बच्चू कडू
बच्चू कडू | |
चित्र:Bachukadu.jpg | |
विद्यमान | |
पदग्रहण ३० डिसेंबर २०१९ | |
राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी |
---|---|
महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
| |
विद्यमान | |
पदग्रहण २००४ | |
मतदारसंघ | अचलपूर, (जि. अमरावती) |
जन्म | ५ जुलै, १९७० |
राजकीय पक्ष | प्रहार जनशक्ती पक्ष |
ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू (जन्म : ५ जुलै १९७०) हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून (जि. अमरावती) सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत.[ संदर्भ हवा ] युवकांचे संघटन करून शेतकरी, दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले आहेत. आपल्या अभिनव आंदोलनाबद्दल बच्चू कडू महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहेत. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कडू यांनी शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांच्या राज्यमंत्री पदाची शपथ ३० डिसेंबर २०१९ रोजी घेतली आहे.[१][२][३] महाराष्ट्रामध्ये ते "बच्चूभाऊ" या नावाने लोकप्रिय असून "अपना भिडू बच्चू कडू" ही त्यांच्या समर्थकांची आवडती घोषणा आहे.[ संदर्भ हवा ]
बालपण आणि कुटुंब
[संपादन]बच्चू कडू यांचा जन्म ५ जुलै १९७० रोजी बेलोरा ता.चांदूरबाजार जि.अमरावती या गावी एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. इंदिरा कडू या त्यांच्या आई, तर बाबाराव कडू हे त्यांचे वडील होत. एकूण सहा मुले आणि पाच मुली यांमध्ये बच्चूभाऊ हे त्यांचे दहावे अपत्य होते. त्यांनी आवडीने मुलाचे नाव "ओमप्रकाश" ठेवले. त्यांचे पूर्वज अमरावतीजवळच्या वाईकी गावातील होते. बच्चुभाऊंचे आजोबा म्हशी खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचे, त्यांचा दुधाचाही व्यवसाय होता. समाजसेवेचे बाळकडू त्यांना कुटुंबाकडूनच मिळाले. गावात एखाद्या गरीबाच्या घरी कार्यक्रम असेल तर भाऊंचे वडील मोफत धान्य द्यायचे. तसेच त्यांच्या घरी असलेल्या टांग्यामधून गावातील अनेक आजारी व्यक्ती किंवा बाळंतीण महिलांना दवाखान्यात पोहोचवले जायचे. भाऊ त्यांच्या मामाच्या कुटुंबियांचे खूप लाडके होते. त्यांना "बच्चू" हे नाव त्यांच्या मामांनीच दिले. नयना कडू या त्यांच्या पत्नी आहेत.
शिक्षण
[संपादन]बच्चू कडू यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या बेलोरा या गावीच झाले. पाचवीनंतरच्या शिक्षणासाठी त्यांनी चांदुरबाजारला प्रवेश घेतला. चांदुरबाजारच्या गो.सी.टोंपे महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले. शालेय जीवनातच संत गाडगेबाबा आणि शाहिद भगतसिंग यांच्या विचारांनी ते प्रेरित झाले. त्यांच्या समाजसेवा, रुग्णसेवेचा पाया याच काळात पक्का झाला.
राजकीय कारकीर्द
[संपादन]कॉलेजमध्ये असताना मित्रांच्या मदतीने कॉलेजमधील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. यातूनच त्यांनी कॉलेज प्रतिनिधींच्या निवडणुकीत भाग घेतला आणि ते निवडून आले. हा त्यांच्या आयुष्यातील पहिला विजय होता. हळूहळू कॉलेजच्या बाहेरही त्यांची लोकप्रियता वाढू लागली. त्याचकाळात जिल्हा सहकारी बँकेने शेतकऱ्यांचे हप्ते थकल्याने त्यांचे ट्रॅक्टर जप्त केल्याच्या प्रकरणात बच्चू कडूंनी बँकेत "सुतळी ॲटमबॉम्ब" फोडून केलेल्या अभिनव आंदोलनानंतर त्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर परत मिळाले. या घटनेने परिसरात बच्चू कडूंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. त्यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव असल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला.
