३३ कोटी देव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्योममंडलाचा भाग ज्यावर रुद्र दर्शवली आहेत - साधारण ५व्या शतकातील, कात्रा केशव देव; सध्या मथुरा संग्रहालय.

३३ कोटि देव म्हणजे ३३ प्रकारचे उच्च देव. संस्कृत भाषेत 'कोटि' या शब्दाचा अर्थ करोड (१,००,००,०००) असा होत नाही तर हा शब्द 'उच्चतम, सर्वोच्च व अत्यंत' असा म्हणून वापरला जातो. शून्याच्या शोधानंतर भारतीय गणितज्ञांनी मोठ्यात मोठ्या संख्या लिहिणास सुरुवात केली, त्यांना नाव देताना मोठी संख्या म्हणून १,००,००,०००ला कोटी असे नाव रूढ झाले. पण हिंदू धर्मामध्ये ३३ कोटी (३३,००,००,०००) ही देवतांची संख्या नसून, ३३ प्रकारचे उच्च देव आहेत. सामान्य भाषेत कोटी शब्दाचा दुसरा अर्थ कोटी (१,००,००,०००) असल्यामुळे ३३ करोड देवी देवता असल्याची मान्यता प्रख्यात झाली.[१][२][३]

या तेहेतीस कोटी/प्रकारच्या देवामध्ये आठ वासू, अकरा रुद्र, बारा आदित्य आणि दोन अश्विनीकुमारांचा समावेश होतो. काही ठिकाणी ३३ कोटी देवांमध्ये इंद्र आणि प्रजापतिला बारा आदित्यात न ठेवता दोन अश्विनीकुमारांऐवजी गणले गेले आहे.[४]

  • बारा आदित्यांची नावे: १. अंशमान (हिस्सा), २. अर्यमन (श्रेष्ठता), ३. इंद्र/शक्र (नेत्रत्व), ४. त्वष्टृ (कौशल्य/कला/शिल्प), ५. पर्जन्य, ६. पूषन (समृद्धि), ७. भग (धरोहर), ८. मित्र (मित्रता/ सहयोगी), ९. वरुण (भाग्य), १०. विवस्वत् (सामाजिक नियम), ११. विष्णू/वामन (ब्रम्हांडीय नियम), १२. धाता / प्रजापति . बारा आदित्यांना सामाजिक वर्तणुकीचे प्रतिक देखील मानले जाते.
  • अकरा रुद्रांची नावे:

पाच अमूर्तः १.आनंद, २. विज्ञान (ज्ञान), ३. मानस (विचार), ४. प्राण (श्वास किंवा जीवन), ५. वाक - (भाषण). अमुर्त म्हणजे निराकार, अप्रत्यक्ष, साकार नसलेला.

शिवाची पाच नावेः १. ईशान (वैभव), २. तत्पुरुष, ३. सद्योजात (नवजात किंवा जन्म घेतलेला), ४. वामदेव, ५. अघोरा

आणि आत्मा

  • दोन अश्विनीकुमार: औषध, आरोग्य, वैद्यक आणि विज्ञानाशी संबंधित दोन वैदिक देव आहेत. यांचा ऋग्वेदात अश्विनौ नावाने उल्लेख आहे.


- असे एकूण: १२ (आदित्य) + ११ (रुद्र) + ८ (अष्टवसू) + २ (आश्विनीकुमार) = ३३.[१][२][३]

बृहदारण्यकोपनिषद[संपादन]

बृहदारण्यकोपनिषदातील तिसऱ्या अध्यायातील नवव्या ब्राह्मणातील याज्ञवल्क आणि शाकल्य विदग्ध यांच्यामधील संवादामध्ये ३३ कोटी देवांचा उल्लेख आहे.[५][६]

शाकल्य विदग्धला स्वःताचा फार अभिमान वाटे. अभिमानाने भरून आलेला तो याज्ञवल्क्याला प्रश्नोत्तर प्रश्न करू लागला?

शाकल्य — किती देव आहेत?
याज्ञवल्क — तीन आणि तीनशे, तीन आणि तीन हजार, म्हणजेच तीन हजार तीनशे सहा (३,३०६).
शाकल्य — किती देव आहेत?
याज्ञवल्क — तेहतीस (३३).

