Jump to content

दूध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


दूध एक अपारदर्शक पांढरा द्रव आहे जो सस्तन प्राण्याच्या मादीच्या स्तनांतून स्त्रवणारा एक पांढरा द्रव पदार्थ आहे. नवजात अर्भकासाठी दूध हे पोषक अन्न आहे.नवजात दूध इतर पदार्थांचे सेवन करण्यास अक्षम होईपर्यंत ते दुधावर अवलंबून असते. साधारणत: दुधात ७४ टक्के पाणी असते आणि उर्वरित भागात घन घटक असतात म्हणजेच खनिजे आणि चरबी असतात. गाय व म्हशी व्यतिरिक्त विविध कंपन्यांचे पॅकेज्ड दूधही बाजारात उपलब्ध आहे. दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि राइबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी -२) तत्त्व असते , त्याशिवाय फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन आणि जीवनसत्त्वे अ, डी, के आणि ई यासह अनेक खनिजे आणि चरबी आणि ऊर्जा असते. याव्यतिरिक्त, त्यात बरीच सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य आणि काही जिवंत रक्तपेशी असू शकतात.[]

दूध हे आपल्या आहाराचा मुख्य घटक आहे. पूर्वीच्या काळापासून भारतीय संस्कृतीत दुधाला महत्त्व दिले जाते. दूध व दुधाचे पदार्थ हे सर्व पूजा-अर्चाना, नैवेद्य यात वापरले जातात. आहारशास्त्रात दूध व दुधाच्या पदार्थाना ‘संपूर्ण आहार’ असे म्हणतात. याचे कारण असे की, नवजात शिशू आपल्या आयुष्याचे पहिले सहा महिने फक्त दुधावरच अवलंबून असतो. दूध व दुधाचे पदार्थ शाकाहारी अन्नातील मुख्य घटक आहेत. दुधात प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. यातील प्रथिने डाळी, कडधान्ये यांच्यातील प्रथिनांपेक्षा उच्च दर्जाची असतात. शाकाहारी अन्नात प्रथिनांचे प्रमाण फार कमी असते. त्यामुळे दूध व त्याचे पदार्थ ही उणीव भरून काढतात. दुधातील प्रथिने उच्च दर्जाची असल्यामुळे शरीराची वाढ, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर दुधात कॅल्शियम व डी जीवनसत्त्व असते. दुधामधील कॅल्शियमचा आपल्या हाडांना खूप फायदा होतो. दुधामध्ये लॅक्टोज नावाची साखर-कर्बोदके असतात. या साखरेमुळे दुधाला गोडी येते. साखर न घालता दूध घेतले तरीही त्याला एक नैसर्गिक गोडवा असतो. हा गोडवा लॅक्टोजमुळे येतो.[]

दुधामधील केसीनरेणूबरोबर कॅल्शियम फॉस्फेटचे रेणू बद्ध असल्याने केसीनच्या अन्ननलिकेतील पचनाबरोबर कॅल्शियम फॉस्फेटचेसुद्धा शोषण होते. दूध हा आपल्या आहारातील महत्त्वाचा कॅल्शियमचा स्रोत बनला आहे. दुधामधील प्रथिने आणि मेदाम्लामुळे लहान मुलांचे पोषण होते. लॅक्टोज या दुधातील शर्करेचे काहीं बालकामध्ये विकराच्या अभावामुळे पचन होत नाही. अशा बालकाना दुधाऐवजी सोयाबीनपासून बनवलेले ‘दूध’ दिले जाते. दूध हे पूर्ण अन्न आहे सुद्धा समजूत पूर्णपणे खरी नाही. दुधामध्ये लोह नसते. त्यामुळे केवळ दुधावर अवलंबून असलेल्या बालकामध्ये लोहाची कमतरता आढळते. दूध हे पूर्ण म्हणून त्याचा आहारात नियमितपणे वापर केला जातो लहान मुलांसाठी तर दूध हे पूर्णान्न आहे.[ संदर्भ हवा ]

