भगतसिंग
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्त्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
भगतसिंग (भगत सिंह) | |
---|---|
भगतसिंगांचे छायाचित्र | |
टोपणनाव: | भागनवाला |
जन्म: | २८ सप्टेंबर १९०७ ल्यालपूर, पंजाब, भारत |
मृत्यू: | २३ मार्च, १९३१ (वय २३) लाहोर, पंजाब, ब्रिटिश भारत |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
संघटना: | नौजवान भारत सभा कीर्ती किसान पार्टी हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन |
पत्रकारिता/ लेखन: | अकाली, अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम' |
धर्म: | शीख |
प्रभाव: | मार्क्स,लेनीन,बकुनीन,समाजवाद, कम्युनिस्ट |
प्रभावित: | चंद्रशेखर आझाद |
वडील: | सरदार किशनसिंग संधू |
आई: | विद्यावती |
भगतसिंग (पंजाबी उच्चारण: (ऐका) २८ सप्टेंबर, १९०७ - २३ मार्च, १९३१) एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन शोर्य कार्यांमुळे वयाच्या २३व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.
डिसेंबर १९२८ मध्ये, भगतसिंग आणि त्याचे सहकारी, शिवराम राजगुरू यांनी २१ वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन साँडर्सला लाहोर येथे गोळ्या घालून ठार मारले. जेम्स स्कॉट ह्यांना ठार मारण्याचा हेतू असताना चुकून साँडर्स बळी पडला. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट याने हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय ह्यांच्यावर लाठी चार्जचा आदेश देऊन त्यांना जबर जखमी केले. त्यामुळे लाला लजपत राय दोन आठवड्यांनंतर मरण पावले. त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता. त्याच्या या कटात चंद्रशेखर आझाद व शिवराम हरी राजगुरू सहभागी होते. त्यानंतर भगतसिंग व राजगुरू यांचा शोध घेत असल्याचे पाहून चंद्रशेखर आझाद ह्यांनी चानन सिंघ नावाच्या भारतीय पोलीस अधिकाऱ्याला मारले.[ संदर्भ हवा ]
सुरुवातीचे जीवन
[संपादन]भगतसिंगचा जन्म १९०७ साली तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. त्याच्या आईचे नाव विद्यावती व वडिलांचे नाव किशन सिंग होते. ज्यावेळेस त्याच्या वडिलांची व दोन काकांची तुरुंगातून सुटका झाली, त्याच सुमारास भगतसिंगांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्यआंदोलनात सामील झाले होते, तर काही महाराजा रणजितसिंगाच्या सैन्यात होते. काही कुटुंबीय सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय होते. त्याचे वडील व काका हे करतार सिंग साराभा व हर दयाल ह्यांच्या गदर पार्टीचे सदस्य होते.[ संदर्भ हवा ]
त्यांच्या वयाच्या इतर शीख मुलांसारखे ते लाहोरच्या खालसा हायस्कूल येथे गेले नाहीत. त्यांच्या आजोबांना त्या शाळेतील लोकांची ब्रिटिश सरकारप्रती असलेली निष्ठा मंजूर नव्हती. बारा वर्षे वय असताना जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर भगतसिंगाने ती जागा पाहिली. १४ वर्षे वय असतांना गुरुद्वारात नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्याविरुद्धच्या आंदोलनात ते सामील झाले. गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्यानंतर भगतसिंगांचा अहिंसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिरास झाला. त्यानंतर भगतसिंग युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाले, व ब्रिटिश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचारांचे समर्थक झाले.
इटालीच्या जोसेफ मॅझिनीच्या 'यंग इटाली' नावाच्या गटापासून प्रेरित होऊन भगतसिंगाने मार्च १९२६ मध्ये 'नवजवान भारत सभा' स्थापन केली. ते हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन संघाचे सदस्य झाले. या संघटनेत चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, शहिद अशफाखल्ला खान सारखे दिग्गज होते. नंतर एक वर्षाने विवाह टाळण्यासाठी भगतसिंग घर सोडून कानपूरला निघून गेला. एका पत्रात त्याने लिहिले आहे की, 'माझे जीवन मी हे सर्वोत्कृष्ट कामासाठी समर्पित केले आहे. देशाचे स्वातंत्र्य हे माझे ध्येय आहे. त्यामुळे, कोणताच आराम किंवा कोणतेच भौतिक सुख माझे आमि़ष असू शकत नाही'.[ संदर्भ हवा ]
भगतसिंगांचे वाचन
[संपादन]भगतसिंगांचा वाचनव्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांचे 'बंदी जीवन' हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक असावे. ऑस्कर वाईल्डचे 'व्हेरा-दि निहिलिस्ट', क्रोपोटकिनचे 'मेमॉयर्स', मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे, वॉल्टेर, रूसो व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी फार मोठी होती. त्या यादीत विक्टर ह्युगोची 'ला मिझरेबल', हॉलकेनचे 'इटर्नल सिटी', अप्टन सिंक्लेअरची 'क्राय फॉर जस्टिस', रॉस्पिनची 'व्हॉट नेव्हर हॅपन्ड', गॉर्कीची 'मदर' ह्या कादंबऱ्याही होत्या. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते.जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टाॅय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते.
वक्ते, पत्रकार, अनुवादक आणि नाट्याभिनेते
[संपादन]भगतसिंग हे उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनास ते 'अकाली' या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी 'वीर अर्जुन', 'प्रताप', इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. सोहनसिंग जोशी यांचे 'कीर्ती', कानपूरचे 'प्रभा', दिल्लीचे 'महारथी'नी अलाहाबादचे 'चॉंद' या नियतकालिकात ते लेखन करत असत. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम' हा बलवंतसिंग या नावाने केला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी 'चॉंद'च्या फाशी विशेषांकात 'निर्भय', 'बलवंत', व 'ब्रिजेश' या नावाने अनेक लेख लिहिले. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधांत 'नॅशनल कॉलेज' तर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी 'राणा प्रताप', 'दुर्दशा',' सम्राट चंद्रगुप्त' या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली.
स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकार्य
[संपादन]९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' असे ठेवण्यात आले. असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर 'आर्मी' हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले. हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे 'मुख्य सेनापती' तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना केली.[File:Statues of Bhagat Singh, Rajguru and Sukhdev.jpg|thumb|भारत-पाकिस्तान सीमेवरील हुसेनवाला, जिल्हा फिरोजपूर,पंजाब नजीक उभारलेले भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे पुतळे ]
खून करून, दरोडे घालून वा चार इंग्रजांना ठार करून काही स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचा उपहास वा धिक्कार केला गेला तरी प्रत्यक्ष त्यांचे कार्य हे साक्षात राजसत्ता उलथून टाकण्यासाठी केलेले एक योजनाबद्ध स्वातंत्र्यसमर होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे अभियोगात सरकारने ठेवलेले आरोपपत्र होय.
आरोपपत्र
[संपादन]"वर निर्दिष्ट केलेल्या आरोपींनी ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी निरनिराळ्या वेळी अन्य कित्येक सहकाऱ्यांसह १९२४ सालापासून ते अटक होईपर्यंत राजाविरुद्ध सशस्त्र युद्ध करण्याचा, त्याचे हिंदुस्थानावरील सार्वभौमत्व हिरावून घेण्याचा आणि अवैध बळाचा वापर करून किंवा धाक दाखवून हिंदुस्थानात विधिवत स्थापित झालेले सरकार उलथून टाकण्याचा कट केला आणि त्या उद्दिष्टासाठी माणसे, शस्त्रे आणि दारुगोळा जमा केला व अन्य मार्गाने सिद्धता केली.
हे उद्दिष्ट गुप्त ठेवले तर युद्ध करणे सोपे जाईल म्हणून ही उद्दिष्टे त्यांनी गुप्त ठेवली. त्यांनी व इतर आरोपींनी 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' व 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी' या संस्थांची स्थापना केली. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार उलथून टाकून त्या ठिकाणी एका संयुक्त प्रजासत्ताक सरकाराची स्थापना करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी बैठकी घेतल्या. आरोपींनी आपली उद्दिष्टे पुढील मार्गांनी साध्य करण्याचा प्रयत्न केला :-
१) बँका फोडण्यासाठी व आगगाड्या लुटण्यासाठी शस्त्रे, माणसेनी पैसा तसेच दारुगोळा जमवणे.
२) हत्या करण्यासाठी व सरकार उलथून पाडण्यासाठी शस्त्रे व बॉंब व स्फोटके यांची निर्मिती करणे.
३) ब्रिटिश हिंदुस्थानात सरकारचे साहाय्यक वा पक्षपाती असणाऱ्या पोलीस वा इतर अधिकाऱ्यांचे आणि लोकांचे, कटाच्या उद्दिष्टांत खंड पाडणाऱ्या तसेच आपल्या संघटनेला अनिष्ट वाटणाऱ्या लोकांचे वध करणे.
४) आगगाड्या उडविणे.
५) क्रांतिकारक आणि राजद्रोही वाङ्मयाची निर्मिती, प्रसार व संग्रह करणे.
६) तुरुंगांतून दंडितांची व इतरांची सुटका करणे.
७) कटात सहभागी होण्यासाठी सुशिक्षित तरुणांना चिथावणी देणे आणि,
८) हिंदुस्थानात क्रांती घडवून आणण्यात स्वारस्य असणाऱ्या परदेशातील व्यक्तींकडून वर्गणीच्या रूपात पैसा गोळा करणे.
सदर आरोपपत्र वाचताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल, की स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होऊन गेला.
भगतसिंगांचे विचार
[संपादन]बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवलेले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. यामुळे त्यांना 'आत्मप्रौढी व घमेंड यांची बाधा झाली आहे असेही उठवले गेले. मात्र ऑक्टोबर १९३० मध्ये त्यांनी लिहिलेले "मी निरीश्वरवादी का?" हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते.
समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये.
समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांडवलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते. अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो. मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो. त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धान्त होता. जगात जर सर्वांत भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वांत मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे. आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे; तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादिले. सुमारे दहा पाने भरेल इतके मोठे हे प्रकटन अत्यंत प्रभावी व भारून टाकणारे आहे.[ संदर्भ हवा ]
हुतात्मा भगतसिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांतिवृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील व हीच मुळे एक दिवस बंदिवासाच्या भिंती उन्मळून टाकतील हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांना आदरांजली वाहताना कुसुमाग्रजांच्या खालील ओळी सार्थ वाटतात: भगत सिंग यांचे विचार खूप मोलाचे होते ते म्हणत जिंदगी तो अपने दम पार जी जाती ही, दुसरों के कंधोंपर तो सिर्फ जनाजे उठाये जाते हैं.
'जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान,
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान'
भगतसिंग आणि गांधी
[संपादन]भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फाशी झाली ती कायदेमंडळात बॉंब फेकला म्हणून नाही, तर सौंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. .
महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.[ संदर्भ हवा ]
कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले - "कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता. त्यांच्या फाशीनंतर ’यंग इंडिया’मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली.
नास्तिकत्व
[संपादन]भगतसिंग हे नास्तिक होते. भगतसिंग यांच्यावर अनेक पुस्तके लिहिलेल्या प्रोफेसर चमनलाल यांनी सुद्धा ते नास्तिक असल्याचा दावा केला आहे. आणि या दाव्यांत तथ्य आहे, हे भगतसिंगांच्या "मी नास्तिक का झालो" या निबंधावरून स्पष्ट होते.[ संदर्भ हवा ]
मी नास्तिक का झालो?
[संपादन]"त्या दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त शांततेच्या व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो, की अशा कठीण प्रसंगीदेखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो, याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती. बऱ्याच विचारान्ती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही. नाही, ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. इतर काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवण्याची इच्छा मी कोणच्याच क्षणी केली नाही. म्हणजे मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहिलो आहे. त्या कसोटीला उतरणे ही साधी गोष्ट नव्हती.
'श्रद्धा' संकटांची व कष्टांची तीव्रता कमी करते, किंबहूना या गोष्टी ती सुखावहसुद्धा करू शकते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व बळकट राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वतःच्या पायावरच उभे राहणे हा काही पोरखेळ नाही. अशा कसोटीच्या क्षणी गर्व, जर असलाच तर पार वितळून जातो. माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्घांना बेदरकारपणे धुत्कारू शकत नाही, आणि त्याने जर असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढला पाहिजे की त्याच्याकडे केवळ पोकळ ऐट नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्या माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. न्यायालयाचा निकाल हा आधीपासूनच ठरलेला आहे. आठवड्याभरात जाहीर व्हायचा आहे. मी माझ्या ध्येयासाठी प्राणाचा त्याग करत आहे याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते?[ संदर्भ हवा ]
एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल, एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल-अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात भोगायला मिळणाऱ्या ऐश्वर्याची स्वप्ने पाहत असेल, पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे, की ज्या क्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच.
जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्यदिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे, थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतू न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते.
संग्रहालय
[संपादन]अमृतसर ते चंदीगड महामार्गावर असलेले खटकरकलॉं येथे भगतसिंग यांचे वडिलोपार्जित घर आहे. तिथे हुतात्मा भगतसिंग स्मृति संग्रहालय आहे. संग्रहालय सोमवारी बंद असते. येथे अनेक दुर्मिळ फोटो आहेत. हुतात्मा भगतसिंग यांची स्वाक्षरी असलेली, त्यांना लाहोर तुरुंगात भेट दिली गेलेली भगवद्गीतेची प्रत येथे आहे.
दफनभूमीवरील स्मारक
[संपादन]भारत - पाकिस्तान फाळणी नंतर भगतसिंगांची दफनभूमी असलेला हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता. भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळविला. तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्या वेळी भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती तेथे उपस्थित होत्या.
पुस्तके
[संपादन]भगतसिंगांवर अनेक पुस्तके लिहिली गेली. त्यांतली काही निवडक पुस्तके :-
- अमर शहीद भगत सिंह (हिंदी, लेखक : वि़ष्णु प्रभाकर)
- आम्ही कशासाठी लढत आहोत? (मूळ लेखक -भगतसिंग; अनुवाद : चित्रा बेडेकर)
- Krantiveer Bhagatsingh (इंग्रजी, लेखिका - नयनतारा देसाई))
- भगतसिंग (चरित्र, चं.ह. पळणिटकर)
- भगतसिंग : निवडक भाषणे व लेखन, भगतसिंगांवरचे पोवाडे (नॅशनल बुक ट्रस्ट)
- मार्टियर ॲज ब्राइड-ग्रूम (इंग्रजी, ईश्वरदयाल गौर)
- विदाउट फिअर, द ट्रायल ऑफ भगतसिंग (इंग्रजी, कुलदीप नय्यर) (मराठी अनुवाद - शहीद भगतसिंग यांचा अखेरपर्यंतचा प्रवास - भगवान दातार)
- शहीद भगत सिंह : समग्र वाङ्मय (संपादक - दत्ता देसाई)
- देस मांगता है कुर्बानिया (शिवाजी भोसले)
- सरदार भगतसिंग (संजय नहार)
- मी नास्तिक आहे का ? (मूळ लेखक -भगतसिंग; अनुवाद : चित्रा बेडेकर)
- शहीद भगतसिंग - जीवन व कार्य (अशोक चौसाळकर, २००७)
कुलदीप नय्यर यांच्या पुस्तकाची कहाणी
[संपादन]जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या करणारे जिंदा आणि सुखा या दहशतवाद्यांनी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांना एक पत्र पाठवून ‘आम्ही भगतसिंग यांच्यासारखेच क्रांतिकारक आहोत’ असा दावा केला होता. नय्यर यांनी भगतसिंग यांच्याबद्दल एका वृत्तपत्रात लेख लिहिला होता. त्या लेखाची प्रतिक्रिया म्हणून या दोघांनी हे पत्र लिहिले होते. या पत्रामुळे नय्यर साहजिकच अस्वस्थ झाले. ‘भगतसिंग यांचा लढा आणि त्यांचे आयुष्य लोकांसमोर नेमकेपणाने मांडलेच पाहिजे अन्यथा अनेक दहशतवादी आपली तुलना त्यांच्याशी करायला लागतील,’ या विचाराने भगतसिंग यांचे चरित्र लिहिण्याचा निर्धार त्यांनी केला आणि तो तडीसही नेला.
भगतसिंग यांच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करून हे चरित्र लिहिण्याचा नय्यर यांचा प्रयत्न होता. त्यासाठी ते पाकिस्तानात गेले. भगतसिंग-सुखदेव-राजगुरू या तीन क्रांतिकारकांना ज्या तुरुंगात ठेवण्यात आले होते, तसेच त्यांना जिथे फाशी देण्यात आली होती, त्या ठिकाणांना नय्यर यांनी भेट दिली. या क्रांतिकारकांची स्मृती सांगणारे आता तिथे काहीही नाही. १९३१ मध्ये २३ मार्च या दिवशी या तिघांना फाशी दिली गेली. त्यांची समग्र माहिती देता यावी, यासाठी नय्यर यांनी त्यांच्यासंबंधीच्या कागदपत्रांबाबत पाकिस्तान सरकारशी पत्रव्यवहारही केला होता; पण त्यांना ती कागदपत्रे मिळाली नाहीत. लंडनमधल्या ‘इंडिया ऑफिस लायब्ररी’मध्ये यासंबंधीची काही कागदपत्रे होती; पण तीदेखील नय्यर यांना मिळू शकली नाहीत. तुरुंगात असताना भगतसिंग यांनी आपली भूमिका आणि आपला लढा स्पष्ट करणारी चार पुस्तके लिहिली होती. या पुस्तकांची हस्तलिखिते मिळवण्याचा नय्यर यांनी प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्नही निष्फळ ठरला.
नय्यर यांनी या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. भगतसिंग आणि सुखदेव यांच्या भावांशी त्यांनी संपर्क साधून माहिती मिळवली. हे करताना धक्कादायक माहिती पुढे येत गेली. सुखदेव यांच्या भावाला पंजाब पोलिसांनी खूप त्रास दिला होता, त्यामुळे त्यांना गाव सोडावे लागले होते. जवळजवळ सात वर्षं नय्यर यांनी या पुस्तकासाठी काम केले. अनेकांच्या भेटी घेऊन, विविध ठिकाणच्या कागदपत्रांचा अभ्यास करून हे चरित्र त्यांनी लिहिले. ‘विदाउट फिअर : लाइफ अँड ट्रायल ऑफ भगतसिंग’ या शीर्षकाने इंग्लिशमध्ये आलेल्या या पुस्तकाचा भगवान दातार यांनी केलेला अनुवाद ‘शहीद’ या शीर्षकाने रोहन प्रकाशनातर्फे भगतसिंग यांच्या जयंतीच्या निमित्ताने, २८ सप्टेंबर २०१५ रोजी प्रसिद्ध झाला.[ संदर्भ हवा ]
भगतसिंगावरील चित्रपट, नाटके
[संपादन]- अमर शहीद भगत सिंह (हिंदी चित्रपट, ). दिग्दर्शक : ओमी बेदी; प्रमुख भूमिका : दारासिंग, अचला सचदेव, सोमी दत्त, रजनीबाला.
- गगन दमामा बाज्यो (हिंदी नाटक, लेखक : पीयुष मिश्रा). ह्या नाटकात स्वतः पीयुष मिश्रा भूमिका करत.
- रंग दे बसंती (हिंदी चित्रपट, २००६). ह्या चित्रपटाला तरुणांमध्ये अतिशय लोकप्रियता मिळाली. प्रमुख भूमिका : आमिर खान, शेरमन जोशी, कुणाल कपूर.
- The Legend of Bhagat Singh – (हिंदी चित्रपट, २००२). प्रमुख भूमिका : अजय देवगण, सुशांत सिंग; संगीत : ए.आर. रहमान)
- शहीद (हिंदी चित्रपट, १९६५). प्रमुख भूमिका मनोजकुमार. हा चित्रपट अतिशय नावाजला गेला. चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा नरगिस दत्त पुरस्कार व उत्कृष्ट कथानकासाठीचा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला.
- २३ मार्च १९३१ :शहीद (हिंदी चित्रपट, २००२). प्रमुख भूमिका : बाॅबी देवल, सनी देवल; दिग्दर्शक : गुड्डू धानोआ; संगीत : आनंदराज आनंद, सुरिंदर सोधी.
- शहीद भगत सिंह (हिंदी चित्रपट, १९६३). दिग्दर्शक : के.एन. बन्साल; प्रमुख भूमिका : शम्मी कपूर, शकीला, प्रेमनाथ, आशा सचदेव.
- शहीदे आझम (हिंदी चित्रपट, २००२) प्रमुख भूमिका : सोनू सूद
- शहीदे आझम भगत सिंह (हिंदी चित्रपट, १९५४). दिग्दर्शक : जगदीश गौतम; प्रमुख भूमिका : प्रेम अबीद जयराज, स्मृती विश्वास, आशिता मुजुमदार.
भगतसिंह आणि लेनिन
[संपादन]भगतसिंगासारख्या प्रखर राष्ट्रप्रेमी क्रांतिकारकाचे लेनिन आणि रशियन क्रांती यांच्याशी जे वैचारिक-राजकीय नाते जुळले होते, ते आजही तितकेच दमदार आणि ताजे वाटण्यासारखे आहे. रशियात समाजवादी क्रांती झाली, तेव्हा भगतसिंग दहा वर्षांचा होता. लहानपणापासून काका सरदार अजितसिंह, लाला हरदयाळ आणि गदर चळवळ यांच्यामुळे क्रांतिकारक विचारांशी त्याचा संपर्क येत होता. भगतसिंगाने १७ व्या वर्षी लिहिलेल्या "विश्वप्रेम' या लेखात विश्वबंधुत्वाचा प्रसार करणाऱ्यामध्ये अमेरिकन-फ्रेंच राज्यक्रांती, मॅझिनी-गॅरिबाल्डी, म. गांधी यांच्याबरोबर तो लेनिनचा उल्लेख करतो. "लेनिन होता विश्वबंधुत्वाची बाजू उचलून धरणारा..."असे म्हणत तो स्पष्ट करतो, की "विश्वबंधुता! याचा अर्थ मी जगामध्ये समानता (साम्यवाद, World wide Equality in the true sense) याशिवाय दुसरे काही मानत नाही.' भगतसिंगने स्वतःच म्हटल्याप्रमाणे पुढील काही वर्षे त्याने विविध क्रांती आणि विचारसरणींचा अभ्यास केला. त्यात लेनिनचेही वाचन केले. आधी "गांधीवादी राष्ट्रवादी', मग "स्वप्नाळू क्रांतिकारी', अल्पकाळ "अराज्यवादी साम्यवादी' असलेले आपण शेवटी "मार्क्सवादी-शास्त्रीय समाजवादी' झालो असे तो स्पष्ट नमूद करतो. पुढे सामूहिक वैचारिक मंथनातून "हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटने'च्या नावात १९२८मध्ये "समाजवादी' हा शब्द घालण्यात आला. पुढे शेवटपर्यंत भगतसिंहाचा आणि संघटनेचा वैचारिक आधार समाजवाद तर राजकीय कार्याचा आदर्श रशियन क्रांती हा राहिला. लाला लाजपतराय यांनी मध्ये क्रांतिकारी तरुणांवर "हे तरुण खूपच धोकादायक आणि क्रांतीचे समर्थक आहेत; त्यांना लेनिनसारखा नेता हवा आहे. पण माझ्यात लेनिन बनण्याची ताकद नाही,' असे म्हणून या तरुणांना "काही परदेशी चिथावणीखोर घटकांनी भडकवले आहे,' असा आरोप केला. तेव्हा भगतसिंगाने उत्तरादाखल लिहिलेल्या लेखात लालाजींना इटलीच्या मॅझिनीने (स्वातंत्र्यासाठी) रस्ता दाखवलेला चालतो; मग आमच्या देशातील समस्यांवर उत्तरे शोधताना रशियन क्रांती व लेनिनसारख्या विचारवंतांकडून नवे विचार घेण्यात काय चूक आहे?' अशा स्वरूपाचा युक्तिवाद केला होता.[ संदर्भ हवा ]
१९३० मध्ये लाहोर कट खटल्यात कैदी असताना भगतसिंह-दत्त यांनी लेनिन दिनानिमित्त (जानेवारी) न्यायाधीशांमार्फत मास्कोला पाठवलेल्या तारेत म्हणले होते : "सोव्हिएत रशियात होत असलेला महान प्रयोग व साथी लेनिन यांचे यश याना पुढे घेऊन जाण्यासाठी मनःपूर्वक सदिच्छा पाठवत आहोत. आम्ही स्वतःला जागतिक क्रांतिकारी आंदोलनाचा भाग म्हणून जोडून घेऊ इच्छितो. "या काळात अगदी न्यायालयासह सर्व माध्यमांतून भगतसिंगांनी देशभर लोकप्रिय केलेल्या तीन घोषणा होत्या : "साम्राज्यवाद मुर्दाबाद', "सर्वहारा झिंदाबाद' आणि "इन्किलाब झिंदाबाद'. या तिन्ही घोषणांमागील प्रेरणा जशी रशियातील कष्टकरी जनतेने केलेली क्रांती होती तशीच लेनिन यांनी आधुनिक साम्राज्यवादाचे आणि क्रांतिकारी व्यूहरचनेचे केलेले मूलगामी विश्लेषण हेदेखील होते. भगतसिंगाच्या तुरुंगातील नोंदवहीत लेनिन यांच्या लिखाणातील याविषयीच्या नोंदी आढळतात. या वैचारिक-राजकीय स्पष्टतेमुळेच हा छोटा क्रांतिकारी गट ब्रिटिश साम्राज्यशाही सत्तेशी अत्यंत प्रखरपणे झुंज देऊन तिला राजकीय-नैतिकदृष्ट्या निष्प्रभ करू शकला.
