Jump to content

स्मृति (हिंदू धर्म)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्मृती, धर्मग्रंथ या पानावरून पुनर्निर्देशित)
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत


स्मृति किंवा स्मृतिग्रंथ यांना भारताच्या धार्मिक साहित्यात विशिष्ट स्थान आहे. धार्मिक बाबतीत श्रुतींच्या खालोखाल स्मृतींना स्थान आहे. धर्माचा मूळ स्रोत जिथून प्रवाहित झाला त्यात स्मृतींना प्रामाण्य आहे. मनु, याज्ञवल्क्य, शातातप, हारित, देवल, यम, पारशर यांच्या स्मृती विशेष प्रसिद्ध आहेत. या स्मृतींच्या एकूण संख्या शंभराहून जास्त आहे. संरुति म्हणजे तत्कालीन कायद्याचे पुस्तक. अर्थात कायदे बदलतात तशा स्मृतीही बदलत गेल्या. मनुस्मृती मध्ये आपल्याला प्राचीन भारतीय न्यायव्यवस्थेचे माहिती मिळते

मुख्य विचार / स्वरूप

[संपादन]

निरनिराळ्या संहितांत विवाह, त्यांचे प्रकार, पुत्रांचे विविध भेद, दत्तक पुत्राचे विधान, धन विभाग, दायभाग, श्राद्ध, स्त्रीधन इ. विषयांवरील तत्कालीन समजुती आणि प्रथा आल्या आहेत, पण ही सर्व माहिती निरनिराळ्या ठिकाणी विखुरलेली आहे. ती सर्व एकत्रित व व्यवस्थितपणे मांडलेली स्मृतिग्रंथांत सापडते. स्मृतिग्रंथ हे आचारविषयक सिद्धांतांचे भांडार आहे.[]

महत्त्व

[संपादन]

धर्मशास्त्राप्रमाणेच सामाजिक दृष्टीनेही स्मृतींना खूप महत्त्व प्राप्त झाले. हिंदुंच्या उपनयन, विवाह इ. सोळा संस्कारांचे वर्णन स्मृतिग्रंथात आढळते. एकूणच भारतीय समाजाची ्तत्कालीन परिस्थिती जाणून घ्यायची असेल, तर त्यासाठी स्मृतींचे अध्ययन आवश्यक ठरते. भारतातील व्यवहाराचे म्हणजे कायद्याचे ज्ञान करून घ्यायचे असल्यासही स्मृतींचा अभ्यास आवश्यक आहे. इंग्रजी अमदानीत आणि सांप्रतच्या न्यायालयात दायभागाचे जे नियम केलेले आहेत, ते या प्राचीन धर्मशास्त्रावर आधारलेले आहेत.

भारतीय समाजाची नीट व्यवस्था लावणे हे स्मृतिकारांचे प्रमुख कार्य होते. समाजाची उन्नती झाली की व्यक्तीचीही उन्नती होते, म्हणूनच प्रत्येक व्यक्तीच्या अभ्युदयाची इच्छा करणाऱ्या स्मृतिकारांनी अनेक व्यापक नियम संग्रहित केले. त्यामुळे निरनिराळ्या विदेशी आक्रमणाच्या काळातही भारतीय समाज टिकून राहू शकला. अशा रीतीने वैदिक संस्कृती व भारतीय समाज यांना प्रतिष्ठित करण्याचे श्लाघ्य कार्य स्मृतिकारांनी केले आहे.[]

स्मृतिग्रंथांत मांडलेले विषय

[संपादन]

स्मृतींमध्ये प्रामुख्याने आचार, व्यवहार व प्रायश्चित्त या तीन बाबींचे वर्णन आले आहे.

आचार विषयाच्या संदर्भात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यशूद्र हे चार वर्ण आणि ब्रह्मचर्य, गार्हस्थ, वानप्रस्थ व संन्यास हे चार आश्रम यांची कर्तव्य-कर्मे सांगितली आहेत. विद्यार्थ्यांची राहणी, त्याची दिनचर्या, त्याचे अध्ययनाचे विषय, आचार्याशी त्याची वागणूक, अनध्याय इ. विद्यार्थ्यांशी संबंधित असलेल्या सर्व विषयांचे वर्णन स्मृतीत केले आहे. त्यानंतर गृहस्थाचा धर्म, त्याची कर्तव्ये, अन्य आश्रमातील व्यक्तींशी त्याचा व्यवहार, गृहस्थाश्रमाची श्रेष्ठता, वानप्रस्थी व्यक्तीचे जीवन, त्याची कर्तव्ये, खऱ्या संन्याशाचे लक्षण, त्याचा धर्म, त्याचा दैनिक आचार इ. अनेक विषयांचे विवेचन स्मृतींत आढळते. याचबरोबर राजनीतीचे वर्णन ही विस्ताराने केलेले आहे.

स्मृतींत वर्णन केलेला दुसरा विषय म्हणजे व्यवहार. याला सांप्रत कायदा असे म्हणतात. फौजदारी कायद्याच्या कक्षेत दंड, दंडाचे प्रकार, साक्षीदाराचे प्रकार, शपथ, न्यायाधीशाचे गुण, निर्णय देण्याची रीत, करांची व्यवस्था इत्यादी विषय स्मृतीत रोचकपणे वर्णिले आहेत. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दहावा
  2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दहावा
  3. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दहावा