जगभरामधे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा वापर एक अन्नपदार्थ म्हणून केला जातो. मनुष्यप्राणी फार पूर्वीपासून दुधाचे सेवन करत आला आहे. त्यासाठी खास दूध देणारे प्राणी पाळण्यात येतात. दुग्धोत्पादनासाठी प्रामुख्याने गायी पाळण्यात येतात. त्या खालोखाल शेळी, मेंढी, म्हैस या प्राण्यापासून दूध मिळवले जाते. दुग्धोत्पादनासाठी भौगोलिकतेप्रमाणे उपलब्ध प्राणी जसे उंट, याक, मूस आदींचाही वापर केला जातो. कमी अधिक प्रमाणात घोडा, गाढव, रेनडियर, झेब्रा या प्राण्यांपासून दुग्धोत्पादन होते. दुधापासून ताक,दही, लोणी, चीझ, साय (क्रीम) ,आईसक्रीम इत्यादी अनेक पदार्थ तयार केले जातात. या विविध खाद्यपदार्थांचा आहारात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

दूध

दुधाचे प्रकार

[संपादन]
  • गायीचे दूध – हिंदू धर्मामध्ये गायीला कायमंच मातेचा दर्जा दिला जातो. तसेच आयुर्वेदात देखील गायीचे दूध हे आईच्या दुधाइतकेच उपयुक्त आहे असे सांगितले आहे. गायीचे दूध इतर पाळीव प्राण्यांच्या दुधापेक्षा पचण्यास हलके असते. गाईच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असते आणि जीवनसत्त्व ‘अ’चे प्रमाण जास्त असते.[]
  • म्हशीचे दूध – म्हशीच्या दुधात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फॉसफरस, कॅल्शिअम असल्याने आपल्या हाडांसाठी हे दूध अतिशय उपयुक्त असते. भारतीय गाईचे आणि म्हशीचे दूध हे ए २ प्रकारचे आहे, जे की संकरित किंवा विदेशी पशूंच्या दुधापेक्षा तुलनेने जास्त आरोग्यदायी मानले जाते. सकाळी उठल्यावर माफक प्रमाणात दूध पिल्यास जेवणातील घटक द्रव्याची कमतरता भरून काढू शकते.
  • सोया मिल्क – सोया मिल्कमध्ये प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.हे दुध कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम, झिंक आशा खनिजांनी परिपूर्ण असे असते.
  • राईस मिल्क – राईस मिल्कमध्ये व्हिटॅमिन इ आणि मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.जर तुम्ही रोज एका विशिष्ट प्रमाणात राईस मिल्कचे सेवन केले तर ह्दयरोग, कॅन्सर अशा मोठ्या आजारांपासून तुमचे संरक्षण नक्कीच होऊ शकते.
  • बदाम दूध – बदाम दुधात भरपूर कॅलरीज, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशिअम, कॉपर असल्याने त्याचे रोज सेवन केल्यास वजन कमी करण्यास, हाड मजबूत बनवण्यात, त्वचेला तजेला आणण्यास ते फायदेशीर ठरते.
  • ऑरगॅनिक दूध – ऑरगॅनिक दूध म्हणजे कोणत्याही प्रकारचे भेसळ नसलेले शुद्ध गायीचे दूध.बऱ्याच वेळा गायींना दूध जास्त यावं म्हणून त्यांना काही इंजेक्शन्स दिली जातात पण ऑरगॅनिक दुधात मात्र गायीला कोणत्याही प्रकारे औषधे न देता चांगल्या प्रतीचे दूध मिळते जे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त ठरते.
  • नारळाचे दूध – नारळाच्या दुधात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ, व्हिटॅमिन बी १, व्हिटॅमिन बी ३, आणि व्हिटॅमिन बी ५ असल्याने हे दूध अतिशय स्वास्थकारक असते. ज्यांना प्राण्यांच्या दुधाची ऍलर्जी असेल त्यांच्यासाठी हे दूध एक उत्तम पर्याय आहे.

निरसे दूध

[संपादन]

दुधाळू प्राण्यांच्या न तापविलेल्या दुधास निरसे अथवा कच्चे दूध म्हणतात. दूध तापविल्याने त्यातील अनेक महत्त्वाचे घटक नष्ट होतात. त्यामुळे 'रॉ मिल्क मुव्हमेंट'(निरसे/कच्चे दूध चळवळ) ही चळवळ सुरू झाली आहे.यात कच्चे दूध पिण्यावर भर दिला जातो.[]

दुधाचे विविध उपयोग

[संपादन]

दुधाचा उपयोग हा सौंदर्यप्रसाधन म्हणूनही केला जातो. कच्चे दूध वा मलई चेहऱ्यावर चमक येण्यासाठी व त्वचा नितळ होण्यासाठी लावली जाते. तसेच दूधात काही घटक मिसळून त्यांचा फेसपॅक चेहऱ्यावर लावला जातो.

