Jump to content

तुकाविप्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संत तुकाविप्र यांचे चित्र
संत तुकाविप्र महाराज
संत तुकाविप्र यांचा परिचय
मूळ नाव तुकाराम भगवंत विपट[]
जन्म श्रावण वद्य अष्टमी शके १६५० – अंजनवती – जिल्हा बीड[]
समाधी - पौंष कृष्ण चतुर्दशी शके १७१४ – अंजनवती – जिल्हा – बीड[]
संप्रदाय वारकरी संप्रदाय[]
गुरू नाथवंशीय विप्रनाथ स्वामी[]
शिष्य पांडुरंग तथा बापुसाहेब विप्र – पूर्वाश्रमीचे पुरंदरे
भाषा मराठी
साहित्यरचना भागवताच्या सर्व भागावर अभंगात्मक टीका, शतकोटीचे अभंग, तत्त्वमसि, सुदामचरित्र. भानुदास चरित्र , कालियामर्दन , पंढरीपर अभंग, नरदेह महिमा अभंग, इतर संतावरचे अभंग,   विठ्ठलावरील पोवाडा, अनेक पदे आरत्या[]
कार्य जनजागृती, समाजसुधारक, कवी, कीर्तनकार[]
संबंधित तीर्थक्षेत्रे अंजनवती, ब्रम्हपुरी, बोरबन, पंढरपूर[]
वडील भगवंतराव  विपट
आई चिन्माई – नाथ वंशीय विप्रनाथ यांची कन्या  []
पत्नी सगुणा[]

पेशवेकालीन संत - संत तुकाविप्र (Saint Tukavipra) हे सन्त एकनाथ महाराजाच्या शिष्य परम्परेतील एक महान सत्पुरुष होते

[संपादन]
  1. अनुक्रमणिका
    1. जीवन.
      1. जन्म
    2.  गुरू परंपरा
    3. पितृवंश
    4. मातृवंश.
    5. उपनयन.
    6. विद्याभ्यास
    7. लग्न.
    8. वास्तव्य.
    9. संत तुकाविप्र यांचे साहित्य.
    10. संत तुकाविप्र यांचे देवस्थान व मठ
    11. संत तुकाविप्र यांचे कार्य , त्यांचे समाजकारणातील स्थान
    12.  संत तुकाविप्र यांचे चरित्र, अभंग आणि त्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके.
      1. स्वातंत्रपुर्व काळात संत तुकाविप्र यांच्यावर झालेले लिखाण.
      2. स्वातंत्र्यानंतरच्या काळात संत तुकाविप्र यांच्यावर झालेले लिखाण.
      3. संत तुकाविप्र यांच्यावर सादर झालेले शोधनिबंध.
    13.  शिष्य परंपरा.
    14.  पसायदान
    15.  समाधी
    16. हस्तलिखीत..
    17. बाह्य दुवे..
    18. संदर्भ..

1   जीवन[]

[संपादन]

संत तुकाविप्र यांचा काळ  हा शके १६५० ते शके १७१४ म्हणजेच इसवी सन 1728 ते इसवी सन 1792 हा होता . हा काळ उत्तर पेशवाई म्हणून ओळखला जातो. संत तुकाविप्र हे आपला जन्म कीर्तनाद्वारे जनजागृती करण्यासाठी असे मानत असत हे त्यांच्या अनेक अभंगातून लक्षात येते. तसेच भक्तिमार्ग हा आत्मसाक्षात्काराचा सर्वोत्तम मार्ग आहे हे ही त्यांच्या अभंगातून जाणवते. संत तुकाविप्र हे वारकरी पंथाचे होते . पंढरपूरची वारी करीत भागवत धर्माचा प्रसार त्यांनी केला. संत तुकाविप्र हे जन्माने ब्राम्हण होते त्यामुळे त्या समाजात असलेल्या काही ठराविक परंपरांचेच पालन करत असत. संत हे नेहमीच परंपरेचा धागा न सोडता आणि त्यात न अडकता वाटचाल करत असतात. म्हणूनच जास्त कर्मकांड करणे हे संत तुकाविप्र यांच्या दिनक्रमांचा भाग नव्हता. स्वतःच्या वडिलांच्या श्राद्धाला ब्राम्हणांना जेवण देण्याऐवजी गरजू ब्राम्हणेतर लोकांना अन्नदान करणाऱ्या संत एकनाथ महाराज यांची थोर मातृवंश आणि गुरू परंपरा लाभलेल्या संत तुकाविप्र यांनी देखील कधीही कर्मकांडांचा प्रचार वा प्रसारही केला नाही. वेदांचा अभ्यास करून त्यातील मर्म हे वेद बोलती सकळा | भाव धरा येक भोळा या सोप्या शब्दात मांडले.

संत नामदेवसंत तुकाराम यांनी जगाची उपेक्षा न करता त्याच जगात वावरत जन सामान्यासाठी आपले अवघे आयुष्य वेचले. अश्या महान संतांचे कार्य पुढे चालवणे या साठी आपला जन्म आहे असे आपल्या अभंगातून संत तुकाविप्र यांनी व्यक्त केले आहे. संत तुकाविप्र यांनी योग विद्येचे संपूर्ण ज्ञान असतानाही त्या मार्गाने जाण्याऐवजी त्यांनी कीर्तनाचा मार्ग स्वीकारला. कारण जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे त्यांच्याठायी पक्के होते.

संत तुकाविप्र यांचे साहित्य अद्यापही म्हणावे तेवढे समाजात पोहोचले नाही. संत साहित्याच्या अभ्यासकांनी, समाज-प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकार प्रवचनकार यांनी या संत साहित्याला समाजाभिमुख करण्यासाठी आपापल्या परीने कार्य करायला हवे असे वाटते .


1.1    जन्म

संत तुकाविप्र यांचा जन्म श्रावण वद्य अष्टमी शके १६५०ला झाला त्यांच्या जन्माचा दाखला देणारा त्यांचा अभंग

श्रावण कृष्ण आष्टमी | पूर्व नेमी जन्म हा

सोळा शतनी पन्नास | शक खास जन्माचा

सौम्य नाम संवत्सर | कृपावर पूर्व जी

तुकाविप्र जाला जन्म | नाम वरं कीर्तना

2   गुरू परंपरा[]

[संपादन]

संत तुकाविप्र यांची गुरुपरंपरा आदिनारायणा पासून खालील प्रमाणे सांगितली जाते.

दत्तात्रय – जनार्दन स्वामीसंत एकनाथ – अनंत – विठ्ठल – विप्रनाथ – संत तुकाविप्र

3   पितृवंश[]

[संपादन]

संत तुकाविप्र यांचे पूर्वज म्हणजे विपट आडनाव असलेले कुटुंब हे रहीमतपुर येथील राम मंदिराची व्यवस्था व पूजा करत असत. संत तुकाविप्र यांच्या पणजोबा म्हणजे प्रल्हादपंता हे राजकिय व सामाजिक अस्थिरतेमूळे रहीमतपूर सोडून पंढरपूरला आले. तेथे ते विठ्ठलाच्या मंदिरात गंध उगळण्याचे काम करत असत. त्यांच्या मुलांचे नाव गंगाधर पंत होते . गंगाधर पंत यांच्या मुलांचे नाव भगवंतराव विपट होते . भगवंतराव विपट हे छत्रपती शाहू महाराजांचे एकनिष्ठ सरदार होते त्यांचा विवाह विप्रनाथ यांची कन्या चिन्मयी (चिमाई) यांचाशी झाला    

प्रल्हादपंत – गंगाधर – भगवंत (संत तुकाविप्र यांचे वडील ) - तुकाविप्र

असा संत तुकाविप्र यांचा पितृवंश आहे.  

4   मातृवंश[]

[संपादन]

संत एकनाथ हे भानुदास महाराजांचे वंशज म्हणजे पणतु  होते . भानुदास महाराजांचे चुलत बंधू केशवस्वामी हे देखील त्या काळचे विद्वान होते. केशवस्वामींचे वास्तव्य सातारा जिल्ह्यातील शेंदरे – वेचले येथे होते असे श्री मोरेश्वर जोशी येळंबकर यांनी आपल्या मराठवड्यातील संतांची जीवनगंगा या आपल्या पुस्तकात म्हणले आहे.  

