दृष्टांतपाठ
मराठीतील पहिला कथासंग्रह
[संपादन]महानुभाव पंथातील महत्त्वाचा असलेल्या ह्या ग्रंथाची निर्मिती इ.स. १२८० मध्ये केशिराजबास यांनी केली. दृष्टांत म्हणजे छोटीशी बोधगर्भ कथा होय. प्रत्येक दृष्टांत आपल्या परीने स्वतंत्र, रोचक आहे. उदा. माकोडेयाचा दृष्टांत, राजहंसाचा दृष्टांत, हत्तीचा दृष्टांत.
परिचय
[संपादन]विचारप्रतिपादन, तत्त्वज्ञान, मांडणी, भाषाशैली आणि समाजजीवनाचे मार्मिक निरीक्षण या सर्वच गोष्टींनी हा ग्रंथ अपूर्व आहे. चक्रधरस्वामींनी तत्त्वविशदनार्थ सांगितलेले एकूण ११४ दृष्टांत केशिराजबासांनी गोळा केले व त्याला दार्ष्टांतिकाची जोड दिली. दृष्टांताची रचना त्रिकांडात्मक आहे. सर्वात वर श्रीचक्रधरोक्त सूत्र, नंतर आशय पटविणारा श्रीचक्रधरोक्त दृष्टांत व शेवटी दार्ष्टांतिक अर्थात केशिराजबासाने काढलेले पारमार्थिक तात्पर्य. हा ग्रंथ प्रामुख्याने परमार्थप्रवणासाठी आहे. या ग्रंथातून सूत्रपाठाचे तत्त्वज्ञान रसगर्भ, भावपूर्ण अशा कथाप्रसंगांच्या आणि दृश्यविशेषणाच्याद्वारे रमणीय माध्यमातून सांगितलेले आहे.
लीळाचरित्रभर इतस्ततः विखुरलेले प्रकट व अप्रकट दृष्टांत केशिराजाने गोळा केले व श्रीचक्रधरांच्या मागे शास्त्र जाणार नाही याची व्यवस्था केली. प्रत्येक दृष्टांतात श्रीचक्रधरांची जिवंत वाणी आणि केसोबासांची सुसंस्कारित भाषासरणी यांचा संयोग आढळतो.
भाषा
[संपादन]चक्रधरांचे तत्त्वज्ञान विद्वानांना रुचेल अशा रीतीने मराठीतून मांडणे व अध्यात्मासारखे शास्त्र पेलण्यास समर्थ अशी शब्दसंपत्ती मराठीत रूढ करणे हे केशिराजाचे मोठे कार्य होय.
उदा. खणिकार = हिऱ्यांचे काम करणारा. बांदकरी = माणसे धरून त्यांची विक्री करणारा. खाती = लोहार. गुळहारिया = रसापासून गूळ काढणारा.
दृष्टांतपाठ हा केवळ तत्त्वज्ञानाचाच ग्रंथ नाही तर लोककथांचे ते पहिले-वहिले संकलनही आहे. त्यामुळे त्याला मनोरंजकता लाभली आहे. खरे तर नागदेवाचार्यांनी सांगितलेल्या ‘म्हातारिया’ना तो सोप्यात सोप्या भाषेतील अज्ञानमुंचन करणारा ज्ञानग्रंथ आहे.