Jump to content

पांडुरंग महादेव बापट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सेनापती बापट या पानावरून पुनर्निर्देशित)
पांडुरंग महादेव बापट

सेनापती बापट यांचे तैलचित्र, संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन, दादर, मुंबई
टोपणनाव: सेनापती बापट
जन्म: नोव्हेंबर १२, इ.स. १८८०
पारनेर
मृत्यू: नोव्हेंबर २८, इ.स. १९६७
मुंबई
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
वडील: महादेव
आई: गंगाबाई

पांडुरंग महादेव बापट ऊर्फ सेनापती बापट (नोव्हेंबर १२, इ. स. १८८० - नोव्हेंबर २८, इ. स. १९६७) हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक होते. मुळशी सत्याग्रहाचे त्यांनी नेतृत्व केले म्हणून जनतेने त्यांना सेनापती ही पदवी बहाल केली. []

जन्म व शिक्षण

[संपादन]

महादेव तसेच गंगाबाई बापट यांचे हे पुत्र होत. त्यांचा जन्म पारनेर (जिल्हा अहमदनगर) येथे झाला. [] त्यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक आणि बी. ए. पर्यंतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. त्यांनी अहमदनगरला मॅट्रिकची परीक्षा दिली, तेव्हा त्यांना संस्कृतची 'जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती' मिळाली. त्यांना बी. ए. परीक्षेत इ. स. १९०३ साली उत्तीर्ण झाल्यावर मुंंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून ते इंग्लंडला गेले. एडिंबरो येथे त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पारनेर तालुक्यातील गणेशखिंड येथील गणपती मंदिरात ते राहत असत. या मंदिरापासून सेनापती बापटांचे पारनेर शहरातील मूळ घर यांदरम्यान मोठा भुयारी मार्ग आहे. या मार्गाची सध्या पडझड झाली आहे. त्यांचे पारनेर मधील घर सेनापती बापट स्मारक म्हणून ओळखले जाते.

कार्य

[संपादन]

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी गुप्तपणे बॉम्ब तयार करण्याची कला शिकून घेतली आणि त्यानंतर सेनापती बापट आणि हेमचंद्र दास या आपल्या सहकारी मित्रांना हे तंत्र शिकण्यासाठी पॅरिसला पाठविले. []असे असले तरी "माझ्या बॉंबमुळे एकही बळी गेला नाही. ते फक्त आमच्या कार्याकडे ल़क्ष वेधण्यास केले गेले होते" असे त्यांचे म्हणणे होते. मात्र तरीही अलीपूर बॉंब खटल्यात सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. इ. स. १९२१ पर्यंत ते स्वतःच्या जन्मगावी शिक्षक म्हणून राहिले आणि त्यांनी समाजसेवा हेच व्रत घेतले. पहाटे उठल्याबरोबर गावचे रस्ते झाडणे व शौचकूप साफ करणे हे व्रत त्यांनी जन्मभर निभावले.

इ. स. १९२१ ते इ. स. १९२४ या कालखंडात पुणे जिल्हयातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळविण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालवले. या आंदोलनादरम्यान बापट यांना सेनापती म्हणून ओळखले जाऊ लागले. या आंदोलनात त्यांना तीनदा कारागृहावासाची शिक्षा झाली. शेवटची सात वर्षे सक्तमजुरीची होती. संस्थानांतल्या प्रजाजनांच्या हक्कांकरिता चालू असलेल्या आंदोलनांत भाग घेऊन त्यांनी संस्थानाच्या प्रवेशबंद्या मोडल्या व त्याबदल कारागृहवासही सोसला. स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन ,हैद्राबाद मुक्ती संग्राम , महाराष्ट्र - म्हैसुर सीमा आंदोलन इत्यादी आंदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.[]

नोव्हेंबर १९१४ मध्ये सेनापती बापटांना मुलगा झाला. त्याच्या बारशाच्या निमित्ताने बापटांनी पहिले भोजन हरिजनांना दिले. एप्रिल १९१५ मध्ये ते पुण्यात वासूकाका जोशी यांच्या 'चित्रमयजगत' या मासिकात नोकरी करू लागले. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी वृत्तपत्रात, दैनिक मराठातही नोकरी केली आहे. दैनिक मराठा सोडल्यानंतर ते लोक-संग्रह नावाच्या दैनिकात राजकारणावर लिखाण करू लागले. त्याचबरोबर डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ज्ञानकोशाचे कामही ते बघत. बापटांच्या पत्नीचे ४ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले. त्यानंतर सेनापती बापट मुंबईतीत झाडूवाल्यांचे नेतृत्व करू लागले. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या 'संदेश' नावाच्या वृत्तपत्रात एक मोठे निवेदन दिले. झाडू-कामगार मित्रमंडळ नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. सप्टेंबर १९२९ मध्ये, झाडूवाल्यांशी मानवतेने वागण्याचा पुकारा करीत बापटांनी गळ्यात पेटी लटकावून भजन करीत शहरातून मुंबईच्या चौपाटीपर्यंत मोर्चा काढला. शेवटी त्यांनी पुकारलेल्या संपाची यशस्वी सांगता झाली.

अंदमानमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगताना इन्द्रभूषण सेन यांनी आत्महत्या केली होती, उल्लासकर दत्त हे भयंकर यातना सहन करीत वेडे झाले होते. हे पाहून, सेनापती बापटांनी अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या सुटकेसाठी डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्यासह एक सह्यांची मोहीम चालविली. त्यासाठी ते घरोघर फिरत, लेख लिहीत, सभा घेत. या प्रचारासाठी बापटांनी ’राजबंदी मुक्ती मंडळ' स्थापन केले होते. इ.स.१९४४ साली नागपूर येथे सेनापती बापट यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले.[]

अनुवाद कार्य

[संपादन]

मराठी भाषेच्या दृष्टीने एक अत्यंत मोलाचे काम पां.म.बापट यांनी केले. योगी श्रीअरविंद यांनी विपुल लेखन केले आहे. ते सारे लेखन Collected Works of Sri Aurobindo या नावाने ३६ खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्यातील काही महत्त्वाच्या इंग्रजी ग्रंथांचे सेनापती बापट यांनी मराठीत भाषांतर केले आहे. श्रीअरविंद आश्रम, पुडुचेरी यांच्या मार्फत हे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

ते ग्रंथ पुढीलप्रमाणे -

  • Life Divine - दिव्य जीवन (३ खंड)
  • The Renaissance in India with A Defence of Indian Culture - (या ग्रंथातील काही भाग) - भारतीय संस्कृतीचा पाया
  • The Synthesis of Yoga - योग समन्वय
  • Essays on The Gita - गीतेवरील निबंध
  • Isha Upanishad - ईश उपनिषद
  • The Human Cycle - मानवी एकतेचा आदर्श (अप्रकाशित)
  • The supramental manifestation upon the earth - पृथ्वीवर अतिमानसाचा आविष्कार (पुस्तक)

गौरव

[संपादन]

पुण्यातील १५ ऑगस्ट, इ. स. १९४७ साली ध्वजारोहण सेनापती बापटांच्या हस्ते करण्यात आले. []पुण्यातील एका सार्वजनिक रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

लघुपट

[संपादन]

सेनापती बापट यांच्या कार्यावर राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान (NCERT) यांनी एका लघु माहितीपटाची निर्मिती केलेली आहे.[]

चरित्रे

[संपादन]

सेनापती बापट, य.दि.फडके, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, ISBN 978-81-237-0177-6 []

संत सेनापती, पुरुषोत्तम पांडुरंग गोखले, प्रकाशक - ग. प्र. प्रधान, उपाध्यक्ष, सेनापती बापट जन्म-शताब्दी महोत्सव समिती, १९८१

संदर्भ

[संपादन]
  1. ^ BOARD, ACME EDITORIAL. Shabdawali (हिंदी भाषेत). Acme a point of perfection private limited.
  2. ^ "विश्व संवाद केंद्र भारत".[permanent dead link]
  3. ^ GOYAL, SHIV KUMAR. MAIN SAVARKAR BOL RAHA HOON (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789350480748.
  4. ^ a b c Patoriya (2008). Pachaas Krantikari (हिंदी भाषेत). Rajpal & Sons. ISBN 9788170287469.
  5. ^ NCERT OFFICIAL (2016-05-26), Senapati Bapat, 2018-07-11 रोजी पाहिले
  6. ^ मराठी पुस्तके सूची २०१५. नवी दिल्ली: नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया. २०१५.