अश्वत्थामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

अश्वत्थामा हा कौरव-पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र. याच्या कपाळावर जन्मापासूनच एक मणी होता. अश्वत्थामा हाही द्रोणाचार्यांचा शिष्य असल्याने तो अर्जुनाप्रमाणेच शस्त्र आणि अस्त्र विद्येत पारंगत असून तेजस्वी आणि दिव्य शक्तींचा उपयोग करण्यात निपुण होता.

कौरव-पांडवांच्या युद्धात द्रोणाचार्यांनी कौरवांचे सेनापतीपद स्वीकारल्यानंतर पांडवसेनेवर त्यांनी तिखट हल्ला चालू केला. पांडवांची बाजू मार खाऊ लागली. द्रोणाचार्य यांचा आपल्या मुलात अतिशय जीव आहे हे श्रीकृष्णाला ठाऊक असते. अश्वत्थामा मेला असे जर द्रोणाचार्यांना पटवून देता आले तर ते दिङ्‌मूढ होतील आणि युद्ध करण्याची इच्छा त्यांना राहणार नाही असा श्रीकृष्णाचा तर्क होता. द्रोणाचार्यांना शस्त्र खाली ठेवायला लावायचा हाच एक उपाय आहे हे कृष्णाने युधिष्ठिराला पटवून दिले. तेंव्हा भीमाद्वारे अश्वत्थामा नावाच्या एका हत्तीचा वध घडवून कृष्णाने 'अश्वत्थामा मेला' अशी आवई उठवली. रणधुमाळीत सत्य कोण सांगेल असा प्रश्न द्रोणाचार्यांना पडला. तेंव्हा सर्वात विश्वसनीय सत्यवादी मनुष्य म्हणून त्यांनी युधिष्ठिराला विचारले की खरेच अश्वत्थामा मेला काय? परंतु कृष्णाच्या सांगण्यावरून युधिष्ठिराने स्पष्ट काही न सांगता "अश्वत्थामा मेला खरा, पण 'नरो वा कुंजरो वा'" असे उत्तर दिले. त्या वाक्यातला ’अश्वत्थामा मेला’ एवढेच शब्द ऐकून, मानसिक धक्का बसलेले द्रोणाचार्य यांनी शस्त्र खाली ठेवले. दृष्टद्युम्नाने याचा फायदा उचलत त्यांचा वध केला.

पुढे अश्वत्थाम्यानेही दृष्टद्युम्नाचा वध करून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला.

अश्वत्थाम्याने महाभारत युद्धात कौरवांचा शेवटचा सेनापती म्हणून काम पहिले[१]. युद्ध संपल्यावर आणि दुर्योधन मृत्यू पंथास लागला असतांना अश्वत्थाम्याने त्याला "पांडवांची शिरे कापून आणतो" असे आश्वासन दिले. परंतु अंधार असल्याने त्याला पाच पांडवपुत्रांचीच मुंडकी आणणे शक्य झाले. आपला निर्वंश झाला हे पाहून संतप्त पांडव अश्वत्थाम्याला त्याला शोधत आले. अर्जुन व अश्वत्थामा दोघे एकमेकांवर ब्रह्मास्त्र फेकतात. यामुळे सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून कृष्ण दोघांना आपापले ब्रह्मास्त्र परत घ्यायला सांगतो. परंतु अश्वत्थाम्याला अस्त्र परत घेण्याची कला माहीत नसल्यामुळे तो अभिमन्यूची पत्‍नी उत्तरेच्या गर्भात ते सोडतो. यावर क्रोधित होऊन कृष्ण त्याच्या कपाळावरचा दिव्य मणी काढून घेतो आणि त्याला शाप देतो की कल्पकल्पांतापर्यंत ही जखम कपाळी घेऊन, तू जखमेवर लावण्यासाठी तेल मागत दारोदार फिरशील. आणि कपाळी जखम घेऊन आजही तो तेल मागत वणवण फिरतो असे मानले जाते.

अश्वत्थामा हा अमर झाल्यामुळे तो सप्तचिरंजीवांमध्ये गणला जातो.

अश्वत्थाम्याविषयी ललित पुस्तके[संपादन]

  • अरे अश्वत्थामा (लेखक श्रीनिवास भणगे)
  • अश्वत्थामा (हिंदी, लेखक - आशुतोष गर्ग)
  • अश्वत्थामा (६ आवृत्त्या, संजय सोनवणी)
  • अस्वस्थ आत्मा अश्वत्थामा (लेखक - सुधाकर शुक्ल)
  • चिरंजीव... अश्वत्थामा (लेखक - शंकर टिळवे)
  • महाभारतातील अश्वत्थामा (लेखिका विजया देशमुख)
  • मी अश्वत्थामा... चिरंजीव (कादंबरी, लेखक - अशोक समेळ)
  • युगान्त ( लेखिका इरावती कर्वे)
  • परधर्मो भयावहः (लेख, लेखिका इरावती कर्वे)

संदर्भ[संपादन]

  1. ^ India, Mythak Tv. "अश्वथामा- कुछ अनकहे रहस्य महाभारत के". Mythak Tv (इंडोनेशियन भाषेत). 2019-01-24 रोजी पाहिले.