रक्षाबंधन
रक्षाबंधन[१] हा हिंदूंचा एक लोकप्रिय वार्षिक सण आहे, जो दक्षिण आशिया तसेच जगाच्या इतर भागांमध्ये विशेषतः हिंदू लोकांद्वारे साजरा केला जातो. या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी म्हणजे एक पवित्र आणि आकर्षक दोर विधिवत बांधतात. ही राखी त्यांच्या भावांकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते. परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.[२]
रक्षाबंधन हा हिंदू दिनदर्शिकेतील श्रावण महिन्यात साजरा केला जातो, जो सामान्यतः ऑगस्टमध्ये येतो. रक्षाबंधन ह्याचा शब्दशः संस्कृत अर्थ "संरक्षण, बंधन किंवा काळजी" असा होतो. बहीण-भावाचा हा सण, ज्याचा उगम लोक-संस्कृतीमध्ये झाला, त्याला स्थानानुसार वेगवेगळी नावे होती; काही ठिकाणी सलुनो,[३] [४] सिलोनो,[५] आणि राकरी असे म्हणले जात होते.[६]
विवाहित स्त्रियांसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. काही प्रदेशांमध्ये किंवा गावांमध्ये बहिर्विवाह प्रथा आहे. यामध्ये वधू तिच्या जन्माच्या गावाबाहेर लग्न करते आणि प्रथेनुसार तिचे पालक तिच्या विवाहित घरी जात नाहीत.[७]
उत्तर भारतातील ग्रामीण भागांत जिथे अनेक खेड्यांमध्ये बहिर्विवाह पद्धती प्रचलित आहे, तिथे मोठ्या संख्येने विवाहित हिंदू स्त्रिया दरवर्षी त्यांच्या पालकांच्या घरी सणासाठी परत जातात.[८][९] त्यांचे भाऊ, जे विशेषतः पालकांसोबत किंवा जवळपास राहतात, कधीकधी त्यांच्या बहिणींच्या विवाहित घरी त्यांना परत घेऊन आणण्यासाठी जातात. अनेक तरुण विवाहित स्त्रिया त्यांच्या जन्माच्या घरी काही आठवड्यांपूर्वी येतात आणि समारंभ होईपर्यंत राहतात.[१०] भाऊ हे बहिणीचे सासर आणि माहेर यांच्यामध्ये आजीवन मध्यस्थ म्हणून काम करतात.[११]
शहरी भारतात, जिथे कुटुंबे अधिकाधिक विभक्त होत आहेत, तिथे हा सण अधिक प्रतीकात्मक बनला असला तरीही तो खूप लोकप्रिय आहे. या उत्सवाशी संबंधित विधी त्यांच्या पारंपारिक प्रदेशांच्या पलीकडे पसरले आहेत. तंत्रज्ञान, स्थलांतर,[१२] चित्रपट,[१३] सामाजिक संवाद, [१४] आणि हिंदू धर्माच्या राजकीय प्रचाराद्वारे[१५][१६] या सणाचे स्वरूप बदलले जात आहे.[१७]
रक्ताचे नाते नसलेल्या स्त्रिया आणि पुरुषांमध्ये स्वैच्छिक नातेसंबंधांची एक बदललेली परंपरा देखील आहे. यासाठी जाती आणि वर्गाच्या पलीकडे,[१८] तसेच हिंदू आणि मुस्लिम हा भेद विसरून राखी बांधली जात आहे.[१९]
प्रस्तावना
[संपादन]हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला'रक्षाबंधन' म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हणले आहे.[२०] या विधीस 'पवित्रारोपण' असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.
उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून "भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो" अशी कामना करतात. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे.
काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना, आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे. भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा होतो. या दिवशी बहिणी आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधतातच आणि शिवाय त्या बंधुत्वसमान नाते असलेल्या व्यक्तीसही राखी बांधतात.