गायीचे अथवा म्हशीचे दूध साधारणतः मंदाग्नीवर एक तृतीयांश उरेल इतके आटविल्यास त्याची बासुंदी होते.एक षष्टांश उरेल इतके आटविल्यास त्याची रबडी(घट्ट बासुंदी) होते व त्यापेक्षा जास्त आटविल्यास त्याचा खवा होतो. खव्यापासून मग पेढा, बर्फी व अनेक प्रकारच्या मिठाया करण्यात येतात.[ संदर्भ हवा ]

दुधापासून बनवलेले अन्नपदार्थ

[संपादन]
  • लोणी:- श्रीकृष्णाला प्रिय अन्न आहे. दुधावर असलेल्या स्निग्ध सायीला विरजण लावले की दही बनते.असे दही पाणी घालून रवीने ढवळुन काढले की पृष्ठभागावर लोणी जमा होते. पाण्याने स्वच्छ धुतलेल्या या लोण्याचा गोळा साठविता येतो.लोण्यामध्ये कमीत कमी ८० टक्के दुधातील स्निग्ध असते.
  • सायः- दूध तापवून थंड करण्यास ठेविले असता त्यावर साय जमा होते. दूध न तापविता तसेच फ्रिजमध्ये ठेवले तर,त्यातील स्निग्ध पदार्थ वर येतात व त्याचा थर निर्माण होतो. या थराला साय किंवा क्रीम म्हणतात.
  • दही :- दूध विरजून तयार होते . या प्रक्रियेदरम्यान त्यात रासायनिक बदल होतात व दुधातील लॅक्टोजचे लॅक्टिक अ‍ॅसिडमध्ये रूपांतर होते.[] चांगल्या प्रतीचे दही करण्यासाठी सर्वप्रथम दुध गाळून गरम करण्यासाठी ठेवावे. दुध उकळेपर्यंत तापविल्यानंतर वातावरणाच्या तापमानापर्यंत(२२-२५ अंश सेल्सियस) थंड होऊ द्यावे.नंतर त्यात ०.५-१ टक्का विरजण (साधारणतः एक ते दीड चमचा १ लीटरसाठी) चांगले मिसळून टाकावे व पुढील १०-१२ तास झाकून ठेवावे. दही तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टीलचे भांडे वापरावे.
  • कस्टर्ड
  • खीर
  • रबडी- जाड बुडाच्या पातेल्यात दूध आटवावे. आटवताना सारखे ढवळावे नाहीतर दूध लागते/उतू जाऊ शकते. ज्यांना साय आवडत नाही, अशांसाठी दूध थोडे गार झाले की, ब्लेंडर किंवा हॅंडमिक्सर दुधात फिरवून साय मोडून काढावी.नंतर केशर, वेलची पूड, बदाम-पिस्ते काप, चारोळी इ. घालावे. रबडी फ्रिजमध्ये ठेवून थंड करावी.[]
  • बासुंदी :- दूध व साखरेपासून बनवले जाणारे एक मिष्टान्न आहे.
  • पनीर :- दुधामध्ये केसीन नावाचे प्रथिन असते. दुधामध्ये एखादा आम्लधर्मी पदार्थ (विरजण) घातला जातो तेव्हा त्याचा परिपाक त्यातील केसीनचे रेणू एकत्र येऊन त्याचे जाळे तयार करण्यात होतो. त्यास पनीर असे म्हणतात. पनीर तयार करताना दुध प्रथमत: उकळेपर्यंत कढईत गरम केले जाते. त्यानंतर ७०-७१ अंश सेल्सियसपर्यंत थंड करून त्यात सायट्रिक आम्लाचे द्रावण किंवा लिंबाचा रस २ टक्के एवढा टाकला जातो त्यामुळे दुध नासते फाटते. मग नरम कपड्याने गाळून घेतले जाते. नरम कपड्यातल्या पनीरवर २०-२५ मिनीटापर्यंत वजन ठेवले जाते. पनीरमध्ये भरपूर प्रमाणात स्निग्ध व प्रथिने आढळतात. तसेच कॅल्शियम फाॅस्फरस या क्षारांचे प्रमाणही जास्त असते स्निग्धांमध्ये विरघळणारे  जीवनसत्त्व यांचे प्रमाणही भरपूर प्रमाणात आढळते.
  • ताक:‌- दही किंवा सायीपासून बनवता येते. दही चांगले घुसळून पाणी घालून त्याचे ताक बनवले जाते.[] आयुर्वेदात ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हणले आहे. प्रत्यक्ष इंद्रालाही ताक दुर्लभ झाले होते, असे संदर्भ संस्कृत साहित्यात आढळतात
  • खवा :- गाई किंवा म्हशीचे दुध लोखंडाच्या कढईत गरम करून सतत ढवळत जातात व आटवितात. जेंव्हा दुधाला उकळी येईल त्यावेळेस गॅस कमी करून दुधाला अधुनमधून ढवळत रहा.जेंव्हा दुध घट्ट होण्यास सुरुवात होते तेंव्हा दुधाला सतत हलवत रहा कारण दुध कढईला लागण्याची भिती राहते. अशाप्रकारे घट्ट झालेले दुध म्हणजे खवा.किंचित पिवळसर पांढरा असतो.साधारणतः १ लीटर चांगल्या दुधापासून 120 ते १३० ग्रॅम एवढा खवा बनतो. काही ठिकाणी यास मावा असेही म्हणतात. खवामध्ये स्निग्धांचे प्रमाण २० टक्के असते, आर्द्रता ४५ ते ४० टक्के आणि एकूण घनपदार्थ ६० ते ४५ टक्के असतात. खव्यापासून प्रामुख्याने पेढे,बर्फी,गुलामजाब सारखे पदार्थ तयार केले जातात. संपूर्ण खवा एकसारखा,पांढऱ्या रंगाचा,नरम व दाणेदार प्रतिचा असावा. त्याला चांगला सुवास असावा. नैसर्गिक तापमानामध्ये जर व्यवस्थित पॅकिंग केलेला असेल तर सात दिवसांपर्यंत आणि रेफ्रिजरेटरमध्ये तीन आठवड्यांपर्यंत टिकून राहतो.मुख्यतः खव्यातील पाण्याचे प्रमाण कमी केले असल्यामूळे खवा जास्त काळ टिकून राहतो.
  • चीझ :- दुधातील केसीन ह्या प्रथिनांना साकळून केला जातो. चीझ हे वेगवेगळ्या चवीत रूपात व पोतात केले जाते चीझ गाई,म्हैस,बकरी किंवा मेंढीच्या दुधापासून बनवितात. तयार करताना दुधाला आम्ल केले जाते,मग रेनेट नावाचे एनजाइम घालून साकळवतात. नंतर त्यातला द्रव पदार्थ हा काढून टाकला जातो. राहिलेला घनपदार्थ हवा तशा आकारांमध्ये आणला जातो त्यास चीझ असे म्हणतात.
  • चक्का व श्रीखंड:- दह्याला पातळ कपड्यातून गाळुन त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करून मिळवलेला घनपदार्थ म्हणजे चक्का होय.

