विकिपीडिया:सद्य घटना/एप्रिल २००८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एप्रिल २००८
सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु
<< १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० >>


आजचे छायाचित्र                                                                                  दि. २० एप्रिल २०२४, शनिवार


दि. ३०.०४.२००८[संपादन]

शासनाकडून हवाय मराठीला न्याय
राज्यातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये मराठीचा वापर करण्याबाबत सर्व स्तरांवर प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार याबाबतीत हळुहळू प्रगती होते आहे. मात्र या प्रयत्नांना शासनाने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तसेच यासाठी अत्यावश्‍यक सोयीसुविधा पुरविण्यासाठीही शासनाने वेगाने काम करण्याची आवश्‍यकता आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३४८ नुसार उच्च न्यायालयसर्वोच्च न्यायालय यांची भाषा इंग्रजी आहे. मात्र न्यायालयांच्या कामकाजाची भाषा बदलण्याचा हक्क संसदेला आहे. याच अनुच्छेदाच्या उपकलम २ नुसार राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीने न्यायालयांच्या कामकाजाची भाषा बदलण्याचा हक्क राज्यपालांना आहे. वरील उपकलमाचा आधार घेऊन केरळ, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांनी तेथील भाषेतूनच त्यांच्या न्यायालयांचे कामकाज चालविले आहे. याच आधारे महाराष्ट्राच्या राज्यपालांनी आदेश काढून कनिष्ठ न्यायालयांच्या कामकाजाची भाषा मराठी करावी, असे निवेदन मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेने राज्यपालांना मागीलवर्षी दिले आहे. ते अद्याप प्रलंबित आहे.
सकाळ


व्याजदर वाढीची टांगती तलवार कायम
देशाच्या अर्थजगताला ग्रासलेल्या महागाईच्या साडेसातीवर काहीसा उतारा म्हणून भारतीय रिझर्व्ह बॅंकेने सीआरआरमध्ये पाव टक्‍क्‍याची वाढ करण्याचा निर्णय आजच्या वार्षिक पतधोरणात घेतला. अपेक्षेप्रमाणे रेपो दरात वाढ झाली नसली तरी सीआरआरच्या वाढत्या दरामुळे तमाम कर्जदारांवरील व्याजदर वाढीची टांगती तलवार कायम राहिली आहे. बॅंकेने चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणात राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाचा दर ८.५ टक्के तर चलनवाढीचा दर ५ ते ५.५ टक्के इतका निर्धारित केला आहे.
सकाळ


होर्डिंग्सच्या भाऊगर्दीत हरवला फाळकेंचा पुतळा
दादरच्या हिंदमाता चित्रपटगृहासमोरच्या चौकात भा. रा. तांबे यांच्या "जन पळभर म्हणतील हाय हाय..." या काव्यपंक्तींची पुन्हा एकवार आठवण व्हावी, असा विदीर्ण प्रकार तिथे घडलाय. या चौकाच्या एका बाजूला विविध राजकीय पक्षांनी लावलेली काही पोस्टर्स आपले लक्ष वेधून घेतात. या होर्डिंग्सच्या भाऊगर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा पुतळा हरवलाय. या पुतळ्याकडे फक्त राज्य शासनच नव्हे; तर चित्रपटसृष्टीनेही पाठ फिरवलीय. दादासाहेब फाळकेंची उद्या (ता. ३०) १३८ वी जयंती. ज्या व्यक्तीने भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली, त्या व्यक्तीचे अवघे दोनच पुतळे महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. पूर्वीच्या काळात दादर भागात स्टुडिओंची अधिक संख्या होती. म्हणून हिंदमाता चित्रपटगृहासमोर १९७० मध्ये हा पुतळा उभारण्यात आला होता. तेव्हापासून आजतागायत या पुतळ्याकडे दुर्लक्ष झालेय.
सकाळ


विद्यार्थ्याला मारहाणीच्या निषेधार्थ ऑस्ट्रेलियात भारतीयांचे आंदोलन
अर्धवेळ टॅक्‍सी चालवणार्‍या एका भारतीय विद्यार्थ्याला प्रवाशाने बेदम मारहाण केल्याबद्दल येथील भारतीय टॅक्‍सीचालकांनी बुधवारी आंदोलन केले. या प्रकरणातील गुन्हेगाराला लवकरात लवकर कडक शिक्षा न झाल्यास येथील विमानतळ बंद पाडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. मारहाण झाल्यानंतर तो विद्यार्थी तब्बल दोन तास त्याच ठिकाणी पडून होता. त्याला कोणीही रुग्णालयात दाखल केले नाही. यावरून भारतीय टॅक्‍सीचालक चिडलेले आहेत. वर्णद्वेषाचाच हा प्रकार असल्याचे टॅक्‍सीचालकांचे म्हणणे आहे.
सकाळ

दि. २९.०४.२००८[संपादन]

पीएसएलव्हीचे यशस्वी उड्डाण
पीएसएलव्हीचे यशस्वी उड्डाण
पीएसएलव्हीचे यशस्वी उड्डाण
"पीएसएलव्ही सी ९च्या यशामुळे आंतरराष्ट्रीय अवकाश बाजारपेठेत भारताचे महत्त्व वाढणार असून, अनेक देशांची मागणी पाहता लवकरच अशा मोहिमांची संख्या वाढवण्यात येणार आहे" असे प्रतिपादन भारतीय अवकाश संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. जी. माधवन नायर यांनी केले. दरम्यान, आता पूर्ण लक्ष चांद्रयानावर केंद्रित करणार असल्याचे पीएसएलव्हीचे प्रकल्प संचालक डॉ. जॉर्ज कोशी यांनी सांगितले. दहा उपग्रहांच्या यशस्वी उड्डाणानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सकाळ


थप्पड पडली तीन कोटी रुपयांना
श्रीशांतला थप्पड मारल्याप्रकरणी हरभजनला दोषी ठरवले गेले असून, सामनाधिकारी फारुख इंजिनिअर यांनी त्याला ११ आयपीएल सामन्यांची बंदी ठोकली आहे. भज्जीने चूक कबूल करून साश्रुनयनांनी माफी मागितली. त्याला पश्‍चात्ताप झाल्याचे मुंबई इंडियन्सच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनाही दंड झाला. प्रसंगावर ताबा ठेवणे शक्‍य असून काहीच केले नाही, असा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला. एकंदरीत पाच सेकंदाचा मूर्खपणा हरभजनला ३ कोटी रुपये आणि ११ सामन्यांच्या बंदीला पडला.
सकाळ


ऑलिंपिक संघटनेकडून हॉकी महासंघ बरखास्त
भारतीय हॉकी महासंघावरील के. पी. एस. गिल यांचा दीड दशकांचा दहशतवाद अखेर संपुष्टात आला आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेने संपूर्ण हॉकी महासंघच बरखास्त केला आहे. महासंघाचे सरचिटणीस के. ज्योतिकुमारन स्टिंग ऑपरेशनमध्ये लाच घेताना सापडल्यामुळे हॉकीच नव्हे, तर संपूर्ण क्रीडा क्षेत्रात खळबळ माजली होती. संसदेपर्यंत याचे पडसाद उमटले होते. या पार्श्‍वभूमीवर ऑलिंपिक संघटनेने आज दिल्लीत कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलाविली होती. प्रदीर्घ चर्चेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
सकाळ


चिमणराव आणि गुंड्याभाऊ पुन्हा येणार
सुप्रसिद्ध विनोदी लेखक चिं. वि. जोशी यांच्या गाजलेल्या कथांवर बेतलेल्या आणि एकेकाळी गाजलेल्या "चिमणराव आणि गुंड्याभाऊ" या मालिकेचे लवकरच पुनरागमन होणार आहे. "चिवचिवाट" असे तिचे नवीन नाव आहे. प्रदीप पटवर्धन या मालिकेत चिमणरावांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
सकाळ


उड्डाणपुलांना पर्यावरणवाद्यांचा विरोध
पुणे महापालिकेतर्फे उभारण्यात येणार्‍या सहा उड्डाणपुलांच्या विरोधात आज विविध पर्यावरणवादी; तसेच स्वयंसेवी संस्थांनी निदर्शने केली. हे उड्डाणपूल उभारण्यासाठी विविध सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या येत्या बैठकीत निर्णयासाठी येणार आहे. पर्यावरणवादी संघटनांच्या प्रतिनिधींनी या बाबत आज महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी आणि स्थायी समितीचे अध्यक्ष श्‍याम देशपांडे यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले.
सकाळ


न्यूजप्रिंटमध्ये दरवाढ
वृत्तपत्रांच्या निर्मितीमध्ये निम्म्याहून अधिक वाटा असलेल्या न्यूजप्रिंटच्या किमती गगनाला भिडल्याने वृत्तपत्र उद्योगावर आर्थिक अस्थैर्याचे सावट घोंघावत आहे. छोट्या आणि मध्यम वृत्तपत्रांचे कंबरडेच मोडणार्‍या या दरवाढीतून सावरण्यासाठी वृत्तपत्रांची विक्री किंमत वाढविण्याबरोबरच जाहिरातींचे दरही वाढविणे अपरिहार्य झाले आहे, असे सांगण्यात येत आहे. भारतात प्रामुख्याने उत्तर अमेरिका आणि चीनमधून न्यूजप्रिंट आयात केली जाते. बीजिंग ऑलिंपिक लक्षात घेऊन, चीनने न्यूजप्रिंटच्या निर्यातीवरील प्रोत्साहने कमी केली आहेत, तर उत्तर अमेरिकेतील अनेक उत्पादकांनी जाणीवपूर्वक उत्पादनाला कात्री लावली आहे. त्यातच पाच-सहा बड्या स्पर्धक कंपन्यांनी हातमिळवणी केल्यामुळे हा व्यवसाय त्यांच्या हाती केंद्रित झाला आहे. परिणामी, कृत्रिम टंचाई निर्माण होऊन न्यूजप्रिंटच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
सकाळ

दि. २८.०४.२००८[संपादन]

उपग्रह प्रक्षेपणात भारताचा विक्रम
पीएसएलव्ही सी-९ चे भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजून २३ मिनिटांनी यशस्वी उड्डाण झाले. एकाच वेळी दहा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याचा विक्रम भारताने या मोहिमेद्वारे केला आहे. पीएसएलव्ही सी-९ च्या उड्डाणाद्वारे ६९० किलोचा भारतीय दूरसंवेदन उपग्रह कार्टोसॅट-२ ए, ८३ किलो वजनाचा इंडियन मिनी सॅटेलाईट (आयएमएस) आणि एकूण ५० किलो वजनाच्या आठ छोटेखानी परदेशी उपग्रहांचे (नॅनो सॅटेलाइट) प्रक्षेपण होणार आहे. एकाच मोहिमेत दहा उपग्रहांचे पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपणाची ही भारतातीलच नव्हे तर जगातील पहिलीच मोहीम आहे. ही मोहीम यशस्वी करून भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती अधोरेखीत केली आहे.
सकाळ


तालिबानचा हल्ला; करझई चौथ्यांदा बचावले
तालिबानच्या दहशतवाद्यांनी आज केलेल्या रॉकेटच्या हल्ल्यातून अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझई; तसेच काही विदेशी अधिकारी थोडक्‍यात बचावले. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबारही केला. हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन संसद सदस्यांसह अनेक जण जखमी झाले. सुरक्षारक्षकांनी करझई यांना सुरक्षित स्थळी हलविले; मात्र नंतर त्यांनी सर्व दिशांनी गोळीबार केल्यामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये अल्पसंख्याकांच्या एका नेत्याचा समावेश आहे. तसेच, दहा वर्षांच्या एका मुलालाही प्राण गमवावे लागले.
सकाळ



रामदास आठवले लखनौत तीन तास स्थानबद्ध
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (रिपाइं) सुवर्णमहोत्सवानिमित्त आज लखनौत येथे घेण्यात येणार्‍या मेळाव्यास परवानगी नाकारत पक्षाचे अध्यक्ष, खासदार रामदास आठवले यांना विश्रामगृहात तीन तास स्थानबद्ध करण्यात आले तर, एक हजारावर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकाराबाबत आठवले यांनी, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आणि मुख्यमंत्री मायावती यांच्यावर जोरदार टीका केली असून, येत्या ५ मे रोजी मायावतींच्या निषेधार्थ राज्यभरात विरोध दिवस पाळण्याचे जाहीर केले आहे. रिपाइंच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राज्यात ठिकठिकाणी मेळावे घेण्यात येत आहेत.
सकाळ



शिक्षणाच्या निधीला भ्रष्टाचाराचा पाझर
सर्वशिक्षा अभियानाच्या नावाने राज्याच्या शिक्षण क्षेत्रात गैरव्यवहारांचा बुजबुजाट झाल्याचे विदारक चित्र विधिमंडळाच्या अधिवेशनातूनच समोर आले आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मिळणारा निधी ग्रामीण भागात पोचेपर्यंत अनेक ठिकाणी झिरपत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या उपक्रमातून शिक्षणव्यवस्थेला आधार मिळणे अपेक्षित असताना अनुदानित शाळा दिवसेंदिवस खंगतच चालल्या असून, विनाअनुदानित शिक्षण क्षेत्र फोफावत असल्याने या योजनेचा प्रामाणिक आढावा घेण्याची मागणीही शिक्षणक्षेत्रातून होत आहे.
सकाळ