हेतू व महत्त्व
[संपादन]बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, सय्यम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं होय. पूर्वजांनी भारतीय संस्कृती मध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे. स्त्री सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला उपदेश होय. फक्त स्त्री हक्क आणि स्त्रीला वरवर सन्मान देणाऱ्या लोकांना तिचे महत्त्व कळत नाही.
‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:| यात्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:|’
ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा, म्हणजेच मान- सन्मान, सत्कार होतो, तेथे सुशील, गुणी व उत्तम मुलं होतात आणि जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही. हा विचार लहानपणीपासून समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न ह्या सणाद्वारे केला जातो.
"राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय्य, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे.
आख्यायिका
[संपादन]1.रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली, याबद्दल निश्चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते. 2.हिंदू पौराणिक कथेनुसार, महाभारतात, जे एक महान भारतीय महाकाव्य आहे, पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याच्या मनगटावर बांधला कारण भगवान कृष्णाने अनवधानाने स्वतःला जखमी केले होते. अशा प्रकारे, भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले.
भारतीय संस्कृती कोशात सांगितलेला धार्मिक विधी
[संपादन]विधीचा प्रयोग असा- सूर्योदयी स्नान करतात. उपाकर्म करून ऋषींचे तर्पण करतात अपराह्नकाळीं राखी तयार करतात. तांदूळ, सोने व पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्यांची पुरचुंडी बांधल्याने रक्षा अर्थातच राखी तयार होते. मग तिची पूजा करतात. नंतर पुढील मंत्राने ती राखी मंत्री राजाला बांधे. - येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल: । तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ॥ (अर्थ- महाबली दानवेद्र बळी राजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधतो. हे रक्षे, तू चलित होऊ नकोस.) यावरून मूळचे हे बंधन राजासाठी होते असे कळते.[२०]
या श्रावण पौर्णिमेला 'पोवती पौर्णिमा' असेही म्हणतात. कापसाच्या सुताच्या नवसुती (नऊ धाग्यांची जुडी) करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात.
धार्मिक महत्त्व
[संपादन]श्रावण पोर्णिमेसच "श्रावणी" असे देखील म्हणले जाते. पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेदपुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव साजरे करीत. तर कुमारांना शिक्षण घेण्यास सुरुवात करण्याचा मुहूर्त याच काळात काढला जात असे. अध्ययनाचा प्रारंभ, शौर्याचे शुभचिन्ह या दोन गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तसे आचरण करणे म्हणजे "श्रावणी' साजरी करणे होय. श्रवण नक्षत्रावर श्रावणी करतात.हा सण म्हणजे बहिण भावाचे अतूट नाते दाखवतो.
यज्ञोपवीत बदलण्याचे धर्मकृत्य
[संपादन]श्रावण महिन्यात जानवी बदलण्याचा कार्यक्रम असतो. हा ऋग्वेदी आणि शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मणांसाठी नागपंचमीच्या दिवशी अर्थात श्रावण शुद्ध पंचमीला, ऋग्वेदी, हिरण्यकेशी आणि तैत्तिरीय ब्राह्मणांसाठी वर्णषष्ठीच्या दिवशी अर्थात श्रावण शुद्ध षष्ठीला, किंवा सर्वसामान्य ब्राह्मणांसाठी श्रावण पौर्णिमेला होतो.
तमिळ पंचांगाप्रमाणे श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी अवनी नावाचा तमिळ महिना चालू असतो, म्हणून या दिवसाला तमिळ पंचांग पाळणारे लोक अवनी अवित्तम म्हणतात. अवित्तम म्हणजे धनिष्ठा. दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असतो. जर पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर पहिल्या दिवशी ऋग्वेदी ब्राह्मणांची आणि दुसऱ्या दिवशी यजुर्वेदी ब्राह्मणांची श्रावणी असते. सामवेदी ब्राह्मणांची श्रावणी गणेश चतुर्थीला असते.
