हिंदू लग्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हिंदू विवाह या पानावरून पुनर्निर्देशित)

हिंदू लग्न हा हिंदूंचा एक संस्कार वा सोहळा आहे.

प्रस्तावना[संपादन]

ज्यामुळे विवाहाची इच्छा असणारे उपवर स्त्री आणि पुरुष ब्राह्मण, नातेवाईक आणि अग्नी यांचा साक्षीने पती पत्नी म्हणून संबद्ध होतात त्या संस्काराला विवाह असे म्हणतात.[१] हिंदू धर्मात विवाहास सोळा संस्कारांतील एक संस्कार मानतात. पाणिग्रहण संस्का‍रास सामान्यतः हिंदू लग्न या नावाने ओळखले जाते. अन्य काही धर्मांत विवाह हा विशेष परिस्थितीत तोडला जाऊ शकणारा पती व पत्‍नी यांमधील एका प्रकाराचा करार असतो. परंतु हिंदू विवाहामुळे जुळून आलेला पति-पत्‍नींदरम्यानचा तथाकथित जन्मोजन्मींचा संबंध हा सामान्य परिस्थितीत तोडला जाऊ न शकणारा संबंध असतो. अग्नीभोवती सात प्रदक्षिणा घालून व ध्रुव ताऱ्यास साक्षी ठेवून दोन शरीरे, मने आणि आत्मे एका पवित्र बंधनात बांधले जातात. हिंदू विवाहात पतिपत्‍नींमधल्या शारीरिक संबंधांच्या जोडीने आत्मिक संबंधांनाही महत्त्वाचे व अत्यंत पवित्र मानले गेले आहे.

हिंदू समजुतींनुसार मानवी जीवनास (ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रमवानप्रस्थाश्रम) या चार आश्रमांत विभागले गेले आहे. त्यांतील गृहस्थाश्रमासाठी पाणिग्रहण संस्कार/विवाह हा अत्यावश्यक आहे. हिंदू विवाहानंतर पतिपत्‍नींमध्ये घडून येणारा शारीरिक संबंध फक्त वंशवृद्धीच्या उद्देशानेच व्हावा अशी आदर्श कल्पना आहे. विवाह संस्कार हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार !
संसार रूप शकटाप्रति वाहणारी, चक्रेच दोन असती नर आणि नारी
यायास की सहचरत्व त्या द्वयास, आहे विवाहविधी जणू एक आस ....... असे या विधीचे काव्यात्म वर्णन केले आहे. [२] विवाहाला पाणिग्रहण, उपयम, परिणय, उद्वाह अशीही नावे आहेत.पाणिग्रहण ,म्हणजे वराने वधूचा पत्नी होण्यासाठी हात आपल्या हाती घेणे.उपयम म्हणजे वधूच्या जवळ जाणे किंवा तिचा स्वीकार करणे.परिणय म्हणजे वधूचा हात हाती घेवून अग्नीला प्रदक्षिणा घालणे.उद्वाह म्हणजे वधूला पित्याच्या घरून आपल्या घरी नेणे. मानवी समाजातील ही सर्वात प्राचीन संस्था मानली जाते.विवाह ही केवळ कुटुंबातील महत्वाची घटना नसून तिचे समाजाच्या दृष्टीनेही विशेष महत्व आहे.धर्मसंपत्ती आणि प्रजासंपत्ती असे विवाहाचे दोन उद्देश मानले जातात.[३]

विधी[संपादन]

 • विवाहापूर्वी मुहूर्त करणे, हळकुंड फोडणे,असे काही विधी घरातील महिला करतात.
 • लग्नाच्या आधी हळद लावणे, घाणा भरणे, ग्रहमख असे विधी करण्याची प्रथा आहे. विवाहाच्या आदल्या दिवशी सीमांतपूजन केले जाते.
 • हिंदू विवाह कायद्याप्रमाणे हिंदू लग्नात लाजाहोम, कन्यादान आणि सप्तपदी हे तीन विधी अत्यावश्यक मानले गेले आहेत.
 • या जोडीने विवाह संस्कारात गणपती पूजन, कुलदेवता पूजन, मधुपर्क, संकल्प, कन्यादान किंवा स्वयंवर, अक्षतारोपण, मंगल सूत्र बंधन, पाणिग्रहण, होम, लाजाहोम, अश्मारोहण, सप्तपदी, अभिषेक, कर्मसमाप्ती, मंगलाष्टके असे विधी होतात. *त्याशिवाय काही ठिकाणी कंकण बंधन, कानपिळी, गाठ बांधणे, झाल, रुखवताचे भोजन, वधूने गौरीहार पूजणे असे लौकिक विधीही केले जातात. [४]

