विष्णु पुराण
सत्यव्रत म्हणाला, ते ऐकून मासा समुद्राच्या मधोमध गेला आणि एका मोठ्य़ा डोंगरासारखा वाढत वाढत त्याने सर्व महासागर व्याप्त केला व म्हणाला - ‘‘सत्यव्रता! पाहिलेस? तू म्हणालास ते अमोघ ठरले, पाहातो आहेस ना! आणखी काम चालूच आहे. असा आणखी वाढत वाढत काय होतो, नकळे!’’ तेव्हां सत्यव्रत हात जोडून नमस्कार करीत म्हणाला - ‘‘मत्स्यरूपांत असलेल्या हे नारायणा! मी रक्षण कर म्हणताच आलांस आणि माझ्या रक्षणार्थ मत्स्यावतार धारण केलांस. तुझी अगाध लीला कळण्याइतका मी मोठा आहे कां रे?’’ अशाच तऱ्हेने अनेक प्रकारे नारायणाचा स्तुतिपाठ केला.
तेव्हां मत्स्यावतार धारण केलेला विष्णू म्हणाला - ‘‘अरे राजा! सात दिवसांत कल्पान्त होणार आहे. व सर्व जग जलमय होईल. ज्ञान, औषधी वनस्पती व बीजें नष्ट होता कामा नयेत. पुढे येणाऱ्या कल्पान्ता या सर्वांचे रक्षण झाले पाहिजे. तुझ्यासाठी एक मोठी नौका, अंधकारात जसा दिवा असावा, तशी येत आहे. त्या नौकेमध्ये सप्तर्षी असतील ती ज्योती त्यांचीच समज!’’
‘‘औषधी वनस्पती, बियाणाच्या राशी, वगैरे तू आपल्याबरोबर नौकेत भर! माझ्या नाकावरच्या शिंगाने मी तुम्ही ज्या नावेत असाल ती नाव बुडू नये व तिचे रक्षण व्हावे, यासाठी सर्व प्रयत्न करीन. म्हणून मी असा अवतार धारण केला आहे. ब्रह्मदेव जागा होईपर्यंत नाव ध्रुव ताऱ्याच्या दिशेने तरंगत जात राहील. येणाऱ्या कल्पांत तू वैवस्वत या नांवे मनू होशील!’’ असा नारायणाने आदेश दिला. सत्यव्रताने विष्णूला गुडघे टेकून नम्रपणे नमस्कार केला. मत्स्यावतार आपल्या चारही कल्ल्यांनी पोहत आणि शेपटी पाण्यावर आपटीत वेगाने लाटांना कापीत खोल निघून गेला. ब्रह्मदेव गाढ झोपेत होता. सर्वत्र अंधकार पसरला व जग काळोखांत बुडाले.
विष्णूपुराण या विषयावरील मराठी पुस्तके[संपादन]
- श्री विष्णू पुराण (संपादक - दत्ता कुलकर्णी)
- विष्णूपुराण (प्र.न. जोशी)
- विष्णू पुराण कथासार (काशिनाथ जोशी)