Jump to content

मुक्ताबाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुक्ताई या पानावरून पुनर्निर्देशित)

संत मुक्ताबाई (जन्म : आपेगाव, महाराष्ट्र, इ.स.१२७९; समाधी : महत् नगर तापीतीर ( महतनगर-मुक्ताईनगर )जळगाव जिल्हा), इ.स. १२९७) या महाराष्ट्रातील संत व कवयित्री होत्या. ह्या मुक्ताई या नावानेही ओळखल्या जातात.

संत मुक्ताबाई - पोस्टाचे तिकीट

कौटुंबिक पार्श्वभूमी

[संपादन]

संत मुक्ताबाई यांचे नाव मुक्ताई विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते. निवृत्तिनाथांचे आजोबा-आजी गोविंदपंत व निराई तसेच निवृत्तिनाथ यांना गहिनीनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. रुख्मिणी आणि विठ्ठलपंत हे आई-वडील. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वरसंत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. संन्याशाची मुले म्हणून या चारही भावंडांना बालपणी खूप कष्टांना सामोरे जावे लागले.

गुरुपरंपरा

[संपादन]

मच्छिंद्रनाथ ऊर्फ मत्स्येंद्रनाथ - गोरखनाथ ऊर्फ गोरक्षनाथ - गहिनीनाथ - निवृत्तीनाथ - मुक्ताबाई अशी ही गुरुपरंपरा आहे.

अध्यात्म-जीवन

[संपादन]

संत मुक्ताबाई यांनी आपल्या शिष्यांना सोऽहम् मंत्राची शिकवण दिली आहे असे त्यांच्या उपदेशपर अभंगातून स्पष्ट होते.

कार्यकर्तृत्व

[संपादन]
  • आपले परात्पर गुरू असणाऱ्या गोरक्षनाथांची आपल्या साधनेच्या आधारावर योगमार्गाने भेट घेतली.[]
  • ताटीचे अभंग लिहून संत ज्ञानेश्वरांना लेखनप्रवृत्त केले.
  • योगी चांगदेवांचा अहंकार छोट्याश्या मुक्ताबाईचे अलौकिक ज्ञान बघून गळून गेला होता. त्यांनी मुक्ताबाईना आपले गुरू मानले.
  • भक्तश्रेष्ठ म्हणून सुविख्यात असणाऱ्या संत नामदेवांच्या जीवनाच्या दृष्टीनेही संत मुक्ताबाई यांचे प्रबोधन महत्त्वाचे ठरले. संत मुक्ताबाईमुळे त्यांना विसोबा खेचर या गुरूंचा लाभ झाला.
  • नाथसंप्रदायातील सद्गुरुपदावर आरूढ झालेल्या मुक्ताबाई ह्या पहिल्याच स्त्री-सद्गुरू होत्या.

मुक्ताबाईच्या जीवनातील ठळक घटना

[संपादन]

जन्म - आश्विन शुद्ध प्रतिपदा (घटस्थापना) (शके ११९९ किंवा शके १२०१) (शकाबद्दल अभ्यासकांमध्ये दुमत आहे.)

बालपण

[संपादन]

बालपणी आई-वडील यांच्यासोबत ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली. त्यानंतर अल्पावधीतच आई-वडिलांचा देहत्याग झालेला आहे. त्यामुळे लहान वयातच तीन भावंडाच्या पाठीवरील ही धाकटी बहीण प्रौढ बनली.

ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली सनद

[संपादन]

वडील-बंधू निवृत्तीनाथ यांच्याकडून ज्ञानेश्वर, मुक्ताबाई आणि सोपानदेव यांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली. त्यामुळे ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यामध्ये गुरू बंधुभगिनी असे एक हृद्य नाते निर्माण झाले. मुक्ताबाईना आलेल्या साधनेतील शंका त्यांनी ज्ञानेश्वरांना विचाराव्यात आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या आधारे पुढे वाटचाल करावी असे चालू असे. एके दिवशी ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस सांगितले, आठवे समाधीचे अंग आले तुज, आता नाही काज आणिकांसी. ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यातील हे संवाद ज्ञानेश्वरांनी 'मुक्ताबाईस दिलेली सनद' या नावाने प्रसिद्ध आहेत.