सप्तपदी[संपादन]

सप्तपदीनंतर विवाह संस्कार पक्का आणि अपरिवर्तनीय होतो. हा विधी करताना यज्ञवेदीच्या भोवती सात पाटांवर प्रत्येकी एक अशा तांदळाच्या लहान लहान राशी मांडलेल्या असतात. प्रत्येक राशीवर सुपारी ठेवलेली असते. होमाग्नी अर्घ्यदानाने प्रज्वलित केला जातो. पुरोहिताचा सतत मंत्रोच्चार चालू असताना वधू-वर यज्ञवेदीभोवती प्रदक्षिणा घालतात. तसे करताना वर वधूचा हात धरून पुढे चालतो. वधू तांदळाच्या प्रत्येक राशीवर प्रथम उजवे पाऊल ठेवते आणि त्याच प्रकारे सर्व राशींवर पाऊल ठेवून चालते. प्रत्येक पदन्यासाचा स्वतंत्र मंत्र उच्चारला जातो. त्यानंतर ते दोघे होमाग्नीस तूप आणि लाह्या अर्पण करतात. ईशान्य दिशेकडे संपणारी सप्तपदी मांडली जाते. ईशान्य ही अपराजिता दिशा मानली असल्याने वधूनेही त्या दिशेने जाण्याचा संकेत रूढ आहे.[५]

अन्नलाभासाठी पहिले, ऊर्जेसाठी दुसरे, समृद्धीसाठी तिसरे, सुखसमृद्धीसाठी चौथे, उत्तम संततीसाठी पाचवे, विविध ऋतूंच्या सुखासाठी सहावे आणि मैत्रीच्या सहृदय नात्यासाठी वधू-वर एकत्रपणे सातवे पाऊल चालतात. याला सप्तपदी असे म्हणतात.

सप्तपदीनंतर वधू-वर अचल अशा ध्रुवताऱ्याचे दर्शन घेऊन हात जोडून नमस्कार करतात. विवाहबंधनाचे आजन्म चिरंतन पालन करण्याच्या प्रतिज्ञेचे हे प्रतीक होय.

वरात, गृहप्रवेश, लक्ष्मीपूजन, देवकोत्थापन आणि मंडापोद्‌वासन ह्या विधींनंतर विवाह संस्काराची सांगता होते.

वरात :

गृहप्रवेश :

लक्ष्मीपूजन :

देवकोत्थापन :

मंडपोद्वासन :

कंकणबंधन मंत्र[संपादन]

अग्निपरिणयन[संपादन]

विवाहाचे प्रकार[संपादन]