शाकल्यने तोच प्रश्न आणखी पाच वेळा पुन्हा पुन्हा विचारला. यावर याज्ञवल्क्यांनी प्रत्येक वेळी संख्या कमी करून देवतांची संख्या अनुक्रमे सहा, तीन, दोन, दीड आणि शेवटी एक अशी सांगितली.

शाकल्य — मग ते तीन हजार तीनशे सहा देव कोण आहेत?
याज्ञवल्क — ही देवांची विभूती आहेत. देव फक्त तेहतीस आहेत.
शाकल्य — काय आहेत ते?
याज्ञवल्क — आठ वसु, अकरा रुद्र, बारा आदित्य, इंद्र आणि प्रजापती.
शाकल्य — आठ वसु कोणते?
याज्ञवल्क — अग्नी, पृथ्वी, वायु, अवकाश, सुर्य, द्युलोक (स्वर्ग), चंद्र आणि नक्षत्र. कारण त्यांच्यामध्ये हे सर्व विश्व वसलेले आहे. म्हणून त्यांना वसु म्हणतात.
शाकल्य — अकरा रुद्र कोणते?
याज्ञवल्क — मानवी शरीरातील दहा इंद्रिये, मनासह अकरावा (आत्मा). जेव्हा ते या नश्वर शरीरातून निघून जातात तेव्हा ते आपल्या प्रियजनांना रडवतात. म्हणून त्यांना रुद्र म्हणतात.
शाकल्य — बारा आदित्य कोण आहेत?
याज्ञवल्क — वर्षाचे बारा महिने म्हणजे बारा आदित्य. कारण ते हे सर्व सोबत घेऊन पुढे जातात; म्हणून त्यांना आदित्य म्हणतात.
शाकल्य — इंद्र आणि प्रजापती कोण आहेत?
याज्ञवल्क — गर्जना करणारे ढग 'इंद्र' आणि 'यज्ञ' (बलिदान) म्हणजे 'प्रजापती'. गर्जना करणारा मेघ म्हणजे 'विद्युत' आणि 'पशु' म्हणजे यज्ञ.
शाकल्य — सहा देव कोणते?
याज्ञवल्क — पृथ्वी, अग्नि, वायु, अवकाश, द्यौ (स्वर्ग) आणि सुर्य.
शाकल्य — तीन देव कोण आहेत?
याज्ञवल्क — तीन जगे- पृथ्वी लोक, स्वर्गलोक, पाताळ लोक. हे तिन्ही जग, कारण हे सर्व देव या तिन्हींमध्ये सामावलेले आहेत.
शाकल्य — दोन देव कोणते?
याज्ञवल्क — अन्न आणि जीवन हे दोन देव आहेत.
शाकल्य — ती दीड देवता कोण?
याज्ञवल्क — वात (हवा) दीड देव आहे; कारण ती वाहते आणि त्यातच सर्वांची वाढ होते. ते दीड आहे कारण त्याच्या उपस्थितीने प्रत्येक गोष्ट श्रेष्ठ वैभव प्राप्त करते.
शाकल्य — देव कोणता?
याज्ञवल्क — प्राण ही एकमेव देवता आहे.  तेच 'ब्रह्म', तेच तत् आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "33 Crore Gods In Marathi 'ही' आहेत ३३ कोटी देवतांची नावे; वाचा, महत्त्व, मान्यता व काही तथ्ये". Maharashtra Times. 2022-04-16 रोजी पाहिले.
  2. ^ a b "३३ कोटी देव कोणते?". eSakal - Marathi Newspaper. 2022-04-16 रोजी पाहिले.
  3. ^ a b Gaikwad, Priyanka. "तेहतीस कोटी देव कोणते? |" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-08-27. 2022-04-16 रोजी पाहिले.
  4. ^ "तुम्हाला माहिती आहेत का हिंदू धर्मातील 33 कोटी देवतांची नावे आणि रहस्य". Divya Marathi. 2018-02-16. 2022-07-25 रोजी पाहिले.
  5. ^ "बृहदारण्यकोपनिषद - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर". bharatdiscovery.org. 2023-02-06 रोजी पाहिले.
  6. ^ "Upanishads". upanishads.org.in. 2023-02-06 रोजी पाहिले.