माणिक सीताराम गोडघाटे
माणिक गोडघाटे | |
---|---|
जन्म नाव | माणिक सीताराम गोडघाटे |
टोपणनाव | ग्रेस |
जन्म |
१० मे, इ.स. १९३७ नागपूर |
मृत्यू |
२६ मार्च, इ.स. २०१२ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, मराठीचे अध्यापन, विश्वकोश संपादक मंडळात समावेश. |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता, ललितलेखन |
कार्यकाळ | १९६७-२०१२ |
प्रसिद्ध साहित्यकृती | संध्याकाळच्या कविता, चर्चबेल |
प्रभाव | अभिजात उर्दू परंपरा, रोमांचवादी इंग्रजी काव्य. |
वडील | सीताराम |
आई | सुमित्रा |
अपत्ये | मिथिला, माधवी आणि राघव |
पुरस्कार |
|
माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस (१० मे, १९३७ – २६ मार्च, २०१२) हे मराठी कवी होते. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. "वाऱ्याने हलते रान" ह्या त्यांच्या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचे पाच काव्यसंग्रह आणि सात ललित लेखसंग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत.
सुरुवातीचे जीवन व शिक्षण
[संपादन]१० मे, १९३७ रोजी नागपूरमध्ये ग्रेस यांचा जन्म झाला. त्यांचे वडील लष्करी व्यवसायात होते. त्यांची रसिकता उल्लेखनीय होती.[माहितीज्ञान पोकळी] कर्नल बाग या नागपुरातील वस्तीत त्यांचे कुटुंब राहत होते. ग्रेस यांचे प्रारंभीचे जीवन कष्टमय होते. आईच्या अकाली मृत्यूमुळे विस्कळित झालेले घर त्यांना सांभाळावे लागले. नोकरी आणि शिक्षण यांच्याशी त्यांना झगडावे लागले. डॉ. लीला माटे यांच्याशी विवाह झाल्यानंतरही हा संघर्ष सुरूच राहिला. एम.ए.ची परीक्षा जवळ आलेली असताना त्यांना बसचा अपघात झाला. इ.स. १९६६ मध्ये मराठी विषयातील ना.के. बेहरे सुवर्णपदक जिंकून नागपूर विद्यापीठातून माणिक गोडघाटे एम.ए. झाले. प्लास्टर लावलेल्या हातांनी त्यांनी प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक घेतले.[१]
इ.स. १९६६ ते १९६८ या काळात नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केले. इ.स. १९६८ पासून ते नागपूरच्याच वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे अध्यापन करू लागले. प्राध्यापक म्हणून १९९७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर २००४ पर्यंत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात मराठी विभागात व ललित कला विभागात संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. 'सौंदर्यशास्त्र' या विषयाचे अध्यापनही या विद्यापीठात त्यांनी केले. इ.स. १९७१ ते १९७६ या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे १९८२ ते १९८६ या काळात ते सदस्य होते.
संपादनकार्य
[संपादन]- 'युगवाणी' या विदर्भ साहित्य संघाच्या मुखपत्राचे १९७१ ते १९७४ या काळात ग्रेस यांनी संपादन केले. मुंबईतील 'संदर्भ' या लेखक केंद्राचेही ते काही काळ संपादक होते.
- १९७५ च्या सालात रामदास भटकळ यांनी रायटर्स सेंटर मुंबई या संस्थेचं 'संदर्भ' हे वाङ्मयीन द्वैमासिक सुरू केले. त्याचे संपादन कवी ग्रेस करत असत.' संदर्भ'चे अवघे दहाबारा अंक निघाले. ग्रेस एखादा विषय प्रत्येक कला क्षेत्रातल्या दिग्गजांना देऊन त्यावर त्यांचे टिपण किंवा लेख मागवत असत.
