Jump to content

जरासंध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चित्र:Birth of Jarasandha.jpg
जन्म
भीमाच्या हातून जरासंधाचा वध

जरासंध हा महाभारतकालीन मगध देशाचा राजा व महाभारतातील कृष्णाचा प्रमुख शत्रू होता. श्रीकृष्णालाही पलायन करायला लावणाऱ्या जरासंधाला मयुरी च्या स्वयंवरात महारथी कर्णाने द्वंद्वयुद्धात जीवनदान दिले होते. तो एक शक्तिशाली राजा असून त्याचे स्वप्न एक चक्रवती सम्राट बनण्याचे होते, परंतु तो अत्यंत क्रूर होता. अनेक देशांच्या राजांना त्याने आपल्या कारागृहात बंदी बनवून ठेवले होते. मथुरा नरेश कंस त्याचा जावई होता व तो त्याचा सासरा होता. श्रीकृष्णाने केलेल्या कंसवधाचा प्रतिशोध घेण्यासाठी त्याने १७ वेळा मथुरा राज्यावर चढ़ाई केली, पण प्रत्येक वेळी त्याला असफल व्हावे लागले. श्रीकृष्णाने भीमाच्या हातून याचा वध घडवून आणला. कृष्णाने राजसूय यज्ञ करण्याची कल्पना उचलून धरली. पण पांडवांना जरासंधाच्या सम्राटपदाची माहिती सांगून त्याला हरवल्याशिवाय युधिष्ठिराला राजसूय यज्ञ करण्याचा अधिकार नाही असे दाखवून दिले. जरासंध व यादव यांच्यामधील वैराचा सर्व इतिहास सांगितला. जरासंधाच्या बाजूने असलेल्या राजांची नामावळी सांगितली. एक युधिष्ठिराचा मामा पुरुजित कुंतिभोज सोडला तर इतर सर्व राजे, त्यांत पांडूचा मित्र असलेला राजा भगदत्त, कृष्णाचा सासरा भीष्मक,शिशुपाल वगैरे सर्व, जरासंधालाच सम्राट मानतात ही वस्तुस्थिति ऐकवली. ’थोडादेखील विसावा न घेता घोर अस्त्रांनी तीनशे वर्षे लढलो तरी जरासंधाचा पराभव करणे शक्य नाही’ या कारणास्तव भोजांच्या अठरा घराण्यांनी व नंतर इतर यादव घराण्यांनीहि, मथुरा सोडून द्वारकेला नवीन शहर वसवून, बंदोबस्तात राहणे पसंत केले हा इतिहास सांगितला. जरासंध व त्याचे दोन सेनापति हंसडिंभक यांच्या पराक्रमामुळे त्याने अनेक राजे युद्धात हरवून, त्याना तुरुंगात टाकले आहे व शंभर राजे पकडल्यावर त्यांचा यज्ञात बळि देण्याचा त्याचा विचार आहे, तेव्हा त्याला हारवल्याशिवाय वा मारल्याशिवाय तुम्ही राजसूय यज्ञ कसा करणार असा प्रष्न उपस्थित केला. वास्तविक, यादवांबरोबरच्या युद्धात हंस व डिंभक मरण पावले होते. तरीहि युद्धामध्ये जरासंधाला हरवण्याची उमेद यादवांना राहिली नव्हती. तेव्हा, द्वंद्वामध्ये गाठून जरासंधाला एखाद्या महान वीराने मारले तरच त्याचे पारिपत्य शक्य होते. यासाठी अर्थातच भीमाशिवाय दुसरा कोण समर्थ होता? वास्तविक कुरूंचे व जरासंधाचे वैर नव्हते. भीष्माशी वैर वा युद्ध जरासंधालाही परवडले नसते! युधिष्ठिराने सरळ दूत पाठवून राजसूय यज्ञ करण्याचा प्रस्ताव जरासंधासमोर मांडला असता तर युधिष्ठिराबद्दलच्या आदरापोटी व भीष्माच्या धाकाने जरासंधाने कदाचित त्याला मान्यता दिलीहि असती. पण या पर्यायात कृष्णाला रस नव्हता! त्याला या निमित्ताने जरासंधाचा काटा काढावयाचा होता व त्याच्या कैदेत पडलेले आपले बांधव सोडवावयाचे होते.