समुद्रमंथन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
समुद्रमंथन

समुद्रमंथन ही एक पौराणिक संकल्पना आहे.[१][२]

आख्यायिका[संपादन]

विष्णु पुराणातल्या[३] एका कथेनुसार एकदा देवांचा राजा इंद्र कोठूनतरी वैकुंठ लोकाला परत येत होता. त्याचवेळी दुर्वास ऋषी वैकुंठातून बाहेर पडत होते. दुर्वासाने हत्तीवर बसलेल्या इंद्राला पहिले आणि त्याला विष्णू समजून त्याच्या दिशेने एक फुलांची माळ फेकली. परंतु आपल्याच धुंदीत असलेल्या इंद्राने ती माळ हत्तीच्या डोक्यावर फेकली. हत्तीने डोके झटकून ती माळ जमिनीवर पाडली आणि ती त्याच्या पायाखाली आली. दुर्वास ऋषींनी हे पाहिले, ते संतप्त झाले आणि त्यांनी इंद्राला 'तुझे सर्व वैभव नष्ट होऊन समुद्रात पडेल आणि तुझे दानवांशी युद्ध होऊन त्यात तू हरल्यावर स्वर्गाचे राज्य गमावशील' असा शाप दिला. आपले वैभव नष्ट झाल्यावर इंद्रदेव इतर सर्व देवांना घेऊन भगवान विष्णूंकडे गेला आणि आपले वैभव परत मिळण्यासाठी काय करावे याचा सल्ला विचारला. विष्णूने समुद्रमंथन करून संपूर्ण वैभव वापस परत मिळवावे आणि सागरमंथनातून अमृत प्राप्त करून घेऊन त्याचा उपभोग करावा असा मार्ग सुचवला. त्यानंतर मंदार पर्वताच्या शिखरावर देवतागण एकत्र होऊन अमृतप्राप्तीसाठी चर्चा करू लागले. तेव्हा भगवान नारायणांनी देवांना सांगितले," देवांनी आणि दैत्यांनी (दानवांनी) मंदार पर्वताची रवी करून समुद्रमंथन करावे, त्या मंथनातून अमृतप्राप्ती होईल." तेव्हा देवांनी नारायणांच्या सल्ल्यानुसार अकरा सहस्र योजने उंच आणि खोल असलेला मंदार पर्वत उपटून काढण्याचा प्रयत्‍न केला, पण ते शक्य झाले नाही. तेव्हा देवगण परत भगवान नारायण आणि भगवान ब्रह्मदेवाकडे गेले आणि तेव्हा त्यांनी शेषनागाला मंदाराचल उपटण्यासाठी सांगितले. महाबली शेषनागाने मंदाराचल उपटला. सर्व देवगण मंदाराचलासह समुद्रकिनारी गेले. सर्वानी समुद्रदेवाला सांगितले की, "आम्ही तुझे मंथन करणार आहोत." तेव्हा समुद्रदेव म्हणाले, "जर तुम्ही मलाही अमृतातील हिस्सा द्याल तर मी मंथनाचे कष्ट सहन करीन." तेव्हा भगवान नारायणांनी कूर्मावतार घेतला आणि मंदार पर्वताला आपल्या पाठीवर घेतले. आणि समुद्रमंथन सुरू झाले. या प्रकारे देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. वासुकी नागाच्या मुखाकडील बाजूस दैत्य आणि शेपटीकडील बाजूस देव होते. पुन्हा पुन्हा वासुकी नाग ओढला जात असल्यामुळे त्याच्या मुखातून अग्नी ज्वाला आणि धूर बाहेर येई. त्या धुराने ढग तयार होऊन ते ढग थकलेल्या देवांवर पर्जन्यवृष्टी करू