अचलपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?अचलपूर

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

२१° १५′ २६″ N, ७७° ३०′ ३१″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ३६९ मी
जिल्हा अमरावती
लोकसंख्या १,०७,३०४ (२००१)

अचलपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात असलेले शहर आहे. यास पूर्वी एलिचपूर म्हणुन ओळखले जात होते. अचलपूर अमरावती पासून अंदाजे ५० कि.मी. लांब आहे. हे शहर सपन नदी आणि बिचन नदी या चंद्रभागा नदीच्या दोन उपनद्यांच्या काठी वसलेले असून याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३६९ मीटर (१,२१० फूट) इतकी आहे. हे शहर याच नावाच्या तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.

अचलपूरमध्ये एकूण ५२ पुरे (माेहल्ले) अाहेत. अब्बासपुरा, सुलतानपुरा अशी तत्कालीन मुस्लिम शासकांची नावे या माेहल्ल्यांना अाहेत. शहराच्या चारही बाजूंनी तटबंदी आहे; तिच्यात माेठाली प्रवेशद्वारे अाहेत.

या शहरातील जुने कोरीव काम काैतुकास्पद अाहे. फिनले मिलमुळे गावात लोकांना राेजगार उपलब्ध झाला अाहे;

येथील अष्टमहा‍सिद्धी हे महानुभावपंथीयांचे तीर्थस्थान आहे.

अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आणि अतिशय प्राचीन शहर आहे. या शहराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असून अनेक पुरातन वास्तू याची साक्ष देतात. शहरावर मोगल, मराठे, निजामांनी राज्य केले आहे.

जिल्ह्यातील दुसरे, तर विदर्भातील सातवे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असा लौकिक असलेल्या या शहराचा कारभार नगरपालिकेमार्फत चालवला जातो. समुद्रसपाटीपासून ३६९ मीटर उंचीवर हे शहर वसलेले असून, सपन आणि बिचन नावाच्या दोन नद्या या शहराबाहेरून वाहतात. मध्य प्रदेशच्या सीमेवर हे शहर वसलेले आहे.

तिनशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले दुल्हागेट आजही शहराचे वैभव आहे. हे गेट इस्माईल खान या सरदाराने बांधले आहे. दुल्हा रहेमान यांच्या दर्ग्याकडे रस्ता जात असल्याने गेटचे नाव असे पडले.