'ग्रेस' या नावाविषयी
[संपादन]इ.स. १९५८ पासून माणिक गोडघाटे यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. इन्ग्रिड बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन गोडघाट्यांनी "ग्रेस" हे साहित्यिक नाव धारण केले. ''दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस'' या बोलपटात इन्ग्रिडसंबंधी शी इज इन ग्रेस असे वाक्य येते. हा बोलपट पाहत असताना तिने आपल्याला शीळ घातलेली आहे, असे गोडघाट्यांना वाटले. त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभा-रूपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इन्ग्रिडमध्ये झाला; तिचे ऋण आठवीत राहण्यासाठी आपण ग्रेस हे नाव धारण केले, असे गोडघाट्यांनी अक्षयकुमार काळे यांना दिलेल्या एका मुलाखतीत म्हणले आहे.[२] वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका आणि स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी छापण्याची पद्धत ह्या दोन खास गोष्टी संध्याकाळच्या कविता ह्या १९६७ साली प्रकाशित केलेल्या आपल्या पहिल्या काव्यसंग्रहात त्यांनी वाचकांना सादर केल्या, आणि ती परंपरा त्यांनी पुढेही चालू ठेवली.
दुर्बोधतेचा आरोप
[संपादन]"कठीण भाषेत सांगितले तर ते दुर्बोध आणि सोप्या भाषेत सांगितले तर हे काय सांगता, असा लोक प्रश्न करतात पण, माझी जगण्याची एक तऱ्हा आहे आणि मी आपल्याच तऱ्हेने जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे. मी जे काव्य करतो ते माझे ‘स्वगत’ आहे, असे समजा. ‘स्वगता’मध्ये भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगतामध्ये श्रोता नसतो तर कवी स्वतः निर्माताच असतो. त्यामुळे कुणाची पर्वा करायची नसते पण, हे स्पष्ट करतो की, मी ज्ञानाचे सोंग करत नाही आणि अज्ञान मिरवत नाही, ज्ञानर्षीचा अवमान करत नाही. मी शब्दकोषांना नवे शब्द देणारा आहे," असे प्रतिपादन त्यांनी राळेगाव येथील भाषणात केले होते. [३] कविता दुर्बोध असल्याच्या आरोपांना उत्तर देताना "मी माझ्या कवितेचा प्रियकर नाही" असे त्यांनी अनेकदा म्हणले होते. [४] माझ्या कवितेने मराठीला काय दिले आहे व ती काय देत आहे याचा विचार मला स्वतःला करण्याचे अजिबात कारण नाही, असे ग्रेस यांनी 'दुर्बोधतेची बेसरबिंदी' या ललितलेखात म्हणलेले आहे. [५] याच लेखात पुढे त्यांनी "आपण दुर्बोधतेच्या आरोपाचे निराकरण करीत नाही," असेही म्हणलेले आहे.
श्रीनिवास हवालदार (निवृत्त अधिकारी, भारतीय प्रशासकीय सेवा, इंदूर, मध्य प्रदेश) यांनी कविवर्य ग्रेस यांच्या प्रातिनिधिक कवितांचे विश्लेषण आणि त्यांना आकळलेले रसग्रहण करून ग्रेसच्या कविता 'दुर्बोध' आणि 'आत्मकेंद्रित' असल्याचा समज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. [६]
दुर्बोध गणल्या गेलेल्या/गाजलेल्या कविता
[संपादन]१. असे रंग आणि ढगांच्या किनारी
२. अज्ञेयाहून गूढ गूढ दिसती झाडातली वर्तुळे
३. आठवण
४. ओळख
५. ओळखीच्या वाऱ्या तुझे घर कुठे सांग?
६. ऊर्मिलेचा सर्पखेळ’
७. कंठात दिशांचे हार
८. कर्णभूल
९. कर्णधून
१०. क्षितिज जसे दिसते
११. ग्रेसची वृत्ती.
१२. घर थकलेले संन्यासी
१३. घनकंप मयूरा
१४. जे सोसत नाही असले
१५. डहाळी
१६. तुळशीतले बिल्वदल
१७. ती गेली तेव्हा रिमझिम
१८. तुला पाहिले मी नदीच्या किनारी
१९. .तांबे-सोन्याची नांदी
२०. तुझी बहार मंदशी तृषार्त जाग ये जरी...
२१. तुझ्यात नभवाहिनी कुठून रक्त गंधावले
२२. देखना कबीर
२३. देवी
२४. दुःख घराला आले
२५. दुःख
२६. निनाद
२७. निरोप
२८. प्रणाली.