लागले. पर्वतावर झाडांच्या घासल्या जाण्यामुळे आग लागली. तेव्हा भगवान इंद्रानी पर्जन्यवृष्टी करून पर्वत शांत केला. वृक्षांचे दूध आणि औषधी रस समुद्रात आले. औषधांच्या अमृतासमान रस आणि दूध व सुवर्णयुक्त मंदाराचलावरील मणी यांच्या एकत्रीकरणाने पावन झालेल्या जलाला स्पर्श केल्याने देवांना अमरत्व प्राप्त होऊ लागले. त्या संमिश्रणाने समुद्राचे पाणी दूध बनले. त्या दुधापासून तूप तयार झाले.सुरूवातीला याच समुद्रमंथनातून विष हलाहल निर्माण झाले होते. भगवान ब्रह्मदेवच्या विनंतीवरून भगवान शंकरदेवाने ते विष प्राशन केले. तेव्हापासून ते नीलकंठ या नावाने प्रसिद्ध झाले.[४]त्यानंतर देव - दानवांनी अजून जोराने मंथन केले. त्यावेळी समुद्रातून अगणित किरणांचा व शीतल प्रकाशी व श्वेतवर्णी असा प्रकट झाला. चंद्रानंतर देवी लक्ष्मी आणि अप्सरा रंभा,सुरा(वारूणी) यांची उत्पत्ती झाली. त्याचवेळी श्वेतवर्णी उच्चैःश्रवा घोडा निर्माण झाला. भगवान नारायणांच्या वक्षावर सुशोभित होणारा उज्ज्वल कौस्तुभमणी, सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनु गाय व कल्पवृक्ष,पारिजातक तयार झाले. लक्ष्मी,सुरा, चंद्र आणि उच्चैःश्रवा हे सर्व आकाशातून देवलोकी गेले. त्यानंतर हाती अमृतचा कमंडलू घेवून विष्णु अवतार देव धन्वंतरी प्रकट झाले.[५] हा चमत्कार बघून दानवांमध्ये 'हे माझे, हे माझे' असा गोंधळ झाला. त्यानंतर चार दातांनी युक्त विशाल ऐरावत हत्ती निर्माण झाला. त्यास व उचैःश्रवा याला इंद्राने घेतले. अमृत आणि लक्ष्मी या दोघांच्या प्राप्तीसाठी दानवांमध्ये फूट पडली. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून दानवांकडून अमृत घेतले आणि ते देवतांना दिले. देवतांनी ते अमृत प्राशन केले. तेव्हा केतूराहूसुद्धा देवतांचे रूप धारण करून अमृत पिऊ लागला. अमृत राहूच्या कंठापर्यंत गेले असता चंद्रदेव आणि सूर्यदेवमुळे राहूचे रूप उघड केले. लगेचच भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने त्यांचे मस्तक धडापासून वेगळे केले. ते पृथ्वीवर पडून तडफडू लागले. तेव्हापासूनच त्यांचे सूर्य व चंद्राबरोबर वैमनस्य राहिले. त्यानंतर देव आणि दानवांमध्ये मोठे युद्ध झाले. त्यावेळी भगवान विष्णूंचे आणि नारायण अशी दोन्ही रूपे दिसू लागली. सुदर्शन चक्राने दानव कापले जाऊ लागले. तेव्हा दानव हे पृथ्वीत आणि समुद्रात लपले. देवांचा विजय झाला. मंदाराचलाला पुन्हा त्याच्या जागेवर ठेवले गेले. देवांनी मुख्यतः भगवान विष्णूने व इंद्राने सुरक्षिततेसाठी भगवान गरुडाकडे अमृत दिले.[१]