मुळा-मुठा, गोदावरी सर्वाधिक प्रदूषित
देशातील नद्यांची जीवनवाहिनी ही ओळख आता झपाट्याने मागे पडते आहे. गंगा-यमुना-गोदावरी या नद्या आणिब्रह्मपुत्रा किंवा नर्मदेसारख्या नद्यादेखील त्याला अपवाद नाहीत. धार्मिक, विकासात्मक अशा विविध कारणांच्या आडून माणसाने नद्यांचा श्‍वास गुदमरून टाकल्याने ही गंभीर स्थिती निर्माण झाल्याचे ताज्या राष्ट्रीय पाहणी अहवालावरून दिसून आले आहे. देशातील तब्बल ७१ नदीपात्रं सर्वांत प्रदूषित असून, त्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक १६ पात्रांचा समावेश आहे. यातही गोदावरी आणि मुळा-मुठा या नद्या सर्वांत प्रदूषित झाल्याचे हा अहवाल सांगतो. गोदावरी नदी तर महाराष्ट्र व आंध्र या दोन्ही राज्यांत भयानक प्रदूषित झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.
सकाळ

दि. २७.०४.२००८[संपादन]

शीघ्रकोपी भज्जीचा कळस
शीघ्रकोपी ऑफस्पिनर हरभजनसिंग याने वादग्रस्त कारकिर्दीत गैरवर्तनाचा कळस गाठला. पंजाबविरुद्ध आयपीएलमध्ये हरल्यानंतर त्याने प्रतिस्पर्धी संघातील देशबांधव एस. श्रीशांत याच्यावर हल्ला केला. यामुळे हरभजनला मुंबई संघातून निलंबित करण्यात आले आहे. त्याच्यावर आणखी गंभीर कारवाई होण्याची शक्‍यता आहे. काल मोहालीतील सामन्यानंतर पीसीए स्टेडिअमवर हा प्रकार घडला.
सकाळ


शेतकर्‍यांच्या अडचणींचाही विचार करा
"बुद्धिजीवी वर्गाने अन्नधान्याच्या महागाईवर मतप्रदर्शन करताना, शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. तसेच शेतकरी अडचणीत आहे, हे देखील लक्षात ठेवावे. महागाई रोखावीच लागेल; मात्र त्याच वेळी शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळण्याची दक्षता घ्यावी लागेल. अन्यथा शेतकरी अन्य पिकांकडे वळतील आणि अन्नधान्याचे भाव आणखी वाढतील," असा इशारा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
सकाळ


भर उन्हात रस्त्यांवरील दिव्यांचा लखलखाट
भारनियमनाचा प्रश्‍न ऐरणीवर असताना रस्त्यावरील दिवे भर दिवसा सुरू असण्याचे प्रकार पुणे शहरात घडत आहेत. दिव्यांची उघड-झाप नियंत्रित करणार्‍या यंत्रणेतील दुरुस्तीसाठी काही काळ दिवे सुरू ठेवावे लागत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात भर बारा वाजताही महापालिका रस्त्यावर उजेड पाडत असल्याचे नागरीकांनी निदर्शनास आणून दिले.
सकाळ


राजकीय दुर्लक्षामुळे सोन्याच्या कोलारवर अवकळा
गेल्या सुमारे सव्वाशे वर्षांत देशाला तब्बल ८५० टनांहून अधिक सोने देणारे कोलारचे खाणकामगार सध्या मात्र विपन्नावस्थेत आहेत. त्यामुळे एकेकाळी सोन्याची झळाळी मिरविणार्‍या "कोलार गोल्ड फील्ड्‌स"ला (केजीएफ) आता अवकळा आली आहे. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमेवर असलेले कर्नाटकातील हे छोटेखानी शहर जगाच्या नकाशावर आले ते येथील सोन्याच्या खाणीमुळे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांना येथील सोन्याचा शोध लागला आणि त्यांनी खाणी सुरू केल्या. स्वातंत्र्यानंतर या खाणी प्रथम म्हैसूर आणि नंतर केंद्र सरकारच्या अखत्यारीत आल्या. देशातील अन्य सार्वजनिक उद्योगांबाबत कमी - अधिक प्रमाणात जे झाले तेच या खाणीचेही झाले. खाणीतून ११ हजार फूट खोलवर जात सोने काढणारी भारत गोल्ड माईन्स लिमिटेड (बीजीएमएल) ही कंपनी आजारी पडली अन्‌ नंतर आचके देत बंद पडली. या घटनेला सहा वर्षे झाली; पण केजीएफ या धक्‍क्‍यातून अद्याप सावरलेली नाही.
सकाळ


नेपाळमध्ये राजाचे अधिकार रद्द करण्यावर शिक्कामोर्तब
नेपाळ हा धर्मनिरपेक्ष देश असून, राजाचे सर्व अधिकार रद्द केल्याची; तसेच देशाचे लष्कर संसदेच्या नियंत्रणाखाली आणल्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी प्रतिनिधी सभेत करण्यात आली होती. या निर्णयावर नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. संसदेच्या या निर्णयाला आव्हान देणार्‍या दोन स्वतंत्र याचिकांवर निर्णय देतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने या दोन्ही याचिका फेटाळून लावल्याचे वृत्त द हिमालयन टाइम्सने आज न्यायालयातील अधिकार्‍यांच्या हवाल्याने दिले आहे.
सकाळ


प्रकाशझोतातील सामन्यांचा भारनियमनावर भार नाही
वीज टंचाईमुळे संपूर्ण राज्य भारनियमनाच्या चटक्‍याने होरपळून निघत असताना उद्यापासून नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीगचे क्रिकेट सामने सुरू होत आहेत; परंतु संयोजकांनी भारनियमनावर कोणताही भार टाकलेला नाही, स्टेडियममधील संपूर्ण वीज ते जनरेटरद्वारे उपलब्ध करणार आहेत. भारनियमनामुळे त्रस्त असलेल्या महाराष्ट्रात वीज वितरण कंपनीच्या विजेवर प्रकाशझोतातील सामने खेळविण्याची "ऐश" राज्याला परवडणारी नाही. हे लक्षात घेऊन डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविण्यात येणार्‍या प्रकाशझोतातील सर्व सामन्यांना जनरेटरचा बॅकअप देण्यात येणार आहे.
सकाळ


ठाणेही भारनियमनमुक्त होणार?
पुणे पॅटर्न आता कांजूरमार्ग ते ठाणे या परिसरात राबविण्यात येणार आहे. या शून्य भारनियमन उपक्रमामुळे ग्राहकांच्या बिलात ८ ते १० टक्के वाढ होणार असली तरी भारनियमनातून नागरिकांची मुक्तता होणार आहे. याबाबत वीज नियामक आयोगापुढील सुनावणी २ मे रोजी होणार असून, त्यानंतरच हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती टिसा वीज समितीचे प्रमुख डॉ. अशोक पेंडसे यांनी आज येथे दिली.
सकाळ

दि. २६.०४.२००८[संपादन]

चालकांचे वर्तन ही विसंगतीवरील प्रतिक्रिया
अवघ्या सहा महिन्यांपूर्वी ज्योतिकुमारी चौधरी या बीपीओमध्ये काम करणार्‍या युवतीवर हल्ला करणारा कॅबचालक होता; त्याचप्रमाणे २००५ बंगळूर येथील बीपीओमधील महिलेवर बलात्कार करणाराही कॅबचालकच. यामुळे महिला कर्मचार्‍यांना कॅबमधील वाहतुकीदरम्यान सुरक्षारक्षक द्यावा, या मागणीने जोर धरला. मात्र, यात केवळ कॅबचालकच दोषी नसून, पोलिसांच्या समितीसमोर त्यांनी मांडलेल्या मतांमुळे नाण्याची दुसरी बाजू स्पष्ट झाली. कॅबऐवजी अधिक आसनक्षमतेच्या मिनीबस वापरल्या जाव्यात, अशी सूचना त्या वेळी केली होती, तरीही कॅबची सवय आणि प्रतिष्ठेच्या नावाखाली कर्मचारी आणि त्यांच्या पालकांनीही मिनीबसचा पर्याय नाकारला. मुलीला घ्यायला आणि सोडायला आमच्या दारात कारच आली पाहिजे, असा अवाजवी आग्रहही अनेक पालकांनी धरला.
सकाळ


सौम्य धोरणाचा सरबजितला फायदा शक्‍य
पाकिस्तानात फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांची वाढती संख्या, त्या संदर्भात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा अहवाल आणि नव्या सरकारचे सौम्य धोरण या सार्‍याचा परिणाम म्हणून अनेक कैद्यांच्या फाशीचे रूपांतर जन्मठेपेत करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. या संदर्भात अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने अहवाल तयार केला असून, त्यावर सकारात्मक निर्णय झाल्यास भारतीय नागरिक सरबजितसिंग हाच पहिला "लाभार्थी" ठरण्याची शक्‍यता आहे.
सकाळ


कथ्थक नृत्याला कार्पोरेट जगात स्थान देण्याचा प्रयत्न
पुण्यतल्या कथ्थक नृत्यात करियर करण्याची जिद्द बाळगणार्‍या शर्वरी जमेनिस यांना यंदाचा संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या नावाने दिला जाणारा "युवा पुरस्कार" जाहीर झाला आहे. याच महिन्याच्या २९ तारखेला दिल्लीत तो समारंभपूर्वक दिला जाईल. आजच्या कार्पोरेट जगतात कथ्थक नृत्याला वेगळे स्थान देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून नवे मार्ग शोधून पारंपारिक नृत्याला दर्जेदार करणे हाच शर्वरी जेमिनीस यांचा ध्यास राहणार आहे.
सकाळ


महावितरण वर्षभराची वीज खरेदी करणार
तात्पुरत्या वीज खरेदीबरोबरच येत्या एक ऑक्‍टोबरपासून जून २००९ पर्यंत पुण्यासाठी वीज खरेदी करण्यासाठी महावितरणने निविदा मागविल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुणेकरांना पुढील वर्षभर दिलासा मिळणार आहे, तसेच अखंडित वीजपुरवठ्याचा दरही कमी होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ


मुंबईचा तिसरा पराभव
सचिन तेंडुलकरच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये सलग तिसर्‍या पराभवाला सामोरे जावे लागले. किंग्ज इलेव्हन पंजाबने घरच्या मैदानावर मुंबईला ६६ धावांनी हरवून पहिला विजय नोंदविला. पीसीए स्टेडियमवरील ही लढत दोन्ही संघांसाठी महत्त्वाची होती. मुंबईप्रमाणेच पंजाबनेही पहिले दोन सामने गमावले होते. किंग्जने १८२ धावांचे संघर्षपूर्ण आव्हान उभे केले. मुंबईला ९ बाद ११६ एवढीच मजल मारता आली.
सकाळ

दि. २५.०४.२००८[संपादन]

भारताशी मैत्री करार माओवादी रद्द करणार
"भारत-नेपाळ यांच्यातील १९५० चा शांतता आणि मैत्री करार असमानतेवर आधारित असल्याने तो रद्द करून नव्या परिस्थितीत योग्य असा करार केला जाईल". असे नेपाळचे माओवादी नेते प्रचंड यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. दोन्ही देशांतील लोक नोकरी किंवा अन्य कारणांसाठी एकमेकांच्या देशांमध्ये मुक्तपणे वावर करू शकतील आणि निवास करू शकतील, असे महत्त्वपूर्ण कलम या करारात आहे. हे कलम दोन्ही देशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नव्या परिस्थितीत अधिक संवेदनशील बनले आहे. अर्थात हा करार रद्द करण्याचे कलमही त्याच्या मसुद्यात आहे, त्यानुसारच हा करार रद्द करण्यात येईल.
सकाळ


सुरक्षा बीपीओतील - सिक्‍युरिटी सेन्सिटायझेशन समिती स्थापन
आयटी आणि बीपीओतील महिला कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सेंटर फॉर पोलिस रिसर्च अंतर्गत "सिक्‍युरिटी सेन्सिटायझेशन समिती" स्थापन केली आहे. त्या समितीच्या प्राथमिक निष्कर्षांमधून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. वैयक्तिक, गोपनीय माहिती आणि पायाभूत सुविधांचे संरक्षण होते की नाही याची पाहणी करणे; तसेच आयटी-बीपीओ क्षेत्रासाठी धोरणनिश्‍चिती करणे व त्याची अंमलबजावणी सक्तीची करणे, हा या समितीचा मुख्य उद्देश आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी समितीला मार्गदर्शन केले असून, गुन्हे अन्वेषण विभागातील अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी पुढाकार घेतला आहे.
सकाळ


