वैश्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


वैश्य समाजा हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार एक वर्ण होता. या वर्णातील व्यक्ती व्यापार व इतर अर्थव्यवस्थेशी संबंधित कामे करायची.आधुनिक भारतात वर्णव्यवस्था नामशेष झाली नसली तरी नामशेष होण्याची आशा आहे.

जातीव्यवस्था ही पेशवे काळात जास्त प्रमाणात रूढ झाली.ह्या काळात जातीव्यवस्थेचे वर्गिकरण अलुतेदार, बलुतेदार आणि वतनदार असे होते. बलुतेदार हे सुतार,लोहार,चांभार,महार,मांग,कुंभार,न्हावी,धोबी,गुरव,जोशी,भाट.. अलुतेदार हे सोनार,जंगम,शिंपी,कोळी,माळी,डवरीगोसावी,रामोशी,तेली,तांबोळी व गोंधळी इत्यादी. ह्या लोकांकडून सामानाची देवाणघेवाण करणारा एक व्यापारी वर्ग होता. त्या वर्गातील लोकांना वैश्यवाणी म्हणत असे. हा वैश्यवाणी समुदाय व्यापार आणि व्यवसायासाठी वेगवेगळ्या भागात गेला.कालांतराने त्याच ठिकाणी त्यांनी आपला समुदाय निर्माण केला.त्यावरून वैश्यवाणी समाजात वेगवेगळ्या शाखा निर्माण झाल्या. ठाणे रायगड जिल्हातील लोकांना ठाणेकर वैश्य म्हणतात.

रत्‍नागिरी जिल्ह्यातील लोकांना संगमेश्वरी वैश्य म्हणतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना कुडाळ वैश्य म्हणतात. 

उत्तर कन्नड जिल्ह्यातील लोकांना कारवारी वैश्य म्हणतात. कोल्हापूर आणि बेळगावातील लोकांना बेळगावी वैश्य म्हणतात.

शास्त्रीय वर्ण प्रणालीतील तिसरा उच्चतम वैश्य समुदाय हा गोव्यातील कुडाली व नीसचा एकल गट आहे जो नंतर व्यापार आणि व्यवसायासाठी इतर शहरी भागात स्थायिक झाला. विशेषतः म्हापसा, फोंडा, मडगाव इथे राहणारे वैश्य पोर्तुगीज सत्ता असताना व्यापार आणि पोर्तुगिजांनी चालवलेले धर्मपरिवर्तन

व इतर कारणांनी वेगवेगळ्या राज्यात स्थलांतरीत झाली.

कोकणस्थ वैश्य[संपादन]

या समाजाची मूळ वस्ती गोदावरी तीरी मुंगीपैठण येथे होती. दूर्गा देवीच्या दुष्काळामध्ये या समाजाची पांगापांग होऊन निरनिराळ्या घाटांनी हे लोक कोकणात उतरले आणि तिथे स्थायिक झाले म्हणून त्यांना "कोकणस्थ वैश्य" म्हणतात.

कोकणात जे प्रमुख दोन व्यापारी वर्ग आहेत. त्यापैकी प्रस्तुत समाज हा रत्‍नागिरी जिल्हातील प्रभानवल्ली व संगमेश्वर ह्या दोन ठिकाणी उतरला नंतर इतर जिल्हात म्हणजे करवीर (कोल्हापूर) आणि कुलाबा (रायगड) येथे गेला. अशी माहीती वैश्य संदर्भ ग्रंथात आहे.

विजापूरच्या दरबारातून मुसलमानी अमदानीत मिळालेल्या सनदा निरनिराळ्या घराण्यांना मिळाल्या त्यांना नंतर शेट्ये हे आडनाव प्राप्त झाले. ह्या नावाने आज ही ओळखले जातात. विशालगड संस्थानापैकी वायकूळ घराण्याच्या जून्या दप्तरात अजूनही पुष्कळ सनदांची नोंद आहे.

रायगड जिल्हातील वैश्य[संपादन]

मराठी सत्तेच्या उदयापूर्वी अदिलशहा, निजामशहा, नवाब सिद्दी ह्यांची सत्ता होती. महाड माणगाव, पोलादपूर हा परीसर अदिलशहाच्या ताब्यात होता तर पश्चिम किनारपट्टी वरील मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा,रोहा ह्या भागात सिद्दीचे वर्चस्व होते जिल्हाच्या उत्तरेकडील किनारपट्टी पनवेल, उरण या भागावर इंग्रजांनी बस्तान बसविले होते.

ह्याभागातील सुपारी, नारळ, मसाल्याचे पदार्थ इत्यादी वस्तूंचा व्यापार करण्यासाठी वैश्य आले त्यांना रायगडी वैश्य असे म्हणटले जाते.

प्रामुख्याने अलीबाग, श्रीवर्धन, आदगाव, बोर्ली पंचयतन इथे वैश्यवाणी समाज जास्त आढळून येतो. ह्या भागात मापुस्कर, कोकाटे, खातू, पोवार, गांधी, देवळेकर ही आडनावे आहेत.