(अपूर्ण यादी)
प्रसिद्ध कविता
[संपादन]- घर थकलेले संन्यासी Archived 2010-04-07 at the Wayback Machine. - मराठीमाती
- ती गेली तेव्हा
- निष्पर्ण तरूंची राई
- मरण
प्रकाशित साहित्य
[संपादन]पुस्तके
[संपादन]नाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) | ||||
---|---|---|---|---|---|---|---|
ओल्या वेळूची बासरी | ललित लेखसंग्रह | पॉप्युलर प्रकाशन | इ.स. २०१२ | ||||
कावळे उडाले स्वामी | ललित लेखसंग्रह | पॉप्युलर प्रकाशन | इ.स. २०१० | चंद्रमाधवीचे प्रदेश | कवितासंग्रह | पॉप्युलर प्रकाशन | इ.स. १९७७ |
चर्चबेल | ललित लेखसंग्रह | पॉप्युलर प्रकाशन | इ.स. १९७४ | ||||
मितवा | ललित लेखसंग्रह | पॉप्युलर प्रकाशन | इ.स. १९८७ | ||||
बाई! जोगिया पुरुष | कवितासंग्रह | पॉप्युलर प्रकाशन | आगामी | ||||
मृगजळाचे बांधकाम | ललित लेखसंग्रह | पॉप्युलर प्रकाशन | इ.स. २००३ | ||||
राजपुत्र आणि डार्लिंग | कवितासंग्रह | अमेय प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशन | इ.स. १९७४ | ||||
वाऱ्याने हलते रान | ललित लेखसंग्रह | पॉप्युलर प्रकाशन | इ.स. २००८ | ||||
संध्याकाळच्या कविता | कवितासंग्रह | पॉप्युलर प्रकाशन | इ.स. १९६७ | ||||
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे | ललित लेखसंग्रह | पॉप्युलर प्रकाशन | इ.स. २००० | ||||
सांजभयाच्या साजणी | कवितासंग्रह | पॉप्युलर प्रकाशन | इ.स. २००६ | ||||
सांध्यपर्वातील वैष्णवी | कवितासंग्रह | पॉप्युलर प्रकाशन | इ.स. १९९५ |
इतर प्रकाशित साहित्य
[संपादन]ध्वनिफिती
[संपादन]- संध्यासूक्तांचा यांत्रिक, फाऊंटन, मुंबई २००४
- साजणवेळा, शब्दवेध, मुंबई १९९८
- सांध्यपर्व, माधवी वैद्य, मुंबई
चित्रपट
[संपादन]निवडुंग (१९८९) या जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटात 'वाऱ्याने हलते रान' ही ग्रेस यांची रचना गीतबद्ध झालेली आहे.
मालिका
[संपादन]दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या 'महाश्वेता' या मालिकेत ग्रेस यांच्या 'निष्पर्ण तरूंची राई' (चंद्रमाधवीचे प्रदेश) या कवितेचा शीर्षकगीत म्हणून (भय इथले संपत नाही) वापर करण्यात आला.
इतर भाषांमध्ये अनुवाद
[संपादन]डॉ. जया मेहता यांनी ग्रेस यांच्या चर्चबेल व मितवा या ललित लेखसंग्रहांचे गुजरातीत भाषांतर केले आहे. ग्रेस यांच्या निवडक कविता डॉ. उमाशंकर जेठालाल जोशी यांनी गुजरातीत अनुवादित केलेल्या आहेत.
रंगमंचीय सादरीकरण
[संपादन]प्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत काव्यगायन आणि विवेचन अशा द्विदल कार्यक्रमाचे सादरीकरण कवी ग्रेस यांनी २००८ मध्ये सुरू केले. इचलकरंजी येथे 'मैत्र जीवाचे' या नावाने अशा द्विदल कार्यक्रमांचा पहिला प्रयोग झाला होता.
माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस. ग्रेस यांचं नाव घेतलं की आठवते. गूढरम्य संध्याकाळ आणि त्यांच्या संध्याकाळच्या कविता. त्यामागोमाग येतात, चंद्रमाधवीच्या प्रदेशातल्या आठवणी . "राजपुत्र आणि डार्लिंग" या त्यांच्या काव्यसंग्रहानेही रसिकांना भुरळ घातली. त्यांच्या शब्दांचं गारुड महाराष्ट्राच्या मनावर गेली दोन चार दशक अव्याहत आहे. गूढतेच्या विश्वात अलगद उतरवणारी कविता, काहीतरी प्रचंड हुरहूर लावणारी पण नक्की काय ते न सापडणारी पण तरीही आपली वाटणारी कविता लिहिणारे , मराठी साहित्य विश्वातले लखलखते माणिक "माणिक गोडघाटे "उर्फ कवी ग्रेस...!