सरबजितची कुटुंबीयांशी १८ वर्षांनी भेट
सुमारे दोन दशकांनंतर सरबजितला त्याचे कुटुंबीय भेटले आणि लाहोरच्या कोट लखपत कारागृहातील काळकोठडीलाही पाझर फुटला. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात १९९० मध्ये झालेल्या बॉंबस्फोटांतील कथित सहभागाबद्दल सरबजितसिंगला पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तो निर्दोष असल्याचा कुटुंबीयांचा दावा असून, त्याला माफी मिळण्यासाठी सर्व स्तरांवरून प्रयत्न सुरू आहेत. सरबजितला भेटण्यासाठी कुटुंबीयांना खास व्हिसा मिळाल्यानंतर त्यांनी काल पाकिस्तानात प्रवेश केला. गृह खात्याने परवानगी दिल्यानंतर त्यांनी आज स्थानिक वेळेनुसार सायंकाळी पाच वाजता सरबजितची भेट घेतली.
सकाळ


९५ हजार रिक्त पदे सहा महिन्यांत भरणार - अर्थमंत्री
राज्य शासनाच्या सेवेतील ९५ हजार रिक्त पदे येत्या सहा महिन्यांत भरली जातील, असे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत जाहीर केले. त्याचबरोबर खासगी उद्योगांत ८० टक्के स्थानिकांना नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत, या धोरणाची सक्तीने अंमलबजावणी केली जाईल. सरकारी कार्यालये व दुय्यम न्यायालयांमध्ये शंभर टक्के मराठीचा वापर झाला पाहिजे आणि दुकानापासून विमानतळापर्यंत सर्व उद्योग, व्यवसायांच्या कार्यालयांचे फलक मराठीतून लिहिले गेले पाहिजेत, असे आदेश काढले जातील, अशा घोषणाही त्यांनी केल्या.
सकाळ


गो मुंबई कार्ड योजनेचे उद्‌घाटन
तिकीट खिडक्‍यांसमोरील रांगा कमी करण्यासाठी गो मुंबई कार्ड योजनेचे आज मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक सौम्या राघवन यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. मात्र सध्या या कार्डाची सुविधा केवळ हार्बर आणि मध्य रेल्वेपुरतीच मर्यादित राहणार असून, बेस्टच्या तिकिटासाठी ही योजना लागू होण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागणार आहे.
सकाळ


दादा कोंडके गौरव पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर
दादा कोंडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा गौरव पुरस्कार या वर्षी पार्श्‍वगायिका उषा मंगेशकर यांना जाहीर झाला आहे. २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवारी (ता. २७) सायंकाळी साडेपाच वाजता नवीन पनवेल येथील महात्मा स्कूल ऑफ ऍकॅडमी स्पोर्टस्‌ येथे नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष रमेश देव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
सकाळ

दि. २४.०४.२००८[संपादन]

व्हॅट, उपकर कमी करा
चलनवाढीची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने राज्यांनी मूल्यवर्धित कर (व्हॅल्यू ऍडेड टॅक्‍स - व्हॅट); तसेच शेतीमालावरील स्थानिक बाजार उपकर कमी करावेत, अशी सूचना केंद्र सरकार राज्यांना करणार आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज सांगितले. या संदर्भात आपण सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सकाळ


ब्लेअर विनातिकीट प्रवास करतात तेव्हा...
टोनी ब्लेअर... ब्रिटनचे माजी पंतप्रधान... पद सोडल्यानंतर त्यांनी लक्षावधी रुपयांची कमाई केली आहे. पण आज ते रेल्वेत चक्क विनातिकीट प्रवास करताना आढळले आणि गाडीत खळबळ माजली. माजी पंतप्रधानांची लाज वाचविण्यासाठी सहप्रवाशाने त्यांचे तिकीट काढले आणि त्यांची सुटका केली.
सकाळ


लैंगिक शिक्षणाबाबतच्या घोषणेला स्थगिती
आगामी शैक्षणिक वर्षापासून नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे देण्याबाबत शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी केलेल्या घोषणेला आज विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी स्थगिती दिली. याबाबत शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार या सर्वांची एकत्रित समिती नेमून याविषयी निर्णय घ्यावा. तोपर्यंत यासंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले.
सकाळ


अमेरिकेपेक्षा युरोप, आफ्रिकेला महत्त्व
काही वर्षांपूर्वी अमेरिका भारताचा सर्वांत मोठा आयातदार देश होता, मात्र, डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याने भारताची अमेरिकेला होणारी निर्यात घटली असून, ती आता युरोप आणि आफ्रिकेकडे अधिक वळली आहे. सरकारनेच ही कबुली आज राज्यसभेत दिली. अमेरिकेतील मंदीचे वातावरण आणि रुपया-डॉलर यांच्या विनिमयदरातील अभूतपूर्व चढ-उतार या कारणांनी भारताची अमेरिकेला होणारी निर्यात २००६-०७ या कालावधीत २२.९ टक्‍क्‍यांनी घटली आहे.
सकाळ


पेट्रोल आणि डिझेलवरील जकात कायम
पुणेकरांना पेट्रोल आणि डिझेल स्वस्तात उपलब्ध करून देण्याची संधी आज पुन्हा एकदा सर्व पक्षीय नगरसेवकांनी घालविली. पेट्रोल आणि डिझेलवरील जकात एक टक्‍क्‍यावर आणण्यासाठी दिलेली उपसूचना आज प्रशासनाच्या सांगण्यावरून कॉंग्रेस आणि भाजपने मागे घेत दोन टक्के जकात आकारण्यास मान्यता दिली.
सकाळ


विकसकांकडून पालिकेला ३२० कोटींचा चुना
महापालिकेच्या पुनर्विकास योजनेंतर्गत अनेक विकसक आपल्या इमारती पूर्ण करून निघून गेले; पण त्यांनी अद्यापही पालिकेकडे भांडवली मूल्याचा भरणा न केल्यामुळे पालिकेचा सुमारे ३२० कोटी रुपयांचा महसूल बुडण्याची शक्‍यता आहे. स्थायी समिती अध्यक्ष रवींद्र वायकर यांनी आज पालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक यांना याबाबत पत्र दिले असून, या थकबाकीदार बिल्डरांविरुद्ध तातडीने कारवाई करून कोट्यवधीचे भांडवली मूल्य वसूल करण्याची मागणी केली आहे.
सकाळ


यापुढे दंगलखोरांकडून नुकसानभरपाई
यापुढे सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणार्‍यांकडून नुकसानभरपाई वसूल केली जाईल. हे अधिवेशन संपताच तसा अध्यादेश काढण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधानसभेत केली.
सकाळ

दि. २३.०४.२००८[संपादन]

परप्रांतीय न्यायाधीशांना मुंबई न्यायालयात आणू नका
इतर राज्यांतील न्यायाधीशांना मुंबई उच्च न्यायालय अथवा राज्यातील खंडपीठांमध्ये बदली करण्याच्या निर्णयाला नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनने मंगळवारी तीव्र विरोध केला. आपल्या राज्यात परतण्याची तीव्र इच्छा सदर न्यायाधीशांना असल्याने ते न्यायदानात लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या बदल्यांवर केंद्र शासन आणि सरन्यायाधीशांनी फेरविचार करावा, अशी मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
सकाळ


पुण्यातील टिळक रस्ता मृत्यूचा सापळा
टिळक रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी असतानाही या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन होत असून, पोलिसही त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याच रस्त्यावर आज सकाळी झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा ही बाब अधोरेखित झाली आहे. आश्‍चर्य म्हणजे या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पोलिस चौकी असूनही या बंदीची ऐशीतैशी आहे हे विशेष.
सकाळ


गवळीच्या हिटलिस्टवर नामांकित बिल्डर.
बांधकाम व्यावसायिकाकडून पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आमदार अरुण गवळी याचा लहान भाऊ विजय अहिरच्या घरातून पोलिसांना शहरात सुरू असलेल्या तीनशेहून अधिक गृहनिर्माण प्रकल्पांची तसेच हे प्रकल्प उभारणार्‍या बांधकाम व्यवसायिकांची इत्यंभूत माहिती असलेली कागदपत्रे सापडली आहेत. त्यामुळे शहरातील इतर नामांकित बिल्डर गवळी टोळीच्या हिटलिस्टवर असल्याची शक्‍यता पोलिस अधिकार्‍यांनी वर्तविली आहे.
सकाळ


देशभर उष्णतेची लाट; २२ मृत्यू
संपूर्ण देशात उष्णतेची लाट आली असून, अनेक राज्यांमध्ये पारा चाळीस अंशांच्याही वर गेलेला आहे. ओरिसात उष्णतेची लाट आली असून, पारा ४५ अंशांच्या पुढे गेल्याने गेल्या काही दिवसांत राज्यात उष्माघाताने २२ जणांचा बळी गेला आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्व शैक्षणिक संस्थांनी उन्हाळ्याची सुटी जाहीर करून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शेतमजुरांना केवळ सकाळीच शेतात काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.
सकाळ


देशातील सुमारे १४ कोटी गावे अंधारात
देशातील गावागावांत वीज पोचविण्याचा झेंडा घेऊन निघालेल्या सरकारच्या ऊर्जा खात्याला मिळालेल्या निधीचाही विनियोग पूर्णपणे करता येत नसल्याचे चित्र समोर आले आहे. देशातील १३ कोटी ८२ लाख ७१ हजार घरांपैकी तब्बल सात कोटी ८० लाख ९० हजार ८७४ गावे अजूनही अंधारात असल्याचे सरकारची आकडेवारी सांगते. मात्र, ऊर्जा खात्याला देण्यात येणार्‍या निधीत सातत्याने कपात होत आहे.
सकाळ


चार्लस डार्विन यांची मूळ संशोधन कागदपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध
माकडापासून माणूस निर्माण झाला, असा उत्क्रांतीचा खळबळजनक सिद्धांत विज्ञानजगतात मांडणारे विख्यात संशोधक सर चार्लस डार्विन यांची "ओरिजिन ऑफ स्पिसिज" या ग्रंथाची मूळ हस्तलिखीते आता जिज्ञासूंना संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. केंब्रिज विद्यापीठातील ग्रंथालय विभागाने यासाठी २० हजार विविध वस्तू व ९० हजार प्रतिमांचा समावेश असलेले "डार्विन ऑनलाईन.ऑर्ग.युके" असे संकेतस्थळ तयार केले.
सकाळ

दि. २२.०४.२००८[संपादन]

अंटार्क्टिकातील संशोधन सहकार्यासह भारत]-चिली यांच्यात चार करार
अंटार्क्टिकातील संशोधनसाठी सहकार्य करण्यासह चार महत्वाचे करार भारत आणि चिली यांच्यात मंगळवारी झाले. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा दक्षिण अमेरिकेतील तीन देशांचा दौरा अखेरच्या टप्प्यात पोचला आहे. मंगळवारी श्रीमती पाटील आणि चिलीच्या अध्यक्षा मिशेल बेकलेट यांच्यात वाटाघाटी झाल्या. त्यानंतर व्यापारवृद्धीसाठी विमान सेवेतील सहभाग (कोड शेअरिंग), अंटार्क्‍टिकातील संशोधन सहकार्य, क्रीडा, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सहकार्यविषयक चार करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.
सकाळ


पैसे देतो सांगणार्‍या ’स्पॅम मेल’पासून सावधान!
"हा ई-मेल शक्‍य तितक्‍या जणांना फॉरवर्ड करा, मग तुमच्या बँकेतील खात्यात विशिष्ट रक्कम जमा केली जाईल" या आशयाचा मेल तुम्हाला कधी आला आहे का; समजा आतापर्यंत कधी आला नसेल आणि यापुढे आला, तर तो कोणालाही फॉरवर्ड करण्याआधी त्याची खातरजमा करून घ्या. अशा प्रकारे बँकेच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी "ई- मेल ट्रॅकिंग सिस्टिम" आजपर्यंत तरी अस्तित्वात आलेली नाही. त्यामुळे तुमच्या बॅंकेतील खात्यात पैसे जमा होण्याचा प्रश्‍नच उरत नाही. तुम्हाला फसवून काही तरी गंमतशीर काम करायला लावण्याचा हा प्रकार आहे. असे मेल एकमेकांना फॉरवर्ड करून काहीच मिळत नाही, उलट त्यामुळे इंटरनेटची बॅण्डविड्‌थ कमी होते. खुद्द मायक्रोसॉफ्ट कंपनीने याबद्दल असा कोणताच ई-मेल कोणालाही पाठविलेला नसून, काही जण कंपनीच्या नावाखाली सामान्यांना फसवत असल्याचा खुलासा १९९९ मध्येच केला होता.
सकाळ



अफगाणिस्तानात पुन्हा दोघा भारतीय कामगारांचे अपहरण
दोघा भारतीय बांधकाम कामगार आणि एका टॅक्‍सीचालकाचे बंदूकधारी अपहरणकर्त्यांनी पश्‍चिम अफगाणिस्तानातून सोमवारी अपहरण केले. अपहरण करण्यात आलेले भारतीय कामगार काबूलकडे परतत होते. गेल्या काही दिवसांपासून बांधकाम क्षेत्राशी संबंधित भारतीयांच्या अपहरणाच्या घटना अफगाणिस्तानात वाढल्या आहेत.
सकाळ



