Jump to content

जिजाबाई शहाजी भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जिजाबाई भोसले या पानावरून पुनर्निर्देशित)
जिजाबाई शहाजीराजे भोसले
राजमाता
शिवरायांसमवेत जिजाबाईंचा पुतळा
पूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले
पदव्या राजमाता, कुलमुखत्यार
जन्म १२ जानेवारी १५९८
सिंदखेडराजा, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू १७ जून १६७४ (वय ७६)
पाचाड, रायगड जिल्हा, महाराष्ट्र
पूर्वाधिकारी पद निर्माण
उत्तराधिकारी सोयराबाई
वडील लखुजीराव जाधव
आई म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई
पती
संतती छत्रपती शिवाजीराजे भोसले
संभाजी शहाजी भोसले
राजघराणे भोसले
चलन होन

राजमाता जिजाबाई शहाजी भोसले (१२ जानेवारी इ.स. १५९८ - १७ जून , इ.स. १६७४)[] ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते.[] जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.[ संदर्भ हवा ]

जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या.

भारत सरकारने ७ जुलै १९९९ रोजी जिजाबाईंच्या सन्मानार्थ डाक तिकीट प्रकाशित केले.[][] जिजाबाई या अनेक चित्रपट आणि पुस्तकांच्या प्रेरणा आहेत.

इतिहास

[संपादन]

जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथील म्हाळसाबाई आणि लखुजी जाधव यांच्या पोटी झाला. लखोजीराजे जाधव हे मराठा कुलीन होते. जिजाबाईंचा विवाह लहान वयातच वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले.[]

१७ जून १६७४ रोजी जिजाबाईंचा मृत्यू झाला. सी.व्ही. वैद्य यांनी त्यांच्या मध्ययुगीन भारत या पुस्तकात असे म्हणले आहे की, यादव "निश्चितपणे शुद्ध मराठा क्षत्रिय" आहेत. [जिजाबाई (शिवाजी महाराजांच्या, ज्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली, त्यांच्या आई) या मराठा/ देवगिरि जाधव/यादव साम्राज्याचे महाराज लखोजीराजे जाधवांच्या पुत्री होत्या,[][]

भोसले व जाधवांचे वैर

[संपादन]

लखुजीराव जाधव हे निजामशाही दरबारातील बलाढ्य, मातब्बर मंडळी पैकी एक होते. एक दिवशी सर्व सरदार, जहागिरदार, मनसबदार आणि वतनदार शाही कदम पोशी करून आपापल्या घरी जावयास निघाले असता. महाद्वार सामोरी भयंकर गर्दी झाली. या गर्दीत खंडागळ नावाच्या सरदाराचा हत्ती अनियंत्रित झाला. आणि लोकांना पायाखाली तुडवू लागला.

अशावेळी लखुजीराव जाधव यांचा मुलगा दत्ताजीने आपल्या सैन्यासह हत्तीला रोखण्यासाठी त्यावर बाणांचा,भाल्यांचा आणि तलवारीचा वार करू लागले. हा सर्व प्रकरण रोखण्यासाठी विठोजी राजे भोसले यांचे दोन्ही मुले संभाजी आणि खेलोजी ( शहाजीराजे यांचे चुलतभाऊ ) दत्ताजी वर तुटून पडले. आणि भोसले - जाधव यांच्यात युद्ध पेटले. आणि संभाजी ने दत्ताजीला ठार केले. ही बातमी पुढे पोहचलेल्या लखुजीराव जाधव यांना कळताच ते सूड घेण्यासाठी भोसल्यांवर चालून आले.

आणि संभाजी वर प्रहार केला. आपल्या चुलतभावावर वार केला म्हणून शहाजीराजे भोसले देखील या लढाईत उतरले परंतु लखुजीराव जाधवांचा आक्रोश सामोरी त्यांचा टिकाव लागला नाही. लखुजीराव यांच्या तलवारीच्या प्रहाराने शहाजी महाराज गंभीर जखमी झाले. आणि त्यांनी अखेरीस संभाजीला ठार केला.[]

या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले.[] नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.

अपत्ये

[संपादन]

जिजाबाईंना एकूण सहा (६) अपत्ये होती. त्यापैकी ४ दगावली (मतभेद आहेत) व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.

जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.[१०]

मुलाचे संगोपन व राजकारभार

[संपादन]

शिवाजी महाराज १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिजाऊ यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवरायांना पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.[११]

शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत.

मृत्यू

[संपादन]

१७ जून १६७४ रोजी किल्ले रायगडाजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले. तेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अवघे बारा दिवस झाले होते.[१२]

जीवन व कार्य

[संपादन]

जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. हे सर्व गुण त्यांनी त्यांचा शिवरायांना दिले. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या.[१२]

त्यांचा मोठा मुलगा संभाजीचा मृत्यू अफझलखानाने केला होता. त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी शिवरायांना प्रोत्साहन दिले, जे त्यांनी पूर्ण केले.

