Jump to content

शनी ग्रह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


शनी  

शनी
कक्षीय गुणधर्म
कक्षेचा कल: सूर्याच्या विषुववृत्ताशी
कोणाचा उपग्रह: सूर्य
उपग्रह: ६२
वातावरण


सूर्यमालेतील ग्रहांमध्ये शनी (Saturn) हा सूर्यापासून सहाव्या स्थानावर आहे. त्याचे बरेचसे वस्तुमान वायूंमुळे असून हा सूर्यमालेतील आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. शनीभोवती बर्फ व आंतरिक्ष कचऱ्यापासून बनलेली कडी आहेत. गुरू ग्रहापेक्षा लहान असला तरी हा त्याच्या भोवताली असलेल्या देखण्या कड्यांमुळे अधिक प्रसिद्ध आहे.

शनीचा आकाशातील अन्य तारकांच्या संदर्भातील वेग अतिशय कमी आहे. म्हणजे अडीच वर्षांमध्ये शनी फक्त एक रास (३० अंश) पुढे जातो. त्यामुळे शनीला संस्कृतमध्ये ’मंद’ म्हणतात. भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या माणसाची जी (चंद्र)रास असेल त्या राशीत किंवा तिच्या आधीच्या किंवा पुढच्या राशीत जेव्हा शनी असतो, तेव्हा ता माणसाला साडेसाती आहे असे समजले जाते.

शनी ग्रह देखील गुरूप्रमाणेच वायुरूपात आहे. शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: २९ वर्ष लागतात. या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणत: १,४२६,७२५,४०० किलोमीटर एवढे आहे.

शनी ग्रह आकाराने प्रचंड असला तरी याची घनता पाण्यापेक्षा कमी आहे, म्हणजे जर शनी पाण्यात पडला तरी तो त्या पाण्यावर सहज तरंगेल.

शनी ग्रहाभोवती असणाऱ्या असंख्य लहान मोठ्या खडकांनी मिळून कडी निर्माण झाली आहेत. या कड्यांची संख्या असंख्य आहे. या कड्यांची प्रामुख्यांनी सात वेगवेगळ्या कड्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या कड्यांमध्ये एक मोठी पोकळी दिसते या पोकळीला "कॅसिनी डिव्हिजन" असे म्हणतात. या पोकळीतील दोन कड्यांध्ये ४,००० किलोमीटरची पोकळी आहे.

शनी ग्रह त्याच्या अक्षाभोवती साधारणत: २८ अंशांनी कललेला असल्यामुळे पृथ्वीवरून आपणास शनीची कडी व्यवस्थित दिसतात, काही वेळा पृथ्वी शनीच्या विषुववृत्ताच्या पातळीत येते, त्यावेळी शनीची कडी पृथ्वीवरून दिसेनाशी होतात व फक्त एक बारीक रेषा दिसते. शनीला एकूण सुमारे ६२ चंद्र आहेत. त्यांतले ज्यांची निश्चिती झालेली नाही असे ९ हंगामी चंद्र आहेत.

भौतिक गुणधर्म

[संपादन]

शनी ग्रहाचा आकार हा त्याच्य़ा ध्रुवापाशी चपटा तर विषुववृत्ताजवळ जास्त फ़ुगीर आहे. त्याचा ध्रुवीय व्यास हा विषुववृत्तीय व्यासापेक्षा जवळपास १०%नी कमी आहे (१,२०,००० किमी व १,०८,७२८ किमी). हा आकार त्याला त्याच्य़ा जलद परिवलनामुळे व त्याच्या वायू अवस्थेमुळे आला आहे. बाकीचे वायूने बनलेले ग्रहही ध्रुवापाशी चपटे आहेत पण शनी इतके नाहीत. सूर्यमालेत फ़क्त शनीच पाण्यापेक्षा कमी घनता असणारा ग्रह आहे त्याचे सरासरी विशिष्ट गुरुत्व ०.६९ इतके आहे. पण ही सरासरी घनता आहे. शनीच्या बाह्य वातावरणाची घनता पाण्यापेक्षा कमी असून गाभ्याची घनता जास्त आहे. शनीच्या अनेक चंद्रांपैकी टायटन हा सर्वात मोठा चंद्र आहे. तो पृथ्वीच्या चंद्रापेक्षा मोठा आहे आणि त्याच्याकडे जाड, अपारदर्शक वातावरण आहे. त्याच्या कड्यांची मालिका हा शनीचा सर्वात सुंदर भाग आहे. शनीच्या दृश्यमान प्रकाशात दिसणारा ह्या मालिकेचा हिस्सा लांबीने सुमारे १,७०,००० मैलांहून (३,००,००० किलोमीटरहून) अधिक आहे.