नगरला सापडली दुर्मिळ जाड शेपटीची पाल
अहमदनगर येथील एमआयडीसी भागात दुर्मिळ अशी जाड शेपटीची पाल आढळून आली. या पालीच्या फक्त तीनच जाती भारतात आढळतात. गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्राच्या काही भागातच ही पाल आढळून येते. एमआयडीसी भागातील जी. के. एन. कंपनीच्या रखवालदाराच्या केबिनबाहेर एक वेगळ्याच रंगाचा सरपटणारा प्राणी आढळला. त्यांनी त्यास साप समजून तातडीने सर्पमित्र सुनील सिद्दम यांना बोलाविले. सिद्दम आणि सर्पमित्र अमोल घोडके तेथे पोचल्यानंतर त्यांना हा प्राणी साप नसल्याचे लक्षात आले. त्यांनी त्यास पकडून निसर्ग अभ्यासक मानद वन्यजीव रक्षक डॉ. सुधाकर कुर्‍हाडे यांच्याशी संपर्क साधला असता, हा प्राणी म्हणजे जाड शेपटीची पाल असल्याचे त्यांनी त्यांना सांगितले.
सकाळ



एसटीची एसी सेवा तोट्याच्या मार्गावर
एसटी महामंडळाच्या ताफ्यात या आठवड्यात वीस व्होल्वो आणि दहा किंगलाँग अशा तब्बल तीस वातानुकूलित बस दाखल होणार आहेत, परंतु अजूनही या गाड्यांच्या मार्गांबाबत आणि वेळापत्रकाबाबत काहीच अंमलबजावणी झालेली नसल्याने वातानुकूलित सेवेसंदर्भात महामंडळ अजूनही गंभीर नसल्याचे बोलले जात आहे. वेळापत्रकातील त्रुटी आणि अपुरी प्रसिद्धी यामुळेच या गाड्या तोट्याच्या मार्गावर गेल्या, अशी चर्चा यानिमित्त रंगली आहे.
सकाळ



भारनियमनाचा विळखा अवघ्या देशभर
वीजटंचाईच्या झळा उन्हाळ्यात जास्त जाणवत आहेत. "मागणी आणि पुरवठा यांच्यात मेळ बसत नसल्याने भारनियमन वाढवत आहोत" अशी वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांची समजूत घालण्यात येत असली, तरी देशभरातच वीजटंचाईची समस्या आहे. "एक वेळ जास्त बिल घ्या; पण सुरळीत वीज द्या" असे ग्राहकांचे म्हणणे असले, तरी मुळात "वीजनिर्मितीच्या आडातच नाही, तर पैसे देऊनही पोहर्‍यात येणार कुठून" हाच खरा प्रश्‍न आहे.
सकाळ


कर्जमाफीची व्याप्ती वाढविणे अशक्‍य
"देशातील टक्के शेतकरी लहान व मध्यम गटातील असल्याने केंद्र शासनाच्या हजार कोटी रुपयांच्या कर्जमुक्ती पॅकेजचा लाभ त्यांना निश्‍चितपणे मिळेल. मात्र यापलीकडे जाऊन कृषि कर्जमाफी किंवा अन्य नवीन जबाबदारी सरकार तूर्त घेणार नाही" अशी स्पष्टोक्ती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी लोकसभेत केली. प्रश्‍नोत्तराच्या तासात सत्यनारायण जटिया यांनी विचारलेल्या प्रश्‍नावरील गुरुदास दासगुप्ता व प्रभुनाथसिंह यांनी उपस्थित केलेल्या उपप्रश्‍नांना दिलेल्या उत्तरात श्री. पवार यांनी वरील वस्तुस्थिती स्पष्ट केली.
सकाळ


निवडणूक आचारसंहितेचा प्रसिद्धी संस्थांना आर्थिक फटका
केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचारात वापरण्याच्या काही गोष्टींवर बंधने घातल्याने प्रसिद्धी संस्था आणि संबंधित घटकांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. तसेच राजकीय पक्ष आणि उमेदवारांवरही प्रचार करताना कोणत्या साधनांचा वापर करायचा याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत या बंधनाचे परिणाम स्पष्ट होतील.
सकाळ


अग्नी-३ क्षेपणास्त्र चाचणी पुढे ढकला
बिजू जनता दलाचे खासदार भ्रातृहारी महताब यांनी आज ओरिसाच्या समुद्रकिनार्‍याजवळ घेण्यात येणारी क्षेपणास्त्र चाचणी पुढे ढकलण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. ओरिसाच्या समुद्रकिनार्‍याजवळ कासवाच्या दुर्मिळ समजल्या जाणार्‍या जातीच्या प्रजननाचा काळ सध्या सुरू असल्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे.
सकाळ

दि. २१.०४.२००८[संपादन]

मुंबई इंडियन्स मुंबईतच पराजित
ना आक्रमक फलंदाजीची मेजवानी, ना विजयाची भेट. वानखेडे स्टेडियमवर खच्चून गर्दी करणार्‍या मुंबईकर प्रेक्षकांच्या पदरी मुकेश अंबानीच्या मुंबई इंडियन्स संघाचा पराभव पाहण्याची वेळ आली. इंडियन प्रीमियर लीगच्या आपल्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा बंगळूर रॉयल चॅलेंजर्सकडून पाच गडी राखून पराभव झाला.
सकाळ (धावफलक)


सरबजितसिंगची फाशी टळणार?
लाहोर कारागृहात आपल्या आयुष्यातील शेवटच्या घटकेची प्रतीक्षा करीत असलेल्या सरबजितसिंगसाठी आशेचा नवा किरण उगविला आहे. पाकिस्तान सरकारने राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावात फाशीची शिक्षा झालेल्यांची शिक्षा माफ करून जन्मठेपेत बदलविण्यात यावी, अशी विनंती केली आहे. रविवारी पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावाने सरबजितसिंगची फाशी टळण्याची आशा निर्माण झाली आहे.
सकाळ


रशियात आला योगाला सुवर्णकाळ!
कम्युनिस्ट नेत्यांनी रशियातून पूर्वी हद्दपार केलेल्या भारतीय योगशास्त्राला पुढील महिन्यात क्रेमलिनमध्ये पुन्हा मानाचे स्थान मिळणार आहे. अध्यक्षपदी निवडून आलेले दिमित्री मेद्वेदेव यांनी पत्नी स्वेतलाना यांच्या आग्रहामुळे योगाभ्यास केला असून, हजारो रशियन जिज्ञासूंना योगाचा लाभ देण्याची त्यांची योजना आहे.
सकाळ


डॉ. सरोजिनी बाबर यांचे निधन
लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ संशोधक आणि साहित्यिक डॉ. सरोजिनी बाबर (वय ८८) यांचे रविवारी पहाटे तीनच्या सुमारास दीर्घ आजाराने झोपेत निधन झाले. त्या अविवाहित होत्या. त्यांच्या मागे दोन भगिनी कुमुदिनी आणि शरदिनी आहेत. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सकाळ


आयटीने दिला महापालिकेला दणका
माहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांची महानगरी म्हणून स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण करणार्‍या, नवी मुंबईचे पालकत्व भूषविणार्‍या नवी मुंबई महापालिकेस राज्य सरकारच्या आयटी पॉलिसीमुळे दर वर्षी सुमारे ३५ कोटी रुपयांच्या उत्पन्नापासून वंचित राहावे लागत असल्याची माहिती हाती आली आहे. राज्यातील माहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांना सरकारने जकात, उपकरातून पूर्ण सूट, तर मालमत्ता कराची निवासी दराने आकारणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या धोरणामुळे राज्यातील सर्वाधिक आयटी उद्योग असलेल्या नवी मुंबईला जोरदार फटका बसला असून सरकारच्या नव्या निर्णयाकडे महापालिकेतील धुरिणी डोळे लावून बसले आहेत.
सकाळ

दि. २०.०४.२००८[संपादन]

शाहीन-२ च्या चाचणीने भारताची शहरे पाकिस्तानच्या टप्प्यात
लांब पल्ल्याच्या व अण्वस्त्रवाहू शाहीन-२ (हत्फ-६) या क्षेपणास्त्राची पाकिस्तानने आज यशस्वी चाचणी घेतली. भारतातील बहुतेक महत्त्वाची शहरे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येतात. पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या नव्या सरकारने घेतलेली ही पहिली क्षेपणास्त्र चाचणी आहे. पंतप्रधान युसूफ रझा गिलानी, संरक्षणमंत्री चौधरी अहमद मुख्तार आणि तीनही सेना दलप्रमुखांच्या संयुक्त समितीचे प्रमुख जनरल तारिक माजीद चाचणीच्या वेळी उपस्थित होते.
सकाळ


पतसंस्थांचे कर्जही माफ
नागरी सहकारी पतसंस्थांनी शेतीसाठी दिलेल्या कर्जाचाही कर्जमाफीत समावेश केला आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथे सांगितले. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत ते म्हणाले, "पाच एकरांच्या आतील शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार असून, जिल्हा मध्यवर्ती बँक, भूविकास बँक, नागरी सहकारी बँका आणि नागरी सहकारी पतसंस्थांतून शेती व शेतीपूरक उद्योगांना कर्जपुरवठा केलेल्यांचा कर्जमाफीत सहभाग होणार आहे. उपसा सिंचन योजनेतील जे पाच एकरांच्या आतील शेतकरी आहेत, त्यांचाही कर्जमाफीत समावेश असेल".
सकाळ


सरबजितची फाशी लांबविलेली नाही - अध्यक्षांच्या प्रवक्‍त्याचा खुलासा
भारतीय नागरिक सरबजितसिंग याच्या फाशीची तारीख लांबविण्यात आली नसल्याचे पाकिस्तानने आज स्पष्ट केले. सरबजितसिंगची फाशीची शिक्षा रद्द करावी, असे आवाहन भारताने केल्यावर नव्या सरकारला सरबजितसिंगच्या शिक्षेबाबत विचार करता यावा म्हणून अध्यक्षांनी फाशीच्या शिक्षेला एक महिना स्थगिती दिली होती, असे अध्यक्षांचे प्रवक्ते निवृत्त मेजर जनरल रशीद कुरेशी यांनी संगितले. एआरवाय या दूरचित्रवाणीने दिलेल्या वृत्तानुसार, सरबजितसिंगच्या शिक्षेची अंमलबजावणी एक महिना पुढे ढकलण्यात आल्याच्या वृत्ताचा कुरेशी यांनी इन्कार केला आहे.
सकाळ


माघारीसाठी हिलरींवर वाढता दबाव
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असणारे बराक ओबामा आणि हिलरी क्‍लिंटन यांच्यातील चुरशीच्या लढतीत ओबामा यांनी आघाडी घेतली असून, मंगळवारी पेनसिल्व्हेनिया राज्यातील प्रायमरीमध्ये खराब प्रदर्शन झाल्यास उमेदवारी मागे घेण्यासाठी हिलरी यांच्यावरील दबाव वाढण्याची शक्‍यता आहे.
सकाळ


शंकरपूर ग्रामस्थांचे श्रमदानातून स्थानक
श्रमदानातून रस्ते किंवा बंधारे होणे नवे नाही, पण मेडक जिल्ह्यातील शंकरपूरच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून चक्क रेल्वे स्थानक बांधले. रेल्वे अधिकार्‍यांनी केलेल्या "सौजन्यपूर्ण दुर्लक्षा"चा त्यात मोठा वाटा आहे. श्रमदानातून उभे राहणारे शंकरपूर हे देशातील पहिलेच रेल्वे स्थानक असेल.
सकाळ


छत्तीसशे टन इलेक्‍ट्रॉनिक कचरा
राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने शहरात इलेक्‍ट्रॉनिक कचर्‍याच्या वाढत्या समस्येवर जागृती प्रकल्प राबविण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येत असलेल्या पुण्यासमोर सुमारे छत्तीसशे टन इलेक्‍ट्रॉनिक कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. पुढील वर्षी शहरात होणार्‍या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, या क्षेत्रातील दहा प्रमुख कंपन्या आणि ४० महाविद्यालयांमधील विद्यार्थी या प्रकल्पात सहभागी होणार आहेत.
सकाळ


मुंबईचे पाणी ठाण्याला देण्यासाठी महापालिकेवर सरकारचा दबाव
मुंबईकरांच्या वाट्याचे पाणी शेजारच्या ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराला देण्यासाठी मुंबई महापालिकेवर सरकारचा दबाव वाढत आहे. त्यामुळे मुंबईवर पाणीकपातीचे संकट ओढविण्याची दाट शक्‍यता आहे. मुंबई शहराने भातसामधून १०० दशलक्ष लीटर पाणी उचलून ठाण्याला द्यावे, अशी ठाणे महापालिकेची मागणी आहे; मात्र त्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात तांत्रिक अडथळा निर्माण होण्याची शक्‍यता आहे.
सकाळ