चक्का प्राप्त झाल्यावर योग्य प्रमाणात साखर मिसळून तयार झालेला नरम घट्ट गोडसर पदार्थ म्हणजे श्रीखंड.

प्रमाणित पद्धतीने चक्का व श्रीखंड तयार करत असताना म्हशीचे दुध घेऊन त्याचे ६ टक्क्यांपर्यंत प्रमाणीकरण केले जाते हे दुध ७१ अंश सेल्सियस वर १०-१५ मिनिटांसाठी गरम करून २२-२५ अंश सेल्सियसवर थंड करतात व त्यात १ टक्का विरजण म्हणून लॅक्टीक अ‍ॅसिड तयार करणारे कल्चर व्यवस्थित मिसळले जाते व हे २८-३० अंश सेल्सियसवर १६-१८ तासांसाठी उबवितात. दही तयार झाल्यावर मलमलच्या कापडामध्ये बांधतात व पुढील ८-१० तासांसाठी टांगून ठेवले जाते. जेणेकरून दह्यातून द्रवरूप पाणी बाहेर पडुन दही घट्ट बनते हा तयार झालेला घनपदार्थ म्हणजे चक्का होय.

एक लीटर दुधापासून साधारणतः २००-२१५ ग्रॅम एवढा चक्का मिळतो.श्रीखंड बनविण्यासाठी वरील चक्का हा मुळ पदार्थ म्हणून वापरला जातो साधारणतः चक्क्याच्या ३५-४० टक्क्यांपर्यंत पीठी साखर मिसळून त्याचे एकजीवीकरण केले जाते. तसेच त्यात रंग सुका मेवा टाकला जातो. तयार झालेल्या पदार्थास श्रीखंड असे म्हणतात.

पेये

[संपादन]

दुधामध्ये हळद, चहा, काॅफी, कोको आदी घालून पेये बनवतात.