राजकारणात येताच बच्चू कडूंनी आपल्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. घरून मिळालेला सामाजिक कार्याचा वारसा आणि राजकीय ताकद या माध्यमातून त्यांनी समाजहिताची अनेक कामे केली. आपल्या गावासोबतच ते शेजारच्या गावातील लोकांच्याही .समस्याही सोडवू लागले. दरम्यान चांदूरबाजार पंचायत समिती निवडणुकीतही बच्चू कडू निवडून आले थेट सभापती पदावर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यावेळी शौचालय योजनेतील एक मोठा भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस आणल्याने राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न व्हायला लागले. अपंग बांधवांसाठीच्या सायकलींच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाबाबत कुरघोडीचे राजकारण झाले. त्यानंतर स्थानिक नेत्यांशी मतभेद झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली. अपंग, रुग्ण, विधवा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी त्यांनी प्रहार संघटना काढली. १९९९ साली विधानसभा निवडणुकीत अचलपूर मतदारसंघातून त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला. लोकसभा निवडणुकीतही ते थोडक्यात पराभूत झाले. त्यानंतर पाच त्यांनी पाच वर्षे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले, आंदोलने केली. त्या जोरावर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू प्रचंड मतांनी विजयी झाले. परंतु आपली संघटना राजकारणासाठी नसून समाजकारणाची आहे असा आदेश त्यांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना दिला आणि आपले समाजसेवेचे व्रत चालू ठेवले. २००४ नंतर २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग चार वेळा अपक्ष आमदार म्हणून ते निवडून आले. २०१९ साली लोकसभा निवडणुकीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला उमेदवारी देऊन त्यांनी या गंभीर विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे.
उपक्रम
[संपादन]पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर बच्चुभाऊंनी आपली राजकीय ताकद वापरून सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न सोडवले. "आमदाराची राहुटी" हा उपक्रम राबवून त्यांनी तालुकास्तरावरील ४७ विविध विभागांच्या ३५ योजना राबविण्यासाठी पंधरा दिवसात अख्खा तालुका पिंजून काढला. प्रत्येक गावात मुक्काम करून गावातील लोकांना विविध कागदपत्रांचे जागच्या जागी वाटप केले.
बच्चू कडूंना "अपंगांचे मसीहा" म्हणून ओळखले जाते. अपंग बांधवांसाठीच्या सरकारच्या योजनांची अमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी वेळोवेळी विधीमंडळात आवाज उठवला. आंदोलने केली. प्रहार संघटना अपंग बांधवांच्या पाठीशी उभी केली.
रुग्णसेवा हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी आपल्या गाड्या विकून त्यातून रुग्णवाहिका खरेदी केल्या. त्यांच्या प्रहार संघटनेच्या रुग्णसेवा समितीच्या दरमहा विदर्भातून रुग्णांना मुंबईला उपचारासाठी नेण्याचे काम केले जाते. मुख्यमंत्री सहायता निधीतून राज्यभरातील गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी ते दक्ष असतात. स्वतः त्यांनी रक्तदानाचे शतक पार केले आहे. मुंबईवरील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी मुंबईच्या मनोरा या आमदार निवासात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
अभिनव आंदोलने
[संपादन]बच्चू कडू महाराष्ट्रात त्यांच्या अभिनव आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची आंदोलने प्रामुख्याने अपंग, रुग्ण, विधवा आणि शेतकऱ्यांसाठी असतात. अभिनव आंदोलनाच्या माध्यमातून त्याकडे लक्ष वेधून घेण्याबरोबरच प्रसंगी कायदा हातात घेऊनही त्यांनी आंदोलने केली आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडू नेहमी आक्रमक असतात. अधिकारी वर्ग शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास टाळाटाळ करत असल्याच्या कारणावरून त्यांचे अनेकदा अधिकाऱ्यांसोबत वाद झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार काहीच उपाययोजना करत नसल्याने नागपूर हिवाळी अधिवेशन काळात त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून केलेलं "शोले" स्टाईल आंदोलन राज्यभर गाजले. सरकारच्या वतीने तत्कालीन उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील आणि वित्त व योजना राज्यमंत्री सुनील देशमुख यांनीही टाकीवर चढूनच त्यांच्याशी चर्चा करून ७५ मागण्या मान्य केल्या होत्या. ७०० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.
आदिवासी बांधव परंपरेने कसत असणारी शेतजमीन त्यांच्या नावे करण्याच्या शासकीय अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणावरून त्यांनी आपल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांसोबत स्वतःला त्या शेतजमिनीत गळ्यापर्यंत गढून घेण्याचे आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच आदिवासी समाजाच्या वनपट्टे मिळण्याच्या मागणीबाबत वनाधिकारी दुजाभाव करत असल्याच्या निषेधार्थ बच्चू कडूंनी त्या अधिकाऱ्याच्या घरात "साप छोडो" आंदोलन करण्याची घोषणा करताच दुसऱ्याच दिवशी आदिवासींना वनपट्टे मंजूर झाले.
खेड्यापाड्यातुन तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या लोकांना अधिकारी वेळेवर भेटत नसल्याने लोकांचा खोळंबा व्हायचा. बच्चुभाऊंना हा विषय समजताच त्यांनी "अधिकाऱ्याच्या खुर्चीचा लिलाव" आंदोलन केले. त्यातून आलेली रक्कम सरकारी खजिन्यात जमा केली. परिणामी अधिकारी कार्यालयीन वेळेत लोकांची कामे करण्यासाठी उपस्थित राहू लागले.
अचलपूर उपजिल्हा रुग्णालय रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या कारणावरून बच्चू कडूंनी रुग्णालय परिसरात झाडाला स्वतःला उलटे टांगून घेत आंदोलन केले. ते पाहून आरोग्य विभागाने त्वरित रुग्णांच्या गैरसोयी दूर करण्यासाठी हालचाल सुरू केली.
२००४-०५ च्या दुष्काळात दुष्काळग्रस्तांना शासकीय मदत विलंब होत असल्याच्या निषेधार्थ त्यांनी तहसील कार्यालयातच गणपती स्थापन करून जोपर्यंत शासन न्याय देत नाही तोपर्यंत या गणपतीचे विसर्जन करणार नाही अशी घोषणा केली. ते "गणपती आंदोलन" पाहून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली.
शहरी भागात अखंड वीजपुरवठा आणि ग्रामीण भागात भारनियमन या दुजाभावाच्या निषेधार्थ बच्चू कडूंनी अमरावती वीज महामंडळाच्या कार्यालयाबाहेर "रुमणं" आंदोलन केले. त्यात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटपट झाली. कार्यकर्ते जखमी झाले. ऊर्जामंत्र्यांनी याची तात्काळ दखल भारनियमन दोन तासांनी कमी करण्याचे आदेश दिले.
कापसाची बिले द्यायला शासन उशीर करत असल्याच्या निषेधार्थ त्यांनी "सामूहिक मुंडन" आंदोलन केले, परिणामी शेतकऱ्यांना त्वरित कापसाची बिले देण्याचे आदेश देण्यात आले होते. दारु बंद व्हावी म्हणून दारूच्या दुकानांसमोर "दूध वाटप आंदोलन" केले. बच्चुभाऊंची छप्परबंद आंदोलन, मंत्र्यांच्या वाहनांवर काळ्या रंगाचे पट्टे मारण्याचे आंदोलन, अचलपूर जिल्हानिर्मितीच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन, संडास योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या पंचायतराज समितीला सडलेले संडासच्या भांडे भेट देण्याचे आंदोलन, शाळकरी जीवनातील सुतळी बॉम्ब आंदोलन, मंत्र्याच्या घरी जाऊन त्याचे कान पकडून च्यावम्याव आंदोलन, राज्यातील मंत्र्यांचे मुखवटे लावून आंदोलन, इत्यादी विविध अभिनव आंदोलने केली आहेत.
अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बहिरम यात्रेतील तमाशा व त्याआडून होणार देहविक्रीचा व्यवसाय बंद पाडण्यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. प्रचंड मोठा विरोध पत्करून त्यांनी त्या यात्रेतील तमाशा, दारूविक्री, देहविक्री बंद पाडून दाखवली.
एप्रिल २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गावावरून म्हणजे नागपूर येहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गावापर्यंत म्हणजेच गुजरातमधील वडनगर इथपर्यंत काढलेली "आसूड यात्रा" खूप गाजली. गुजरातच्या सीमेवर ही यात्रा अडवण्यात आल्यानंतर बच्चुभाऊंनी वेषांतर करून गुजरातमध्ये प्रवेश मिळवला. मोदींच्या वडनगर या गावी जाऊन त्यांनी रक्तदान केले आणि सरकारला संदेश दिला की या देशातील शेतकऱ्यांचे रक्त घ्या, पण त्यांचा जीव घेऊ नका.
मारहाण केल्यावरून अटक
[संपादन]आमदार कडू यांनी मंगळवारी २९ मार्च २०१६ रोजी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भा. र. गावित यांना मारहाण केली. त्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले. मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी खाली उतरले व त्यांनी ठिय्या आंदोलन केले. मात्र त्यानंतरही कडू यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. आमदार बच्चू कडू यांना अखेर बुधवारी रात्री मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली.
लोकसत्ताचा अग्रलेख
[संपादन]आमदार बच्चूंच्या बच्चेगिरीवर ३१ मार्च २०१६ च्या दैनिक लोकसत्तात अगदीच बच्चू हा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.
पुरस्कार
[संपादन]- शंभुगौरव पुरस्कार : संभाजी ब्रिगेडतर्फे, २०१६[ संदर्भ हवा ]
संदर्भ
[संपादन]- ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 – www.bbc.com द्वारे.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
- ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.
- साचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत.
- CS1 errors: dates
- इ.स. १९७० मधील जन्म
- महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राचे विद्यमान आमदार
- प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकारणी
- महाराष्ट्रातील आमदार
- महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य
- अचलपूरचे आमदार