नंदीग्राममध्ये पुन्हा संघर्ष
नंदीग्राममध्ये होऊ घातलेल्या पंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आज भूमी उच्छेद प्रतिरोध समिती आणि मार्क्‍सवादी कार्यकर्ते यांच्यात संघर्ष उफाळून आला. त्यात मार्क्‍सवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोन महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिकारीपाडा भागात झालेल्या या संघर्षात भूमी उच्छेदचे आठ कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
सकाळ

दि. १९.०४.२००८[संपादन]

सरकारी कामकाज आता मराठीतूनच
मराठीला राजभाषेचा मान देणार्‍या महाराष्ट्राच्या मंत्रालयातील मातृभाषेची वर्षांची उपेक्षा आता संपणार असून, सरकारी कागदपत्रांवर मराठीची स्पष्ट मोहोर उमटण्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत. सरकारी परिपत्रके, निर्णय किंवा पत्रव्यवहार मराठी भाषेतूनच करण्याच्या आदेशांना नोकरशाहीने १९६६ पासून वेगवेगळ्या सबबींखाली वाटाण्याच्या अक्षता लावल्याचा साक्षात्कार सामान्य प्रशासन विभागाला झाला आहे. त्यामुळे मंत्रालयापासून तालुका पातळीपर्यंत सर्व सरकारी कार्यालयांत मराठीतून कामकाज करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
सकाळ


"लहान मुलांच्या वक्तव्याकडे फारसे लक्ष देऊ नका" - शरद पवार
कर्जमाफीच्या निर्णयात नागरी सहकारी पतसंस्थांनी शेतीसाठी दिलेल्या कर्जाचा तसेच शेतीपूरक उद्योगांच्या कर्जांचाही समावेश करण्याचे संकेत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिले. पश्‍चिम महाराष्ट्रातील दौर्‍यात उद्धव ठाकरे करीत असलेल्या टिकेवर "लहान मुलांच्या वक्तव्याकडे आम्ही फारसे लक्ष देत नाही, तुम्हीही देऊ नका" अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडविली. महागाई वाढली म्हणून ओरड करीत भुकेचा प्रश्‍न सोडविणार्‍या शेतकर्‍याला भुकेकंगाल करू नका, असे सुनावत महागाईतून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार समर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ


पर्यटकांसाठी तिबेट पुन्हा खुला करण्याचा चीनचा निर्णय
तिबेटमधील पर्वतमय प्रदेश परदेशी पर्यटकांसाठी लवकरच पुन्हा खुला करण्याचा निर्णय चीनने घेतला असून तिबेटच्या पर्यटन विभागाने यासंबंधी प्रयत्न सुरु केले आहेत. चीनमधून प्रसिद्ध होणार्‍या एका दैनिकाने याविषयी माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार येत्या १ मे पासून तिबेट परदेशी पर्यटकांसाठी खुला होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान अमेरिकास्थित काही माध्यमांनी मात्र अशी शक्‍यता नाकारली असून त्यांच्या म्हणण्यानुसार ऑगस्टमध्ये होणार्‍या ऑलिंपिक स्पर्धांनंतरच पर्यटनासंबंधी निर्णय घेईल.
सकाळ


सरबजितची फाशी पुन्हा पुढे ढकलली
लाहोर व मुलतान शहरांत १९९० मध्ये झालेल्या बॉंबस्फोटांतील संशयित आरोपी सरबजितसिंग याला ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी पाकिस्तान सरकारने आणखी एक महिना पुढे ढकलली आहे. त्याला एक मे रोजी फाशी देण्यात येणार असल्याचे आधीचे वृत्त होते. मानवतेच्या भूमिकेतून सरबजितसिंगची फाशीची शिक्षा रद्द करावी, असे आवाहन परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पाकिस्तान सरकारला केले होते. त्यानंतर शिक्षेची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली. सरबजितसिंगच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सकाळ


अतिक्रमणावर कॅमेर्‍यांची नजर
महापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड ऑफिसमधील अतिक्रमण निरीक्षकास डिजिटल कॅमेरे देण्याचा प्रस्ताव प्रशासन तयार करीत आहे. हॉकर्स पुनर्वसन योजना राबविलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण रोखण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरेल.
सकाळ


व्याजदरवाढीचा निर्णय तूर्तास लांबणीवर
रिझर्व्ह बॅंकेचे वार्षिक पतधोरण २९ एप्रिलला जाहीर झाल्यानंतरच बॅंका कर्जावरील व्याजदराबाबत निर्णय घेतील, असे मत बॅंकिंग तज्ज्ञांनी व्यक्त केले. चलनवाढ आटोक्‍यात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने रोख राखीव निधीच्या प्रमाणात (सीआरआर) दोन टप्यांत वाढ करण्यात येणार असल्याचे काल जाहीर केले होते.
सकाळ


वृत्तपत्र कागद २५ टक्‍क्‍यांनी महागला
वृत्तपत्रांच्या कागदाच्या किमतीमध्ये डिसेंबर २००७ नंतर तब्बल २५ टक्‍क्‍यांची वाढ झाल्याने त्याचा वृत्तपत्रांच्या निर्मिती खर्चावर मोठा ताण आला असल्याचे उत्पादक आणि संबंधित गोटातून मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. वृत्तपत्रांच्या कागद आयातीचा खर्च गेल्या तीन महिन्यांत वाढल्यामुळे वृत्तपत्र उद्योग आर्थिक अडचणीत सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सकाळ

दि. १८.०४.२००८[संपादन]

मराठी भाषेतील पहिला शिलालेख सापडला
कुडल (ता. दक्षिण सोलापूर) येथील मराठीतील पहिला शिलालेख सापडला आहे. त्याची स्थिती बर्‍यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच ओळींचा लेख कोरलेला आहे. त्याचा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटचे वाक्‍य "वाछि तो विजेया होईवा ।।" असे मराठीत आहे. विशेष म्हणजे त्यात स्पष्ट कालोल्लेख सापडतो, तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ.स.१०१८ या काळात तो कोरला आहे. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्‍वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - "चामुण्डराजे करवियले" हा काळाच्या दृष्टीने आद्य मराठी लेख समजला जात असे. तो आता मागे पडला असून तो मान कुडलला मिळाला आहे.
सकाळ


आदिवासी विद्यार्थ्यांची उपासमार पोषण आहार बंद
शहापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिला जाणारा पोषण आहार ऐन परीक्षांच्या काळात तडकाफडकी बंद करण्यात आल्याने शहापूर तालुक्‍यात विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. तालुक्‍यातील चारशे शाळांमध्ये पोषण आहार दिला जात होता. मात्र १ एप्रिलपासून आहार देणे बंद करण्यात आल्याने गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे.
सकाळ


मराठी चित्रपटाची पताका अटकेपार
मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलेल अशी एक महत्त्वपूर्ण घटना मराठी चित्रपटसृष्टीत घडत आहे.ऑस्करपर्यंत मजल मारलेला "श्‍वास", अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजवून आलेले "टिंग्या" आणि "वळू" तसेच वेगळ्या धाटणीचा "चेकमेट" हे चित्रपट आता हिंदीबरोबरच इतर प्रादेशिक भाषांत डब केले जाणार आहेत; तर काहींचा रिमेक काढण्यात येणार आहे. आगामी दोन ते तीन महिन्यांत ही प्रक्रिया सुरू होणार आहे.
सकाळ


सावरकरांची जन्मभूमी निघाली रेखीव नगरीच्या दिशेने !
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची जन्मभूमी नाशिक जिल्ह्यातील भगूर. स्वातंत्र्य लढ्याच्या अनुषंगाने विशेष महत्व असलेल्या या शहराने आता रेखीव नगरीच्या दिशेने वाटचाल सुरु केलीयं. संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान स्पर्धेत भगूर नगरपालिकेने राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे वीस लाख रुपयांचे पारितोषिक पटकाविले. विविध स्पर्धांमधील यशाच्या रकमेतून शहराच्या सुशोभिकरणावर नगरपालिकेतर्फे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
सकाळ


आकाशगंगांच्या जवळ आढळले तारकासमूह
आकाशगंगांची पडछाया भासावी अशा प्रकारचे क्षीण तारकासमूह खगोलशास्त्रज्ञांना दोन चक्राकार आकाशगंगांच्या जवळपास आढळले आहेत. विद्युतचुंबकीय क्षेत्राच्या प्रभावामुळे ब्रह्मांडातील अनेक वस्तू किंवा त्यांचा बराच मोठा भाग असूनही दिसत नाही, या सिद्धान्ताला पुष्टी देणारे हे संशोधन ठरले आहे.
सकाळ

दि. १७.०४.२००८[संपादन]

अभूतपूर्व सुरक्षेत ऑलिंपिक ज्योत दौडला प्रारंभ
तिबेटी आंदोलकांच्या तीव्र निदर्शनांमध्येच राजधानीत गुरुवारी दुपारी ऑलिपिंक ज्योत दौडचा प्रारंभ झाला. राष्ट्रपती भवनापासून राजपथावरून ही दौड इंडिया गेटपर्यंत जाणार आहे. एकूण ७० मान्यवर दौडमध्ये सहभागी होणार असून, त्यामध्ये ४७ खेळाडूंचा समावेश आहे. राजपथवर यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
सकाळ


यंदा सरासरीइतकाच पाऊस; वेधशाळेचा दिलासा
चालू वर्षी देशभरातील मोसमी पावसाचे प्रमाण सरासरीइतके असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. पहिल्या टप्प्यातील दीर्घकालीन अंदाजानुसार एक जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. देशभरातील विविध हवामानशास्त्रीय संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक नवी दिल्ली येथे सुरू आहे. या बैठकीत केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी हा अंदाज जाहीर केला.
सकाळ


खाद्यतेल, डाळींची आयात करणार
वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आज विविध उपाययोजना जाहीर केल्या. यात सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे विकण्यात येणार्‍या खाद्यतेलावर अनुदान, खाद्यतेल आणि डाळी यांची आयात आदींचा समावेश आहे. खाद्यतेलावर लिटरमागे १५ रुपये अनुदान देण्यात येईल आणि त्याचा पुरवठा कमी पडू नये यासाठी १० लाख टन आयात करण्यात येईल, तसेच डाळींचीही १५ लाख टन आयात करण्यात येईल, असे कृषिमंत्री शरद पवार यांनी आज लोकसभेत जाहीर केले.
सकाळ


लोकप्रतिनिधीही थकवताहेत "एमटीएनएल"ची बिले
सर्वसामान्य ग्राहकांचे दूरध्वनी बिल थकल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करणार्‍या महानगर टेलिफोन निगम लिमिटेडने (एमटीएनएल) खासदार-आमदारांकडून बिले वसूल करण्यात मात्र प्रतीक्षेचे धोरण अवंलबिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मिलिंद देवरा, अबू आसीम आझमी, रामदास आठवले आदी लोकप्रतिनिधींकडे दूरध्वनींच्या बिलापोटी असलेली थकबाकी तब्बल तीन वर्षांपासून वसूल करण्यात आलेली नाही! दरम्यान, बिल चुकविणार्‍या ग्राहकांमुळे एमटीएनएलला २००४ ते २००७ या वर्षांत सुमारे ५० कोटींचा फटका बसला आहे.
सकाळ


भारनियमन वर्षात निम्म्यावर येणार
येत्या वर्षभरात राज्यातील वेगवेगळ्या प्रकल्पांमधून सुमारे १७०० मेगावॉट इतकी जादा वीज प्राप्त होणार असल्याने पुढील वर्षभरात भारनियमन निम्म्यावर आणण्यात येईल, असा दावा आज राज्य वीजवितरण कंपनीकडून बेलापूर येथे करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत राज्यभरात विजेचे भारनियमन सरासरी एका तासाने कमी झाले आहे, असेही या वेळी सांगण्यात आले. बेलापूर येथील सिडको भवन येथे घेतलेल्या या जाहीर सुनावणीदरम्यान वीज कंपनीच्या प्रस्तावित दरवाढीस वेगवेगळ्या ग्राहक संघटना, उद्योजक तसेच नागरिकांनी तीव्र विरोध केला.
सकाळ

दि. १६.०४.२००८[संपादन]

राज्यभरात ८० कोटींचे अन्नधान्य जप्त
वाढती महागाई रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांत साठेबाजांविरुद्ध सुरू केलेल्या जोरदार कारवाईत गेल्या दहा दिवसांत राज्यात ५५ कोटी २८ लाख रुपयांची गहू, डाळी व तांदळासारखी खाद्यान्ने जप्त करण्यात आली. आजच्या सर्वांत मोठ्या कारवाईत नागपूर शहरात २५ कोटी रुपयांचा शेतीमाल, तसेच पुण्यातही पावणेदोन कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
सकाळ


मुफ्तींना काश्‍मिरात पाकिस्तानी चलनही हवे
काश्‍मीर हा मुक्त व्यापार प्रदेश जाहीर होणार असेल, तर राज्यात भारतीय चलनाबरोबरच पाकिस्तानी चलन वापरण्यासही परवानगी द्यावी, असे विधान माजी मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांनी केले होते. त्यावरून काश्‍मीरमधील राजकारण पेटले आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांनी सईद यांच्या वक्‍तव्याचा तीव्र निषेध केला असून, राज्यात पाकिस्तानी चलन वापरू देण्यास विरोध केला आहे. जम्मूच्या रियासी जिल्ह्यात रविवारी एका सभेत सईद यांनी पाकिस्तानी चलन वापरण्याविषयी विधान केले होते.
सकाळ


औद्योगिक भाडेवाढीतही मुंबई आघाडीवर
उद्योगसमूहांमध्ये उत्पादनखर्च कमी करण्यासाठी वाढती स्पर्धा असतानाच, गेल्या वर्षभरात कार्यालयांच्या जागेच्या भाड्यात सर्वाधिक वाढ मुंबई शहरात झाल्याचे एका पाहणीत दिसून आले आहे. अमेरिकेतील स्थावर मालमत्ता संस्थेने केलेल्या पाहणीत, गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईतील औद्योगिक मालमत्तांचे भाडे दुपटीने वाढले आहे. मुंबई पाठोपाठ इस्तंबूलचा क्रमांक लागतो, येथे या वर्षी साठ टक्के भाडे वाढले आहे.
सकाळ


देशात चांगल्या न्यायाधिशांची कमतरता
कायदा पदवीधर न्यायालयीन सेवेत न येता उद्योगसमूहांना पसंती देत आहेत. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या न्यायाधीशांची कमतरता असल्याची चिंता सर्वोच्च न्यायालयाने आज व्यक्त केली. न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी अधिक न्यायाधीशांच्या नियुक्तीचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने द्याव्यात, अशा आशयाची याचिका जनहित मंच स्वयंसेवी संस्थेने दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हे निरीक्षण नोंदविले.
सकाळ


पालिका सुरू करणार १६६ रात्रशाळा
महापालिकेच्या उर्दू आणि हिंदी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांची प्राथमिक शिक्षणानंतर मोठ्या प्रमाणावर होणारी गळती रोखण्यासाठी नव्या शैक्षणिक वर्षापासून १६६ रात्रशाळा सुरू करण्याचा निर्णय पालिका शिक्षण विभागाने घेतला आहे. विशेषत: उपनगरातील मुस्लिमबहुल भागात या शाळा सुरू होणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाचे सहआयुक्त एस. एस. शिंदे यांनी दिली
सकाळ


भारतीय दागिन्यांना परदेशात झळाळी
भारतीय जेम आणि ज्वेलरी उद्योगात सध्या जगतातून मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहे. या उद्योगात २२.२७ टक्के वाढ झाली असून एकूण निर्यात ८४,०५८.१९ कोटी रुपये आहे, अशी माहिती "द जेम ज्वेलरी एक्‍स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिल"चे अध्यक्ष संजय कोठारी यांनी दिली. एप्रिल २००७ ते मार्च २००८ या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर करताना त्यांनी ही माहिती दिली.
सकाळ

दि. १५.०४.२००८[संपादन]

एस.टी.ची रक्कम लांबवणारे दरोडेखोर अडीच तासांत अटकेत
राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) कर्मचार्‍यांवर गोळ्या झाडून ११ लाख ७४ हजार ७५४ रुपयांची रक्कम पळवून नेणार्‍या चारही दरोडेखोरांना पोलिसांनी अवघ्या अडीच तासांत सापळा रचून पकडले. निलंगा आगारातील कॅशिअर माणिक सूर्यवंशी व सुरक्षारक्षक सुरेश जाधव हे जमा झालेली ही रक्कम घेऊन भारतीय स्टेट बॅंकेच्या येथील शाखेत भरण्यासाठी चालले होते. बॅंकेत जाण्यापूर्वी तीन दरोडेखोरांनी त्यांच्याजवळील पैशाची पेटी पळविण्याचा प्रयत्न केला.
सकाळ


कोकणच्या राजाची खरेदी "ऑनलाईन"
संपूर्ण देशामधील आंबा बाजारपेठेतील दर बागायतदारांना उपलब्ध व्हावेत, यासाठी ऑनलाईन आंबा खरेदीची सुविधा जिल्ह्यावासीयांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज या सुविधेचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी विकासचंद्र रस्तोगी यांच्या हस्ते झाले.या सुविधेमुळे आंबा खरेदी-विक्रीमध्ये असणारी दलालांची सद्दी संपुष्टात येण्यास मदत होणार आहे.
सकाळ


दिवसाला ३२० कोटींचा इंडियन ऑइलला तोटा
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला दिवसाला ३२० कोटी रुपयांच्या नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. हीच परिस्थिती २००९ पर्यंत कायम राहिली, तर याचा परिणाम भविष्यात उभारण्यात येणार्‍या कंपनीच्या प्रकल्पांवर होणार असल्याचे आज कंपनीचे अध्यक्ष सार्थक बहुरिया यांनी स्पष्ट केले.
सकाळ


कर्जे महागण्याची शक्‍यता; बॅंकिंग तज्ज्ञ
रिझर्व्ह बॅंकेचा पतधोरणाचा आढावा येत्या २९ एप्रिलला जाहीर होणार असून, त्यात चलनवाढीवर आळा घालण्यासाठी ठोस उपाय योजले जाऊ शकतात. त्यामुळे पतधोरणानंतर कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्के वाढ होण्याची शक्‍यता काही बॅंकिंग तज्ज्ञांनी व्यक्त केली.बॅंकिंग तज्ज्ञांच्या मते, रोख राखीव निधीच्या प्रमाणात (सीआरआर) अर्धा टक्के वाढ होण्याची शक्‍यता जास्त आहे.
सकाळ

दि. १४.०४.२००८[संपादन]

भाववाढीमुळे दहा कोटी लोक गरिबीकडे
भाववाढीचा आता जागतिक बॅंकेनेही धसका घेतला आहे. जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमतीमध्ये जगातील वेगवेगळ्या देशांत होत असलेल्या वाढीमुळे सुमारे दहा कोटी लोक गरिबीच्या चक्रव्युहात अडकण्याची आणि हजारो लोक उपासमारीला सामोरे जाण्याची शक्‍यता बॅंकेने वर्तविली आहे. जगातील सगळ्याच देशांत अन्नधान्याच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. फिलिपाईन्स, इजिप्त आणि हैतीमधील स्थिती तर विदारक असल्याचे बॅंकेने स्पष्ट केले आहे.
सकाळ


तिसर्‍या कसोटीत भारताचा विजय; मालिका बरोबरीत
अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमवर नांगी टाकलेला भारतीय क्रिकेट संघ त्या मैदानावरील पराभवाचे जशास तसे उट्टे काढेल, अशी अपेक्षाही कोणी बाळगली नव्हती. अगदी आखाडी खेळपट्टीवर काल दुसर्‍या दिवशी भारताने तेवीस धावांची आघाडी घेतली होती, तेव्हा आज रामनवमीच्या दिवशी हा संघ विजयाची भेट देईल, असे कोणासही वाटले नव्हते, पण धोनीच्या धुरंधरांनी, हा चमत्कार करून दाखविला.
सकाळ


ओबीसींची वेगळी गुणवत्ता यादी शक्‍य - भालचंद्र मुणगेकर
"उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणार्‍या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या क्षमतेविषयी शंका घेतली जाणार असेल, तर या विद्यार्थ्यांची वेगळी गुणवत्ता यादी तयार करता येऊ शकेल," असे प्रतिपादन नियोजन मंडळाचे सदस्य भालचंद्र मुणगेकर यांनी केले. उच्च शिक्षण संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांच्या २७ टक्के आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर आरक्षणाला विरोध करणार्‍यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. भालचंद्र मुणगेकर आणि वीरप्पा मोईली समिती या मुद्‌द्‌यांचा अभ्यास करीत असून, त्यांनी ओबीसींच्या गुणवत्ता यादीचा पर्याय सुचविला आहे.
सकाळ


बुधियाचे माजी प्रशिक्षक बिरांची दास यांची हत्या
धावपटू बुधियाला तयार करणारे प्रशिक्षक बिरंची दास यांची रविवारी (ता. १३) भुवनेश्‍वर येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दास यांच्यावर एका बंदूकधार्‍याने दोन गोळ्या झाडल्या. त्यांना जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात आणण्यात आले; मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला.
सकाळ


माओवाद्यांची नेपाळमध्ये सरशी
नेपाळमधील घटना समितीच्या निवडणुकीत १०५ पैकी ६१ जागा जिंकून माओवाद्यांनी बहुमत प्राप्त केले. नेपाळच्या राजकारणात दीर्घकाळ वर्चस्व असलेल्या नेपाळी कॉंग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांना पराभव पत्करावा लागला.
सकाळ


पाच एकरांच्यावर ठराविक कर्ज माफ करण्याचा विचार - शरद पवार
पाच एकरांच्यावर जमीन असलेल्या शेतकर्‍यांचे ठराविक रकमेचे कर्ज माफ करण्याचा विचार सुरू असून, याबाबत रिझर्व्ह बॅंकेकडून मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथे दिली. रिझर्व्ह बॅंकेकडून मूल्यमापनाचे हे काम कधी पूर्ण होईल याचा कालावधी स्पष्ट करण्यास मात्र त्यांनी नकार दिला.
सकाळ


स्कार्लेटच्या मृतदेहातून महत्त्वाचे अवयव गायब
गोव्यात बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या स्कार्लेट कीलिंगच्या मृतदेहातील महत्त्वाचे अवयवच नसल्याचे ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या न्यायवैद्यक चाचणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्‍यता आहे. गोव्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला असून, येथे घेण्यात आलेल्या चाचणीवेळीच हे अयवय काढावे लागल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ


कराचीत हिंदू कामगार वेठीला
कराचीजवळच्या कोरंगी औद्योगिक वसाहतीतील नोव्हा इंडस्ट्रीज या कंपनीतील चाळीस हिंदू कर्मचार्‍यांना कंपनीत प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे. ....एका हिंदू कामगाराच्या खुनाविषयी तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केल्यामुळे हिंदू कामगारांना व्यवस्थापनाने कंपनीत प्रवेश नाकारला.
सकाळ


सिडकोविरोधी प्रकल्पग्रस्तांचा असंतोष
सिडको शासनाच्या नाकर्तेपणामुळे नवी मुंबई परिसरात सिडको प्रकल्पग्रस्तांनी १९७० पासून नैसर्गिक गरजेपोटी बांधलेली घरे साडेबारा टक्के भूखंड योजनेतून कापण्यास सिडकोने सुरुवात केल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून, याविरोधात सिडकोला धडक देण्यासाठी गावोगावी जनजागृती सुरू आहे.
सकाळ


बाबरीवेळी सद्दाम संयमी राहिले
बाबरी मशीद उद्‌ध्वस्त झाल्याच्या घटनेनंतर इराकचे तत्कालीन अध्यक्ष सद्दाम हुसेन यांनी अन्य आखाती राष्ट्रप्रमुखांप्रमाणे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करणे टाळून सौम्य भूमिका घेतली होती, असा उल्लेख इराकमधील भारताचे त्यावेळचे राजदूत रणजितसिंह काल्हा यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. काल्हा यांनी १९९२ ते १९९४ या काळात बगदादमध्ये भारताचे राजदूत म्हणून भूमिका बजावली. त्या काळातील अनुभव त्यांनी "द अल्टिमेट प्राईझ" या आपल्या पुस्तकात नमूद केले आहेत.
सकाळ

दि. १३.०४.२००८[संपादन]

नेपाळमध्ये माओवाद्यांची बहुमताकडे वाटचाल
नेपाळच्या सार्वत्रिक निवडणुकीत माओवाद्यांची बहुमताकडे वाटचाल सुरू असून, नेपाळ कम्युनिस्ट पक्षाने (माओवादी) नऊ जागा जिंकल्या असून, ६० जागांवर आघाडी घेतली आहे. निवडणुकांचा संपूर्ण निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्‍यता आहे. नेपाळमध्ये २४० जागांसाठी ता. १० रोजी मतदान झाले. आतापर्यंत १८ जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यात माओवाद्यांनी ९ जागा जिंकल्या आहेत. नेपाळी कॉंग्रेसने तीन जागा जिंकल्या आहेत. नेपाळ कम्युनिस्ट पक्ष (यूएमएल) व नेपाळी कॉंग्रेस प्रत्येकी १२ जागांवर आघाडीवर आहेत. काठमांडू खोर्‍यातील तीनही जिल्ह्यांत कम्युनिस्टांना धक्का बसला आहे. काठमांडू ललितपूर व भक्तपूर या कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात नेपाळी कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे.
सकाळ


