श्रीपाद वल्लभ

श्रीपाद श्रीवल्लभ हे श्रीदत्तात्रेयांचे कलियुगातील पहिले पूर्णावतार मानले जातात. श्री दत्तप्रभू पासून त्रिमूर्ती आणि त्रिमूर्ती पासून तीन कोटी देव व त्यांच्यापासून तेहतीस कोटी देवता उत्पन्न झाल्या. म्हणून केवळ श्री दत्त नामस्मरणाने सकल देवतास्मरण केले चे फल प्राप्त होते.
श्रीपाद श्रीवल्लभ
जन्म: भाद्रपद शुद्ध ४, गणेश चतुर्थी, शके १३२०, पिठापूर, आंध्रप्रदेश
आई/वडील: सुमती महाराणी /अप्पलराज शर्मा
आजी/आजोबा: राजमांबा / श्रीबापनाचार्य
निवास क्षेत्र: कुरगड्डी (कुरवपूर) (कर्नाटक राज्य)
संप्रदाय: नाथ संप्रदाय (दत्तावतारी)
वेष: ब्रम्हचारी
कार्यकाळ: १३२० -१३५०
समाधी: अवतार समाप्ती अश्विन वद्य १२ शके १३५०, कुरवपूर
चरित्र ग्रंथ: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत
इ.स. १३२० मध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्थी ला चित्रा नक्षत्रावर श्रीदत्तात्रेयांनी अप्पलराज शर्मा व सुमती महाराणी यांच्या पोटी ज्योती रूपाने जन्म घेतला. श्रीपाद श्रीवल्लभांचा आयुष्यकाळ हा तीस वर्षांचा असून सोळा वर्ष ते पिठीकापुरम (पिठापुर) येथे बालपण व चौदा वर्ष कुरुवपुर येथे तपामध्ये गेले. येथे त्यांनी तप केला, म्हणून कुरवपुरला तपोभूमी व पिठीकापुरम (पिठापुर) जन्मोभूमी संभोवतात. गुप्त झाल्यानंतर तीन वर्ष कुरवपूर येथे तेजोरुपात राहुन त्यांनी शंकर भट्ट ह्या श्रीपाद श्रीवल्लभ चारित्रामृत ग्रंथाच्या लेखकाला मार्गदर्शन केले. आज ही श्रीपाद श्रीवल्लभ प्रभु तेजोरुपात वावरत असतात. इ.स.१३५० त्यांनी गुप्त रूपा मध्ये वावरण्याचा निर्णय घेतला. देह रूपाने जरी ते दिसत नसले, तरी श्रीपाद श्रीवल्लभ प्रभु तेजोरूपात आज ही आहे. आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. त्यांना अलौकिक बुद्धिमत्ता लाभली होती. आपल्या भावंडांमधील अपंगत्व व आंधळेपणा दूर करून त्यांनी माता-पित्यांची चिंता दूर केली. त्यांनी जगन्नाथपुरी, काशी, बद्रीकेदार या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. तीन वर्षे ते गुप्तपणे गोकर्ण-महाबळेश्वर येथे राहिले. त्यानंतर ते श्रीशैलावर गेले. त्यांनी संन्यास घेतला नव्हता. ते ब्रह्मचारी होते व ब्रह्मचारी वेशात वावरत होते.
