Jump to content

यशवंत दिनकर पेंढरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कवि यशवंत या पानावरून पुनर्निर्देशित)
यशवंत दिनकर पेंढरकर
जन्म नाव यशवंत दिनकर पेंढरकर
टोपणनाव यशवंत
जन्म मार्च ९, १८९९
चाफळ व जिल्हा सातारा
मृत्यू नोव्हेंबर २६, १९८५
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता
कार्यकाळ कविता लेखन १९१५ ते १९८५
प्रभावित गो. गो. मुजुमदार
वडील दिनकर पेंढरकर

यशवंत दिनकर पेंढरकर ऊर्फ कवी यशवंत हे मराठी कवी होते. 'महाराष्ट्रकवी' म्हणून त्यांना गौरवाने उल्लेखले जाते. ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते.जव्हार संस्थानाचे राष्ट्रगीत देखील त्यांनीच रचले.आधुनिक मराठी कवी परंपरेत राजकवी यशवंत यांना महत्त्वाचे स्थान आहे. "रविकिरण मंडळातील' सप्तर्षींमध्ये माधव जूलियन सोबत यशवंत यांच्या नावांचा अग्रक्रमाने उल्लेख केला जात असे.[ संदर्भ हवा ]

बालपण

[संपादन]

यशवंत ऊर्फ यशवंत दिनकर पेंढरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यात चाफळ येथे ९ मार्च १८९९ रोजी झाला. त्यांचे बालपण तेथेच गेले. आपण चाफळचे रहिवासी आणि जुन्या कालखंडात सांस्कृतिक उत्थानासाठी भरीव कार्य केलेले पुण्यपुरूष समर्थ रामदास चाफळचे, या योगायोगाबद्दल त्यांना अत्यंत अभिमान वाटायचा. समर्थ रामदास आणि शककर्ते छत्रपती शिवाजीमहाराज ही त्यांची श्रद्धास्थाने. संस्कारक्षम वयात डॉ. दत्तोपंत पटवर्धन यांची लोकमान्य टिळकांची युयुत्सू राष्ट्रवादी वृत्तीचा संस्कार करणारी कीर्तने यशवंतांना स्फूर्तिप्रद वाटायची. ""छंद लागला टिटवीला । तिने समुद्रहि आटविला हे शब्द त्यांच्या अंतःकरणावर कोरलेले. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या शिवजयंतीत्युत्सवाचा संस्कार त्यांच्यावर झालेला. तेव्हापासून त्यांच्या भावविश्‍वात समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांना महत्त्वाचे स्थान मिळालेले.[ संदर्भ हवा ]

यशवंतांच्या लौकिक जीवनाचा मार्ग अत्यंत खडतर होता. शालेय शिक्षणास ते सांगलीला राहिले. तेथील सिटी हायस्कूलमधून डिपार्टमेंट स्कूल फायनलच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. पुढचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना घेता आले नाही. त्यातही जमेची बाब ही की त्या शाळेतील शिक्षक, नामवंत कवी आणि कादंबरीकार साधुदास ऊर्फ गो. गो. मुजुमदार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव यशवंतांवर पडला. [ संदर्भ हवा ]

पुणे वास्तव्य आणि साहित्यिक सहवास

[संपादन]

पुढे यशवंत पुण्याला गेले. अभिरुचिसंपन्न कवी गिरीश त्यांना मित्र म्हणून लाभले. प्रा. श्री. बा. रानडे आणि सौ. मनोरमा श्रीधर रानडे या प्रेमळ दांपत्याची पाखर त्यांना लाभली. मनोरमा रानडे तर सर्वांची आवडती जिजी होती. माधव जूलियन यांच्यासारख्या व्युत्पन्न, प्रतिभावंत आणि मनस्वी कवीचा सहवास त्यांना लाभला. दिवाकरांसारखे चोखंदळपणे वाचन करणारे मित्र होते. शिवाय वि. द. घाटे, प्रा. द. ल. गोखले आणि ग. त्र्यं. माडखोलकर होते. या समानधर्मी मित्रांच्या सहवासामुळे यशवंतांना नवीन क्षितिज खुणावू लागले. औपचारिक शिक्षणाची उणीव त्यांनी चौफेर आणि चोखंदळ वाचनाने भरून काढली. एकीकडे लौकिक जीवनातील वैशाखवणवा होता, तर दुसरीकडे अलौकिक काव्यानुभूतीचे मोरपीस अंतर्मनाला आल्हाद देत होते. अशा संघर्षमय परिस्थितीतही कवितेवरील अनन्य निष्ठा यशवंतांनी ढळू दिली नाही. त्याविषयीची मानसप्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणतात, ""कारकुनी म्हणजे असेल नसेल त्या अभिरुचीची राखरांगोळीच! अशा परिस्थितीत कवितेच्या आवडीचे कोवळे मुगारे करवून जायचे. पण वावटळीत पदराआड दिव्याची ज्योत सांभाळून ठेवावी त्याप्रमाणे अंतर्यामीची असलेली कवितेची आवड मी जोपासली. काव्य ही एक उपासना आहे, ते एक व्रत आहे, अशी त्यांच्या मनाची धारणा होती.[ संदर्भ हवा ]

स्थायीभाव

[संपादन]

उत्कट आत्मपरता हा यशवंतांच्या प्रतिभेचा स्थायीभाव आजच्या गतिमान जीवनप्रवाहातील संवेदनशीलतेला कदाचित मानवणारे नाही. पण, एकेकाळी यशवंतांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची मुद्रा जनमानसावर उमटवली होती. एकत्र कुटुंबपद्धतीतील शाश्‍वत जीवनमूल्यांचा त्यांनी उद्‌घोष केला. त्यांची कुंटुंबवेल्हाळ वृत्ती त्यांच्या आत्मनिष्ठ कवितांतून प्रकट होते. १९२२ मध्ये त्यांना लिहिलेल्या "आई' या कवितेतील गोडवा आजही कायम राहिला आहे.

"आई' म्हणोनि कोणी, आईस हाक मारी

ती हाक येई कानी, मज होय शोककारी

स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी

या ओळींतील आर्तता आणि करुणा अंतःकरणाला स्पर्श करते. मातेची महत्ता समुचित शब्दांत कवीने वर्णिलेली आहे.

आई! तुझ्याच ठायी सामर्थ्य नंदिनीचे

माहेर मंगलाचे अद्वैत तापसांचे

"दैवतें माय-तात' या कवितेतही आई वडिलांविषयी कृतज्ञताभाव परिणामकारक शब्दांत व्यक्त झाला आहे. आपल्या मनातील भाव-भावनांचे कढ, आशा-निराशेची स्पंदने आणि तीव्र दुःखाच्या छटा यशवंतांनी समरसतेने रंगवल्या. "समर्थांच्या पायांशी', "माण्डवी' व "बाळपण' अशा कितीतरी आत्मप्रकटीकरण करणाऱ्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत. "लाह्या-फुले' या कवितेत आपल्या जीवनातील प्रखर वास्तवाचे चित्रण कवी करतो. माझें हें जीवित तापली कढई मज माझेंपण दिसेचि ना माझें जीवित तापली कढई तींत जीव होई लाही-लाही वसन्त, हेमन्त, निशा किंवा उषा लाहीच्या विकासासारखेंच लाह्या-फुलें ऐशीं देहीं फुलतात. ऐश्‍वर्य अनन्त हेंच आम्हां!

प्रेम कविता

[संपादन]

यशवंतांच्या प्रेमकवितेत प्रीतिसाफल्य, तिची विफलता, मृत्यूवर मात करणारे तिचे चिरंजीवीत्व इत्यादी छटांचे चित्रण आढळते. त्यांच्या प्रेमकवितेवर रविकिरणमंडळातील कवींचा ठसा उमटलेला दिसतो. केवळ प्रियकराच्या नवथर भावनांचे प्रकटीकरण करण्यात त्यांची प्रतिभा रमत नाही. कल्पनासृष्टीतील प्रेयसीच्या सौंदर्याचे मानसिक चिंतन करण्याची प्रवृत्ति त्यांच्यात आढळते. स्त्रीच्या शारीरिक सौंदर्यामुळे पुरुषाच्या मनात प्रीतीभाव निर्माण होत असला तरी, त्याची परिणती आत्मिक मिलनात होणे ही खरी कसोटी. प्रेयसीच्या अंतःकरणातील उदात्ततेला कवी प्राधान्य देतो. यादृष्टीने तूच रमणी ही त्यांची कविता उल्लेखनीय होय. "प्रीतिसंगम', "प्रेमाची दौलत', "चमेलीचे झेले' आणि "एक कहाणी' या कवितांचा आवर्जून निर्देश करायला हवा. "एक कहाणी' मध्ये बारा कवितांचा गुच्छ आहे. "चमेलीचे झेले'मध्ये तीन कविता एकत्र गुंफलेल्या आहेत. "एका वर्षानंतर' या कवितेत सुरुवातीला प्रसन्न भावनांचे प्रतिबिंब आढळते... ती तू दिसतां हृदयी येती कितीक आठवणी मम सौख्यांची झाली होती तुझ्यांत साठवणी! या कवितेत आठ कवितांची मालिका आहे. प्रेमनैराश्‍यामुळे निर्माण झालेल्या व्यथेंचे चित्रण करताना कवी उद्‌गारतो... सुहासिनी, कां दर्शन देसी? मी हा दरवेशी! समोरूनी जा, झाकितोंच वा हृदयाच्या वेशी!

सामाजिक आशयाची कविता

[संपादन]

यशवंतांनी राष्ट्रीय वृत्तीचा परिपोष करणारी आणि सामाजिक आशयाची कविता लिहिली. महाराष्ट्र प्रेमाकडून राष्ट्रप्रेमाकडे त्यांच्या कविमनाचा विकास होत गेला. इतिहासातील स्फूर्तिप्रद क्षणांचे शब्दांकन करणारी, महापुरुषांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवण्यासाठी भावनात्मक आवाहन करणारी कविता त्यांनी लिहिली. त्यांच्या प्रतिभेने निरंतर स्वांतत्र्यांचा ध्यास घेतला. ""आकाशातील तारकांच्या राशी लाथेच्या प्रहाराने मी झुगारीन. पण स्वातंत्र्यलक्ष्मी, तुझ्या चरणांशी लीन होईन. (स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा/यशोधन) ""स्वातंत्र्यभानूने भारतात लवकर दर्शन द्यावे. तेव्हाच आपण पावन होऊ. असे ते उद्‌गारतात. (तुरुंगाच्या दारात/यशोधन) "तुटलेल्या तारा' या विलापिकेत राष्ट्रीय भावनांचे दर्शन घडते. "सिंहाची मुलाखत' या कवितेत राष्ट्रीयता आणि मानवता या दोन्ही मूल्यांचा पुरस्कार ते करतात. "गुलामाचे गाऱ्हाणे' आणि "इशारा' या प्रतिकात्मक आशय करणाऱ्या कविता आहेत. राष्ट्रजीवनातील पुरूषार्थाला जाग आलेली आहे, तिचे प्रतिबिंब या कवितांत आढळते. "तुरुंगाच्या दारात' या कवितेत कवी उद्‌गारतो... वाढु दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती मन्मना नाही क्षिती भिंतिच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडुनी? मुक्त तो रात्रंदिनी

शृंखला पायात माझ्या चालताना रुमझुमे

घोष मंत्रांचा गमे या ओळीतून आत्मनिर्भर वृत्तीचे प्रभावी दर्शन घडते. "मायभूमीस अखेरचे वंदन' या कवितेत मृत्यूवर मात करणारी वृत्ती दिसून येते.

जीवनाचे विविध पैलू यशंवतांनी आपल्या कवितेतून आकळले. त्यांची कविता विविधरुपिणी आणि विपुल आहे. १९१५ ते १९८५ या सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्यनिर्मिती केली. त्यांच्या स्फुट कवितेत सुनीतांचा समावेश आहे. "बंदीशाळा' हे बालगुन्हेगांरांच्या करुण स्थितीचे चित्रण करणारे खंडकाव्य आहे. "काव्यकिरीट' हे बडोद्याच्या राजपुत्राच्या राज्यारोहणविषयावरील खंडकाव्य आहे. "जयमंगला' मधील २२ भावगीतांमधून यशवंतांनी हृदयसंगम प्रेमकथा साकार केली आहे. यात प्रयोगशीलता आहे. म्हणले तर यातील प्रत्येक भावगीते ही स्वतंत्र कविता आहे. दुसरीकडे एकत्र गुंफलेली ही मालिका-कविता आहे. शिवाजी महाराजांच्या जीवन त्यांनी "छत्रपती शिवराय' हे महाकाव्य रचले. "मुठे, लोकमाते' हे दीर्घकाव्य पानशेत धरण फुटले त्या दुर्घटनेवर आधारलेले आहे. "मोतीबाग' हा त्यांचा एकमेव बलगीतांचा संग्रह आहे. यशवंतांचा काव्यप्रवास हा एका प्रयत्नवादी आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्वाच्या जीवनविकासाचा आलेख आहे.[ संदर्भ हवा ]

गद्यलेखन

[संपादन]

यशवंतांनी लिहिलेली ’घायाळ’ ही कादंबरी म्हणजे लेखक स्टीफन झ्वाईग यांच्या Downfall of the Heart या दीर्घकथेचे रूपांतर आहे.

यशवंतांनी या पुस्तकाला मोठी प्रस्तावना लिहिली आहे.तीत त्यांनी स्टीफन झ्वाईग यांची प्राथमिक माहिती, मराठीत झालेले त्यांचे अनुवाद, मराठी साहित्यिकांना वाटत असलेले झ्वाईग यांचे महत्त्व इत्यादी विस्तृत टिप्पणी केली आहे.

प्रस्तावनेच्या शेवटी यशवंतांनी झ्वाईग यांच्या सपत्‍नीक आत्महत्येचा तपशील सांगितला आहे, तो असा - झ्वाईग यांनी महायुद्धाने समग्र भूगोलाची आणि मानवी संस्कृतिविजयाची राखरांगोळी होणार हे पाहून, कल्पनाचक्षूंना दिसणारे जगाचे भेसूर भवितव्य न सहन होऊन २३ फेब्रुवारी १९४२ रोजी पत्‍नीसह आत्महत्या केली.[ संदर्भ हवा ]

प्रकाशित साहित्य

[संपादन]
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
घायाळ अनुवादित कादंबरी
छत्रपति शिवराय खंडकाव्य
जयमंगला
मित्रप्रेम रहस्य कवितासंग्रह
तुटलेला तारा कवितासंग्रह
पाणपोई कवितासंग्रह
प्रापंचिक पत्रे
बंदिशाळा कवितासंग्रह
यशवंती कवितासंग्रह
यशोगंध कवितासंग्रह
यशोधन कवितासंग्रह
यशोनिधी कवितासंग्रह
वाकळ कवितासंग्रह

संकीर्ण

[संपादन]

१९५० साली मुंबईस भरलेल्या तेहतिसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

दुवे

[संपादन]


संदर्भ

[संपादन]