Jump to content

रंगनाथस्वामी निगडीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रंगनाथ स्वामी निगडीकर या पानावरून पुनर्निर्देशित)
श्री रंगनाथ स्वामी

रंगनाथस्वामी निगडीकर(जन्म-१६१२; मृत्यू-१६८४) हे समर्थ पंचायनातले एक सत्पुरुष होते. ते दिसायला अतिशय सुंदर आणि मोहक होते. मनाने विरक्त असूनही त्यांचा थाट एखाद्या मोठ्या सरदारासारखा असे. ते स्वतः घोड्यावर बसून प्रवास करीत. त्यांच्याबरोबर मोठा लवाजमा असे. वैभवशाली राहण्यामुळे त्यांच्या विरक्तीबद्दल लोकांना नेहमीच शंका वाटत असे. अशा शंकेखोरांनी दोन वेळा शिवाजी महाराजांचे मन रंगनाथस्वामींबद्दल कलुषित करण्याचा प्रयत्‍न केला होता. पण रंगनाथस्वामींनी शिवाजी महाराजांच्या मनात निर्माण झालेला किंतु काही चमत्कार दाखवून क्षणार्धात दूर केला, अशी आख्यायिका आहे. त्याचे जन्म स्थान हे सांगोला तालुक्यातील नाझरे गाव हे आहे.

पूर्वायुष्य

[संपादन]

रंगनाथस्वामींचे पूर्ण नाव रंगनाथ बोपजी देशपांडे. त्यांच्या आईचे नाव बयाबाई. बोपजी हे नाझरा गावचे देशपांडे होते. त्यांच्या तीन मुलांपैकी रंगनाथ हे मधले चिरंजीव होत. कल्याणी गावचे पूर्णानंद हे सहजानंदांचे शिष्य होते. रंगनाथांच्या वडिलांनी या पूर्णानंदांकडून संन्यासदीक्षा घेतली. तेव्हा त्यांचे नाव निजानंद ठेवण्यात आले. रंगनाथांना निजानंदांकडून अनुग्रह झाला. पुढे निजानंदांनी शके १५६४मध्ये मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी कऱ्हाड येथे जिवंत जलसमाधी घेतली.

संन्यासी झालेले रंगनाथस्वामी शेवटपर्यंत ब्रह्मचारी राहिले. घोड्यावरून तीर्थयात्रा करताना सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील निगडी गावाजवळ एका ओढ्याकाठी त्यांच्या घोड्याचा खूर दगडात रुतला, म्हणून ते घोड्यावरून खाली उतरले आणि दैवी संकेत समजून निगडीत राहू लागले.

लेखन

[संपादन]

रंगनाथस्वामींची लेखनशैली आणि निरूपणशैली ही रामदासांसारखी सुस्पष्ट आणि रोखठोक आहे. त्यांनी हजारो पदे, पंचके आणि अष्टके लिहिली. समर्थ रामदासांचे वर्णन त्यांनी ‘राजाधिराज अवतरला हा या जगदोद्धारा’ या शब्दांत केले आहे. कल्याणस्वामी यांना फार अद्वैतचर्चा केलेली आवडत नसे. त्यांनी रंगनाथस्वामींना ‘अद्वैतचर्चा कंटाळवाणी सांडूनि वर्णा कोदंडपाणी’ (अद्वैतावर चर्चा करण्यापेक्षा श्रीरामाची उपासना करा) असा सल्ला दिला. त्यावर रंगनाथस्वामींनी ‘अद्वैतचर्चा जंव हे कळेना, तो पूर्ण रामीं मन हे वळेना’ असे जोरदार उत्तर दिले.

धाडसी रंगनाथस्वामी

[संपादन]

माघातील रामदासांच्या पुण्यतिथी उत्सवासाठी रंगनाथस्वामींनी वडगावी येण्याचे जयरामस्वामींना कबूल केले होते, पण ही गोष्ट ते विसरून गेले. त्यावेळी ते भागानगरला होते. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी त्यांना ते आठवले. त्वरित त्यांनी घोडा दौडवला. वाटेत झालेल्या रामोश्यांच्या हल्ल्याचा त्यांनी न घाबरता प्रतिकार केला आणि सायंकाळी ते वडगावला पोचले. त्यांच्या या धाडसाचे साऱ्यांनीच आश्चर्यमिश्रित कौतुक केले.

