नरनाळा किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नरनाळा

नाव नरनाळा
उंची ३१६१ फूट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी दुर्गम
ठिकाण अकोला जिल्हा
जवळचे गाव अकोट
डोंगररांग
सध्याची अवस्था
स्थापना सखोल माहीती नाही, परंतु राजेगोंड व राजपुत शासक नारणाल सिंह स्वामी व त्यांचे वंशज, रावराणा सोलंकी यांच्या द्वारे


नरनाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. या किल्ल्याचे शासक सोलंकी राजपुत राजा नारणाल सिंह स्वामी यांच्या नावावर या किल्ल्याचे नामकरण झाले. पुढे याच नारणाल सिंह स्वामींचे वंशज, रावराणा नारणाल सिंह सोलंकी द्वितीय इथले किल्लेदार झाले.

अकोला जिल्ह्यातील हा अतिशय दुर्गम गिरिदुर्ग आहे.

स्थान[संपादन]

अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर हा किल्ला पसरलेला आहे. अकोल्यापासून याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानूर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट व्याघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्यापासून गडावर जाण्याकरिता आता गाडीवाट आहे. तरीही कित्येक दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात. पायथ्याशी वन विभागाच्या चौकीवर जाता येता नोंद करावी लागते, गडावर मुक्कामास परवानगी नाही.

भौगोलिक माहिती[संपादन]

गड जमिनीपासून ३१६१ फूट उंच आहे. गडाचा विस्तार हा ३८२ एकराचा असून गडाच्या कोटाची (तटबंदीची) लांबी २४ मैल आहे. एकूण दोन लहान व एक मोठा असा मोठा पसारा असणारा हा बहुधा महाराष्ट्रातील सर्वात विर्स्तीण गिरिदुर्ग असावा. मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखला जात असून तेलियागड आणि जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग पूर्व-पश्चिमेला आहेत.

किल्ल्याबद्दल[संपादन]

गडाच्या प्रवेशाला ५ दरवाजे लागतात त्यांवरून या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना यावी. सर्वात आधी शहानूर दरवाजा, मग मोंढा दरवाजा, त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा, असे करीत आपण गडावर पोहचतो. गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विर्स्तीण जलाशय आहे. याला बारमाही पाणी असते. हा तलाव याच्या औषधी गुणांकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कुणाला कुत्रा चावल्यास त्याने या तलावात स्नान करून येथील दर्ग्यावर गूळफुटाणे वाहावे व तडक गड उतरावा. तसेच गड उतरताना मागे वळून पाहू नये, असे मानतात.

उपदुर्ग[संपादन]

तेलीगागड नरनाळा किल्ल्याचा एक उपदुर्ग आहे.

पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

गडावर आजही राणी महाल व बाजूची मशीद अस्तित्वात आहे. त्या समोरचा सभामंडप आता नसला तरी त्याचे स्तंभ त्याच्या विस्ताराचे भान करून देतात. सरळ पुढे गेल्यास तेला- तुपाच्या टाक्या लागतात. या टाक्या खोल असून त्यांत विभागणी केलेली आहे; युद्धकाळात तेल-तूप साठवण्यासाठी त्या वापरल्या जात असे.

गडाच्या तटाच्या बाजूने फिरत गेल्यास थोड्या अंतरावर 'नऊगजी तोफ' दिसते. ही तोफ अष्टधातूची असून इमादशहाच्या काळात गडावर आणली गेल्याचे बोलले जाते. तोफेवर पारशीत लेख कोरलेला आहे. तोफेचे तोंड गडपायथ्याच्या शहानूर गावाकडे रोखलेले आपणास लक्षात येते. बाजूला खूप खोल असे चंदन खोरे आहे. या खोऱ्यात चंदनाच्या व सागाच्या झाडांची फार दाट पसरण आहे.

किल्ल्याच्या पायथ्याशी धारुळ गावात धरुळेश्वराचे एक सुंदर शिवालय आहे.या शिवलयाचे बांधकाम इसवी सन १५२१ साली झालेले आहे.पण हे शिवालय कोणी बांधले याचा अजूनपर्यंत शोध लागलेला नाही.हे शिवालय नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी दक्षिणेस आहे.या शिवालयाचे वास्तू हेमाडपंथी असून ते शिवालय दक्षिण मुखी आहे.या शिवलयाच्या पूर्वेस भग्न अवस्थेत काही वास्तू आहेत.असे बरेचसे वास्तू तेथे सापडतात.त्यांच्या अवशेषा वरून आपण अंदाज लावू शकतो की यांचं वैभव कसं असेल.

या शिवालयाचे संपूर्ण बांधकाम दगडी असून चौरसाकार आहे व मंदिराचे कळस हे गोलाकार आहे या कारणाने याला गुम्मद असे म्हणतात.शिवलयाचा परिसर खूप मोठा असून रमणीय असा आहे.शिवलयाला पुरातन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे.शिवालयाकडे जाण्यासाठी विविध असे मार्ग आहेत त्यामध्ये सहज मार्ग म्हणजे आकोट ते रामापुर (धारुळ) या रस्त्यावर पडते.

ऐतिहासिक महत्त्व[संपादन]

गड नेमका कुणी आणि कोणत्या काळात बांधला या बाबत नक्की माहिती नाही पण स्थापत्य व ऐतिहासिक पुराव्यांवरून हा गड 'गोंड राजांनी' बांधला असल्याचे बोलले जाते. त्यानंतर राजपुत राजा नारणाल सिंह यांनी या किल्ल्यात बदल करून बुरुज बांधले.गडावर नागपूरकर भोसले कालीन तुळशी वृंदावन व हनुमान मंदिर आहे. गडावर राम तलाव व धोबी तलाव यांसहित २२ तलाव आहेत. गडाला ६४ बुरूज आहेत. भक्कम तटबंदी व दुर्गम पहाडी यांच्या सहित हा दुर्ग सातपुड्याच्या दारावर उभा राहून उत्तरेकडून विशेषतः माळव्यातून येणाऱ्या आक्रमणांना तोंड देत झुंजला असेल. या गडावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक[संपादन]

या किल्ल्याला ७ जून, इ.स. १९१६ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[१]

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "नोटिफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्युमेन्ट्स इन इंडिया" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2016-03-04. २२ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)