कृष्णा कल्ले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कृष्णा कल्ले (जन्म : इ.स. १९४१; - मुंबई, १५ मार्च, २०१५) या एक मराठी सुगम संगीत गायिका होत्या.. त्यांनी १९६० तसेच १९७०च्या दशकात दोनशेहून अधिक हिंदी, पंजाबी, गुजराती]] व शंभरहून जास्त मराठी गाणी गायली आहेत. 'केला इशारा जाता जाता' आणि 'एक गाव बारा भानगडी' या त्याकाळी गाजलेल्या चित्रपटांतील लावण्या त्यांनीच गायलेल्या आहेत. त्या इ.स. १९६०पासून मुंबई आकाशवाणीच्या 'अ' श्रेणीच्या गायिका होत्या.

मूळच्या कारवारी, पण वडिलांच्या उत्तरप्रदेशातील कानपूर येथील नोकरीमुळे कृष्णा कल्ले यांचा जन्म आणि बालपण, शिक्षण कानपूरच्याच हिंदीभाषी प्रदेशात झाले. परिणामी त्यांच्या गळ्यावर मूळच्या कारवारी भाषेऐवजी हिंदी-ऊर्दू भाषेचाच लहजा चढला. शालेय जीवनात त्या गायन शिकत असताना स्पर्धांमध्ये आपले गुण प्रदर्शित करून त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पारितोषिके पटकावली होती. त्यांच्या गोड आवाजामुळे सोळा वर्षांच्या असतानाच कानपूर रेडिओ स्टेशनवर त्या गायला लागल्या. सोबत उत्तर प्रदेशात होणा‍र्‍या यात्रां-जत्रांतील संगीत समारोहांत देखील त्यांचा आवाज गुंजायला लागला.

एकदा मुंबईत नातेवाईकांकडे आल्या असताना कृष्णा कल्ले यांचा आवाज गायक [[अरुण दाते] यांच्या कानावर पडला आणि त्यांन‌ी हा आवाज मुंबई आकाशवाणीवर काम करणा‍र्‍या संगीत दिग्दर्शक यशवंत देवांपर्यंत पोहचवला. आधी देवांनी आणि नंतर [[अनिल मोहिले] यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून मराठी भावगीते गाऊन घेतली.

आलम आरा (हिंदी), गुणसुंदरीनो घर संसार (गुजराती), अज दी हीर (पंजाबी) या अमराठी चित्रपटांतील त्यांची गाणी गाजली. जमाने से पूछो, टारझन और जादुई चिराग, प्रोफेसर और जादूगर, रास्त और मंजिलें आदी काही दुय्यम दर्जाच्या हिंदी चित्रपटांसाठीही कृष्णा कल्ले यांनी गाणी गायली. हिंदीतील सुमारे २०० आणि मराठीतील सुमारे १०० चित्रपटगीतांना त्यांनी आवाज दिला. १००हून अधिक भजने, भक्तिगीते व गझला त्या गायल्या आहेत.

कृष्णा कल्ले यांनी गायिलेली मराठी गाणी (कंसात संगीत दिग्दर्शकाचे नाव)[संपादन]

 • अंतरंगी रंगलेले गीत (अनिल मोहिले)
 • अशा या चांदराती (विठ्ठल शिंदे)
 • अशी नजर घातकी बाई (श्रीनिवास खळे)
 • आईपण दे रे (श्रीनिवास खळे)
 • इथे मिळाली सागर-सरिता (हेमंत केदार)
 • ऊठ शंकरा सोड समाधी (दत्ता डावजेकर]]
 • कशी रे आता जाऊ घरी (विठ्ठल शिंदे)
 • कामापुरता मामा (यशवंत देव)
 • कुणि काहि म्हणा (यशवंत देव)
 • कुंजात विहरतो सुगंध शिंपित (वीरधवल करंगुटकर)
 • गुपित मनिचे राया (एस्‌. मदन)
 • गोड गोजिरी लाज लाजरी, ताई तू होणार नवरी (हृदयनाथ मंगेशकर)
 • चंद्र अर्धा राहिला रात्र (यशवंत देव)
 • चंद्रकळा रुक्मिणी नेसली (विश्वनाथ मोरे)
 • तांडा चालला रे गड्या (राम कदम)
 • तुझ्याचसाठी कितीदा (यशवंत देव)
 • तू अनश्वरातील अमरेश्वर (वीरधवल करंगुटकर)
 • तू अबोल हो‍उन जवळी मजला (श्रीनिवास खळे)
 • तू माझ्या स्वप्नांची कल्पना (ओम दत्ताराम)
 • देश हीच माता देश जन्मदाता, घडो देशसेवा ऐसी, बुद्धी दे अनंता (श्रीनिवास खळे)
 • नाचतो डोंबारी रं (राम कदम)
 • पत्र तुझे ते येता अवचित (बाळ चावरे)
 • परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशिल का (अनिल मोहिले)
 • पुनवेचा चंद्रमा आला घरी, चांदाची किरणं दर्यावरी (बाळ पार्टे)
 • फुलं स्वप्नाला आली गं (सुधीर फडके)
 • बिब्बं घ्या बिब्बं, शिक्ककाई गल्लीबोळातनं वरडत जाई (राम कदम)
 • मन पिसाट माझे अडले रे (यशवंत देव)
 • मीरेचे कंकण, भक्तीचे दर्पण, स्मरे ते रंगून, हरीनाम
 • मैना राणी चतुर शहाणी (श्रीनिवास खळे)
 • रामप्रहरी रामगाथा (श्रीनिवास खळे)

कृष्णा कल्ले यांनी गायिलेली हिंदी-पंजाबी-गुजराती गाणी[संपादन]

 • आज जश्ने-खुशनसीबी है (हिंदी चित्रपट आलम आरा, सहगायिका चंद्राणी मुखर्जी आणि इतर)
 • आजा ले ले (पंजाबी चित्रपट -अज दी हीर)
 • ओ मेरे राजा (हिंदी चित्रपट -गरीबी हटाओ)
 • तेरा वादे पे वादा होता गया (हिंदी चित्रपट -गाल गुलाबी नैन शराबी, सहगायिका प्रीती सागर)
 • पाटणना चौकमां गरबो (गुजराती चित्रपट -गुणसुंदरीनो घर संसार, कोरस)
 • मेरी ह्सरतोंकी दुनिया (हिंदी चित्रपट -गाल गुलाबी नैन शराबी, सहगायक मोहम्मद रफी)
 • मेहंदी रचेगी (हिंदी चित्रपट -गाल गुलाबी नैन शराबी)
 • हाल ए दिल क्या करें (हिंदी चित्रपट -आतिश)
 • हीर जत्ती दा विलायती रांझा (पंजाबी चित्रपट -अज दी धार)
 • हीरनी दोरी हलरा दू (गुजराती चित्रपट -गुणसुंदरीनो घर संसार)

पुस्तक[संपादन]

कृष्णा कल्ले यांच्या जीवनावर 'गायिका कृष्णा कल्ले : एक कृतार्थ गानप्रवास' नावाचे पुस्तक वसुधा कुलकर्णी यांनी लिहिले आहे.


पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

 • जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते यूथ फेस्टिवल पुरस्कार
 • राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते १९५७ मध्ये गायनासाठी पुरस्कार
 • १९५८मध्ये अखिल भारतीय सुगम संगीताचे पहिले पारितोषिक
 • पी. सावळाराम प्रतिष्ठान आणि ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारा ‘गंगा जमुना पुरस्कार’
 • अरुण दाते यांच्या आग्रहाखातर कृष्णा कल्ले यांनी १९६५मध्ये त्यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या गायन स्पर्धेत भाग घेतला आणि सेहगल मेमोरियलतर्फे देण्यात येणारा गोल्डन 'गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया'चा किताब मिळवला.
 • महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.