शके १६०६ च्या मार्गशीर्ष वद्य दशमीला रविवारी रंगनाथस्वामींनी देहत्याग केला (इसवी सन १६८४). त्यांची समाधी निगडी येथे आहे.

हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप आदी सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय ग्रंथांचे कर्ते श्रीधर हे या रंगनाथस्वामींचे पुतणे होत.

रंगनाथस्वामी यांच्यावर रचलेले अभंग []

[संपादन]


संत श्रेष्ठ रंगनाथ स्वामी दास पंचायतनचे वरिष्ठ ज्ञाननिष्ठ संत. रामाचे परमभक्त, तसेच पंढरीचे वारकरी, रामायण व भागवत ह्या ग्रंथावर त्यांचा समान अधिकार, स्वामींच्या गृही, शारदा आणि लक्ष्मी सख्यभावाने नांदत असत. श्रीपती व वाचस्पति दोन्ही समसमत्वे, त्याचे ठायी नांदत होते. नाथांप्रमाणे ते गर्भश्रीमंत आहेत. त्यांचे वाङ्मय संस्कृत व प्राकृतामध्ये आहे. रामदासी व वैष्णवाचे श्रद्धास्थान. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथी महोत्सवास, सर्व संत महंत येत असत. मोठी गर्दी होत असे. मार्गशिर्ष कृ. १० हा मुख्य दिवस असतो.

स्वामीचा आणि राहिमातपुर येथील विपटाचा पिढ्यान पिढ्या ऋणानुबंध असल्याने, सर्व विपट उत्सवास येत असत. अशाच एका उत्सवासाठी संत तुकाविप्र यांनी केलेल्या कीर्तन प्रसंगी रचलेले अभंग


नमियेली निजरंग माऊली। समाधी या निगडी ।। धृ ॥

केला सर्वांचा निजभावे उद्धार । सर्वस्व जाले अवतार ।

नरदेह सर्वोत्तम हे सर्व । कृष्णा वेण्या थडी ।। १ ।।

भक्ती भावाने विचरोनी। संकीर्तन रंगणी।।

प्रेमे नाचतसे निजधानी । सर्वार्थ करोनी देव केला गडी ॥ २ ॥

मार्गशिर्ष या विभूती । मासात हे तिथी ।।

कृष्ण दशमी पुण्यतिथी । संत कीर्ती उभविली देह गुढी ।। ३ ।।

तुकाविप्र या संत संगी। कीर्तन प्रेमरंगी ॥

नाचत उभा या कलयुगी । नमुनी संत योगी धन्य होय गडी ।। ४ ।।


निजानंद माये चित्त तुझ्या पाये। राहो ठेवोनिया सर्वकाळ ।। १।।

स्वानंद स्वरुप, आत्मानंद रूप । कोंदले अमूप प्रेमानंद ॥ २ ॥

आनंदाची मूर्ती, देखावी नयनी । ऐसे आले मनी माऊलीच्या ॥ ३॥

संतमाय भली प्रसन्न जाहाली। प्रेमभरे केली कृपा ऐसी ॥ ४ ॥

प्रल्हाद पंतासी जाले वरदान । निमित्त कारण आम्हा जन्मा ॥ ५॥

तुकाविप्र बाळ माये तूं कृपाळ । करावा संभाळ प्रेमालिंगे ॥ ६ ॥


बाई ग ऐशी चिन्हे  । कै  येतील माझे ठायी ॥ धृ ॥

असोनी विदेहता। असंग गृह कांचन कांता ।। कम निष्कर्मियता। समता सर्वभूती ।। १ ।। |

नित्यानित्य विवेक दृष्टी। नित्य संकीर्तनी प्रेम वृष्टी ।। विजानंदी अभंग मीठी। क्षमा दया सहानुभूती ॥ २ ॥

भेदाभेद विसरोनी। अद्वये नाचे किर्तनी ॥ परंगी रंगोनी। सर्वांगे प्रेम भरोनी ।। ३ ।।

स्वरूप अंबेस्वरूपानदे। तुकाविप्र नीजछंदे ।।चे कीर्तनी स्वानंदे माय निजानंदे ॥ ४ ॥



  1. ^ विनायक, विप्र (२०१२). संत सद्गुरु तुकाविप्र जीवन दर्शन. पंढरपूर: विप्र दत्त मंदिर. pp. २१५ -२२२.