विजेबाबत जनतेशी खेळू नका - शिंदे
"विजेच्या बाबतीत महाराष्ट्र अडचणीतून जात आहे. वीजनिर्मिती केली, तरच राज्याची प्रगती होणार आहे. त्यामुळे जनतेशी असा खेळ खेळू नका. पुरेशी वीजनिर्मिती का झाली नाही, याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या चुका मान्य करून आत्मचिंतन करा आणि वीजनिर्मितीचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न करा" असे आवाहन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी महाराष्ट्रातील सर्व पक्षांना केले. वीजनिर्मितीसाठी केंद्र महाराष्ट्राला शक्‍य तेवढी मदत करील, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.
सकाळ


अमरावतीत पाच कोटींचा धान्यसाठा जप्त
अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमंत पवार यांच्या नेतृत्वात विशेष कृतिदलाने येथील सेंट्रल वेअरहाउसमधील एका बड्या कंपनीच्या गोदामावर छापा टाकून तेथून सुमारे ५ कोटी १८ लाख रुपयांचा धान्यसाठा जप्त केला.
सकाळ


एस. टी. कामगार केव्हाही संपावर जाणार
एस. टी. उद्योगाच्या आणि कामगारांच्या वेतनाच्या मागण्या राज्य शासनाने पूर्ण न केल्यास कोणत्याही क्षणी एस. टी. कामगार संघटना राज्यव्यापी संप पुकारेल, असा निर्णय आज येथे झालेल्या राज्यकार्यकारिणीच्या बैठकीत झाला. ही माहिती संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण आणि सरचिटणीस हनुमंतराव ताटे यांनी आज दिली. शहरापासून जवळच असलेल्या मुडेश्‍वर मैदानावर उद्यापासून दोन दिवस मान्यताप्राप्त महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे ४४ वे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. या पार्श्‍वभूमीवर संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची सर्वसाधारण बैठक आज झाली. त्यानंतर संघटनेच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.
सकाळ


अप्रगत विद्यार्थ्यांची पाटी कोरीच!
प्राथमिक शाळांतील अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे राबविल्या जाणार्‍या लेखन-वाचन कार्यक्रमावर प्राथमिक शिक्षक संघटनांनी बहिष्कार घातला आहे. या संघटनांशी चर्चा न करण्याची ताठर भूमिका शासनाने घेतल्यामुळे या कार्यक्रमाचा राज्यात बोजवारा उडाला आहे. येत्या १५ एप्रिल रोजी या कार्यक्रमाची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे ज्या अप्रगत मुलांसाठी हा कार्यक्रम राबविला जाणार होता ते विद्यार्थी मात्र अद्यापही उपेक्षित आहेत.
सकाळ


६० फुटांच्या कॅनव्हासवर स्वातंत्र्याचा इतिहास साकारणार!
भारतीय स्वातंत्र्याचे अभ्यासक आणि चित्रकार औरंगाबादवासी अविनाश पुराणिक भारतीय स्वातंत्र्याच्या साठव्या वर्षानिमित्त ६X६० फूट कॅनव्हासवर स्वातंत्र्यलढ्यातील ६० प्रसंग ६० दिवसांत चितारणार आहेत. क्रांतिकारक मंगल पांडेंनी पहिली गोळी झाडली ती २९ मार्चला. या दिवसाचे औचित्य साधून हा अभिनव उपक्रम शिवाजी पार्कच्या समर्थ व्यायाम मंदिराच्या परिसरात ६० फुटी कॅनव्हासवर रंग लावून सुरू करण्यात आला.
सकाळ

दि. १२.०४.२००८[संपादन]

पदव्युत्तर अभ्यासक्रमांना आरक्षण लागू नाही?
केंद्र सरकारच्या शिक्षण संस्थांत इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) २७ टक्के आरक्षणाला मंजुरी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना लागू होणार की नाही, याबद्दल अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. न्यायालयाचा निर्णय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना लागू होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा शंका उपस्थित झाल्यामुळे या निर्णयाबाबत फेरआढावा घेण्याचा अर्ज केंद्र सरकारकडून केला जाण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. मात्र, कायदेतज्ज्ञांच्या मते या संदर्भात ’रस्ता बंद’ झाल्याची अवस्था आहे.
सकाळ


जाती कमी का होत नाहीत? - सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
उच्च शिक्षण संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली असली तरी समाजात समानता आणण्यासाठी आरक्षणाचे धोरण परिणामकारक ठरले आहे काय, असा सवालही केला आहे. केंद्र सरकारने यावर आपली भूमिका सादर करावी, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती अरिजित पसायत आणि सी. के. ठक्कर यांनी म्हटले आहे, की मागास वर्गांची संख्या कमी होत नाही. उलट ती वाढत आहे. याचा अर्थ मागासवर्ग कमी होण्याऐवजी वाढत आहे काय? तसे असेल तर प्रतिवादींच्या ( केंद्र सरकार व आरक्षणवादी पक्ष) आरक्षण वा कोटा देण्याच्या धोरणावर शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. असमानता दूर होण्याची गरज आहे. पण त्याविषयी कोणीही काही म्हणत नाही. "इतर मागासवर्गीय" ही संकल्पना जेव्हा अस्तित्वात आली तेव्हापासून त्यातील एकही जात त्या गटातून बाहेर पडलेली नाही. स्वातंत्र्याचा काळानंतर आरक्षणाच्या धोरणाने अपेक्षित उद्दिष्ट साध्य केले आहे काय, हे सांगा असा आदेशही न्यायालयाने केंद्र सरकारला दिला.
सकाळ


"बंद"नी पाहिली पुणेकरांची परीक्षा
महागाईच्या ओझ्याने वाकलेल्या आणि उन्हाळ्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी आजचा दिवस परीक्षा पाहणारा होता. महागाईच्या विरोधात कष्टकर्‍यांनी काढलेल्या मोर्चामध्ये रिक्षाचालकही सहभागी झाल्याने प्रवाशांचे हाल झालेच; पण त्याचबरोबर महापालिकेने आज संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला. त्यात भर म्हणून सायंकाळी लोणीकंद येथून येणार्‍या वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्याने निम्याहून अधिक पुणेकरांना सायंकाळपासून अंधाराचा सामना करावा लागला.
सकाळ


तिबेटच्या प्रश्‍नावरून चीनचे आंतरराष्ट्रीय संबंध ताणले
तिबेटच्या मुद्द्यावरून अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाने संमत केलेला ठराव, त्याला चीनने दिलेले कडवे प्रत्युत्तर, तिबेटींचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांचा अमेरिका दौरा; तसेच अंतर्गत बाबींत हस्तक्षेप न करण्याचा चीनने ऑस्ट्रेलियाला दिलेला इशारा; या पार्श्‍वभूमीवर चीनचे आंतरराष्ट्रीय संबंध आणखी ताणले आहेत. दलाई लामा यांचे तेरा दिवसांच्या अमेरिका दौर्‍यासाठी काल सिऍटलमध्ये आगमन झाले. "अनुकंपेची बीजे" या विषयावरील पाच दिवसांच्या अधिवेशनाचे नेतृत्व ते करणार आहेत.
सकाळ

दि. ११.०४.२००८[संपादन]

परदेशी पर्यटकांवर अंकुश हवाच
गोव्यात पर्यटक बालकांशी असभ्य वर्तन करीत असतील तर राज्य पोलिस काय करतात? असा सवाल पुढे आला आहे. गोमन्तकने हा विषय थेट छायाचित्रे प्रसिद्ध करून चव्हाट्यावर आणल्यानंतर अशा पर्यटकांवर अंकुश हवाच, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. अशा पर्यटकांवर कायद्यानुसार कारवाई होते की नाही? या प्रश्‍नांवर गोवा राज्य बालक आयोगाच्या बैठकीत विचारविनिमय करून पुढील पावले उचलली जातील, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष उदय बाळ्‌ळीकर यांनी दिली.
सकाळ


पुण्यातील दोन शिक्षिकांची नासातर्फे निवड
नासा या जगविख्यात अवकाश संशोधन संस्थेमध्ये होणार्‍या शिक्षकांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आघाडी घेण्याची परंपरा पुणेकर शिक्षकांनी कायम राखली आहे. यंदा देशातील निवड झालेल्या तीन शिक्षकांमधील दोन शिक्षक पुण्याचे आहेत. येत्या जूनमध्ये होणार्‍या दोन आठवड्यांच्या प्रगत प्रशिक्षण कार्यक्रमाला विध्यांचल शाळेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील आणि अभिनव इंग्रजी माध्यम शाळेतील गणिताच्या शिक्षिका सुजाता देशपांडे उपस्थित राहणार आहेत. जगभरातून केवळ ३२ शिक्षकांचीच या कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. या सर्व शिक्षकांनी नासातील एज्युकेटर्स ऍट स्पेस कॅम्प हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
सकाळ


पुण्यात घर घेणे आता झाले महाग
शहरातील सदनिकांच्या किमती प्रतिचौरस फूट ५० ते ४०० रुपयांनी वाढविण्याचा निर्णय प्रमोटर्स ऍन्ड बिल्डर्स असोसिएशन ऑफ पुणे (पीबीएपी)ने जाहीर केला. ही वाढ येत्या ता. २० एप्रिलपासून अमलात येणार आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष ललितकुमार जैन यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. पुण्यातील सदनिकांचा आता किमान दर अडीच हजार रुपयांपेक्षाही जास्त होणार आहे. बांधकाम क्षेत्रातील मंदीच्या पार्श्‍वभूमीवर, देशातील मोठ्या शहरांमध्ये सदनिकांच्या किमती कमी करण्यात येत आहेत. पुण्यातही सदनिकांच्या किमती कमी होण्याची अपेक्षा असताना असोसिएशनने त्यात वाढ करून सर्वांनाच धक्का दिला आहे. शहरातील सदनिकांचे दर सध्या अडीच हजार ते चार हजार रुपये प्रतिचौरस फुटाच्या दरम्यान तर आलिशान सदनिकांच्या किमती दहा हजार रुपये चौरस फुटापर्यंत आहेत. पीबीएपीचे अडीचशे सदस्य असून त्यांच्या प्रकल्पांना ही वाढ लागू होईल.
सकाळ


आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत आणि नाराजीही
सर्वोच्च न्यायालयाने आज मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे मुंबईत विविध ठिकाणी पडसाद उमटले.विद्यार्थी संघटनांनी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र या निर्णयातून क्रिमीलेयरला वगळण्यात आल्याबद्दल आणि खासगी संस्थांमध्ये आरक्षण नाकारल्याबद्दल काही संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सकाळ

दि. १०.०४.२००८[संपादन]

भूकबळी आणि कुपोषण निर्मूलनाचे उद्दीष्ट भारत विसरला
वेगवान विकासदरामुळे गरिबीचे उच्चाटन करण्यात भारताला लक्षणीय यश मिळाले असले तरीही बालकुपोषण, माता मृत्यूप्रमाण यामध्ये भारत आफ्रिकेच्याही मागे आहे, अशी टीका जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (आयएमएफ) अहवालात करण्यात आली आहे. भूक आणि कुपोषण ही उद्दीष्टे आता विसरली आहेत, अशी बोचरी टिप्पणीही करण्यात आली आहे.
सकाळ


आमिर खान, डॉ. लागू यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानने या वर्षीच्या दीनानाथ पुरस्कारांची घोषणा केली असून, मालिनी राजूरकर, मोहन तोंडवळकर, शंकर अभ्यंकर, डॉ. श्रीराम लागू, आमिर खान, उल्हास प्रतिष्ठान यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत हे पुरस्कार जाहीर केले. पुरस्कार वितरण सोहळा २४ एप्रिल रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते होणार आहे.
सकाळ

दि. ०९.०४.२००८[संपादन]

वृक्षांच्या कत्तलीत महाराष्ट्र देशात पहिला
पर्यावरणाचा र्‍हास आणि जागतिक तापमानवाढीमुळे वने आणि जंगले वाचविण्यासाठी मोहिमा सुरू असताना महाराष्ट्रात मात्र बेकायदा जंगलतोडीने उच्चांक गाठला असून, २००३ ते २००६ या तीन वर्षांत राज्यातील जंगलांमधून कोट्यवधी रुपये किमतीच्या दुर्मिळ जंगली झाडांची बेकायदा कत्तल झाल्याचे उघडकीस आले आहे. याच कालावधीत देशभरात जवळपास शंभर कोटी रुपये किमतीची मौल्यवान व दुर्मिळ जंगली झाडे जमीनदोस्त झाली असून, बेकायदा जंगलतोडीमध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे.
सकाळ


लष्करातील १०७ अधिकारी स्वेच्छानिवृत्तीसाठी प्रयत्नशील
मनुष्यबळाची चणचण भासत असलेल्या संरक्षण दलांत सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमुळे काहीशी नाराजी असून, त्यामुळे १०७ अधिकार्‍यांनी गेल्या पंधरा दिवसांत स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केल्याने संरक्षण दलांना धक्का बसला आहे. सहाव्या वेतन आयोगाने २४ मार्चला शिफारशी सादर केल्या. त्यावर नाराजी दर्शवीत लष्कर, नौदल व हवाई दलातील १०७ अधिकार्‍यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे सांगण्यात येते. लेफ्टनंट कर्नल, कर्नल अशा दर्जाच्या अधिकार्‍यांच्या वेतनात १५ टक्‍क्‍यांपर्यंतच वाढ सुचविण्यात आल्याने अधिकार्‍यांत नाराजी आहे. ही नाराजी तातडीने दूर न केल्यास हे किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाचे अधिकारी लष्करातून बाहेर पडतील, असे लष्करातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
सकाळ


