्पा तेली, (सिद्धापूर) - दत्तात्रय काशीद, जवळा | ||||||||||||||||
हे सुद्धा पहा[संपादन]
संदर्भ[संपादन]
- ^ "khillar". dairyknowledge.in. ३१ डिसेंबर २०२० रोजी पाहिले.
- ^ "सांगलीत लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच बैलबाजार फुलला; खिलार बैलाला 'इनोव्हा' एवढी किंमत!". Archived from the original on 2021-05-25. २५ मे २०२१ रोजी पाहिले.
- ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (इंग्रजी भाषेत).
- ^ "Welcome to Vishwa Gou Sammelana". web.archive.org. 2015-07-06. Archived from the original on 2015-07-06. 2020-12-31 रोजी पाहिले.
- ^ डॉ. नितीन मार्कंडेय, अमित गद्रे (२००७). देशी गोवंश. पुणे: सकाळ प्रकाशन. pp. ४१. ISBN 978-93-86204-44-8.