Jump to content

पाराशर व्यास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेदव्यास

मूळ नाव कृष्ण द्वैपायन
भाषा संस्कृत
साहित्यरचना महाभारत, नवग्रह स्तोत्र, कल्कि पुराण
वडील पराशर ऋषि
आई सत्यवती
पत्नी पिंजला (वाटिका)
अपत्ये शुकदेव

पराशर ऋषींचे पुत्र महर्षी वेदव्यास यांनी महाभारत या महाकाव्याची रचना केली. त्यांचे दुसरे नाव कृष्णद्वैपायन व्यास असेही म्हणतात; कारण महर्षी वेदव्यास यांनी द्वैपायन बेटावर तपश्चर्या केल्यामुळे आणि ते रंगाने काळे असल्यामुळे ते कृष्ण द्वैपायन म्हणून ओळखले जाऊ लागला. पुढे वेदांवर भाष्य केल्यामुळे ते वेदव्यास या नावाने प्रसिद्ध झाले. []

महाभारत हा एक प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ आहे. महर्षी व्यास यांनी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला अशी मान्यता आहे.[][]

आख्यायिका

[संपादन]

प्रत्येक द्वापारयुगामध्ये व्यासांच्या रूपाने विष्णूने अवतार घेऊन वेदांचे विभाग सादर केले. पहिल्या द्वापारयुगामध्ये स्वतः ब्रह्म वेद व्यास झाले, दुसऱ्यात प्रजापती, तिसऱ्या द्वापारयुगामध्ये शुक्राचार्य व चौथ्या युगात बृहस्पति वेदव्यास झाले. त्याचप्रमाणे सूर्य, मृत्यू, इंद्र, धनंजय, कृष्ण द्वैपायन, अश्वत्थामा इत्यादी अठ्ठावीस वेदव्यास झाले. अशा प्रकारे अठ्ठावीस वेळा वेदांचे विभाजन झाले.

पाराशर व्यासांनी अठरा पुराणांची रचना केली, असे मानले जाते.[]

महर्षी व्यासांनी एवढे काम करून ठेवले आहे की त्यानंतर वेगळे काहीच उरले नाही, हे सांगणारी 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्' ही उक्ती प्रसिद्ध आहे.

महाभारत म्हणजे मानवी जीवनात उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रश्नांचा विचार करून मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे. महाभारतात जे असेल ते अन्य ग्रंथात असू शकेल पण जे महाभारतात नाही ते-'न तत्र अन्यत्र!' ते कुठेहि असणार नाही, अशी व्यासांनी लिहिलेल्या महाभारत ग्रंथाची प्रसिद्धी आहे.

आणि ते सप्तचिरंजीवांतील एक असल्याचे मानले जाते.[]

जन्म आणि पौराणिक कथा

[संपादन]

धर्म पुराणानुसार इ.स.पू. ३००० च्या सुमारे आषाढ महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी महर्षि वेद व्यास यांचा जन्म झाला होता. महर्षि वेद व्यास अत्यंत ज्ञानी, तेजस्वी आणि महान ऋषी होते. त्यांना चारही वेदांचे पूर्ण ज्ञान होते. म्हणूनच त्यांना वेद व्यास म्हणले गेले.[]

आषाढ शुक्ल पौर्णिमा हा गुरू पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो[]

पौराणिक कथांनुसार, प्राचीन काळी महर्षि पराशर प्रवास करत असताना त्यांना एक स्त्री दिसली. ती नाव सत्यवती ऊर्फ मत्स्यगंधा होती. मासे पकडणाऱ्या एका कोळ्याची ती मुलगी होती. मत्स्यगंधा दिसायला फारच सुंदर आणि आकर्षक दिसत होती पण तिच्या शरीराला माशांचा गंध येई, म्हणून सत्यवतीला 'मत्स्यगंधा'. म्हणून ओळखले जाते.[]महान ऋषि पराशर यांच्या सहवासात देवी सत्यवतीला (मत्स्यगंधा) कुमारिकेला पुत्रप्राप्ती झाली.

