शंतनू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शंतनू व सत्यवती. राजा रवि वर्मा यांचे चित्र.

शंतनू हा महाभारतातील हस्तिनापूरचा भरतवंशी व चंद्रकुळातील राजा होता. तो राजा प्रतीपचा सर्वात लहान मुलगा व भीष्म, चित्रांगदविचित्रवीर्य यांचा पिता होता.

शंतनू व गंगा[संपादन]

तरुणवयात शंतनू गंगेच्या प्रेमात पडतो व तिला लग्नाची मागणी घालतो. मात्र गंगा एका अटीवर लग्नास तयार होते. ती अट म्हणजे तिने काहीही केले तरी शंतनू तिला त्याचे कारण विचारणार नाही. शंतनू ही अट मान्य करतो व गंगेशी लग्न करतो. मात्र त्यांना पहिला मुलगा झाल्यावर लगेच गंगा नवजात बालकास नदीमध्ये टाकून देते. मात्र वचनबद्ध शंतनू तिला याचे कारण विचारू शकत नाही. अशाप्रकारे गंगा एकामागोमाग एक सात नवजात बालकांना गंगेत टाकून देते. आठव्या मुलाच्या जन्मानंतर मात्र शंतनू न रहावून तिला त्याचे कारण विचारतो. गंगा त्या शेवटच्या बालकास मारत नाही मात्र शंतनूने वचनभंग केल्यामुळे ती त्याला सोडून जाते. हा शेवटचा मुलगा देवव्रत (नंतरचा भीष्म) या नावाने महाभारतातील प्रमुख पात्राच्या रूपाने पुढे येतो.

शंतनू व सत्यवती[संपादन]

देवव्रत मोठा झाल्यावर शंतनू त्याला हस्तिनापूरचा भावी राजा म्हणून घोषित करतो. एकदा शंतनू व देवव्रत शिकारीला गेले असता यमुना नदीच्या काठावर शंतनू सत्यवती या दाशराज नावाच्या कोळ्याच्या मुलीला पाहून तिच्या प्रेमात पडतो. तो दाशराजाला भेटून सत्यवतीची मागणी घालतो. परंतु 'सत्यवतीचा पुत्र हा हस्तिनापूरचा भावी राजा होणार असेल, तरच तिचा विवाह शंतनूशी होईल' अशी अट दाशराज घालतो. शंतनू ते मान्य करत नाही व तिथून परततो. मात्र देवव्रताला हे समजल्यावर तो दाशराजाला भेटून त्यांना वचन देतो की सत्यवतीचा पुत्रच हस्तिनापूरचा राजा बनेल. पण या वचनानेसुद्धा दाशराजाचे समाधान होत नाही. त्याला वाटत असते की सद्ध्या जरी देवव्रताने स्वतः राजा न होण्याचे वचन दिले असले तरी त्याच्या पुढील पिढ्या राजगादीवर आपला हक्क सांगतील. दाशराजाचे समाधान करण्यासाठी देवव्रत प्रतिज्ञा करतो की तो आजीवन ब्रह्मचारी राहील, ज्यामुळे सत्यवतीचे वंशजच हस्तिनापूरचे राजे बनतील. या भीषण प्रतिज्ञेमुळे देवव्रत पुढे भीष्म म्हणून ओळखला जाऊ लागतो.

अशाप्रकारे सत्यवती व शंतनूचा विवाह होतो. व त्यांना चित्रांगदविचित्रवीर्य ही दोन मुले होतात. मात्र आपल्यामुळेच भीष्माला ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करावी लागली या अपराधीभावनेमुळे यानंतर लवकरच शंतनूचा मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूनंतर सत्यवती काही काळ भीष्माच्या मदतीने हस्तिनापूरच्या संत्तेचा सांभाळ करते व नंतर चित्रांगद हस्तिनापूरचा राजा बनतो.