"कठीण भाषेत सांगितले तर ते दुर्बोध आणि सोप्या भाषेत सांगितले तर हे काय सांगता, असा लोक प्रश्न करतात पण, माझी जगण्याची एक तऱ्हा आहे आणि मी आपल्याच तऱ्हेने जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे. मी जे काव्य करतो ते माझे ‘स्वगत’ आहे, असे समजा. ‘स्वगता’मध्ये भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगतामध्ये श्रोता नसतो तर कवी स्वतः निर्माताच असतो. त्यामुळे कुणाची पर्वा करायची नसते पण, हे स्पष्ट करतो की, मी ज्ञानाचे सोंग करत नाही आणि अज्ञान मिरवत नाही, ज्ञानर्षीचा अवमान करत नाही. मी शब्दकोषांना नवे शब्द देणारा आहे," असे प्रतिपादन त्यांनी राळेगाव येथील भाषणात केले होते.
ग्रेसांची कविता म्हणजे समुद्रासारखी अथांग असते... तिचा शोध घ्यावा तेव्हढा कमीच.. आणि तेव्हढीच चमत्कृती..! दुर्गाबाई भागवतांच्या मते –दैवी, मानवी, पाशवी जीवनवृत्तींचे अद्भुत मिश्रण ज्यांच्या कवितेतून झाले आहे असे कवी ग्रेस......शब्द आणि अर्थाच्या या किमयागाराचे आपल्यावर आभाळाएवढे ऋण आहेत.
त्यांच्या काही गाजलेल्या कविता...
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला....
पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने......
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता. मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता...
घर थकले संन्यासी , हळू हळू भिंतही खचते आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते
तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुझे केस पाठिवरी मोकळे इथे दाट छायातुनी रंग गळतात या वृक्ष-माळेतले सावळ......!
गूढार्थ आवर्तनांच्या आशयसूत्रात बंदिस्त करत शब्दांना अर्थालंकाराच्या नादलयींवर झुलवत ठेवणारा जोगिया पुरुष, प्राचीन नदीपरी खोल, दुःखाचा महाकवी "ग्रेस".
"ग्रेस" म्हणजे निसर्ग कृपेची भावाभिव्यक्ती, ग्रेस म्हणजे शब्दांतरीचे गूढात्म संदर्भ शोधू पाहणारी काव्यवृत्ती. ग्रेस म्हणजे मराठी काव्याचे मर्मबंध उलगडणारा अभिज्ञ शब्दप्रभू. आत्ममग्नतेतून संवेदनाप्रधान आशयाचे पैलू पाडणारा काव्यमहर्षि. मराठी वाङ्मयाच्या अन्वयाने मराठी साहित्यसृष्टीच्या कोंदणाला कवितेचा आणि लालित्याचा नवा अर्थालंकार परिधान केला तो कविवर्य ग्रेस यांनी. नवख्या अर्थांतरोपन्यासाचे मर्मभेदी परिमाण धारण करणारी ग्रेस यांची कविता अमूर्त संवेदनेतून शब्दांतीत काव्याशयाचे अवगाहन करते.ती वाचकांना आस्वादाच्या पातळीवर अर्थान्तराच्या परिमितीचे परिघ छेदून जाणारी असल्याने ती दुर्बोध वाटत असली तरी दुर्बोध नसून ती अबोध आहे.कारण कविता कधीच दुर्बोध नसते. कवीच्या आशयसृष्टीतील लेखनानुभूती मूलतः दोन पदे धारण करणारी असते किंबहुना ती तो जुळवून आणतो किंवा ती कविच्या प्रतिभेची मजल असते.याचाच प्रत्यय कविवर्य ग्रेस यांच्या कवितेतून यथार्थत्वाने येतो.
स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
कवी, कवितेची भूमी अर्थछट्टाच्या बाहुपाशात अडकवतो..तेव्हा त्याचे आशयसुक्त कविच्या मनोभूमीत विषयाचे मर्मभेद निर्माण करत असते.तो वाचकांना आशयाच्या आवर्तांशी रूंजी घालत तिष्ठत ठेवतो..ही "ग्रेस"यांच्या कवितेची परिणती आहे.