मत्सगंधा कुमारिका पुढे हस्तिनापूर राज्याचे राजा शंतनु यांची पत्नी झाली, व तिचे नाव देवी सत्यवती झाले. [][]

व्यासजन्म कथेचा आशय[]

[संपादन]

व्यास जन्माची कथा संक्षेपाने अशी आहे. पराशर ऋषि गंगा पार करण्यासाठी गंगातटावर आले. तटावर एक कोळी होता. परशारांनी कोळ्याला गंगापार करून देण्यास सांगितले. कोळ्याने आपली कन्या मत्स्यगंधा हिला पराशरांना गंगापार नेण्यास सांगितले. त्यावेळी मत्स्यगंधा केवळ सात वर्षाची बालिका होती. मुलीने गंगापार करण्यासाठी ऋषींना नावेत बसवून नाव चालू केली. नाव मध्यधारेत आल्यावर तपस्वी ऋषींचे मन बहकले व त्यांनी त्या सात वर्षाच्या मुलीपाशी संभोगाची इच्छा व्यक्त केली. मुलगी सुद्धा फार धूर्त होती. तिने ऋषींना सांगितले की ती केवळ सातच वर्षाची असल्यामुळे ऋषी तिच्याशी संभोग कसा काय करू शकतील? तर त्यांनी तिचे शरीर पूर्ण षोडशवर्षीय करावे. ऋषींनी तिचे म्हणणे मान्य करून त्या सात वर्षाच्या मुलीला सोळा वर्षाची बनविले. तेव्हा ऋषि त्या युवती मत्स्यगंधेकडून कामतृप्ती करू इच्छिते झाले. परंतु तो दिवसाचा समय होता आणि मुलगी असली म्हणून काय झाले? तिच्या ठायी शालीनता व स्त्रीसुलभ लज्जा होतीच! तिची दिवसाढवळ्या संभोगाला तयारी नव्हती. पण ऋषीतर कामातुर झालेले असल्यामुळे अधिक धीर धरायला तयार नव्हते. "कामातुराणां न भयं न लज्जा।" तेव्हा ऋषींनी त्या दोघांभोवती घनदाट धुके म्हणजे धूम्र वायुमंडल उत्पन्न केले. एवढे गडद की जवळपासचे काहीच दिसत नव्हते. नंतर पराशराने मत्स्यगंधेशी संभोग केला व जो पुत्र प्राप्त झाला त्याचे नाव व्यास असे ठेवण्यात आले.

वरवर पाहिल्यास ही कथा अश्लील आणि अनैतिक दिसते. जीवशास्त्रीय दृष्टीने विचार केला तर सात वर्षाच्या जीवाचे वय एकदम वाढू शकत नाही. शिवाय आदर्श आणि आदरणीय ऋषी इतके अनैतिक होते काय? मुळीच नाही. मग या कथेत कोणते रहस्य भरले आहे? ते रहस्य वायुतत्वाच्या अनुभूतीचे आहे. जे साधक साधना करून वायुतत्वाच्या पलिकडे आकाशतत्वाकडे व त्याहीपलीकडे परातत्वाकडे जाऊ इच्छितात त्यांना भगवान व्यास पराशर ऋषी असे म्हणतात. परा अवस्थेला शर मारणारा तो पराशर ऋषी. परातत्वाचा वेध करण्याविषयी उपनिषदात श्लोक आहे. "प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्मतल्लक्षम् उच्चते।" पराशर वायुतत्वाची साधना करण्यास गंगेवर गेले आणि तेथे त्यांना सात वर्षांची बालिका मिळाली. कोळ्याला व मत्स्याला गंगासागर कसा पार करावा, हे ज्ञान आहे कारण दोघेही ऐल तटावरून पैल तटापर्यंत जावू शकतात. म्हणून सात वर्षांची बालिका कोळी व तिचे नाव मत्स्यगंधा दाखविलेले आहे.  मत्स्य + गं + धा म्हणजे ज्ञानाचा वेग धा म्हणजे धारण करणारी अवस्था! बालिका सात वर्षीय का ? तर आपली काया सात यौगिक चक्रांचीच बनलेली आहे आणि जो साधक आपल्या कायेचा, शरीराचा पूर्ण उपयोग म्हणजेच उपभोग घेईल तो गंगासागर, संसारसागर पार करू शकेल.