कुंभमेळा आख्यायिका[संपादन]

विष्णूने उरलेले अमृत आपले वाहन असलेल्या गरुडाकडे दिले आणि त्याला ते देवलोकी सुरक्षित ठेवण्यास सांगितले. गरुड देवलोकात अमृताचा कुंभ नेत असताना अमृताचे काही थेंब पृथ्वीवर सांडले. ज्या ठिकाणी ते अमृत सांडले त्या ठिकाणांना पुराणात तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळाली. त्या ठिकाणी कुंभमेळा संपन्न होतो.[६]

कुंभमेळा साधू आखाडा

भागवत पुराणातील संस्कृत श्लोक[संपादन]

अंकोरवट (कंबोडिया) येथील समुद्रमंथनाचे शिल्प

श्रीशुक उवाच -

ते नागराजमामंत्र्य फलभागेन वासुकिम् ।

परिवीय गिरौ तस्मिन् नेत्रमब्धिं मुदान्विताः ॥ १ ॥

आरेभिरे सुसंयत्ता अमृतार्थे कुरूद्वह ।

हरिः पुरस्तात् जगृहे पूर्वं देवास्ततोऽभवन् ॥ २ ॥

कठीण शब्दांचे अर्थ- कुरूद्वह - हे कुरुश्रेष्ठा परीक्षित राजा. मुदान्विताः - आनंदित झालेले. ते - ते देव व दैत्य. फलभागेन - फळांतील भाग देऊ करून. नागराजं वासुकिं. सर्पाचा राजा जो वासुकि त्याला. आमन्त्र्य - बोलावून. (तं) नेत्रं - त्याला दोरी म्हणून. तस्मिन् - त्या. गिरौ - पर्वतावर. परिवीय - गुंडाळून. अमृतार्थं - अमृताकरिता. सुसंयत्ताः - सज्ज झालेले असे. अब्धिं (मथितुं). समुद्राचे मंथन करण्यास. आरेभिरे - आरंभ करिते झाले. हरिः - श्रीविष्णू. पूर्वं - प्रथम. पुरस्तात् - पुढच्या बाजूस. जगृहे - धरिता झाला. ततः - त्याच्या मागोमाग. देवाः - देव. अभवन् - त्या बाजूला झाले. ॥१-२॥

मराठी समशलोकी-

परीक्षिता तदा देवे असुरे वासुकीस त्या ।

अमृत भाग देण्याचे करोनी मान्य आणिले ॥

नेती वासुकिची केली पर्वता वेढिले तये ॥ १ ॥

अमृता इच्छुनी सर्व घुसळायासि लागले ।

अजीत वासुकीच्या त्या मुखाकडुनि राहता ॥

देवता राहिल्या त्याच बाजूने नेति ओढिण्या ॥ २ ॥

--श्री मद्भागवताच्या ७व्या अध्यायाच्या मराठी भाषांतरातला विष्णुदास वसिष्ठ यांचा समश्लोकी अनुवाद.

श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, समुद्रमंथनातून मिळणाऱ्या अमृतामध्ये तुलाही वाटा मिळेल, असे नागराज वासुकीला वचन देऊन, त्याला दोराप्रमाणे मंदाराचलाला लपेटून घेतले आणि चांगल्या तयारीनिशी त्यांनी अमृत मिळविण्यासाठी आनंदाने समुद्रमंथन करण्यास प्रारंभ केला. त्यावेळी श्रीहरींनी प्रथम वासुकीच्या मुखाची बाजू धरली, म्हणून देवसुद्धा त्या बाजूला गेले. (१-२)

चौदा रत्ने[संपादन]

या मंथनातून चौदा रत्ने बाहेर आली. ती पुढीलप्रमाणे:

लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुराधन्वन्तरिश्चन्द्रमाः।

गावः कामदुहा सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः।

अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोमृतं चाम्बुधेः।

रत्‍नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्यात्सदा मङ्गलम्।

लक्ष्मीकौस्तुभ(मणी) ●पारिजातककल्पवृक्षरंभा(अप्सरा) ●धन्वंतरी(विष्णु अवतार) ●चंद्रदेवकामधेनू(गाय) ●ऐरावत(हत्ती) ●उच्चैःश्रवा (घोडा) ●हलाहल (विष) ●अमृतशंखधनुष्य(विष्णु अवतारांसाठी) ●सुरा(वारूणी)[७]

हे ही पहा[संपादन]

कुंभमेळा

सिंहस्थ कुंभमेळा

संदर्भ[संपादन]

  1. a b Chandak, Kanhaiya Lal (2010-01-01). Bharatiya Sanskriti Ke Aadhar Granth (hi मजकूर). Prabhat Prakashan. आय.एस.बी.एन. 9788188267958. 
  2. ^ Varadpande, Manohar Laxman (2009). Mythology of Vishnu and His Incarnations (en मजकूर). Gyan Publishing House. आय.एस.बी.एन. 9788121210164. 
  3. ^ Wilson, Horace Hayman (1840). The Vishńu Puráńa: A System of Hindu Mythology and Tradition (en मजकूर). J. Murray. 
  4. ^ Gokhale, Namita (2008-09). Shiv Mahima (Hindi) (hi मजकूर). Penguin Books India. आय.एस.बी.एन. 978-0-14-400146-0. 
  5. ^ Sacitra Āyurveda (hi मजकूर). Ṡrī Baidyanātha Āyurveda Bhavana. 1998. 
  6. ^ MURTY, SUDHA (2018-04-01). GARUDJANMACHI KATHA (mr मजकूर). Mehta Publishing House. आय.एस.बी.एन. 9789387789722. 
  7. ^ Sutton, Komilla (1999-01-20). Essentials of Vedic Astrology (en मजकूर). The Wessex Astrologer. आय.एस.बी.एन. 978-1-902405-79-7.