समुद्रबंदी काठावरची, दोन पांढरी शहरे गगन निळाईत पार बुडाले, त्यांचे सर्व शहारे
प्रस्तुत काव्यपंक्तीच्या आशयाचे विश्लेषण करताना अभिधाच्या अन्वयाने असे विवेचन करता येईल की, समुद्र काठावरच्या दोन शहराला समुद्राच्या भरतीने केव्हा धोका होईल या कल्पनेने आलेले शहारेही आता अंधारलेल्या काळोखात अदृश्य झाले आहेत आणि याच बरोबर लक्षणाच्या अन्वयाने प्रस्तुत काव्यपंक्तीतून अभिव्यक्त झालेला प्रणयभाव हा रुपकात्मक प्रतिमांनी बंदिस्त केलेला दिसतो.हे समजून घेण्यासाठी वाचकांची अनुभूती कवीच्या प्रतिभेइतकी टोकदार, प्रगल्भआणि चौफेर असतेच असे नाही.
सदरहू पंक्तीत आशय आणि अभिव्यक्तीची संदिग्धता आहेच. वाचकांच्या मनःपटलावर अभिधा आणि लक्षणाचे द्वंद्व चालू असते. तेव्हा कवीच्या अर्थविश्वाचा अदमास वाचकांना केवळ स्पर्शून जातो. ही भावार्थता ग्रेस यांच्या कवितेत आहे. म्हणून कविची भूमिका ही वाचकांकडून विशिष्ट अनुभूती सिद्ध करीत असली ; तरी तो कलाकृतीच्या चिकित्सेचा निश्चित अनुबंध ठरत नाही. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते
ही ग्रेस यांची कविता "महाश्वेता" मालिकेसाठी संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध करून लता मंगेशकर यांनी गायलेली आहे. तिचे गीत होऊन ती आता लहान थोरांच्या ओठांवर आहे. ग्रेस यांच्या "भय इथले संपत नाही " या पंक्तीत प्रश्नही आहे आणि उत्तरही. हा प्रश्न कवी यांना जेव्हा पडतो ; तेव्हा कवीला आईची आठवण येते. आणि लहानपणी जी गीते तू मला शिकविलीस ती मी संध्याकाळी गातो. कारण संध्यासमयी मनात काळोख दाटून येतो आणि प्रत्येक घटनेने जीव भयव्याकुळ होत जातो, असा भावपूर्ण आशय उपरोक्त गीत-पंक्तीतून व्यक्त होताना दिसतो.
तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शूनी गेला सीतेच्या वनवासातील, जणू अंगी राघवशेला
कवी ग्रेस यांच्या कवितेची भूमी ही गूढानुभूतीच्या भूमिकेवर आधारित आहे म्हणून ती तर्कार्थाच्या विश्लेषणास वाचकसापेक्ष असेलच असे नाही कारण कलाकृतीची निर्मितीमूल्ये कलावंताच्या मनोसंवेदनेत दडलेली असतात. म्हणून ग्रेस यांच्या कवितेतील "रसभाव" हा अभिधा किंवा लक्षणा सापेक्ष राहत नाही तो विविध आशयछट्टांचे अग्रदूत ठरत जातो. "संध्याकाळच्या कविता"मधून आलेल्या काव्यपंक्ती पाहूया...
ही चंद्र-उदयिनी वेळा, घननीळ कांठ मेघांचे भरतीच्या क्षितिजावरूनी, घर दूर जसे सजणाचें किंवा
पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने
कवितेचे मूल्य हे भावनानिष्ठ आणि तर्काधिष्ठीत अर्थान्वयाचे भाकीत करत जाते तेव्हा ती नव्या सृजनसृष्टीची प्रस्थापना करीत असते.
कवी ग्रेस यांच्या कवितेतील अर्थघटक प्रतिमांशी पुरक साधर्म्य निर्माण करतात.तोच त्यांच्या कवितेचा मूलाधार आणि स्वाभाविक गाभा-घटक आहे आणि यातून निर्माण झालेली आपली वेगळी विशिष्ट शैली आहे.
तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुझे केस पाठीवरी मोकळें इथे दाट छायातुनी रंग गळतात या वृक्षमाळेतले सावळें
ही कविता सुद्धा गीत झालेली आहे. संगीतकार श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध करून ती गोड गळ्याचे गायक- सुरेशजी वाडकर यांनी गायिले आहे.
नव्या उपमा, नवी प्रतिमाने, मात्रावृत्त व गुणवृत्तांच्या आधारभूत काव्यनिर्मितीला नवखे सामर्थ्य देणारी ग्रेस यांची तरल भावकविता आणि त्याचबरोबर सामाजिक जाणिवेतून आलेल्या विविधरंगी पात्रांच्या माध्यमातूनही त्यांची कविता समाजमनाचे पैलू अधोरेखित करते. त्यांच्या मुक्तछंदातील कवितेतून संयमाधिष्ठित विद्रोह व्यक्त होतो. सामाजिक जाणीव आणि निसर्ग यांच्या मार्गाने जसे चिरंतनाकडे जाता येते. तसेच आत्ममग्नतेतूनही याची जाणीव ग्रेस यांच्या कवितेतून होते. शब्दलालित्य व प्रतिमासृष्टी यांच्या पलीकडे जाऊन रसिकांच्या अंतर्मनात उतरणारी ग्रेस यांची कविता समाजमनाचा ठाव घेते. तिने मराठी रसिकांच्या मनावर गारुड केले आहे. समग्र मराठी साहित्याच्या कक्षेचा परीघ ग्रेस यांच्या कवितेने विस्तीर्ण केला आहे आणि काव्यस्वादाच्या पातळीवरही त्यांची कविता संकीर्ण प्रश्नांचे तांडव उभे करते. अपरिहार्य आणि व्यामिश्र घटनांच्या आणि घटकांच्या नोंदी घेत निर्मोही आणि नित्तळ अभिव्यक्तीतून ती सर्वस्पर्शी होत जाते. त्यांची कविता तरल लयबद्ध भावानुवादासह संगीताजवळ जाणारी आहे. ती सहज यमक साधणारी भावकविता आहे. ग्रेस यांच्या अनेक कविता संगीतबद्ध होऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. म्हणून त्यांची कविता मराठी साहित्य संस्कृतीचे वैभव आहे. अशा शब्दप्रभूचे साहित्यसृष्टीला मिळालेले योगदान मौलिक आणि उपकारक आहे. मोरांना कळते वेळ , कोकीळ असते हळवे .. ग्रेस समजुन यायला थोडं दुःख गाठीला असलं की बरं जातं, असं मला वाटतं. तो खरच क्रूर आहे. सगळं सोलून टाकतो, त्वचेला आंधळं म्हंटलंय त्याने ते उगाच नाही! सगळी आतडी टांगून ठेवतो तो आणि सौंदर्यस्थळं दाखवतो. ज्याच्यात हिंमत असेल तो बघेल..
आडवाच झोपलो असतो गर्भाशयात तर येऊ दिले असते का ? तुझ्या वाट्याला माऊलीचे भाग्यपण ? इतका थेट प्रश्न विचारायला ताकद लागते. आईबद्दल लिहितांनाही तिचं बाईपण जास्त जपतो हा माणूस म्हणूनही मला तो आवडतो. आईच्या स्त्रीत्वाचा हा सन्मान मी कुठेच बघितला नाही. म्हणून तो जेव्हा लिहितो, 'माझी आई मत्त वासना..' तेव्हा ते हिडीस वाटत नाही.
हा कवी महाराष्ट्राला लाभणं हे मराठीचं संचित आहे. तुम्ही त्यांना सादर करणं हे आमचं भाग्य आहे. 'माझ्या कुळाप्रमाणे मृत्यू मला दुपारी , आकाशातून बोलावतात घारी' हे ग्रेस शिवाय कोण लिहू शकेल. मला भिडणारी एक अशी आहे, घर कोसळले गं मधुरा मी उदासिनी बघ झाले कपटाने जोगी माझ्या गायींना घेऊन गेले.
संदर्भ:-
- १.'ग्रेसविषयी' - डॉ.अक्षयकुमार काळे (२००९)
- २.'रचनेच्या खोल तळाशी' - डॉ.नंदकुमार मुलमुले
ग्रेस यांच्या साहित्यावरील समीक्षात्मक ग्रंथ
[संपादन]- ग्रेस-अंबरफुलांचे दिवे (डॉ. चं.वि. जोशी) : या ग्रंथाला मसापचा २०१७ सालचा पुरस्कार मिळाला आहे.