ते केवळ ज्योती स्वरूप होते. याप्रमाणे दोन वेळा जन्म घेतल्याने ते आजन्म द्विज होते. ते संपूर्ण, अखंड, अनंत, अद्वैत, सच्चिदानंदघन असल्याकारणाने या अवतारात त्यांना गुरू अशी व्यक्ती नव्हती. वास्तवात, ते त्रिमूर्तीचे संयुक्त रूप नसून त्रिमूर्तीच्या अतीत असलेले एक विशिष्ट तत्त्व होते. म्हणून त्या त्रिमूर्तीस अतीत असलेले चतुर्थतत्व असल्याचे सुचविण्यासाठी त्यांनी चतुर्थीस अवतार घेतला. मातेच्या गर्भातून बाहेर येऊन पुन्हा गर्भस्थ झाले असता, महायोगी, सिद्ध पुरुष व देवतांच्या प्रार्थनेस प्रसन्न होऊन पुन्हा जन्मल्यामुळे ते आजन्म ब्रह्मज्ञान संपन्न होते. चित्रा नक्षत्राचा अधिपती अंगारक म्हणजे मंगळ आहे. तो ग्रह पाप म्हणजे नीच स्थानी असता सकल जीव राशीस अमंगलप्रद ठरतो. सकल अमंगळाचे हरण करून शुभमंगलत्व प्रदान करण्यासाठी प्रभूंनी चित्रा नक्षत्रामध्ये जन्म घेतला. चित्रा नक्षत्र असतांना श्रीपाद प्रभूंचे पूजन केल्यास विशेष फलप्रद ठरते. श्रीपाद प्रभू साक्षात धर्मशास्ते आहेत. ते हरि-हरात्मज श्री अय्यप्पा स्वामी असल्याचे सुचविण्यासाठी त्यांनी तूळ राशीमध्ये जन्म घेतला. ते जाणत नाही असे धर्मशास्त्रच नाही. धर्म संकटात सापडलेल्या मनुष्याने त्यांची प्रार्थना केल्यास त्यास धर्म पथप्रदर्शनाचा लाभ होतो. सूर्य हा ग्रहांचा अधिपती आहे. सिंह लग्नामध्ये जन्म घेतल्यामुळे ते सकल विश्वाचे नात व दरबार भरण्यासाठी जन्म घेतलेले जणू काही चक्रवर्तीच आहेत असे सूचित होते.
तमोगुण प्रधान असलेला वामन अवतार.रजोगुणयुक्त असलेला परशुराम अवतार. सत्वगुणप्रधान असलेला तो रामावतार. त्रिगुणांच्या अतीत असलेला, निर्गुणतत्त्वप्रधान असलेला श्रीकृष्ण अवतार. कर्मप्रधान असलेला तो बुद्ध अवतार. समस्त सृष्टीतील एकत्वातील अनेकतत्व आणि अनेकत्त्वातील एकत्व स्वतःमध्ये सामावून घेणारा, अत्यंत अद्भुत, अत्यंत विलक्षण युगअवतार म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभावतार.
प्राण, विश्वास, आकाश, वायू, अग्नी, जल, भूमी, इंद्रिये, मन, अन्न, बल, विचार, मंत्र, कर्म, लोक, लोकांतील विविध नावे त्यांना सोळा कला असे म्हणतात श्रीपाद प्रभू षोडश कलांनी परिपूर्ण असे परब्रम्हवतार आहेत.
श्री दत्तात्रय प्रभु यांनी कलयुग प्रारंभ होण्या अगोदर कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग मध्ये सोळा अवतार घेतले आहे. १)योगीराज २) अत्रीवरद ३)दिगंबरावधूत ४)कालाग्निशमन ५) योगीजन वल्लभ ६) लीला विश्वंभर ७) सिद्धराज ८) ज्ञानसागर ९) विश्वंभरावधूत १०) मायामुक्तावधूत ११) आदीगुरू १२)संस्कारहिन शिवस्वरूप १३) देवदेव १४) दिगंबर १५) दत्तावधूत १६) श्यामकमल लोचन.
श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारानंतरच भारतामध्ये दत्त संप्रदायाची जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्र प्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे.
गुरुद्वादशी- श्रीपाद श्रीवल्लभ यांनी निजानंदी गमन केले तो दिवस.अश्विन वद्य द्वादशी अर्थात गुरू द्वादशी! शिष्य या दिवशी गुरूंचे समर्पण भावनेने पूजन करतात म्हणून या दिवसाला गुरुद्वादशी म्हणतात. गुरुद्वादशीच्या दिवशी ब्रह्मांडात गुरुतत्व १०० पटीने जास्त प्रक्षेपित होते. प्रत्येक साधक व शिष्य यांच्यासाठी गुरुद्वादशी हा दिवस दीपावली व इतर दिवसांपेक्षा अतिशय महत्वाचा दिवस आहे.
या दिवशी शिष्याने त्याच्या गुरूंना तळमळीने हाक मारल्यास ती गुरू पर्यंत पोहोचते, कारण त्यादिवशी वातावरण गुरुतत्वमय झालेले असते. शिष्यपदाच्या जवळ पोहोचलेला प्रत्येक साधकाला या दिवशी गुरू शिष्यत्व प्रदान करतात. गुरू द्वादशी ही सर्व दत्तभक्तांसाठी एक अद्वितीय पर्वणीच.
कुरवपुरातच आश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी त्यांनी निजानंदी गमन केले. हा दिवस आजही गुरूद्वादशी म्हणून दत्तसंप्रदायी लोक श्रद्धेने पाळत असतात.