यानंतर विसोबा खेचर शरण आले आहेत असे दिसते. शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठण गावी चारही भावंडे गेलेली असताना, मुक्ताबाईबद्दलची पैठणकरांची प्रतिक्रिया अशी होती की, हे तिन्ही अवतार तीन देवाचे l आदिमाता मुक्ताई मुक्तपणे अवतरली ll मुक्ताबाईचा ब्रह्मचित्कला नावाने देखील सन्मान झाला असल्याचे आढळते.

शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठण येथे

[संपादन]

ज्ञानेश्वरादी भावंडे शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठण येथे गेली असताना, सदैव आत्ममग्न स्थितीमध्ये असे. 'तुर्यावस्थारता सुता मुक्ता' असे दर्शन सर्वांना घडत होते.

ताटीचे अभंग आणि ज्ञानेश्वरीची निर्मिती

[संपादन]

ज्ञानाची कवडे बंद करून घेतलेल्या ज्ञानेश्वरांना मुक्ताबाईने ताटीच्या अभंगाद्वारे विनवणी केली आणि त्यातून पुढे ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली.

योगीराज चांगदेव भेट

[संपादन]

ज्ञानेश्वरादी भावंडांची थोरवी ऐकून भेटायला आलेल्या योगीराज चांगदेवांना तिन्ही भावंडानी मुक्ताबाईंकडे सोपविले आहे. स्वतःच्या योगसिद्धीचा अहंकार झालेल्या चांगदेवाबाबत त्या म्हणतात, '' योगिया म्हणवी आणि इंद्रियांचा रंकु l तयाचा विवेकु जाळी परता ll'' ज्ञानेश्वरादी भावंडांची अचेतनावरील सत्ता पाहून चांगदेव शरण आले तेव्हा येथेच मुक्ताबाईंनी चांगदेवांना चांगदेव पासष्टीचा अर्थ समजावून दिला. आणि मग त्यांच्यामध्ये गुरू शिष्य हे नाते निर्माण झाले. आपण मुक्ताबाईचे शिष्य झालो यातील धन्यता चांगदेवांनी पुढील शब्दांत व्यक्त केली आहे, ''चौदा शत झाली बुद्धी माझी गेली l सोय दाखविली मुक्ताईने ll'' [] चांगदेव मुक्ताबाईंना शरण आले. ते त्यांचे शिष्योत्तम झाले. चांगदेवांनी येथे सद्गुरू मुक्ताबाई आणि इतर तिन्ही भावंडांची पूजा केली. 'मुक्ताई मुक्तरूप मुक्तीची चित्कला l नित्य मुक्तलीळा दावी अंगी ll' या भावनेने त्यांनी पूजा केली होती.

संत नामदेवांची भेट

[संपादन]

संत नामदेव जेव्हा ज्ञानेश्वरादी चार भावंडांच्या भेटीला आले तेव्हा सर्वांनी त्यांना वंदन केले, मात्र मुक्ताबाईने त्यांना नमस्कार करण्यास मनाई केली. सद्गुरूविना परमार्थप्राप्ती नाही, हे त्यांना कळावे यासाठी मुक्ताबाईचा प्रयत्न होता. गुरू गोरक्षनाथ यांच्या थापटण्याच्या प्रसंगातून नामदेवांना स्वतःचे अपुरेपण लक्षात आले आणि पुढे ते विसोबा खेचर यांना शरण गेले. 'लहानसी मुक्ताबाई जैसी सणकांडी' असा उल्लेख नामदेवांनी केला. []

गोरक्षनाथ कृपेचा अनुभव आणि मिळालेले वरदान

[संपादन]

नामदेवांच्या परीक्षेच्या निमित्ताने मुक्ताबाई यांच्या योगसामर्थ्याची प्रचिती भावंडांना आली आणि मुक्ताबाई 'माय' या स्वरुपात वंदनीय झाली. या प्रसंगामध्ये मुक्ताबाई यांना गोरक्षनाथ यांच्या कृपेचा अनुभव आला. अमृत संजीवनी लाभण्याचा हा अनुभव होता. याच प्रसंगी त्यांना 'चिरकाल अभंग शरीरा'चे वरदान मिळाले होते.

मुक्ताबाईंचा अज्ञातवास

[संपादन]

पुढे श्रीज्ञानेश्वर भावंडे आणि संत नामदेव हे तीर्थाटनास गेलेले आहेत, त्याचे सविस्तर वर्णन नामदेव गाथेमध्ये आले आहे. परंतु या तीर्थयात्रेस मुक्ताबाई गेल्या नाहीत. शिष्य योगीराज चांगदेव यांच्यासमवेत त्या आळंदीजवळ असलेल्या सोळू या गावी अज्ञातवासात राहिल्या.

समाधी पर्व

[संपादन]

तीर्थयात्रेवरून परतल्यावर अल्पावधीतच ज्ञानेश्वरांनी समाधीस्थ होत असल्याचा आपला निर्णय बोलून दाखविला. आणि सर्व भावंडे त्यासाठी सिद्ध झाली. प्रथम ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतली, त्यानंतर सोपान व वटेश्वरांनी सासवड येथे तर पुढे पुणतांबे येथे चांगदेवांनी समाधी घेतली.

मुक्ताबाईंची समाधी

[संपादन]

निवृत्तीनाथ आणि नामदेव व इतर भक्तगण यांच्यासमवेत संत मुक्ताबाई आपेगावी पोहोचल्या. तेथून पुढे वेरूळ, घृष्णेश्वर येथे जाऊन मुक्काम केला. पुढील वाटचालीच्या दरम्यान 'ज्ञानबोध' ग्रंथाची निर्मिती झाली. आणि नंतर वैशाख वद्य दशमी या दिनी मुक्ताबाई तापीतीरी स्वरूपाकार झाल्या. []

मुक्ताबाईंची समाधी महत् नगर तापीतीर कोथळी (जळगाव जिल्हा) येथे आहे.

साहित्य

[संपादन]

अभंगगाथा

[संपादन]

सकलसंत गाथेमध्ये मुक्ताबाईचे फक्त ४२ अभंग ग्रथित केले आहेत. पण प्रकाशित अभंगाव्यतिरिक्त २०२ अभंग उपलब्ध होऊ शकले आहेत. ते 'कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायी' या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत. प्रकाशित ४२ अभंगाचा अर्थही या पुस्तकात उलगडून दाखविण्यात आलेला आहे.[] पांडुरंग माहात्म्य वर्णन करणारे अभंग, नामपर अभंग, संतपर अभंग, योगिक अनुभूतीपर अभंग, तत्त्वज्ञानपर अभंग, मुक्तस्थिती वर्णनपर अभंग, संवादात्मक अभंग, कूट रचना या प्रकारे त्यांच्या अभंगांचे वर्गीकरण करता येते.

ताटीचे अभंग

[संपादन]

संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानेश्वर याने ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे. या लोकरूढ समजुतीला काही प्रतीकात्मक अर्थ आहे. लहानग्या मुक्ताईने आपल्या थोरल्या भावाची म्हणजे ज्ञानेश्वरांची अधिकारवाणीने घातलेली समजूत हे या अभंगांचे स्वरूप आहे. संख्येने अल्प (१२) पण आशयाने समृद्ध असणारे हे अभंग पुढे ज्ञानेश्वरी ऊर्फ भावार्थदीपिका या ग्रंथांचे प्रेरणास्त्रोत बनले, असे अंतर्गत पुराव्यानिशी स्पष्ट होते. पोकळ शब्दशास्त्राच्या भाराने दडपून जाणारी व नागवली जाणारी सामान्य जनता पाहून, त्या पासून दूर जात, स्वतःच्या आत्मस्थितीत निमग्न राहावे हे बरे, असा विचार करणे म्हणजे ताटी लावून घेणे. ही ताटी उघडावी अशी विनवणी मुक्ताबाई करतात. ''सुख सागर आपण व्हावे l जग बोधे निववावे ll बोध करू नये अंतर l साधुस नाही आपपर ll'' असे त्या ज्ञानेश्वरांना सांगतात. ''तुम्ही तरुनी विश्व तारा l ताटी उघडा ज्ञानेश्वरा ll'' अशी विनवणी त्या ज्ञानेश्वरांना करतात. परिणामतः शुद्ध ज्ञानापासून वंचित झालेल्या जनसामान्यांमध्ये 'ब्रह्मविद्येचा सुकाळ' करण्याची प्रतिज्ञा करून ज्ञानेश्वर ज्ञानप्रदानाला उद्युक्त झाले आहेत, असे दिसते. []

ज्ञानबोध ग्रंथ

[संपादन]

मुक्ताबाईंनी 'निवृत्ती-मुक्ताई संवादरूप ज्ञानबोध' या ग्रंथाचे लेखन केले आहे असे संशोधनान्ती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. या ग्रंथाच्या सुरुवातीला निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईंना १२४ अभंगांमध्ये प्रश्न विचारले आहेत आणि त्या प्रश्नांना मुक्ताबाईंनी ५४ अभंगांमध्ये उत्तरे दिली आहेत. मुक्ताबाई समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.[]

मुक्ताबाई - चांगदेव संवाद

[संपादन]

सकल संतगाथेमध्ये मुक्ताबाई - चांगदेव संवाद या नावाने काही अभंग प्रकाशित करण्यात आले आहेत. या अभंगांमधील पुष्कळसे अभंग कूट-स्वरूपाचे आहेत.[]

स्फुट लेखन

[संपादन]
  • मुक्ताबाईंचे कल्याण-पत्रिका, मनन, हरिपाठ हे साहित्य प्रकाशित आहे.
  • त्यांची ‘निवृत्तीप्रसादे मुक्ताबाई’ ही अभंगरूपी कविता अद्याप अप्रसिद्ध आहे.

संत मुक्ताबाई आणि इतर संत यातील अनुबंध

[संपादन]

गुरू गोरक्षनाथ आणि संत मुक्ताबाई

[संपादन]

मुक्ताबाईंनी गोरोबांकरवी नामदेवांची घेतलेली परीक्षा, हा प्रसंग सर्वश्रुत आहे. मात्र या कथेतील महत्त्वाची भूमिका निभावणारे गोरोबा म्हणजे गोरा कुंभार नसून नाथसंप्रदायातील एक थोर अध्वर्यु गोरक्षनाथ हे होत, असे अनेक पुराव्यांनी सिद्ध करता येते. मुक्ताबाईंनी गोरक्षनाथांची स्वतःच्या योगसामर्थ्याच्या आधारावर भेट घेतली. ही भेट कशी शक्य झाली याचे वर्णन नामदेवांनी केले आहे ते असे - ''गोरा जुनाट पै जुने । हाती थापटणे अनुभवाचे । परब्रह्म म्हातारा निवाला अंतरी । वैराग्याचे वरी पाल्हाळला ।।'' हा परब्रह्म म्हातारा म्हणजे साक्षात गोरक्षनाथ हे मुक्ताबाईंचे वैराग्य पाहून स्वतःला प्रकट करते झाले.[]

संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई

[संपादन]

निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांच्यामध्ये बंधू-भगिनी आणि गुरु-शिष्य असे नाते होते. निवृत्तीनाथांनी दिलेल्या साधनेच्या आधारे मुक्ताबाई यांनी जी प्रगती करून घेतली, त्याच्या आधारे त्यांनी गुरुपरंपरेतील आद्यगुरू गोरक्षनाथ यांची अदृश्य रुपात भेट घेतली. या प्रसंगी निवृत्तीनाथांना मुक्ताबाईने मार्गदर्शन केले आहे. पुढेही मुक्ताबाईच्या समाधीपूर्वी त्यांची जी विकल स्थिती झाली होती, तेव्हा निवृत्तीनाथ त्यांना सांभाळत असल्याचे वृत्त नामदेव गाथेमध्ये येते. 'ज्ञानबोध' हा ग्रंथ तर निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांच्या नात्यावर वेगळेपणाने प्रकाश टाकणारा आहे.[]

संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई

[संपादन]

ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यामध्ये गुरुबंधू-भगिनी असे नाते आहे. ज्ञानेश्वरांनी 'मुक्ताबाईस दिलेली सनद' या लहानशा प्रकरणग्रंथामध्ये त्याचे दर्शन घडते. या ग्रंथाचे स्वरूप असे आहे की, येथे मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना साधनेसंबंधी विविध प्रश्न विचारले आहेत. आणि त्यांची उत्तरे ज्ञानेश्वरांनी दिली आहेत. ज्ञानेश्वरांनी येथे मुक्ताबाईस गुरुप्रणित सोऽहम् साधनेसंबंधी मार्गदर्शन केले आहे. सोऽहम् संबंधी सखोल विवेचन झाल्यावर ज्ञानेश्वर मुक्ताबाईस म्हणतात, ''यापरता नाही उपदेश आता ।।'' ज्ञानेश्वरांना सोऽहम् साधनेसंबंधी जे ज्ञात होते ते सर्व त्यांनी मुक्ताबाईंना सांगितले असावे, असे वरील वाक्यावरून लक्षात येते. ज्ञानेश्वरांनी केलेल्या शंकानिरसनामुळे मुक्ताबाईंचेही समाधान झाले. तो सर्व भाग त्यांनी स्वतः आत्मसात केला, त्यातून त्यांची अवस्था बदलली. त्या उच्चदशेस जाऊन पोहोचल्या. त्यांच्यातील हा बदल ज्ञानेश्वरांच्याही लक्षात आला आणि त्यामुळे त्यांनी मुक्ताबाईंना निःशंक शब्दामध्ये एक प्रशस्तिपत्रही दिले - ते म्हणाले, ''आठवे समाधिचे अंग आले तुज । आता नाही काज आणिकांसी ।।'' []

संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई

[संपादन]

या दोघांच्या नात्याचे अगदीच त्रुटित संदर्भ सापडतात. निवृत्ती आणि ज्ञानेश्वर कोरान्न मागायला जात असताना सोपानदेव आपला सांभाळ करीत असत, एवढाच उल्लेख मुक्ताबाई करताना आढळतात. [] अनाम अरुपाची माउली l आदिमाउली ll अशा शब्दांत सोपानदेव त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढतात. []

संत नामदेव आणि संत मुक्ताबाई

[संपादन]

मुक्ताबाईच्या निमित्ताने संत नामदेवांना सद्गुरूचे महत्त्व ज्ञात झाले आणि पुढे ते विसोबा खेचर यांना शरण गेले. मुक्ताबाई यांच्या योगसामर्थ्याची प्रचिती या प्रसंगाच्या निमित्ताने भावंडांना आली आणि मुक्ताबाई 'माय' या स्वरुपात सर्वांना वंदनीय झाली.

विसोबा खेचर आणि संत मुक्ताबाई

[संपादन]

मुक्ताबाई यांनी आपल्या योगसामर्थ्याच्या आधारावर श्री गोरक्षनाथ यांची भेट घेतली, त्या वेळी विसोबा खेचरही घटनास्थळी उपस्थित असावेत, असे संशोधनांती स्पष्ट होते. आणि त्याचाच संदर्भ 'मुक्ताईने बोध खेचरासी केला l तेणे नामयाला बोधियेले ll या वचनामध्ये येतो. निवृत्तीनाथांच्या पुढील वचनामध्येही तसा संदर्भ येतो, 'काढिला शोधून अनुभव मुक्ताईने l ...विसोबा खेचर सिद्ध झाला ll' []

