ऋद्धिपूरलीळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऋद्धिपूरचरित्र या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

ऋद्धिपूरला राहणारे चक्रधरांचे गुरू गोविंदप्रभू उर्फ गुंडमराउळ यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या आठवणी म्हाइंभटाने गोळा केल्या व त्यातून ऋद्धिपूरलीळा उर्फ गोविंदप्रभूचरित्र हा ग्रंथ सिद्ध केला. रचना इ.स. १२८८. एकूण ३२५ लीळा. अर्थात हे समग्र चरित्र नव्हे कारण गोविंदप्रभूंसंबंधीच्या सर्वच आठवणींचा यात समावेश नाही. गोविंदप्रभू - हरपाळदेव भेटीचा प्रसंग यात नाही. एका बाजूने ईश्वरावतारास शोभून दिसणारे सर्वज्ञत्वादी गुण तर दुसऱ्या बाजूने अवलियाची लक्षणे अशा दुहेरी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन या चरित्रात घडते. अमरावती हीच श्रीप्रभूंची कार्यभूमी असल्यामुळे त्यांच्या वऱ्हाडी भक्तजनांच्या तोंडी खास वऱ्हाडी बोली ऐकायला मिळते. प्राचीन वऱ्हाडी भाषेच्या अभ्यासाचे हा ग्रंथ हे एक उपयुक्त साधन ठरते. उदा. गडू = तांब्या, हारा = टोपली, हेल = पाणी भरण्याचे मडके. पोपट / पावटे = उकडलेल्या तुरीच्या शेंगा, गीदरी, उकड = नीट न बसलेला, कोनटा = कोपरा. लीळाचरित्राच्या तुलनेत हे मर्यादित स्वरूपाचे चरित्र आहे. लीळांचे साधेपण मोहक आहे. यातून उभी राहणारी गुंडम राउळांची ‘नाभिचुंबित खाड’ (दाढी) व ‘गगनाची वास’ पाहणारी मूर्ती लक्ष वेधून घेते.

कथनशैली
तंव ते आली : घागरी ठेवीली : घराआंतु गेली :
पाळणा पाहिला : तव न देखचि ।। (प्रत्येक ओळीत सहा अक्षरे आणि अनुप्रासात्मकता)
“एजमान ! देऊळवाडेयासि वाट कोण जाईल?”
गोसावी म्हणितले, “मेला जाए! वाटा वाटा जाए ना म्हणे”
“नीघरा जाले गर : घरीचीया गोसावीया जाली वोसरी”