दुधावरील प्रक्रिया : पाश्चरायझेशन व होमोजिनायझेशन

[संपादन]

पाश्चरायझेशन या प्रक्रियेत दूध विशिष्ट काळासाठी ठराविक तापमानावर तापवण्यात येते (minimum 78 deg. for 16 sec ). या प्रक्रियेमुळे दुधातील हानिकारक जीवाणू नष्ट होऊन ते माणसांच्या पिण्यालायक होते, तसेच त्याचे आयुष्यमानही वाढते. होमोजिनायझेशन प्रक्रियेत दुधातील स्निग्धकण फोडून ते एकजीव करण्यात येते व ते नासणार नाही याची काळजी घेऊन थंड करण्यात येते.

कच्चे दूध व पारंपारिक/पाश्चराईज्ड दूध याची तुलना

[संपादन]
कच्चे दूध व पारंपारिक/पाश्चराईज्ड दूध याची तुलना
अ.क्र. पोषक व प्रतिरोधक तत्त्वे पाश्चराईज्ड दूध कच्चे दूध
अ-जीवनसत्त्व ३५% कमी होते १००% सक्रिय राहतात
क-जीवनसत्त्व २५% ते ७७% कमी होते १००% सक्रिय राहतात
इ-जीवनसत्त्व १४% कमी होते १००% सक्रिय राहतात
लोह ६६% कमी होते १००% सक्रिय राहतात
जस्त (झिंक) ७०% कमी होते १००% सक्रिय राहतात
ब-जीवनसत्त्व ३८% कमी होते १००% सक्रिय राहतात
कॅल्शियम २१% कमी होते १००% सक्रिय राहतात
एन्झाईम्स १००% कमी होते १००% सक्रिय राहतात
इम्युनोग्लोबुलिन्स नष्ट होतात १००% सक्रिय राहतात
१० व्हे प्रोटिन्स स्वभाव/गुण-बदल १००% सक्रिय राहतात

[]

सस्तन प्राण्यांच्या नवजातांच्या पोषणासाठी मातेच्या स्तनातून नवजातांच्या जन्मानंतर स्रवणारा द्रव पदार्थ म्हणजे दूध. फक्त सस्तन प्राणी आपल्या पिलाना स्तनांमधून दूघ पाजून मोठे करतात. सस्तन प्राण्यामध्ये घर्मग्रंथींचे रूपांतर दुग्धग्रंथीमध्ये होते. दूध हे पाणी, मेदाम्ले, प्रामुख़्याने केसीन (प्रथिन), आणि लॅक्टोजचे (शर्करा) कलिली मिश्रण आहे. याशिवाय सोडियम,पोटॅशियम, कॅलशियम यांचे क्षार, आणि सूक्ष्म प्रमाणात फॉस्फरस पेंटाऑक्साइड, अ आणि ड जीवनसत्त्व असते. दुधामध्ये काहीं प्रमाणात जिवाणूप्रतिबंधक आणि कवकप्रतिबंधक विकरे असतात, सस्तन प्राण्यांच्या सर्वच जातीमध्ये दूध निर्मिती होते. सस्तन प्राण्यामधील दूध निर्मितीसाठी आवश्यक ‘कप्पा जीन’चा केसीन निर्मितीमध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. हे जनुक नसल्यास सस्तन प्राण्यामध्ये दूधनिर्मिती होत नाही. या जनुकाचा शोध हैदराबादमधील सेंटर फॉर सेल अँड मोलेक्युलर बायॉलॉजी या संस्थेमध्ये लागला आहे. स्तनी वर्गातील दूधनिर्मितीची जनुके एकसारखी असली तरी सर्व स्तनी वर्गामधील दुधामधील घटक आणि प्रतिकारद्रव्ये जातिनुसार भिन्न असतात.

दुधातील प्रथिनांच्या प्रमाणावर पिलाची वाढ किती वेगाने होणार हे अवलंबून असते. उदाहरणार्थ घोड्याच्या शिंगराचे वजन दुप्पट व्हायला साठ दिवस लागतात तर हार्प सीलचे पिलू पाच दिवसात दुप्पट वजनाचे होते. प्रतिलिटर मानवी दुधात १५ ग्रॅम प्रथिने असतात तर रेनडियरच्या दुधातील प्रथिनांचे प्रमाण १०९ ग्रॅम असते.

मादीने पिलास जन्म दिल्यानंतर पहिल्या काहीं दिवसात स्तनातून येणाऱ्या दुधास कोलोस्ट्रम (मराठीत चीक) म्हणतात. कोलोस्ट्रममधील प्रतिकारद्रव्ये संसर्गापासून पिलांचे संरक्षण करतात. पशुपालन चालू झाल्यानंतर मानवाने इतर जनावरांच्या दुधाचा अन्नात समावेश केला आहे. गाय, बकरी,उंट, म्हैस, याक, गाढवीण यांचे दूध उपलब्धतेप्रमाणे वापरले जाते. अधिक उपलब्ध झालेले दूध टिकवून ठेवण्यासाठी दूध विरजून त्याचे दही आणि चीज बनवण्याची पद्धत सुमारे दोन हजार वर्षापूर्वीची आहे.

स्तनामध्ये तयार झालेले दूध स्तनपान केल्याशिवाय पिलाना मिळत नाही. त्यासाठी स्तनाग्रे चोखण्याची क्रिया करावी लागते. पिलानी स्तनाग्रे चोखण्यास प्रारंभ केल्यास पश्च पोषग्रंथीमधून ऑक्सिटॉसिन नावाचे संप्रेरक स्रवते. ऑक्सिटॉसिनच्या प्रभावाने स्तनामध्ये साठलेले दूध आचळातून बाहेर वाहते. (पहा दुग्धस्रवण). आता दुग्धव्यवसाय पूर्ण व्यावसायिक पद्धतीने केला जातो. भारतामधील पशूंची संख्या जगात पहिल्या क्रमांकाची आहे. त्यामुळे भारतात सर्वाधिक दूध उत्पादन होते. यास धवल क्रांती या नावाने ओळखले जाते. दुभत्या जनावरांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी प्रत्येक दुभत्या जनावरामागे सर्वाधिक दूध उत्पादन हॉलंडमध्ये होते.

ए2 दूध

[संपादन]

गायीच्या ज्या दुधात बीटा-केसीन प्रथिनाचा ए2 हा घटक मिळतो, त्या दुधास ए2 प्रकारचे दूध स्हणतात. “ए2मिल्क” हे “ए2 मिल्क कंपनी”चे ब्रँड उत्पादन मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड व इंग्लंडमध्ये विक्रीस उपलब्ध आहे.
सामान्य दुधापेक्षा ए2 दूध आरोग्याकरता अधिक लाभप्रद आहे याचा कोणताही ठोस पुरावा २००९ पूर्वी उपलब्ध नव्हता. कांही प्राथमिक चाचण्यातून अशी शक्यता आढळली, की ए2 दूध हे सामान्य दुधापेक्षा आरोग्याकरता लाभप्रद आहे, व सामान्य ए1 दुधातील ए1 प्रथिने हानिकारक असू शकतात व त्यामुळे दुधाचे पचन कठीण होऊ शकते.
ए1 व ए2 बीटा-केसीन हे दुधातील बीटा केसीनचे दोन जीनी प्रकार आहेत. या दोघांच्या संरचनेत एका अमायनो आम्लाचा फरक असतो. सारा युरोप (फ्रान्सशिवायचा), ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड मधील गायींत ए1 बीटा केसीन आढळते. “ए2 मिल्क कंपनी” ने विकसित केलेल्या जनुकीय चांचणीद्वारे, कोणती गाय ए1 प्रकारचे दूध देते व कोणती गाय ए2 प्रकारचे दूध देते, हे शोधता येते. या चांचणीच्या आधारे सर्व गायींची चांचणी करून ही “ए2 मिल्क कंपनी” ऊत्पादकास प्रमाणपत्र देते. हे दूध अधिक किंमतीला विकले जाते.

पार्श्वभूमी

[संपादन]

गायीच्या दुधात 87 टक्के पाणी आणि 13 टक्के घन पदार्थ असतात. घन पदार्थात मेद, शर्करा (लॅक्टोज), खनीजपदार्थ व प्रथिने असतात. केसीन हा प्रथिनांचा मुख्य घटक असतो, आणि या केसीनपैकी 30 – 35 टक्के प्रमाण हे बीटा केसीनचे असते. (एका लिटरमधे 2 चहाचमचे). गायींच्या जनुकीय रचनेनुसार, या बीटा केसीनचे निरनिराळे प्रकार असतात. यांतील प्रमुख प्रकार म्हणजे ए1 व ए2 बीटा केसीन. पैकी ए1 हा प्रथम शोधला गेला व ए2 त्यानंतर. 209 अमायनो आम्लांच्या शृंखलेने बनलेल्या या दोन्ही केसीनमधला एकमेव फरक म्हणजे ६७वी जागा. ए1 बीटा केसीनमधे या जागी असतो हिस्टिडीन आणि ए2 बीटा केसीनमधे असते प्रोलिन. पचनसंस्थेतील पाचक विकरांची अभिक्रिया नेमकी या ६७व्या ठिकाणीच होत असते. ए1 बीटा केसीनपासून बीटा केसोमॉर्फिन 7 (बीसीएम7) हे पेप्टाईड तयार होते. परंतू, ए2 प्रकारात बीसीएम7 तयार होत नाही.