योगीराज चांगदेव आणि संत मुक्ताबाई

[संपादन]

सद्गुरू मुक्ताबाई आणि योगीराज चांगदेव हे शिष्योत्तम असे दोघांमधील नाते आहे. मुक्ताबाई ही आई आणि चांगदेव हे तान्हे बालक अशी कल्पना करून लिहिलेले मुक्ताबाईंचे अंगाईचे अभंग आहेत. चांगदेवासारख्या योग्याकडे मातेच्या वात्सल्याने पाहू शकणारी मुक्ताबाई यांची योग्यता कोणत्या पातळीची असेल, त्यांचा अधिकारही यातून सूचित होतो. मुक्ताबाई आणि चांगदेव यांच्यातील हृद्य नात्यावर प्रकाश टाकणारे हे अभंग आहेत.

लोकसाहित्यातील मुक्ताई

[संपादन]

मुक्ताबाई यांचे व्यक्तिमत्त्व जनमानसाने विविध रुपामध्ये जतन केले आहे. तिचे लहानपण, भावा-बहिणींच्या नात्यातील हृद्यता, चांगदेव आणि मुक्ताबाई यांचे गुरुशिष्य नाते, आदिमाया मुक्ताबाई इ. विविध भूमिकेतून तिचे रूप जतन केले आहे. लहानग्या मुक्ताबाईबद्दल एक विलक्षण असे कौतुक जनमानसामध्ये आहे. तिचे लहानुगेपण, तिचे लडिवाळपण, तिचे देखणेपण स्त्रियांना विलक्षण भावते असे दिसते. 'माझ्या मुक्ताचं चांगुलपण गं जसं केवड्याचं पान'[] असे कोणी तिच्याबद्दल म्हणते. तर कोणी तिच्या नेणत्या वयाने आणि उडणाऱ्या जावळाने मोहून जाते. 'ग्यानोबा मुक्ताबाई दोघं हिंडती धीरानं, नेणत्या ग मुक्ताबाईचं जावळ उडतं वाऱ्यानं.[] . अहिराणी लोकसाहित्यात म्हणले आहे, 'बहीण ना भाऊ बायपननी पिरीत, ग्यानबाना जोडे, मुक्ताबाईनी सुरत ' दोघांमधील बालपणीच्या प्रेमाचे हे वर्णन आहे.[] 'माझी मुक्ताई मुक्ताई, दहा वर्साचं लेकरू, चांगदेव योगीयानं, तिले मानला रें गुरु'.मुक्ताबाई आणि चांगदेव यांच्या संदर्भातला चमत्कारसदृश असा कथाभाग लोकमानसाने अधिक प्रमाणात जतन केला आहे असे दिसते. [१०] मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजण्याची घटना देखील जनमाणसाला भावते. 'ज्ञानदेवांच्या घरात, एक किमया घडली, तव गुणगुणे ओवी, म्हणे मुक्ताई देवीला, कैवल्याच्या पाठीवर, रुखमाई लाटे पोळी, व्यर्थ शिणवीशी चूल, भाजले ग मी मांडे काल'[११]