शनीचे परिवलन

[संपादन]

वायुरूप असल्याने शनी त्याच्या आंसाभोवती एकसमान गतीने फिरत नाही. गुरू ग्रहाप्रमाणे त्याला दोन कालावधी आहेत : शनीवरच्या विषुववृत्तीय प्रदेशाचा स्वतःभोवती फिरण्याचा कालावधी १० तास १४ मिनिटे आहे. (म्हणजे पृथ्वीवरील एका दिवसाच्या काळात शनी ८८४ अंशात फिरतो). शनीचा विषुववृत्तीय प्रदेश हा दक्षिण विषुववृत्तीय पट्ट्याच्या उत्तर किनाऱ्यापासून ते उत्तर विषुववृत्तीय पट्ट्याच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत पसरला आहे. उर्वरित रेखांशाना परिवलनास १० तास ३९ मिनिटे २४ सेकंद लागतात. (पृथ्वीवरील एका दिवसाच्या काळात शनी ८१० अंशात फिरतो.)

शनीभोवतीची कडी

[संपादन]

शनी त्याच्याभोवतीच्या कड्यांमुळे जास्त ओळखला जातॊ. ही कडी साध्या दूरदर्शी किंवा द्विनेत्रीच्या(दुर्बिणीच्या) साहाय्याने पहाता येतात. ही कडी शनीच्या विषुववृत्तावर ६,६३० कि.मी. ते १,२०,७०० कि.मी. अंतरापर्यंत पसरलेली आहेत. कड्याची जाडी मात्र एक किलोमीटरच्या आसपास आसून ती सिलिका, आयर्न ऑक्साईड व बर्फाच्या कणांपासून बनलेली आहेत. कणांचे आकारमान एक धूलिकणाच्या आकारमानापासून ते १० मीटरपर्यंत असते. पॅन आणि ॲटलस हे शनीचे दोन सर्वात आतले चंद्र आहेत.

नैसर्गिक उपग्रह

[संपादन]

शनीला खूप चंद्र आहेत. त्यांची निश्चित संख्या सांगता येत नसली तरी ते संख्येने सुमारे बासष्ट असावेत. त्याच्या सभोवतालच्या कड्यामधील सर्व तुकडे हे एका अर्थाने त्याचे उपग्रहच आहेत. तसेच कड्यांमधील मोठा तुकडा व लहान चंद्र यामध्ये फरक करणेसुद्धा अवघड आहे. या सर्वांमध्ये फक्त सात उपग्रहांना त्यांच्या (त्यातल्या त्यात) जास्त वस्तुमानामुळे गोलाकार प्राप्त झाला आहे. शनीचा सर्वांत लक्षणीय उपग्रह म्हणजे टायटन(Titan). संपूर्ण सूर्यमालेत फक्त याच उपग्रहाला दाट वातावरण आहे. याची मध्यभागील घनता जास्त आहे. शनीच्या एनक्लेडस या फक्त ५०० किलोमीटर रुंद असलेल्या चंद्रावर पाणी असण्याची शक्यता आहे. शनीला भेट देणारे कॅसिनी हे नासाने पाठवलेले एकमेव यान होते. सप्टेंबर २०१७मध्ये ह्या यानाने शेवटचे चित्र पाठवले आणि ते यान नष्ट झाले.

संदर्भ

[संपादन]

जाणून घ्या सूर्यमालेतील शनी ग्रहाविषयी रंजक माहिती Archived 2020-02-18 at the Wayback Machine.