 1. ब्राह्म विवाह : दोन्ही पक्षांच्या सहमतीने समान वर्गाचे सुयोग्य वराशी वधूचा विवाह ठरवणे, यास 'ब्राह्म विवाह' म्हणतात. सामान्यतः या विवाहानंतर वधूस सालंकृत करून पाठवले जाते. आजकालचा 'नियोजित विवाह' (स्थळे पाहून ठरवलेला विवाह) हे 'ब्राह्म विवाहा'चेच एक रूप आहे.
 2. दैव विवाह : कोणत्यातरी सेवाकार्यासाठी (विशेषतः धार्मिक अनुष्ठानासाठी) लागणार्‍या पैशांपोटी आपल्या कन्येचे दान देणे, यास 'दैव विवाह' म्हणतात.
 3. आर्ष विवाह : वधूपक्षाकडील लोकांस कन्येचे मूल्य देऊन (सामान्यतः गोदान देऊन) कन्येशी विवाह करणे, यास 'आर्ष विवाह' असे म्हणतात.
 4. प्राजापत्य विवाह : कन्येच्या सहमतीशिवाय तिचा विवाह अभिजात्य वर्गांतील वराशी करणे, यास 'प्राजापत्य विवाह' म्हणतात.
 5. गांधर्व विवाह : कुटुंबीयांच्या सहमतीशिवाय वधू-वरांनी कोणत्याही रीतिरिवाजांशिवाय एकमेकांशी विवाह करणे, यास 'गांधर्व विवाह' म्हणतात. दुष्यंताने शकुंतलेशी 'गांधर्व विवाह' केला होता.
 6. आसुर विवाह : कन्येस विकत घेऊन (पैशांनी) विवाह करणे, यास 'आसुर विवाह' म्हणतात.
 7. राक्षस विवाह : कन्येच्या सहमतीशिवाय तिचे अपहरण करून जबरदस्तीने विवाह करणे, यास 'राक्षस विवाह' म्हणतात.
 8. पैशाच विवाह : कन्येच्या शुद्धीत नसण्याचा (ग्लानी, गाढ निद्रा, थकवा इत्यादींचा) फायदा घेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे व नंतर विवाह करणे, यास 'पैशाच विवाह' म्हणतात.

विवाहाशी संबंध असलेले काही चमत्कारिक विधी

 1. कुंभ विवाह : एखाद्या मुलीला अकाली वैधव्य येणार असल्यास ते टाळण्याकरिता हा विधी करतात. विवाहाच्या आदल्या दिवशी मातीच्या कुंभात(भांड्यात) पाणी भरून त्यात सोन्याची विष्णुप्रतिमा टाकून ठेवतात. त्याला फुलांनी सुशोभित करतात. मुलीच्या भोवती दोर्‍यांची जाळी करून मुलीला लपटेतात. विष्णूचे पूजन करून नियोजित वराला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना करतात. नंतर तो कुंभ एखाद्या नदीत फोडतात. नंतर मुलीच्या अंकावर पाणी शिंपडतात व ब्राह्मणांना भोजन घालून हा विधी पूर्ण करतात.
 2. अश्वत्थ विवाह : हा विधीही वैधव्ययोग टाळावा म्हणून करतात आणि तो कुंभविवाहासारखा असतो. या विधीत मातीच्या कुंभाऐवजी अश्वत्थाचे झाड आणि सोन्याची विष्णुप्रतिमा ह्यांचे पूजन करतात आणि नंतर ती प्रतिमा ब्राह्मणाला दान देतात.
 3. अर्कविवाह : एखाद्या मनुष्याच्या एकीपाठोपाठ दुसरी अशा दोन पत्‍नींचे निधन झाले तर तिसरीबरोबर विवाह करण्यापूर्वी तो अर्काच्या म्हणजे रुईच्या झाडाबरोबर विवाह करतो.

ब्रह्मचारी मृत झाला तर त्याच्या दहन कर्मापूर्वी त्याचा विवाह रुईच्या झाडाशी करतात अशी प्रथा आहे.[६]

टीका व आक्षेप[संपादन]

प्रचलित मान्यतांमुळे हिंदू विवाहसमारंभांमध्ये लग्नाचे धूमधडाक्यात, थाटामाटात आयोजन करण्याची रीत रुळल्यामुळे समारंभावरील खर्च ही मोठी समस्या झाल्याची टीका काही स्तरांतून होते.[७] या समस्येला उत्तर म्हणून सामुदायिक विवाह पद्धतीने समारंभ करण्याचा पर्यायही आधुनिक काळात अवलंबला जात आहे.[८]

चित्रदालन[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. विवाह- भारतीय संस्कृती कोश खंड आठवा
 2. ज्ञान प्रबोधिनी विवाह संस्कार पोथी ,पुणे
 3. भारतीय संस्कृती कोश खंड आठवा
 4. ज्ञान प्रबोधिनी विवाह संस्कार पोथी,पुणे
 5. विवाह पोथी ज्ञान प्रबोधिनी, पुणे
 6. अंत्येष्टी पोथी ज्ञान प्रबोधिनी पुणे
 7. SatyamevJayate Issues - Big Fat Indian Wedding - Marriage Or Marketplace?. Aamir Khan's television show on Star TV
 8. [१][मृत दुवा]