नंतर युवती सोळा वर्षांची दाखविलेली आहे. याचा आशय हा की साधक जोपर्यंत पूर्णपुरूष बनत नाही तो पर्यंत तो परातत्वाप्रत पोहोचू शकत नाही. पूर्णपुरूष होण्याकरिता त्याला "षोडशकला युक्त" बनले पाहिजे, उपनिषद अशा पूर्ण साधकाला "षोडशकलापुरूषः" म्हणतात. म्हणून कथेमध्ये सात वर्षाच्या बालिकेला संभोग योग्य सोळा वर्षाची बनविलेली आहे.

आता धुके किंवा धूम्र अवस्थेचे प्रयोजन काय? तर वायुतत्वामध्ये प्रवेश करते वेळी साधकाला आजूबाजूला गडद धुके दिसते. वायुतत्वाच्या या दिव्य अनुभूतीला उद्देशूनच भगवान व्यासांनी पराशर आणि मत्स्यगंधा संभोगाचे समयी कथेत गडद धुके दाखविले. अशा आत्मसंभोगातून म्हणजेच आत्म्याच्या व परमात्म्याच्या मीलनातून वेद म्हणजे ज्ञानाचा जन्म झाला. पुत्र म्हणजे फलप्राप्ती व त्याचे नाव व्यास ठेवले गेले.

वर्तुळाच्या परिघापासून निघून, केन्दबिंदू छेदून, परत परिघापर्यंत जाणारी सरळ रेषा म्हणजे व्यास (diameter) आहे. मनुष्य जन्म-मृत्यूच्या संसार चक्राच्या परिघावर सतत फिरत असतो. एक वेळ येते की ती व्यक्ती विचार करते, नक्की जीवन म्हणजे काय? मी कुठून आलो व कुठे चाललोय? ती परीघावर थांबते व शोध सुरू होतो. ती या चक्राच्या केंद्र बिंदूपर्यंत येते, पूर्ण ज्ञान प्राप्त करते व पुन्हा प्रवास सुरू होतो तो परिघापर्यंत, मिळवलेले ज्ञान समाजाला वाटण्यासाठी! एकूण प्रवास झाला दोन त्रिज्या अंतराचा म्हणजे व्यास अंतर! अशी उच्च अवस्था म्हणजेच भगवान व्यास! जी व्यक्ती संसाराचे पूर्ण ज्ञान प्राप्त करते, ती व्यास होय. व्यास ही उपाधी आहे न की व्यक्तीचे नाव!

अठरा पुराणे आणि त्यांची श्लोकसंख्या [१०]

[संपादन]
  1. अग्नि पुराण(१५,०००)
  2. कूर्म पुराण(१७,०००)
  3. गरुड पुराण(१९,०००)
  4. नारद पुराण(२५,०००)
  5. पद्म पुराण(५५,०००)
  6. ब्रह्म पुराण (१०,०००)
  7. ब्रह्म वैवर्त पुराण(१८,०००)
  8. ब्रह्मांड पुराण(१२,०००)
  9. भविष्य पुराण(१४,५००)
  10. भागवत पुराण(१८,०००)
  11. मत्स्य पुराण(१४,०००)
  12. मार्कंडेय पुराण(९,०००)
  13. लिंग पुराण(११,०००)
  14. वराह पुराण(२४,०००)
  15. वामन पुराण(१०,०००)
  16. विष्णु पुराण(२३,०००)
  17. शिव पुराण(२४,०००)
  18. स्कंद पुराण(८१,१००)