कालांतराने रेल्वे सुरू झाल्यावर काही व्यापारी मुंबईच्या दिशेने वाटचाल करू लागले मुंबईत आल्यावर काही लोकांनी छापखाना व पानाच्या वखारी सुरू केल्या ह्या व्यापारात ते नावारूपाला आले. देवळेकर ,हिगीष्टे ह्यांनी छानखाने काढले तर मापुस्कर, खातू ह्यांनी पान व तंबाखूच्या वखारी उत्तम प्रकारे चालविल्या. इतर लोक किराणा माल व कापड व्यवसाय करत आहेत.

कुडाळ वैश्य[संपादन]

घाटावरून कोकणात जेव्हा व्यापारी टोळ्या उतरल्या त्यातील काही कुडाळ प्रांतात गेले. त्याकाळी कुडाळ प्रांत हा रत्‍नागिरी जिल्हात होता. सावंतवाडी संस्थान होण्यापूर्वी पासून ह्या प्रांताला कुडाळ हेच नाव होते. या भागात रहाणारे म्हणून कुडाळ वाणी असे म्हणतात.

यांची मुख्य वस्ती सावंतवाडी शहर, कुडाळ, बांदे, आरवंदे, माणगाव, आकेरी, दापोली, दाणोली, आंबोली, आंब्रड, कसाल, कुंभवडे, आंबवडे घोडगे व इतर लहान खेडी , तसेच गोव्यामध्ये पणजी, म्हापसे, डीचोली, साकळी, फोंडे, पेडणे, मडगाव इत्यादी व बेळगाव, कोल्हापूर जिल्हात आहे. याशिवाय नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई पुणे शहरात मोठ्या प्रमाणात आहेत.

पाटणस्थ वैश्य[संपादन]

      पाटणस्थ वैश्य समाज हा प्रथम रायपाटण व खारेपाटण येथे वस्ती करून राहीला असावा. खारेपाटण ही पेठ प्राचीन काळापासून भरभराटीस आलेली होती. हे एक व्यापारी केंद्र आणि खाडीचे बंदर म्हणून प्रसिद्ध होते. म्हणून इथल्या वैश्य समाजाला पाटणस्थ वैश्य नाव पडले असावे.

    ह्यांची लोकवस्ती गगनबावडा, भुईबावडा, पन्हाळा, भूदरगड तालुका आणि राधानगरी- चांदे  या मार्गावरून थेट कोल्हापूर पर्यत आढळते. घाटमाथ्यावर ह्यांची वस्ती जास्त आहे. तसेच रत्‍नागिरीच्या मध्य विभागात म्हणजे राजापूर व देवगड या तालुक्यात ही हा समाज आहे. याशिवाय पुणे मुबई शहरात ही वास्तव्य आढळते.

पूर्वी हे लोक खायची पाने, केळी, हळद, व तागाचे व्यापार मोठ्या प्रमाणात करत असे.

  बामणे या गावात लाडवाडी, कोकाटेवाडी, जैतापकरवाडी मध्ये पाटणस्थ वैश्यांची घरे आहेत.ह्यांची ग्रामदेवता चाफाबाईचें देऊळ गावाच्या मध्यवर्ती असे आहे. मालक व पुजारी पाटणस्थ वैश्य आहेत.

   ह्यांची आडनावे -  कानडे, कुडतरकर, कोरगांवकर, ढवण, तानवडे, नारकर, महाजन,लाड, कोदे, खाड्ये, फोंडगे, बिड्ये, शिरसाट, शिरोडकर, सापळे, कामेरकर, कुडाळकर, कोकाटे, खवळे, खेतल, जैतापकर, नर, हळदे इत्यादी आहेत.

 ठाणेकर वैश्य[संपादन]

         ठाणेकर वैश्य समाज हा अंबरनाथ, आटगाव, अंबाडी, बेलापूर, भिवंडी, बदलापूर, चिंचघर, डोंबिवली, दुगाड, वसई, कुळगाव, कल्याण, खातिवली, खर्डी, मुरबाड, पडघा, शहापूर, टिटवाळा, ठाणे, वासिंद, विक्रमगड, वाडा, वज्रेश्वरी, जव्हार येथे पसरलेला आहे.

     हा समाज येथे केव्हा आला याचा काही पुरावा मिळू शकला नाही. साधारण दिडशेवर्षा पूर्वी व्यापारासाठी नाशिक नगर व बोरघाटातून येथे आला असावा.

   किराणा माल, भुसारी माल, कापड, मिठाई, ह्या क्षेत्रात ठाणेकर वैश्य व्यापार करत असत.

मुंबई सारख्या औद्योगिक शहराच्या जवळ असून सुद्धा सरकारी दप्तरांत ह्या समाजाची कोणतीच नोंद नाही .