पुणे येथील आपल्या पतीची जहागीर त्यांनी समर्थपणे चालवून त्याचा विकास केला. त्यांनी कसबापेठ गणपती मंदिराची स्थापना केली. तसेच केवरेश्वर मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला.[१२]

शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पार पाडली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.

शिवरायांच्या पहिल्या पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांचे जुलमाने धर्मपरिवर्तन झाले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.

राजांच्या सर्व स्वाऱ्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवत रांगणा किल्ला जिंकून घेतला. जिजाबाईंनी पूर्णतः जबाबदारी उतारवयातही कौशल्याने निभावून नेली.

पुस्तके

[संपादन]

राजमाता जिजाबाईंचे गुणवर्णन करणारी अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही-

  • जिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह, कवयित्री - मेधा टिळेकर
  • जेधे शकावली
  • शिवभारत
  • जिजाऊ (डॉ प्रतिमा इंगोले )
  • जिजाई : मंदा खापरे ट
  • गाऊ जिजाऊस आम्ही : इंद्रजीत भालेराव
  • अग्निरेखा

चित्रपट

[संपादन]

जिजाबाईंची भूमिका असणारे अनेक मराठी चित्रपट व मराठी नाटके आहेत. शिवाजी महाराजांवरील चित्रपट-नाटकांत जिजाबाईंचे पात्र बहुधा असते. परंतु जिजाबाईंवर स्वतंत्र असे फारच थोडे चित्रपट निघाले, त्यांपैकी काही हे :-

  • राजमाता जिजाऊ (दिग्दर्शक - यशवंत भालकर)
  • स्वराज्यजननी जिजामाता (दूरचित्रवाणी मालिका, निर्माते : अमोल कोल्हे)

जगाला दिशा देणारी जगत्जननी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब

[संपादन]

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्याच प्रेरणेने कानंद, गुंजन, वेळगंड मोसे खोऱ्यातील वीर बाजी पासलकर, झुंजारराव मारळ, तानाजी मालुसरे आदी 600 तरुण संवगड्यांना सोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मोठ्या युक्तीने जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत मुत्सद्देगिरीने बिना लढाई किल्लेदार पळून गेला असे आदिलशाहीला कळवून पहिला किल्ला तोरणा ताब्यात घेतला‌.पुढे निजामशाहीचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा ह्याच्याशी स्वराज्य उभारणीबाबत चर्चा करून नरसाळा किल्ला मिळविला. चाकणचा किल्लेदार सुद्धा स्वराज्याच्याच विचाराने प्रेरित होऊन स्वराज्यात दाखल झाला. रक्ताचा थेंबही न सांडता तीन किल्ले लोकांच्या उस्फुर्त पाठींब्यातुन मिळाले. लोकांना स्वराज्य पाहिजे आहे हे स्पष्ट झाले, पुढे कोंढाण्याच्या मुसलमान किल्लेदाराला भरपूर पैसे देऊन गड ताब्यात घेतला. शहाजीराजांची परंपरागत जहाँगिरी होती पुणे, सुपे, बारामती, इंदापूर आणि शिरोळ या जहाँगिरीच्या सुरक्षिततेसाठी पुरंदर किल्ला स्वराज्यात असणे किती गरजेचे आहे, हे माँसाहेब जिजाऊंनी पटवून दिले. ऐन दिवाळीच्या दिवशीच पुरंदरचा किल्ला स्वराज्यात आला. व जिजाऊ माँसाहेबांच्या उपस्थितीत शिवरायांनी खरीखुरी दिवाळी साजरी केली. त्यामुळे शहाजीराजे शिवरायांना मदत करीत असल्याचा संशय आला जिंजीच्या मोहिमेवर गेलेल्या शहाजीराजांना वेल्लोर येथे अचानक झडप घालून आदिलशाहाने कैद करविले. आदिलशहाने दोन्ही पुत्रांचा बंदोबस्त करण्यासाठी मुर्रादखान व फतेहखान यांना पाठविले. फतेह खानाने अगदी सहज सुभानमंगळ किल्ला जिंकला म्हणून मोठ्या आनंदाने विजयोत्सव साजरा करून झोपले अश्या वेळी मल्हार कावजीच्या नेतृत्वात मावळ्यांनी अर्ध्या तासात फौज कापून काढली.उरलेले खानाचे सैन्य पळु लागले जे जीवंत सापडले ते शरण आले व स्वराज्यात मावळे म्हणून दाखल झाले. खानाचा खजिना, नव्या दमाचे 500 घोडे मिळाले व हीच रसद पुढे खानाच्या पराभवासाठी वापरली. महाराजांनी खानाच्या बोलसद, शिरवळ छावणीवर हल्ले करून खानाला डिवचले. खानाने पुरंदरवर चाल केली, खानाचे सैन्य पुरंदरवर अर्ध्यापर्यंत चढल्यावर अचानक दरवाजा उघडून खानाच्या सैन्यावर हल्ला चढविला आणि खानाचे सैन्य कापून काढले. खानाचा सासवडपर्यंत पाठलाग केला,  तिकडे संभाजी राजांनी सुद्धा हिंदू राजांना एकत्रित करून फर्राबखानाची धुळधाण उडविली, अश्याप्रकारे आदिलशहाला जिजाऊ माँसाहेबांच्या दोन्ही पुत्रांनी तडाखेबंद उत्तर दिले. जिजाऊंच्या सल्ल्यानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार मुराद बक्ष यांच्याशी संधान साधले व आदिलशाहीला मोगलांकडून फर्मान आले “ शहाजीराजे भोसले आमचा माणूस आहे, शिवाजी भोसले आमच्या सेवेत आहे, त्याचे वडील शहाजीराजे यांना तातडीने मुक्त करावे” त्यामुळे शहाजीराजेंची सन्मानपूर्वक सुटका करण्यात आली, आदिलशहाला मोठी चूक झाल्याचे कळून चुकले आणि त्याने शहाजीराजेंना दरबारात बढती देऊन फर्जंद पदावर घेतले, या संपूर्ण प्रकरणामागे माँसाहेब जिजाऊंची मुत्सद्दीगिरी कारणीभूत ठरली. 25 जुलै 1629ला निजामाने विश्वासघाताने भर दरबारात वडील राजे लखुजीराव, भाऊ अचलोजी व राघोजी आणि भाचा यशवंतराव या चौघा कुटुंबियांना एकाच वेळी खून केला. तेव्हापासून जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेऊन अखंड सावधानता बाळगली. निजामाच्या दरबाराची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एकाच वेळी चार ठिकाणी स्वराज्याचे चारधाम चार शक्तिस्थळे निर्माण केली.