उपपुराणे

[संपादन]

कल्की पुराण

व्यासवंदना

[संपादन]

प्राचीन ग्रंथांनुसार महर्षि वेद व्यास हे स्वतः देवाचे रूप होते. त्यांची स्तुती पुढील श्लोकांनी केली आहे.[११] ======

नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्रः।

येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्ज्वालितो ज्ञानमयप्रदीपः।।

मराठी अर्थ - महाभारतासारख्या ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या अशा प्रचंड बुद्धीच्या महर्षि वेदव्यास यांना माझे नमस्कार असो.

व्यासाय विष्णूरूपाय व्यासरूपाय विष्णवे।

नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नम:।।[१२]

मराठी अर्थ -

ब्रह्मज्ञानाचा निधी असणारे व्यास हे विष्णूचे रूप आहेत आणि विष्णू हा व्यासाचे रूप आहे,

वसिष्ठ मुनी यांच्या वंशजांचा माझा नमस्कार असो. (वसिष्ठाचा मुलगा होता 'शक्ति'; शक्तीचा मुलगा पराशर आणि पराशरांचा मुलगा व्यास.

व्यासांवर लिहिलेली मराठी पुस्तके

[संपादन]
  • महर्षि वेदव्यास (कृष्णाजी कोल्हटकर)
  • महर्षी वेदव्यास (कादंबरी, लेखक - सुधाकर शुक्ल)
  • महर्षी व्यास (कादंबरी, लेखक -जनार्दन ओक)
  • व्यासपर्व (ललित, लेखिका - दुर्गा भागवत)
  • भारतीय संस्कृतीचे व्यवस्थापक महर्षी व्यास (कादंबरी, लेखिका - विद्यावाचस्पती अनुराधा कुलकर्णी


संदर्भ यादी

[संपादन]
  1. ^ a b c "वेदव्यास". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2020-01-08.
  2. ^ "महाभारत". विकिपीडिया. 2019-10-27.
  3. ^ "Vyasa". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-28.
  4. ^ admin. "महर्षि वेदव्यास के बारे में कुछ अनसुने तथ्य Maharishi Vedvyas Secret Facts". Gyan Manthan (इंग्रजी भाषेत). 2020-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-14 रोजी पाहिले.
  5. ^ नवभारतटाइम्स.कॉम. "ऐसे पैदा हुए थे गुरु महर्षि व्यास, इनके जन्मदिन पर मनाते हैं गुरु पूर्णिमा". नवभारत टाइम्स (हिंदी भाषेत). 2019-09-14 रोजी पाहिले.
  6. ^ नवभारतटाइम्स.कॉम. "ऐसे पैदा हुए थे गुरु महर्षि व्यास, इनके जन्मदिन पर मनाते हैं गुरु पूर्णिमा". नवभारत टाइम्स (हिंदी भाषेत). 2019-09-14 रोजी पाहिले.
  7. ^ "गुरुपौर्णिमा". विकिपीडिया. 2019-07-17.
  8. ^ admin. "महर्षि वेदव्यास के बारे में कुछ अनसुने तथ्य Maharishi Vedvyas Secret Facts". Gyan Manthan (इंग्रजी भाषेत). 2020-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-14 रोजी पाहिले.
  9. ^ हरकरे, योगीराज मनोहर (२२ डिसेंबर २०११). साधना, साधक आणि दिव्यानुभूती. नागपूर: वैदिक विश्व प्रकाशन. pp. ६०, ६१, ६२.
  10. ^ "पुराण". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-08-17.
  11. ^ "वेदव्यास". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-07-19.
  12. ^ "वंदे मातृ संस्कृति". www.facebook.com. 2019-09-13 रोजी पाहिले.