Jump to content

कुंति

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कुंती या पानावरून पुनर्निर्देशित)
कुंति वानप्रस्थासाठी जात असताना; मागे धृतराष्ट्रगांधारी (काल्पनिक चित्र; इ.स. १५९८)

कुंति (देवनागरी लेखनभेद : कुंती) ही महाभारतातील हस्तिनापुराच्या पंडु राजाची पत्नी व पांडवांमधील थोरल्या तिघांची आई होती. यादव कुळातील शूरसेनाची कन्या असलेल्या कुंतीचे बालपणीचे नाव पृथा असे होते. निःसंतान असलेल्या कुंतिभोज राजाला दत्तक गेल्यावर तिचे नाव कुंति असे ठेवण्यात आले.

कुंतिच्या सेवेवर प्रसन्न होऊन दुर्वास ऋषिंनी तिला एका मंत्राचे वरदान दिले. त्या मंत्राचा वापर करताच ज्या दैवताचे स्मरण ती करेल, त्या देवाकडून तिला पुत्रप्राप्ती होणार होती. कुमारी असलेल्या कुंतीने सूर्याचे स्मरण करून मंत्रोच्चार केला आणि मंत्राच्या प्रभावाने पुत्रप्राप्ती झाली. ह्या सुर्यपुत्राला जन्मतः अंगावर अभेद्य कवच आणि कानात कुंडले होती. या पुत्राचे नाव कुंतिने कर्ण असे ठेवले. परंतु अविवाहीत असताना या पुत्राला जवळ ठेवणे तिला शक्य नव्हते म्हणून कुंति एका पेटीत विपुल धन ठेवून त्यामधे या पुत्राला ठेवते व ती पेटी नदीत सोडून देते. ही पेटी अधिरथ नावाच्या कौरवांच्या सूताला सापडते. तो या पुत्राला आपल्याच पोटच्या मुलाप्रमाणे वाढवतो.

पुढे कुंतिचा विवाह हस्तिनापूरचा राजा पांडुशी याच्याशी होतो. तिला माद्री नावाची सवत देखील होती. एकदा पांडू मृगया करताना चुकून किंदम ऋषी पति-पत्नीस हरीणांची जोडी समजून बाण मारतो. मरण्यापूर्वी किंदम ऋषी पांडूला शाप देतात की जेव्हा तो एखाद्या स्त्रीजवळ शरिरसुखाच्या अपेक्षेने जाईल, तेव्हा त्याला तात्काळ मृत्यू येईल. यानंतर विफल होऊन, राज्यत्याग करून पांडू आपल्या दोन्ही पत्नींसह वनवासात राहू लागतो. पुत्रप्राप्तीचा मार्ग खुंटल्याने पांडू कुंति व माद्रीला नियोग पद्धतीने पुत्रप्राप्ती करून घेण्यास सांगतो. तेव्हा कुंतिने तिच्याकडे असलेल्या मंत्राच्या सामर्थ्याबद्दल पांडूला सांगते. पांडूने त्या मंत्राद्वारे पुत्रप्राप्ती करून घेण्यास सहमती दर्शवतो. त्याबरोबर कुंति यमापासून युधिष्ठीर, वायूपासून भीम आणि इंद्रापासून अर्जुन असे तीन पुत्र प्राप्त करून घेते. आपली सवत माद्री हिलादेखील माता होण्याचा अधिकार मिळावा म्हणून कुंति आपला मंत्र तिला देऊन टाकते. नंतर माद्री त्या मंत्रसामर्थ्याने अश्विनीकुमारांपासून नकुल आणि सहदेव हे जुळे पुत्र प्राप्त करून घेते. पांडू राजाच्या या पाच पुत्रांनाच पांडव असे म्हणतात. कुंति माद्रीच्या मुलांनाही आपल्या पोटच्या मुलांप्रमाणेच वागणूक देते.

पुढे शापाचा विसर पडून पांडू व माद्रीसोबत प्रणय करू पहात असताना, त्याचा किंदम ऋषींच्या शापाच्या प्रभावाने मृत्यू होतो व त्याचे प्रायाश्चित म्हणून माद्री सति जाते. यानंतर कुंति आपल्या पाचही पुत्रांना घेऊन हस्तिनापुरास परतते. या घटनेमुळेच दुर्योधनाच्या मनात असंतोष जागा होतो.

कौरवपांडव कुमारवयीन असताना हस्तिनापुरात युद्धकला प्रतियोगितेचे आयोजन केलेले असताना तेथे कर्णास पाहिल्यावर कुंति त्याला आपला पहिला पुत्र म्हणून ओळखते, मात्र ती याची वाच्यता कुठेही करत नाही. महाभारत युद्धापूर्वी श्रीकृष्ण जोपर्यंत कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य सांगत नाही तोपर्यंत कुंति ही आपली माता आहे, हे कर्णालादेखील ठाऊक नसते.

द्रौपदीचा पाच पांडवांशी विवाह होण्यास कुंतिच्या तोंडून अनावधानाने बाहेर पडलेले शब्द कारणीभूत होतात.

पुढे महाभारत युद्धप्रसंगी एके दिवशी कुंति आपला पहिला पुत्र कर्ण यास भेटावयास जाते व त्याचा जीव वाचवण्यासाठी, त्याला पांडवांना सामिल होण्याविषयी सुचवते, मात्र कर्ण या गोष्टीस नकार देतो. या युद्धामधे कर्ण अर्जुनाकरवी मारला जातो. यानंतर कुंती कर्णाच्या जन्माचे रहस्य पांडवांना सांगते व त्याचा अंत्यविधी योग्य प्रकारे व्हावा असे आवाहन करते.

महाभारत युद्धसमाप्तीनंतर कुंति राजसुखाची अपेक्षा न करता धृतराष्ट्रगांधारी यांच्यासोबत वानप्रस्थाश्रमास निघून जाते.

कुंती वरील पुस्तके

[संपादन]

कुंतीच्या जीवनावर अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही :-

  • कुंती (अनंत तिबिले)
  • कुंती (अनुवादित, अनुवादक - प्रा. सुधीर कौठाळकर; मूळ लेखक - रजनीकुमार पंड्या)
  • कुंती (लेखिका - सरोजिनी शारंगपाणी)
  • कुन्ती (हिंदी, डॉक्टर विजय)
  • कुन्ती एक माँ (हिंदी, शिवाशंकर त्रिवेदी)
  • कुंती... मी राजमाता (अनंत अंबादास कुलकर्णी)