प्रांतानुसार
[संपादन]रक्षाबंधनच्या सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकेय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. जैन लोक हा दिवस रक्षापर्व म्हणून पाळतात. त्या दिवशी जैन मंदिरातून राख्या ठेवलेल्या असतात. जैन मुनी त्यांचे आदराने ग्रहण करतात. उत्तर भारतात नोकर मालकाच्या हाताला राखी बांधतात.[२०]
आख्यायिका
[संपादन]राखी बांधताना बहिणीने म्हणावे, - येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल ।। (दानवांचा राजा बली यांच्या हातात दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी जशी रक्षा (राखी) बांधली होत तशीच ही राखी मी तुझ्या हाताला बांधत आहे.)
बाह्यदुवे
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ The Oxford Hindi-English Dictionary, 1993 Quote: m Hindi rakśābandhan held on the full moon of the month of Savan, when sisters tie a talisman (rakhi q.v.) on the arm of their brothers and receive small gifts of money from them.
- ^ A Field of One's Own: Gender and Land Rights in South Asia, 1994
- ^ Village India: Studies in the Little Community, 1955
- ^ Struggling with Destiny in Karimpur, 1925-1984 Quote: (p 84) Potters: .
- ^ Village Life in Northern India: Studies in a Delhi Village, 1965
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;Berreman1963
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ A Moral Technology: Electrification as Political Ritual in New Delhi, 2017 Quote: Rakhi and its local performances in Kishan Garhi were part of a festival in which connections between out-marrying sisters and village-resident brothers were affirmed.
- ^ The Oriental, the Ancient and the Primitive: Systems of Marriage and the Family in the Pre-Industrial Societies of Eurasia, 1990 Quote: "... the heavy emphasis placed on the continuing nature of brother-sister relations despite the fact that in the North marriage requires them to live in different villages.
- ^ Bodies of Song: Kabir Oral Traditions and Performative Worlds in North India, 2015 Quote: "In August comes Raksha Bandhan, the festival celebrating the bonds between brothers and sisters.
- ^ Essays on North Indian Folk Traditions, 2005 Quote: In Savan, greenness abounds as the newly planted crops take root in the wet soil.
- ^ Festivals of India, 1969
- ^ A Moral Technology: Electrification as Political Ritual in New Delhi, 2017 Quote: In modern rakhi, technologically mediated and performed with manufactured charms, migrating men are the medium by which the village women interact, vertically, with the cosmopolitan center—the site of radio broadcasts, and the source of technological goods and national solidarity
- ^ BUSINESS @ HOME, 2003 Quote: "Quote: Raksha Bandhan traditionally celebrated in North India has acquired greater importance due to Hindi films.
- ^ Faith: filling the God-sized hole, 2003 Quote: "But since independence and the gradual opening up of Indian society, Raksha Bandhan as celebrated in North India has won the affection of many South Indian families.
- ^ State and Civil Society under Siege: Hindutva, Security and Militarism in India, 2015 Quote:(p 111) The RSS employs a cultural strategy to mobilise people through festivals.
- ^ The Hindu Nationalist Movement and Indian Politics: 1925 to the 1990s : Strategies of Identity-building, Implantation and Mobilisation (with Special Reference to Central India), 1999 Quote: This ceremony occurs in a cycle of six annual festivals which often coincides with those observed in Hindu society, and which Hedgewar inscribed in the ritual calendar of his movement: Varsha Pratipada (the Hindu new year), Shivajirajyarohonastava (the coronation of Shivaji), guru dakshina, Raksha Bandhan (a North Indian festival in which sisters tie ribbons round the wrists of their brothers to remind them of their duty as protectors, a ritual which the RSS has re-interpreted in such a way that the leader of the shakha ties a ribbon around the pole of the saffron flag, after which swayamsevaks carry out this ritual for one another as a mark of brotherhood).
- ^ A Moral Technology: Electrification as Political Ritual in New Delhi, 2017 Quote: ... as citizens become participants in the wider "new traditions" of the national state.
- ^ India: A Country Study, 1996
- ^ Everyday Life in South Asia, 2002
- ^ a b c भारतीय संस्कृती कोश खंड सातवा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |