शाहूनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सातारा (शाहूनगर)

सातारा शहराचे (शाहूनगरचे) संस्थापक छत्रपती थोरले शाहूमहाराज होत.

औरंजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर शाहूमहाराजांनी सातारच्या किल्ल्यावर आपल्या राज्याभिषेक करवून घेतला व सातारच्या किल्ल्यावरूनच त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हलवण्यास सुरुवात केली. अडचणीत सापडलेले मराठा साम्राज्य शाहूमहाराजांच्या समयसूचक धोरणांमुळे हळू हळू मोकळा श्वास घेऊ लागले. विखुरलेले एक एक मराठा सरदार एकत्र करून त्यांच्यात स्वराज्यची ऊर्मी नव्याने जागृत करत शाहूमहाराजांनी मराठा स्वराज्याला मराठा साम्राज्याचे स्वरूप देण्यास सुरुवात केली. मराठा साम्राज्याचा चहूबाजूला जसाजसा विस्तार होऊ लागला तसातासा सातारच्या किल्ल्याचा परिसर प्रशासनच्या दृष्टीने कमी पडू लागला व त्यातूनच सातारा शहराच्या स्थापनेची कल्पना पुढे आली आणि शहराची मुहूर्तवेढ रोवत शाहूमहाराजांनी मराठा स्वराज्याच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वज्याची राजधानी डोंगरावरून जमिनीवर आणली.

सातारा शहराची अर्थात शाहूनगरीची रचना व त्यातील भागांची नवे शाहूमहाराजांच्या आमदनीची आठवण करून देतात. राजकीय महत्त्व संपले तरीही मराठा साम्राज्यही राजधानी म्हणून साताऱ्याचा अभिमान महाराष्ट्रीयांना आजही वाटतो. शाहूनगरची स्थापना १७२१ च्या सुमारास झाली. शाहूमहाराजांच्या दिनांक २८ मार्च १७२१ च्या पत्रात तातडीने वाडा बांधल्याचा उल्लेख आहे. शाहूमहाराजांच्या व पेशव्यांच्या भेटी होत त्या रोजनिशीत नोंदल्या आहेत त्यावरून शहर रचनेच्या कालावधीचा अंदाज लागतो. डिसेंबर १७२० च्या सुमारास श्रीमंत बाजीरावांनी शाहूमहाराजांची भेट सातारा किल्यावर घेतली. त्यानंतर सात -आठ महिन्यांच्या भेटी माची किल्ले सातारा येथे झालेल्या आहेत. त्यापुढे ऑगस्ट १७२१ला शाहूनगर नजीक केल्ले सातारा येथे श्रीमंत बाजीरावांनी शाहूमहाराजांची भेट घेतली असा उल्लेख आहे. अर्थात १७२१ च्या सुमारास शाहूनगर स्थापना झाली.

शाहूनागरालच हल्ली सातारा असे म्हणतात. शाहूमहाराजांनी स्वतःकरीत दोन राजवाडे बांधले. यव्तेश्वरच्या डोंगरातून नळ बांधून पाणी आणले. जागोजागी हौद तलाव बांधले त्यांनी शाहूनगरच्या वैभवात जास्तीत जास्त भर घालण्याचे प्रयत्न केले.

शाहूनगरची रचना व प्रतिष्ठा शाहूमहाराजांच्या नजरेखाली पुष्कळ वाढली. व्यापार उद्योग वाढला. नवीन सावकार निर्माण झाले. सुखानंद, सुमेरगिरी, बन्सीपुरी अशा परदेशी सावकारांची वस्ती सुरू झाली. मराठ्यांचा बाह्यउद्योग पसरत गेला, त्याबरोबर उत्तरेकडचे हिंदी लोग, वकील, व्यापारी, हुन्नरी कलावंत अशी अनेक माणसे दक्षिणेत आल्यामुळे शाहूनगरातील दळणवळण वाढून नगराचे जीवनस्तर उंचावले. त्याच बरोबर शाहूनगरचे वैभवसुद्धा विस्तारले.

महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर वसवताना शाहूमहाराजांनी तख्ताचा वाडा, रंगमहाल, पीलखाना, अदालतवाडा, बेगम मस्जिद असा अनेक भव्यदिव्य इमारतींची उभारणी केली.

तख्ताचा वाडा[संपादन]

हल्ली जिथे शाहू उद्यान आहे तिथे शाहूमहाराजांचा वाडा होता. तिथेच त्यांचे सिंहासन होते. म्हणू त्याला तख्ताचा वाडा म्हणत. जवळच असलेल्या विहिरीस तख्ताची विहीर म्हणत. सध्या एक तटबंदीची भिंत व वाड्याच्या भिंतीचा अवशेष अढळतो.

रंगमहाल[संपादन]

रंगमहाल ही वस्तू अदालतवाड्याच्या पूर्वेस सुमारे २०० मीटर अंतरावर आहे. मूळ इमारत ३० मीटर लांब व १५ मीटर रुंद असून तिला ४५ मीटर रुंदीची नवीन इमारत जोडून बांधली आहे. मूळ इमारत ३ माजली होती. शाहूमहाराजांच्या राण्यांचा राणीवसा येथे होता म्हणून या इमारतीस रंगमहाल असे नाव देण्यात आले. राजमाता येसूबाईसाहेबदेखील याच वाड्यात राहत असत. १८७४ साली लागलेल्या आगीत संपूर्ण रंगमहाल बेचिराख झाला. सध्या या वाड्याचा अर्धा भाग कूपर कारखान्याच्या ताब्यात आहे.

अदालतवाडा[संपादन]

अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी बोगद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर शाहूमहाराजांच्या कालावधीपासून अस्तित्वात असलेल्या वस्तूचा महाराज न्यायालयासारखा उपयोग करीत. ही इमारत ६७. मीटर लांब व ४८ मीटर रुंद आहे. १८७६ पर्यंत या इमारतीचा उपयोग दिवाणी न्यायालय म्हणून केला जात असे. त्यानंतर मात्र नवीन राजवाड्याचा वापर न्यायालयासाठी होऊ लागला. सध्या अदालत वाडा सातारा राजकुलाचे शिवाजीराजे भोसले यांचे वसतिस्थान आहे.

बेगम मस्जिद[संपादन]

औरंजेबाची मुलगी बेगम झीनतउन्निसा हिने शाहूमहाराजांच्या कैदेत असताना चांगला सांभाळ करून त्यांचे धर्मांतरण होऊ दिले नव्हते. झीनतउन्निसा बेगम १७२१ साली वारली. तिच्या स्मरणार्थ शाहूमहाराजांनी अदालत वाड्याच्या जवळच एक मस्जिद बांधली. आज त्या मस्जिदीचे जोते आहे त्यावरच नवीन मस्जिद उभारली आहे.

साताऱ्यात म्हणजेच शाहूनगरमध्ये अनेक वाडे बांधण्यात आले होते. फत्तेसिंह वाडा, मंत्र्यांचा वाडा, शिर्के यांचा वाडा, पंडितराज यांचा वाडा, वगैरे..


Copyright-problem paste.svg
या विभागातील मजकूर http://akashjadhav392.blogspot.in/2017/11/2.html येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.(एप्रिल २०१८)  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले