Jump to content

जयद्रथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जयद्रथ हा सिंधुदेशाचा नरेश वृद्धक्षत्र याचा पुत्र व महाभारतात उल्लेखिलेल्या सिंधु, शिबिसौवीर देशांचा राजा होता. धृतराष्ट्रगांधारी यांची एकमेव कन्या असलेल्या दुःशलेशी याचा विवाह झाला. महाभारतीय युद्धात तो कौरवांच्या पक्षातून लढला व अर्जुनाच्या हातून मारला गेला. त्याच्या अनेक पुत्रांमध्ये सुरथ नावाचा एक पुत्र होता.

जयद्रथ हा पांडवांचा द्वेष करीत असे. त्याला बलाहक, आनीक, विदारण आदि सहा भाऊ होते. हा एका स्वयंवरासाठी शाल्व देशाला जात असताना काम्यकवन नावाच्या गावात मुक्कामाला होता. त्याच्यासह त्याचे सहा भाऊ, शिबिकुलाचा राजपुत्र कोटिक, त्रिगर्तराजपुत्र क्षेमंकर, इक्ष्वाकुकुलातला सुपुष्पित आणि कलिंगपुत्र होते. त्याशिवाय इतर बारा राजपुत्र आणि त्यांचे सैन्य होते. शिकारीसाठी गेला असताना जयद्रथ पांडवांच्या वनवासातील आश्रमापाशी पोहोचला. तिथे फक्त द्रौपदी, तिची दासी आणि म्हातारे धौम्य ऋषी होते. जयद्रथाने आपल्या सैन्यासह तिथे जाऊन द्रौपदीला रथात घालून पळवून नेले. ते पाहून धौम्य ऋषींनी रथाचा पाठलाग करण्याचा प्रयत्‍न केला. पांडवांना हे समजताच त्यांनी दूर अंतरावर गेलेल्या जयद्रथाला गाठले आणि त्याच्याशी लढाई केली. तीत अनेक राजपुत्र मारले गेले. संपूर्ण सेनेचा नाश झालेला पाहून जयद्रथ पळाला,आणि भीम-अर्जुनांना बऱ्याच शोधानंतर सापडला. भीमाने त्याला खूप बडवले आणि त्याच्या केसाचे पाच पाट काढून त्याला आश्रमात आणले. त्याला मारून टाकले तर दुःशला आणि धृतराष्ट्र-गांधारी यांना फार दुःख होईल म्हणून भीमार्जुनांनी शेवटी त्याला युधिष्ठिराच्या विनंतीवरून जिवंत सोडून दिले.

अशा प्रकारे पांडवांकडून अपमानित झालेल्या जयद्रथाने खूप तप केले व भगवान शंकरांकडून पांडवांच्यावर विजय मिळावा असा वर मागितला. शंकराने अर्जुनाच्या अनुपस्थितीत कोणताही पांडव तुला हरवू शकणार नाही असा वर दिला. त्यामुळेच अर्जुनाच्या अनुपस्थितीत चक्रव्यूह भेदायला अभिमन्यूबरोबर गेलेले पांडव जयद्रथाला हरवू शकले नाहीत, आणि शेवटी अभिमन्यू मारला गेला. त्याच्या प्रेताला जयद्रथाने लाथ मारली. हे समजल्यावर बाहेरून परत आलेल्या अर्जुनाने पुढच्या सूर्यास्ताच्या आत जयद्रथाला मारीन अशी प्रतिज्ञा केली. आणि आकाशात आलेल्या ढगांमुळे सूर्यास्त झाला असे समजून बाहेर पडलेल्या जयद्रथाला मारून अर्जुनाने ती प्रतिज्ञा पार पाडली.

जयद्रथाला त्याच्या पित्याने (वृद्धक्षत्राने) असा वर दिला होता की जो त्याचे मस्तक जमिनीवर पाडेल त्या पाडणाऱ्याच्या डोक्याचे शेकडो तुकडे होतील. श्रीकृष्णाने अर्जुनाला याबाबतीत इशारा दिला होता. अर्जुनाने जयद्रथाला बाण मारून त्याचे शिर असे उडवले की ते थेट शेकडो मैल दूर बसलेल्या जयद्रथाच्या वडिलांच्या मांडीवर पडले. वडील दचकून उभे राहिले आणि त्यांच्या मांडीवरले जयद्रथाचे मस्तक जमिनीवर घरंगळले. त्याक्षणी वडलांच्या डोक्याची शंभरावर शकले होऊन त्यांचा मृत्यू झाला. जयद्रथासमोर ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ हे श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणलेले वाक्य मराठी भाषेत म्हण स्वरूपात प्रचलित आहे.

जयद्रथ वध (काव्य)

[संपादन]

हिंदी कवी मैथिलीशरण गुप्त यांनी जयद्रथ वध नावाचे खंडकाव्य लिहिले आहे.(इ.स. १९१०). हे काव्य हरिगीतिका छंदामध्ये असून त्यात ७ सर्ग आहेत.