गायींमधे बीटा केसीनच्या ६७व्या ठिकाणी प्रोलिनच्या जागी हिस्ट्डिन येणे ही घटना ५००० ते १०००० वर्षांपूर्वी उत्परिवर्तनाच्या योगे घडून आली असावी असा वैज्ञानिकांचा कयास आहे. गायींचे कळप युरोपात उत्तरेकडे घेऊन जात असताना हे उत्परिवर्तन संकरातून पश्चिमी देशांत पसरत गेले असावे.

ए1 व ए2 बीटा केसीन देणाऱ्या गायींचे वितरण हे कळपानुसार व भूप्रदेशानुसार बदलत गेले आहे. आफ्रिका व आशियात फक्त ए2 प्रकारच्या गायी आहेत. ए1 प्रकार पश्चिमी देशांत आढळतो. जातिनिहाय पाहिले तर ग्वेर्न्से जातीच्या ७० टक्के गायी ए1, तर होल्स्टन व आयर्शायर्स जातीच्या गायी ४६ ते ७० टक्के ए2 प्रकारचे दूध देतात.

आरोग्यावरील परिणाम

[संपादन]

सन १९८० च्या सुरुवातीला, पेप्टाईड्सचे पचन होत असताना त्यांचा आरोग्यावर भला – बुरा परिणाम होतो किंवा कसे यावर विचार सुरू झाला होता.
ए1 ए2 बीटाकेसीन कडे लक्ष १९९० च्या सुरुवातीला दिले गेले. न्यू झीलंडमधे केलेल्या प्राण्यांवरील प्रयोगांत आणि साथीच्या रोगांवरील संशोधनात, ए1 बीटाकेसीन आणि जुनाट आजार यांच्यात कांही संबंध असावा असे आढळले, याने माध्यमांत व वैज्ञानिकांत तसेच ऊद्योजकांत मोठी उत्सुकता निर्माण झाली. जर खरोखर बीसीएम7 मानवाकरता घातक असेल, तर हा सामाजिक आरोग्याकरता तसेच व्यावसायिकांकरता मोठा मुद्दा ठरू शकणार होता.
सन 2000 मधे स्थापन झालेल्या ए2 कॉर्पोरेशन या कंपनीने एक जनुकीय चाचणी विकसित केली. गाय कोणत्या प्रकारचे दूध देते (ए की ए2) हे या चाचणीद्वारे ठरविता येते. या चाचणीने प्रमाणित ए2 दूध हे त्यात हानिकारक पेप्टाईड्सचा अभाव असल्याने, अधिक किंमतीने विकले जाऊ शकते. कंपनीची वेबसाईट सांगते, की “ बीटाकेसीनए1 हा हानीकारक घटक प्रौढांमधे हृदयरोग तर बालकांत इन्शुलिन-मधुमेहाचा कारक ठरतो. सीइओच्या अनुसार, ए1बीटाकेसीनचा छिन्नमनस्कता, स्वमग्नता यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आहे. ए2 कॉर्पोरेशनने फूड स्टॅंडर्ड्&zwnjस ऑस्ट्रंलिया न्यू झीलंडकडे अशीही मागणी केली, की साध्या दुधावर “आरोग्यास हानिकारक” अशी सूचना सक्तीची करावी.
व्यापक जनहित लक्षात घेता, युरोपियन फूड सेफ्टी ऑथॉरिटी (ईएफएसए)ने उपलब्ध शास्त्रीय पुराव्यांचा अभ्यास करून २००९मधे आपला अहवाल सादर केला. यासाठी ईएफएसए ने बीसीएम7 वर प्रयोगशाळेत झालेल्या चाचण्यांचा आधार घेतला. ईएफएसएला जुनाट आजार आणि ए1 दुधाचे सेवन यांत कोणताही संबंध आढळला नाही. प्राण्यांच्या मेंदूआवरणात किंवा मेजूरज्जूमधे टोचले असता बीसीएम2 हे क्षीणपणे घातक ठरते. या चाचण्या प्राण्यांवर झाल्या होत्या व त्यातही बीसीएम2 तोंडातून दिले गेलेले नव्हते. मानवात दूध तोंडाने ग्रहण केले जाते.सबब या चाचण्या मानवावर होणारा परिणाम तपासण्यात अपुऱ्या ठरतात. सर्वांगीण पुरावा न गोळा करता, साथीच्या रोगांसंबंधी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे अर्धेकच्चे निष्कर्ष धोक्याचे ठरतील असा ईएफएसएने दिला. ए1 केसीनमुळे मधुमेह होतो हे चुकीचे आहे असे २००९ च्या आणखी एका सर्वेक्षणात आढळले. पुन्हा 2014च्या एका सर्वेक्षणात असे आढळले, की दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या बालकांत मधुमेहाचे रुग्ण होण्याची प्रवृत्ती जास्त असते. तथापि, दुधातील नेमका कोणता घटक याला जबाबदार आहे हे शोधणे जिकिरीचे व खर्चिक आहे.