- ग्रेस आणि दुर्बोधता, डॉ. जयंत परांजपे (१९८६)
- ग्रेसच्या कविता - धुक्यातून प्रकाशाकडे, श्रीनिवास हवालदार (२०१४, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे) या पुस्तकास मध्य प्रदेशातील मराठी साहित्य अकादमीच्या म.प्र.संस्कृति परिषद (भोपाळ)ने 'राजकवि भास्कर रामचन्द्र तांबे ' पुरस्कार दिला आहे.(४ जुलै २०१८)
- ग्रेसच्या कविता - धुक्यातून प्रकाशाकडे [उत्तरार्ध ][प्रकाशन वर्ष २०१६] लेखक- श्रीनिवास हवालदार [कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे]
- 'दूरस्थ ग्रेस- कवी ग्रेस यांना न लिहिलेली पत्रें' ; लेखक- श्रीनिवास हवालदार,प्रकाशन वर्ष: २०१८ [कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे]
- धुके आणि शिल्प, त्र्यं. वि. सरदेशमुख (१९८५)
- ग्रेसविषयी, डॉ. अक्षयकुमार काळे (२००९)
- रचनेच्या खोल तळाशी, डॉ. नंदकुमार मुलमुले
- मराठीतील काव्यरंग [एक समीक्षात्मक अध्ययन]- प्रकाशन वर्ष २०२१[ लेखक-श्रीनिवास हवालदार [कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ]
मराठी साहित्यातील १४ प्रसिद्ध कवी आणि कवयित्रींच्या प्रातिनिधिक कवितांच्या विश्लेषणात्मक अध्ययनात कवी ग्रेस यांच्या कविताही समाविष्ट आहेत.
पुरस्कार व गौरव
[संपादन]- गौरववृत्ती (फेलोशिप), महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, इ.स. २००५
- जी. ए. कुलकर्णी सन्मान पुरस्कार, पुणे, इ.स. २०१०
- जीवनव्रती पुरस्कार, विदर्भ साहित्य संघ, नागपूर, इ.स. १९९७
- दमाणी पुरस्कार, सोलापूर, ‘संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (ललितबंध)साठी
- नागभूषण पुरस्कार, नागभूषण फाऊंडेशन, नागपूर इ.स. २०१०
- महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’साठी (काव्य)
- महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, ‘चर्चबेल’साठी (ललितबंध)
- महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, ‘राजपुत्र आणि डार्लिंग (काव्य)
- महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, ‘संध्याकाळच्या कविता (काव्य)
- मारवाडी सम्मेलन पुरस्कार, मुंबई, ‘मितवा’साठी (ललितबंध)
- वाग्विलासिनी पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान, पुणे
- विदर्भ गौरव पुरस्कार, कृषी विकास प्रतिष्ठान, नागपूर
- विदर्भ भूषण पुरस्कार, इ.स. २०११[७]
- सहकारमहर्षी साहित्य पुरस्कार, सोलापूर
- साहित्य अकादमी पुरस्कार, इ.स. २०११ - वाऱ्याने हलते रान या ललितलेखसंग्रहासाठी.
- कवी ग्रेस हे इ.स. २०१२ साली झालेल्या दुसऱ्या ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
मृत्यू
[संपादन]कर्करोगाशी सुमारे तीन वर्षे लढा दिल्यानंतर अखेर वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी २६ मार्च २०१२ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले.
संदर्भ
[संपादन]- ^ संध्याकाळच्या कविता : एक अभ्यास, प्रा. अजय आणि इतर, साहित्य सेवा प्रकाशन (सातारा).
- ^ काळे, अक्षयकुमार. ग्रेसविषयी. p. १९.}.
- ^ लोकसत्ता http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=128277:2011-01-10-15-05-37&Itemid=1. Archived 2014-12-23 at the Wayback Machine.Sep 29, 2012
- ^ सकाळ http://www.esakal.com/esakal/20101225/5432976455069330558.htm Archived 2012-06-24 at the Wayback Machine.. Sep 29, 2012
- ^
मितवा. p. १९८.
|पहिलेनाव=
missing|पहिलेनाव=
(सहाय्य)}. - ^ A study and research centre for Marathi poet Grace on net
- ^ तरुण भारत http://tarunbharat.net/ftp/e-paper/2012-03-27/mpage6_20120327.htm [मृत दुवा]
बाह्य दुवे
[संपादन]- "ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार". २१ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link] - "ग्रेस यांची गाणी". 2014-09-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-21 रोजी पाहिले.
- https://drdevanandsontake.blogspot.com/2020/05/blog-post.html