मुक्ताईंवरील पुस्तके

[संपादन]
  • मुक्ताई जाहली प्रकाश(संशोधन) - स्वामी प्रा.डॉ तुळशीराम महाराज गुट्टे ( संत साहित्यिक )
  • आदिशक्ती मुक्ताई -प्र. न. पित्रे (धार्मिक)
  • कडकडोनी वीज निमाली ठायींचे ठायीं (संत मुक्ताबाई : व्यक्ती आणि वाङ्‌मय) - संशोधन अभ्यासग्रंथ - लेखिका डॉ. केतकी मोडक
  • धन्य ती मुक्ताई - सुमति क्षेत्रमाडे (कादंबरी)
  • मी बोलतेय मुक्ताई - नीता पुल्लीवार (ललित)
  • मुक्ताई - मंदा खापरे (कादंबरी)
  • मुक्ताई - मृणालिनी जोशी (ललित)
  • मुक्ताई - शांता परांजपे (ललित)
  • श्री संत मुक्ताबाई चरित्र - प्रा. बाळकृष्ण लळीत
  • मुक्ताबाई क्रांतिदर्शी - नंदन हेर्लेकर
  • मुक्तीकडून मुक्तीकडे (संत मुक्ताबाईंचे व्यक्तिचित्रण, लेखिका - सुहासिनी इर्लेकर)
  • मुक्ताई दर्शन - बाबुराव मेहूणकर (आध्यात्मिक जीवनपट)
  • ऐं मुक्ताईं सोsहम् - बाबुराव मेहूणकर (तत्त्वज्ञानपर)
  • गाथा दासमुक्ताची:प्रथम खंड - दासमुक्ता-बाबुराव मेहूणकर (स्फुट/आत्मकथनपर)
  • एक समालोचन - दासमुक्ता/बाबुराव मेहूणकर (मुक्ताईवरील एका पुस्तकाचे समालोचन)[१२][१३]
  • मुक्ताबाईची अभंगवाणी - डॉ.अशोक कामत, अतुल प्रकाशन, १९८०
  • श्रीज्ञानेश्वरमहाराजांची मुक्ताबाईस सनद - संपा. श्री.बा.त्र्यं.शाळिग्राम, स्वाध्याय महाविद्यालय प्रकाशन, १९७७
  • ब्रह्मचित्कला दर्शन अर्थात श्रीमुक्ताबाई चरित्र व गाथा, ले. श्रीनिवृत्ती दौलत वक्ते, १९८०
  • ताटीचे अभंग - एक विवेचन, ले.डॉ.सदानंद मोरे, श्रीभागवत प्रबोधन संस्था, १९९४
  • महाराष्ट्र संतकवयित्री, श्री.ज.र.आजगावकर, १९३९
  • संतकवयित्री, डॉ.इंदुमती शेवडे

स्मृतिप्रीत्यर्थ

[संपादन]
  • जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद तालुक्याचे नाव बदलून संत मुक्ताईच्या नावावरून मुक्ताईनगर केले आहे.
  • पुण्यातील येरवडा येथे मेंटल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी हॉस्पिटलच्या आवारातच मुक्ताई निवास नावाची धर्मशाळा स्थापन करण्यात आली आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d e f g डॉ.मोडक, केतकी (२००५). 'कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायीं' (संत मुक्ताबाई : व्यक्ती आणि वाङ्मय). पुणे.
  2. ^ डॉ.रा.चिं.ढेरे. सकलसंत गाथा, खंड ०२.
  3. ^ श्री.सुरेश जोशी (1975–76). श्रीनिवृत्ती-मुक्ताई संवादरूप ज्ञानबोध. नगर: नगर जिल्हा ऐतिहासिक वस्तु संग्रहालय प्रकाशन.CS1 maint: date format (link)
  4. ^ a b डॉ.रा.चिं.ढेरे (१९८५). सकलसंतगाथा, गाथापंचक. पुणे: वरदा बुक्स.
  5. ^ a b मराठी संत-साहित्यातील नाथ-प्रतिपादित सोहम साधना - एक अभ्यास - (प्रबंध), डॉ.केतकी मोडक
  6. ^ "अभंग ०३". मुमुक्षू. मे–जून 1927.CS1 maint: date format (link)
  7. ^ संपा. सरोजिनी बाबर (१९७५). मराठीतील लोकगीत.
  8. ^ संपा. सरोजिनी बाबर (मार्च १९६५). लोकसाहित्य साजशिणगार.
  9. ^ संपा. कृष्णा पाटील. अहिराणी लोकसाहित्य दर्शन, खंड २.
  10. ^ बहिणाबाईची गाणी. पॉप्युलर प्रकाशन.
  11. ^ ले. श्री. दि. इनामदार. दिंडी जाय दिगंतरा.
  12. ^ "संत मुक्ताबाई — विकासपीडिया". mr.vikaspedia.in. 2018-07-02 रोजी पाहिले.
  13. ^ मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री