1) शहाजीराजेंना कर्नाटक प्रांतात छोटे छोटे हिंदू राजे एकत्र करून कर्नाटकात त्या राजांना सहकार्य करण्याची भूमिका,

2) मोठ्या मुलगा संभाजी राजांना बंंगलूर या शहरात 15,000 फौजेनिशी कारभार सोपविला.

3) सावत्र मुलगा व्यंकोजीराजे ( तुकाईचा मुलगा ) ला‌ तंजावर येथे शहाजीराजे व संभाजीच्या आश्रयाखाली सुरक्षित वातावरणात ठेवले. इकडे मावळ्यांसह जिजाऊ  व शिवाजी महाराजांनी अभेद्य राजगडाला राजधानी बनवून महाराजांना सुरक्षित केले. यामुळे जिजाऊ माँसाहेब जिवंत असेपर्यंत कधीही शहाजीराजे, संभाजीराजे, व्यंकोजीराजे, शिवाजी महाराजांवर प्राणघातक हल्ला परतवून लावण्यामध्ये मावळ्यांच्या सहकार्यांने यश मिळत गेले.

हे सुद्धा वाचा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ GHUGARE, GANESH JANARDAN (2017). IMPORTANCE OF MANAGEMENT TECHNIQUES OF CHHATRAPATI SHIVAJI ON THE BATTLE GROUND A STUDY. Chapter 3. Shri Jagdishprasad Jhabarmal Tibarewala University. p. 47. hdl:10603/193985.
  2. ^ Tibbetts, Jann (2016-07-30). 50 Great Military Leaders of All Time (इंग्रजी भाषेत). Vij Books India Pvt Ltd. ISBN 978-93-85505-66-9.
  3. ^ Jain, Manik (2017). Phila India Stamp Guide Book (1800-2017) (19th ed.). Kolkata: Philatelia. pp. 129–171
  4. ^ "List of postage stamps of India (1991–2000)". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2021-08-08.
  5. ^ Sardesai, H. S. (2002). Shivaji, the Great Maratha (इंग्रजी भाषेत). Cosmo Publications. ISBN 978-81-7755-285-0.
  6. ^ "The Sampradaya Sun - Independent Vaisnava News - Feature Stories - September 2015". www.harekrsna.com. 2022-01-12 रोजी पाहिले.
  7. ^ Population Geography: A Journal of the Association of Population Geographers of India (इंग्रजी भाषेत). The Association. 1988.
  8. ^ "राजमाता जिजाबाई". बालसंस्कार (इंग्रजी भाषेत). 2019-01-12 रोजी पाहिले.
  9. ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तुत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. २९. ISBN 978-81-7425-310-1.
  10. ^ "जिजाऊ चरित्रातून काय शिकावे" (इंग्रजी भाषेत). 2019-01-12 रोजी पाहिले.
  11. ^ "Rajmata Jijau, आदर्श राजमाता जिजाऊ". Zee Marathi Jagruti (इंग्रजी भाषेत). 2019-01-12 रोजी पाहिले.
  12. ^ a b c "Jijabai Shahaji Bhosale Birth Anniversary: Interesting Facts about Chhatrapati Shivaji Maharaj's Mother". News18 (इंग्रजी भाषेत). 2021-01-12. 2022-01-12 रोजी पाहिले.