व्यावसायिक उत्पादन व विक्री

[संपादन]

न्यू झीलंडमध्ये ए1बीटा केसीनवर संशोधन करणाऱ्या एका संशोधकाने ए2 कॉर्पोरेशनची स्थापना केली. सहसंस्थापक होता हॉवर्ड पॅटर्सन, न्यू झीलंडमधील एक धनवान उद्योजक, फोंतेरा या दुधसहकारीसंस्थेचा मुख्य भागधारक आणि मोठा दुग्धव्यावसायिक. ए2 कॉर्पोरेशनने जनुकीय चाचणी विकसित करून तिचे पेटमट घेतले. या चाचणीद्वारे गाय कोणत्या प्रकारचे (ए1 की ए2) हे पडताळता येते. सन २०१२ च्या आसपास, ए2 ट्रेडमार्क, ए2 चांचणी, ए2 दूध देणाऱ्या गायींची पैदास करण्याच्या रिती, ए2केसीनयुक्त पोषण आहार, व ए2चे वैद्यकीय उपयोग यांबद्दल जागतिक स्वामित्वहक्क ए2 कॉर्पोरेशनने आपल्या ताब्यात घेतलेले होते.

दुधातील पोषक द्रव्ये

[संपादन]

गाय, म्हैस, शेळी आणि मेंढी यांच्या दुधातील प्रमुख पोषक घटक द्रव्ये/१०० ग्रॅम.[]

घटक मात्रा गाय म्हैस शेळी मेंढी
पाणी ग्रॅम ८७.८ ८१.१ ८८.९ ८३.०
प्रथिने ग्रॅम ३.२ ४.५ ३.१ ५.४
स्निग्धांश ग्रॅम ३.९ ८.० ३.५ ६.०
संतृप्त मेदाम्ल ग्रॅम २.४ ४.२ ३.८ २.३
एकल असंतृप्त मेदाम्ल ग्रॅम १.१ १.७ ०.८ १.५
बहु असंतृप्त मेदाम्ल ग्रॅम ०.१ ०.२ ०.१ ०.३
कार्बोहायड्रेट (लॅक्टोज) ग्रॅम ४.८ ४.९ ४.४ ५.१
शर्करा (लॅक्टोज) ग्रॅम ४.८ ४.४ ५.१ ४.९
कोलेस्ट्रॉल मिलिग्रॅम १४ १० ११
कॅल्शियम मिलिग्रॅम १२० १०० १७० १९५
ऊर्जा किलो कॅलरी ६६ ११० ६० ९५
किलो जूल २७५ ४६३ २५३ ३९६

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "दूध". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-08-06.
  2. ^ a b c Sarvanje, Vinayak. "पौष्टिक आणि स्वादिष्ट दुधाचे विविध पदार्थ |" (इंग्रजी भाषेत). 2017-11-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-12 रोजी पाहिले.
  3. ^ a b लेखक: मोरेश्वर जोशी. तरुण भारत नागपूर-ईपेपर-पान क्र. ९, "भूक भागवणारा अमोल ठेवा-निरसे दूध" Check |दुवा= value (सहाय्य). कृषी भारत पुरवणी
  4. ^ a b "दूध, दही अन् ताक!". Loksatta. 2019-09-12 रोजी पाहिले.
  5. ^ "Table 1 -Milk composition analysis, per 100 grams" (इंग्रजी भाषेत). ३० मार्च २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० मार्च २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]