केशवस्वामी – श्रीपति – माधव – यादव – गोविंद – गोपाल – अनंत – विठ्ठल – माणिक(विप्रनाथ) – चिन्माई (संत तुकाविप्र यांची आई) – तुकाविप्र

5   उपनयन[]

[संपादन]

संत तुकाविप्र यांची मौंज ही वैशाख शके १६५५ला झाली असावी. संत तुकाविप्र हे ५ वर्ष वयाचे होते तेंव्हा त्यांचे गुरू व आईकडील आजोबा असलेल्या नाथवंशीय विप्रनाथ स्वामी यांनी संत तुकाविप्र यांच्यावर उपनयन संस्कार केले असा उल्लेख आहे

6   विद्याभ्यास[]

[संपादन]

संत तुकाविप्र यांच्या शिक्षणाचा पहिला भाग वयाच्या पाचव्या वर्षांपासून सातव्या वर्षापर्यंत, श्री विप्रनाथ स्वामी यांच्या जवळ झाले . त्यानंतरचे शिक्षण त्यांनी नीरा नरसिंगपूर येथे घेतले. संत तुकाविप्र यांच्या साहित्यातून त्यांचे संस्कृत भाषेचे व व्याकरणाचे ज्ञान अफाट होते हे लक्षात येते . संत तुकाविप्र यांनी चार वेद, १०८ प्रमुख उपनिषदे, सहा शास्त्र, अठरा पुराणे त्याच बरोबर विवेक चूडामणि, पंचदशी, विवरण यांचाही अभ्यास केला आहे यांचीही  खात्री त्यांच्या साहित्याच्या अवलोकनातून पटते. संत तुकाविप्र यांना गायनकला देखील अवगत होती ज्याचा उपयोग ते कीर्तनाद्वारे जनजागृती करण्यासाठी करत असत.

7   लग्न[]

[संपादन]

संत तुकाविप्र यांच्या आईचे निधन शके १६६०ला झाले त्या आधी त्यांचे लग्न झाले होते व लग्नाच्या आधी नीरा नरसिंगपुरचे शिक्षण झाले. संत तुकाविप्र यांचे सुरुवातीचे शिक्षण शके १६५७ पर्यंत (यावेळी संत तुकाविप्र हे ७ वर्षे वयाचे होते) म्हणजे त्यांच्या गुरूंच्या (विप्रनाथ स्वामी यांच्या निधना पर्यंत) झाले असे मान्य करून त्या नंतर १६५८-५९ला त्यांचे नरसिंगपुरचे शिक्षण संपले असावे व त्याच दरम्यान किंवा शके १६५९-६०ला संत तुकाविप्र यांचे लग्न झाले असावे असा निष्कर्ष काढता येतो . लग्नाच्या वेळेस संत तुकाविप्र यांचे  वय ९ ते १० वर्ष असावे. संत तुकाविप्र यांनी लग्नानंतर अजन्म असिधारा वृताचे पालन केले . असिधारा म्हणजे पत्नीशी शरीर संबंध न ठेवता तीला देवतेसमान समजणे.

8   वास्तव्य[]

[संपादन]

शके १६५० ते शके १६५७ – अंजनवती, जिल्हा बीड

शके १६५८  ते शके १६६० – नीरा नरसिंगपूर

शके १६६०  ते शके १६६६ – महाराष्ट्रभर प्रवास

शके १६६७  ते शके १६७८  - ब्रम्हपुरी – जिल्हा सातारा

शके १६७९  ते शके १६९०  - बोरबन – जिल्हा सातारा

शके १६९२  ते शके १७०४ – कऱ्हा नदीची प्रदक्षिणा

शके १७०५ ते शके १७१४ – पंढरपूर – जिल्हा सोलापूर , अंजनवती आणि विविध ठिकाणी प्रवास

9   संत तुकाविप्र यांचे साहित्य []

[संपादन]