फाशीच्या दोन दिवस आधी, कायदेविषयक सल्लागार प्राणनाथ मेहतांनी काही हवे का असे विचारले, तेव्हा भगतसिंहाने त्यांना एक पुस्तक आणून देण्याची विनंती केली. तसे त्यांनी ते दिले. फाशीची वेळ झाल्यावर तुरुंग कर्मचारी जेव्हा भगतसिंहाला न्यायला त्याच्या कोठडीजवळ आला तेव्हा भगतसिंह ते पुस्तक वाचत होता. त्याला उठवू लागताच भगतसिंह म्हणाला, "ठहरो, एक क्रांतिकारी की दुसरे क्रांतिकारी के साथ मुलाकात हो रही है.' हातातील पान संपवल्यावर तो उठून म्हणाला, "चलो'. ते पुस्तक लेनिनचे चरित्र होते.[ संदर्भ हवा ]
बाह्य दुवे
[संपादन]- मैं नास्तिक क्यों हूॅं?
- Why I am an Atheist
- मंत्रालयाला भगतसिंग आणि सुखदेव यांच्यातला फरक कळेना
- शोध.. शहीद भगत सिंगांचा!
- बृहन्महाराष्ट्रातले नास्तिकांसाठीचे व्यासपीठ[permanent dead link]
- भगतसिंग इंटरनेट अर्काइव्ह (भगतसिंगाचे सर्व साहित्य इंग्लिशमध्ये येथे उपलब्ध)
- भगतसिंगांसाठी भारत,पाक एकत्र[permanent dead link]
- पाकिस्तान : भगतसिंग यांचा खटला वरिष्ठ पीठाकडे सुपूर्द
- पाकमध्ये भगतसिंगांवरील खटल्याची फेरयाचिका[permanent dead link]
- भगतसिंगांना फाशी दिल्याबद्दल राणी एलिझाबेथ यांनी माफी मागावी: पाकिस्तानातील मानवाधिकार कार्यकर्त्यांची मागणी
- भगतसिंगांच्या निर्दोषत्वासाठी कायदेशीर लढा[permanent dead link]
- Pakistan Chief Justice to decide on plea over Bhagat Singh’s innocence
- Why 85 yrs after his hanging, Bhagat Singh remains relevant
- Petition To Prove Bhagat Singh’s Innocence Filed In Pak Court Archived 2017-05-17 at the Wayback Machine.
- Pakistan is proving to be a bigger fan of Bhagat Singh than RSS
- ‘Why can’t we reopen Bhagat Singh case?’: Sukhdev’s kin to move SC
संदर्भ
[संपादन]- अतिरिक्त संदर्भांची आवश्यकता असलेले लेख
- पासून अतिरिक्त संदर्भांची आवश्यकता आहे
- इ.स. १९३१ मधील मृत्यू
- मृत बाह्य दुवे असणारे लेख from November 2022
- कायमचे मृत बाह्य दुवे असणारे लेख
- भारतीय स्वातंत्र्यलढा
- भारतीय स्वातंत्र्यसैनिक
- भारतीय क्रांतिकारक
- पंजाबी व्यक्ती
- इ.स. १९०७ मधील जन्म
- पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती
- भारतीय नास्तिक