दि. ०८.०४.२००८[संपादन]

ऑलिंपिक ज्योत पॅरिसमध्ये विझली
बीजिंग ऑलिंपिकचे आयोजन करणार्‍या चीनविरुद्ध होत असलेली निदर्शने दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. आज ऑलिंपिक ज्योतीची दौड सुरू असताना पॅरिसमध्ये चीनविरोधी पडसाद उमटले. निदर्शने वाढल्यामुळे संयोजकांना ज्योत दोन वेळा विझवावी लागली आणि बसमध्ये ठेवावी लागली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार पॅरिसमध्ये ८० जणांना ऑलिंपिक ज्योत घेऊन धावण्याचा बहुमान मिळाला होता. यातील पहिल्याच धावपटूच्या हातातून ऑलिंपिकज्योत हिसकावून घेण्याचा प्रयत्न फ्रेंच ग्रीन पार्टीच्या एका कार्यकर्त्याने केला
सकाळ


याहूवर ताब्यासाठी आता मायक्रोसॉफ्टचे दबावतंत्र
याहूवर ताबा मिळविण्यासाठी आता मायक्रोसॉफ्ट कार्पोरेशनने दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे. तीन आठवड्यात याहूने निर्णय घ्यावा अन्यथा यापूर्वीची ऑफर मागे घेऊ, असा धमकीवजा इशारा मायक्रोसॉफ्टने दिला आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह बॉल्मर यांनी पाच एप्रिलला याहूच्या संचालक मंडळाला दिलेल्या पत्राचा सूरच दबावाचा आहे. याहू ताब्यात घेण्यासाठी ४४.६ अब्ज डॉलर्स देण्याची तयारी मायक्रोसॉफ्टने दाखविली होती. व्यवहार अधिक गतीने आणि मैत्रीपूर्ण व्हावा, यासाठी ही चांगली ऑफर देऊ केली आहे. तथापि, दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ होऊनही या ऑफरवर विचार झालेला नाही, अशी तक्रार बॉल्मर यांनी पत्रात केली आहे.
सकाळ


उत्पन्नवाढीसाठी एसटीचा आता नवा फंडा
या, एसटीच्या प्रवाशांचे नव्या चकचकीत मॉलच्या रेस्टॉरंटवर स्वागत असो. ज्यांच्या खिशाला परवडते, त्या प्रवाशांनी या रेस्टॉरंटमध्ये खुशाल खावे, प्यावे. इतर वस्तूही विकत घ्याव्या. ज्यांना नाही परवडत, त्यांनी बसमध्येच बसून राहावे. आता प्रवाशांची ही सोय असो वा गैरसोय; त्याचा मोबदला मात्र मिळणार आहे एसटीला. अर्थात, खाये आप, भरे पेट मेरा, असेच एसटी महामंडळाच्या या नव्या योजनेबाबत आता म्हणावे लागेल. सतत होणारा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळातर्फे नाना शकली लढविल्या जातात. त्यात आणखी एका अजब योजनेची भर पडली आहे. प्रवाशांच्या सोयीचे कारण पुढे करून टप्प्यात येणार्‍या चकचकीत मॉलच्या रेस्टॉरंटला एसटी आता भेट देणार असून, त्या मॉल्सकडून ५० रुपये मोबदला घेणार आहे.
सकाळ


पत्नीला काळी म्हणाल तर तुरूंगात जाल!
पत्नीला नेहमी काळ्या रंगावरून चिडवून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने पतीला सुनावलेली दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविली. पत्नीला काळी म्हणणे हा तिचा मानसिक छळच असल्याचा निर्वाळाही न्यायालयाने दिला आहे.
सकाळ

दि. ०७.०४.२००८[संपादन]

कापूसकरांचे ”अवचितबाबा” ऑनलाइन कलासंग्रहालयात
प्रसिद्ध शिल्पकार शरद कापूसकर यांनी घडवलेल्या अवचितबाबा या शिल्पाची एआरसी (आर्ट रिन्यूअल सेंटर) या जगातील सर्वांत मोठ्या ऑनलाइन संग्रहालयात जगातील अंतिम पंचवीस कृतींत निवड झाली आहे. अभिजात कलाप्रकारांना जागतिक पातळीवरील रसिकांसमोर सादर करणार्‍या एआरसीवर प्रथमच मराठी शिल्पकाराची शिल्पकृती प्रदर्शित झाली आहे. आर्ट रिन्यूअल सेंटर हे जगातील सर्वांत मोठे आणि प्रतिष्ठेचे ऑनलाइन कलासंग्रहालय आहे. त्यांच्या www.artrenewal.org या संकेतस्थळावर सॅलोन - २००७ फायनलिस्ट इन स्कल्प्चर कॅटॅगरी येथे कापूसकर यांचे अवचितबाबा हे शिल्प रसिकांना पाहता येईल.
सकाळ


तापमानवाढीमुळे अमेरिकेलाही डेंगीचा धोका
तापमान बदलामुळे केवळ विकसनशील देशांनाच नव्हे तर विकसित देशांनाही डेंगी, मलेरियाचा धोका निर्माण झाला आहे. आत्तापर्यंत तेवीस अंश अक्षांश - रेखांशांच्या दरम्यान डेंगीचा प्रादुर्भाव आढळत होता. मात्र दरवर्षी ०.५ सेल्सियसने तापमानात वाढ होत असल्यामुळे अन्य देशातही डेंगीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. १९९५ साली अमेरिकेतील टेक्‍सास राज्यात डेंगीचा प्रादुर्भाव आढळून आला होता. आता टेक्‍सासबरोबरच हवाई, प्यूर्तो रिको भागात डेंगीचे रुग्ण आढळून आले आहेत.
सकाळ

दि. ०६.०४.२००८[संपादन]

बनावट ईमेलद्वारे भारतीयांची लूटमार
वामन हरी पेठे सन्सचे व्यवस्थापक आत्माराम गावडे यांना तब्बल चार लाख डॉलरची लॉटरी लागल्याचा "ई मेल' आला. पण या बनावट लॉटरीचे किस्से यापूर्वी अनेक वेळा गावडे यांनी ऐकले होते. त्यांनी या ई मेलकडे दुर्लक्ष केले. पण त्यांना या लॉटरीचे आमिष दाखवून रक्कम उकळण्यासाठी वापरण्यात येणारे बॅंकेचे खाते भारतातील असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गावडे यांनी बॅंकेच्या व्यवस्थापकांना हे खाते बनावट असल्याचे निदर्शनास आणून दिले. तरीही याविषयी कोणतीही कारवाई केली गेली नाही. हे खाते आजही बिनबोभाट सुरू आहे.
सकाळ


दांडी बहाद्दरांवर कारवाई करू
विधिमंडळातील कामकाजाबाबत पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक गप्पांना वृत्त म्हणून प्रसिद्धी दिल्याने मुख्यमंत्री विलासराव देशमुख कमालीचे व्यथित झाले आहेत.

अशा चर्चांमधील गप्पांना 'वृत्त' बनवून पत्रकारांनी अनौपचारिक चर्चेच्या नैतिकतेलाच धक्का पोहोचविला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. यापुढे पत्रकारांशी बोलायचे की नाही, असा प्रश्‍न आपल्याला पडला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अधिकार वापरण्यात संयम ठेवणे म्हणजे हतबलता नव्हे, अशी टिप्पणी त्यांनी आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केली आहे.

सकाळ


दुसर्‍या कसोटीत तिसर्‍याच दिवशी भारत पराभूत
कसोटी क्रिकेटमध्ये एखादी चूक झाली, तर सुधारणा करण्याची संधी मिळते असे म्हणतात, परंतु त्याच्यासाठी जिगर लागते. खेळपट्टीवर हिरवे गवत असो वा नसो; ती फलंदाजांसाठी नंदनवन झालेली असो वा नसो; जिगरच नसेल, तर पराभवापेक्षा दुसरे काहीही पदरी पडू शकत नाही.

पहिल्या दिवशीच दलदलीत अडकलेली टीम इंडिया आज गटांगळ्या खात पुरती बुडून गेली आणि दक्षिण आफ्रिकेने हा दुसरा कसोटी सामना एक डाव आणि ९० धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

सकाळ


दि. ०५.०४.२००८[संपादन]

भारतीय अंतराळवीर २०१५ मध्ये अंतराळात झेपावणार
भारतीय अंतराळवीर २०१५ मध्ये अंतराळात झेपावणार असून, या मोहिमेचा आराखडा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) तयार केला आहे. या मोहिमेच्या तंत्रज्ञानावर सुमारे दहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, इस्रोचा आराखडा येत्या काही दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

मानवसहित अंतराळ मोहिमेच्या प्रकल्प अहवालाला अंतिम रूप दिल्याची माहिती "इस्रो'चे अध्यक्ष डॉ. जी. महादेवन नायर यांनी पत्रकारांना दिली. पुढील आठवड्यात या अंतरिक्ष आयोगाची बैठक अपेक्षित असून, प्रकल्पाच्या खर्चाबाबत आयोग केंद्राला शिफारस करेल, अशी माहिती त्यांनी दिली. प्रकल्पाच्या येत्या आठ वर्षांच्या दिशेबाबत "इस्रो'च्या बंगळूर मुख्यालयाला पुरेशी स्पष्टता आली असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ


रमेश देव-सीमा यांना व्ही. शांताराम पुरस्कार
मराठी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या योगदानासाठी, राज्य सरकारतर्फे देण्यात येणार्‍या चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारासाठी प्रख्यात कलावंत रमेश देव-सीमा देव यांची, तर राज कपूर पुरस्कारासाठी प्रख्यात गीतकार, कवी आणि दिग्दर्शक गुलजार यांची निवड झाली. औरंगाबाद येथे २९ एप्रिलला होणार्‍या सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्री. चव्हाण यांनी औरंगाबाद येथे आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सव्वा लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह असे व्ही. शांताराम पुरस्काराचे; तर एक लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह असे राज कपूर पुरस्काराचे स्वरूप आहे.

सकाळ

दि. ०४.०४.२००८[संपादन]

मार्चमधील पाऊस ऐतिहासिक
मागील महिन्यात, ऐन उन्हाळ्याच्या सुरवातीला, महाराष्ट्रासह दक्षिण भारतात झालेला अवकाळी पाऊस ऐतिहासिक ठरला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, या पावसाने मार्च महिन्यातील गेल्या सव्वाशे वर्षांतील उच्चांक गाठला आहे.

१३ ते २६ मार्चदरम्यान झालेल्या या पावसाने दक्षिण भारतात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा ४०० ते १६०० टक्के इतकी जास्त पातळी गाठली होती. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीने केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक; तसेच महाराष्ट्राच्याही अनेक भागांत अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती. "आयएमडी'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार १८७५ पासून मार्च महिन्यात एवढा पाऊस कधीही झाला नव्हता. पुण्यातही मार्च महिन्यात गेल्या दहा वर्षांत पावसाने हजेरी लावल्याची नोंद नव्हती. शहरातील मार्च महिन्यातील पावसाची सरासरी ०.५ मिलिमीटर इतकी आहे; मात्र तीन दिवसांत २५ मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद होऊन शहरातही सरासरीपेक्षा पन्नास पट अधिक पावसाची नोंद झाली. पन्नास पट हा आकडा मोठा वाटत असला, तरी या महिन्यात गेल्या कित्येक वर्षांत अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे.

सकाळ

दि. ०१.०४.२००८[संपादन]

सहा आमदार एक वर्षासाठी निलंबित
विधानसभेत आज अर्थसंकल्पातील विभागवार मागण्यांवर बोलण्याची संधी दिली नाही म्हणून अध्यक्षांना पुस्तके व टाचण्यांचे बॉक्‍स फेकून मारणारे स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, अपक्ष आमदार बच्चू कडू, संजय चव्हाण, शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि भाजपचे राज पुरोहितसंजय कुटे यांचे विधानसभा सदस्यत्व एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले.

सभागृहात अनपेक्षितपणे झालेला गोंधळ व करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे अर्थसंकल्पी अधिवेशनाला वेगळेच वळण लागले आहे. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी सरकार आमदारांवर सूडबुद्धीने कारवाई करीत आहे, असा आरोप केला. सहा आमदारांच्या निलंबनाचा ठराव बहुमताने मंजूर केल्यानंतर शिवसेना-भाजपच्या सदस्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्या गोंधळातच पीठासन अधिकारी सुधाकर परिचारक यांनी कामकाज स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

सकाळ

हे सुद्धा पहा[संपादन]