Jump to content

रविकिरण मंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९२० च्या दशकांत पुण्यातील काही समविचारी कवींनी एकत्र येऊन रविकिरण मंडळ स्थापन केले होते. रविकिरण मंडळात सात कवी व एक कवयित्री एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने काव्यलेखन करण्याचा प्रयोगही झाले. त्यांच्या या कवी मंडळाला 'सन टी क्लब' असे नामाभिधानही देण्यात आलेले होते.[]

मराठी कवितेला प्रसिद्धी मिळवून देण्यात रविकिरण मंडळाचा मोठा वाटा आहे. रविकिरण मंडळाच्या माध्यमातून कविता सर्वसामान्य रसिकांपर्यंत जाउन पोहोचली.[] मंडळा कडून कविता वाचन, चर्चासत्र इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे.

हे मंडळ १९३५ पर्यंत कार्यरत होते.[]

मराठी कवितेतील सौंदर्यवादी धारा दृढमूल करण्यात आणि ती समाजाभिमुख करण्यात रविकिरण मंडळाचे श्रेय फार मोठे आहे. या कवींनी काव्यगायनाची प्रथा सुरू केली. कवी यशवंतांनी तर बुलंद स्वरात कविता गाऊन ती लोकप्रिय केली.[]

लोकमान्यांचे सुपुत्र श्रीधरपंत टिळक यांच्या प्रोत्साहनाने आणि आधारामुळे रविकिरण मंडळाच्या काव्यमैफली टिळकांच्या गायकवाड्यातच व्हायच्या.

इतिहास

[संपादन]

१९२१ च्या बडोदे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलना नंतर पेंढरकर, पटवर्धनरानडे ह्या पुण्याच्या कवींनी दर रविवारी नियमित भेटून आपापल्या कविता व तत्कालीन साहित्याबद्दल चर्चा करण्याचे ठरविले. तद्‌नंतर मंडळ कविता-वाचनाचे जाहीर कार्यक्रम करू लागले. मंडळाने केलेल्या कविता वाचनाच्या कार्यक्रमांना त्या काळी खूप प्रसिद्धी मिळाली होती.

सदस्य कवी

[संपादन]

विरोध

[संपादन]

त्या काळात काही सुधारणावादी कवीं आणि रविकिरण मंडळातील कवींनी मराठी कवितेला पंतकाव्याच्या बांधणीतून मुक्त करून. गजल्, सुनीत यासारखे परके काव्यप्रकार मराठीत रूढ व्हावेत म्हणून ते प्रयत्‍न केले.पण ते त्यांच्या सर्व ज्येष्ठांना आणि समकालीन काव्य रसिकांना भावलेच असे नाही. रविकिरण मंडळातील कवींच्या काव्यप्रवृत्तींना अनंततनय, बा. अ. भिडे इत्यादींचा विरोध असे.[]

जुन्यावर प्रेम करणाऱ्या आणि परंपरेचा अभिमान असणाऱ्या प्र.के.अत्र्यांना या नवकाव्य प्रकारात मोडणाऱ्या कवितांबद्दल आक्षेप असे. म्हणून ते त्या कवितांचे विडंबन करीत असत. खूप लोकप्रिय आणि त्या काळी गाजलेल्या कवितांची अत्र्यांनी केलेली विडंबनेही (राजहंस माझा निजला/चिंचेवर चंदू चढला, पाखरा येशिल का परतून/परिटा येशील कधी परतून) तेवढीच लोकप्रिय झाली.[]

निवडक कविता संकलन

[संपादन]

रविकिरण मंडळाची निवडक कविता अनुराधा पोतदार आणि वसंत कानेटकर द्वारा संकलीत/संपादित (साहित्य अकादमी प्रकाशन)

प्रभाव

[संपादन]

नंतरच्या काळात रविकिरण मंडळाचे चार सदस्य, माधव ज्युलियन, यशवंत, ग.त्र्यं. माडखोलकर आणिवि.द. घाटे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष झाले.[]

कविवर्य माधव ज्युलियन आणि रविकिरण मंडळ यांच्या कवितांचा फार मोठा प्रभाव शांताबाईंवर त्यांच्या संवेदनक्षम वयात पडलेला होता. ‘या मंडळीभोवती एक सोनेरी गुलाबी धूसर वलय असल्यासारखं वाटे’, असे त्यांनी लिहून ठेवले आहे. काव्य लोकाभिमुख करण्याची मंडळाची धडपड त्यांना पटली होती. शांताबाईंनी मंडळाची काव्यगायनाची पद्धत स्वीकारली नाही, पण मूळची काव्यपठण पंरपरा आणि त्या माध्यमातून कवितेचा लोकांशी जुळणारा संवाद त्यांना महत्त्वाचा वाटत राहिला. रविकिरण मंडळाची एक ठळक खूण म्हणजे मंडळाने लेखनात अनुस्वाराऐवजी केलेला परसवर्णाचा वापर! शांताबाई आपले नाव कधीही ‘शांता’ असे लिहीत नसत. त्या आपले नाव ‘शान्ता’ असेच लिहीत. रविकिरण मंडळाच्या प्रभावाची ही खूण त्यांच्या नावात जणू एकरूप झाली होती.[]

संदर्भ

[संपादन]