    ठाणेकर वैश्यांची आडनावे:

  तेलवणे, दलाल, पातकर, गुजरे, महाजन, सोनटक्के, मलबारी, कोथिंबरे, शेठे, पांडव, म्हात्रे, खडकबाण, पनवेलकर, खिसतमराव, शेटे, गंधे, पाठारी, बिडवी, मुरबाडकर, तांबोळी, कोंडलेकर, आंबवणे, रोडगे, उबळे, जगे, आळशी, हरदास, काबाडी, भरणुके, बडे, चौधरी, मनोरे, पुण्यार्थी, मुंडे, सिगासणे, आंग्रे, जुकर, शहाणे, शेरेकर, राखाडे, भोपतराव, गोरी, वाणी, झिंजे, निकते, रोठे, पेणकर, पुणेकर, आनंंदे, दुगाडे, पक्के, दामोदरे, ठकेकर, लोखंडे, झुगरे, ठाकरे, पोटे, दुगाडे, गोरे, भुसारी, लाड, तांबडे, तोडलीकर अस्वले

     बहुतांश ठाणेकर वैश्यांचे गोत्र काश्यप आहे. कुलदेवता तुळजाभवानी व जेजुरीचा खंडोबा आहे.  इतर ही असू शकतात

  काही आडनावे ही सर्व  वैश्य समाजात सारखी आहेत पण राहाण्याचे स्थान जसे बदलले गेले तसे कुळ व गोत्र ही वेगळे असलेले पाहाण्यात आले आहे.

बेळगावी वैश्य / कारवारी वैश्य[संपादन]

सोळाव्या शतकात पोर्तुगीजांच्या धर्मछळामुळे अनेक वैश्य गोवा सोडून स्थलांतरीत झाले. त्यापैकी काही कुटुंबे रामदुर्ग आंबोली (रामघाट) चोर्ले घाटामार्गे बेळगावात स्थलांतरीत झाली. ह्या समाजात प्रामुख्याने तीन प्रकारचे वैश्य आढळतात. नार्वेकर वैश्य, बांदेकर वैश्य, पेडणेकर वैश्य.

नार्वेकर वैश्य[संपादन]

सध्या बेळगाव, खानापूर, नंदगड, लोंढा, अळणावर, बीडी, कलघटगी, दांडेली, यल्लापूर, अनगोळ, तुड्ये, मुरूकुंबी, कडोली इत्यादी ठिकाणी ह्यांची वस्ती आहे. ह्यांची गावावरून आडनावे आहेत.या समाजाची कुलदैवत गोवा प्रातांत मंगेशी, म्हाडदोबा, श्री कणकेश्वरी, नागेशी, शांतादुर्गा, सप्तकोटेश्वर, काळभैरव ही आहेत.

बांदेकर वैश्य[संपादन]

मूळ बांद्याहून निघून कारवार, अकोला, हल्याळ, कुमठा, व होनावर येथे स्थायिक झाले. बांद्याहून आले म्हणून बांदेकर नाव पडले. बेळगाव शहर, पारसगड, अथणी,गोकाक येथे जास्त वस्ती ह्यांची आहे. ह्यांची आडनावे पोकळे, तायशेटे, शिरसाट, मुंगे, वेंगुर्लेकर, नेवगी, तेली, कुशे इत्यादी आहेत.

पेडणेकर वैश्य—पेडणे येथून स्थलांतरीत झाले म्हणून पेंडणेकर म्हणतात. हे लोक नावा पुढे शेट लावतात. हे लोक किराणा दुकान, मिठाई ,नारळ, केळी, सुपारी, चणे, कुरूमुरे इत्यादींचा व्यापार करत असत.

  इतर वैश्य समाजातील पोटजाती विषयी थोडक्यात माहिती -

  लाड वाणी -  यांची वस्ती बेलापूर, हल्याळ, शिरसी या भागात आहे. पूर्वी हे लोक घोड्यांचा व्यापार करत होते. आता कापड, किराणा विक्री व्यवसायात आहेत.कुलदैवत भवानी आहे.  

नगर जिल्हात नगर व शेवगाव ह्या तालुक्यातील लाड वाणी हे गुजरातच्या लाट प्रदेशातून या भागात आले ह्यांची आडनावे चवाण, चिखले, चौधरी, गोसावी, जोशी, झारे, कराडे, खेळे, मोदी, पैठणकर, शेटे, अशी आहेत. यांची कुलदेवता अशनई येथील आशापुरी, तुळजाभवानी, शिंगणापूरचा महादेव, व पंढरपूरचा विठोबा आहे. हे शाकाहारी असतात. पिढीजात धंदा दुकानदारीचा आहे.

वैश्य समाजातील प्रकार

  •   कोमटी वैश्य
  •   कासार वैश्य
  •   लिंगायत वाणी
  •   चितोडे वाणी
  •   हंबद वाणी
  •   कुणकरी वाणी
  •   कठर वाणी
  •   नेवे वाणी
  •   कुलवंत वाणी

         

           


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ण Aum.svg
ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्र