भागवताच्या सर्व भागावर अभंगात्मक टीका

शतकोटीचे अभंग

तत्त्वमसि पान 1
तत्त्वमसि पान 1

तत्त्वमसि

सुदामचरित्र

भानुदास चरित्र

कालियामर्दन  

पंढरीपर अभंग

नरदेह महिमा अभंग

इतर संतावरचे अभंग

विठ्ठलावरील पोवाडा

अनेक पदे

आरत्या

यातील सर्व साहित्य हे १९५६ पर्यंत पंढरपूर येथील विप्र दत्त मंदिर येथे होते असे समजते कारण 1944 साली इतिहास संशोधक श्री रा. ग हर्षे यांनी पंढरपूरातील मठांचे सर्वेक्षण केले होते यावेळी या साहित्याच्या उपलब्धतेची नोंद झाली असा उल्लेख श्री वा.ल. मंजुळ यांनी या सर्वेक्षणावर आधारित लिहिलेल्या श्री क्षेत्र पंढरपूरातील मठांचा इतिहास []या पुस्तकात केला आहे. इसवी सन 1956 साली चंद्रभागेला आलेल्या महापूरात [१०]यातील बरेच साहित्य नष्ट झाले असे विप्र कुटुंबीय सांगतात. असे असूनही संत तुकाविप्र यांचे उपलब्ध साहित्य बरच आहे . ते पुनर्लिखित , मुद्रित हस्तलिखित स्वरूपात आहे असे समजते.    

या शिवाय मराठी वाङ्मय कोश खंड १ पान क्रमांक ११६ व ११७ वर खालील उल्लेख आहे

रचेनेचे नाव संग्रहाचे नाव
आत्मसिंधु वि ल भावे संग्रह
कालियामर्दन  गना मुजुमदार संग्रह
भानुदास चरित्र गो का चांदोरकर संग्रह
सुदाम चरित्र वि ल भावे संग्रह
अभंग पदे स्तोत्रे ई. रचना

[]संत तुकाविप्र यांचे साहित्य हे भाषा, व्याकरण तसेच गद्य रचना निर्मितीच्या दृष्टीने परिपूर्ण आहे असे त्यांच्यावर शोध निबंध लिहिणाऱ्या संशोधकांचे मत आहे

10 संत तुकाविप्र यांचे देवस्थान व मठ [११]

[संपादन]

संत तुकाविप्र आणि त्यांचे शिष्य पांडुरंग तथा बापूसाहेब विप्र यांनी ज्या मठांची स्थापना केली त्याची माहिती या प्रमाणे

अंजनवती मठ
अंजनवती मठ

अंजनवती – जिल्हा बीड – महाराष्ट्र – येथे संत तुकाविप्र व त्यांचे गुरू विप्रनाथ स्वामी यांची समाधी आहे.  येथे एकमुखी दत्त मूर्ती देखील आहे

गोंदी – जिल्हा बीड – महाराष्ट्र – येथे संत तुकाविप्र यांनी स्थापन केलेली विठ्ठल मूर्ति आहे.

बोरबन – जिल्हा सातारा – महाराष्ट्र  - येथे संत तुकाविप्र यांनी स्थापन केलेली गणेश मूर्ती आहे याच बरोबर विठ्ठल मूर्ति आहे

ब्रम्हपुरी – जिल्हा सातारा – महाराष्ट्र - येथे संत तुकाविप्र यांनी स्थापन विठ्ठल रखुमाई यांची मूर्ति आहे

पंढरपूर – जिल्हा सोलापूर – महाराष्ट्र - येथे संत तुकाविप्र यांचे शिष्य बापुसाहेब विप्र यांनी स्थापन केलेली एक मुखी दत्त मूर्ती आहे. याच बरोबर येथे बापूसाहेब विप्र यांची समाधी आहे

11 संत तुकाविप्र यांचे कार्य , त्यांचे समाजकारणातील स्थान[१२]

[संपादन]

मराठी वाङ्मय कोश खंड १ पान क्रमांक ११६ व ११७ यावर खालील उल्लेख आहे - रोज कीर्तन करीत जनजागृती करण्याचा संत तुकाविप्र यांचा संकल्प असे. ह्याकरिता अखिल महाराष्ट्रभर त्यांचा संचार होई व भगवतभक्तीचा प्रचार चाले. संत तुकाविप्र यांना सातारकर छत्रपती , श्रीमंत नानासाहेब व भाऊसाहेब पेशवे फार मानीत असत . मोठे मोठे सरदार – जहागीरदार संत तुकाविप्र यांच्या शिष्यमंडळात होते. देशावर आणि कोकणात संत तुकाविप्र यांना अनेक इनामे मिळाली होती. तरीही संत तुकाविप्र हे विरक्तवृत्तीने राहात . त्यांच्याजवळ शीघ्रकवित्व होते.

संत तुकाविप्र हे मोरोपंत रामजोशी, शिवदिन केसरीनाथ, महीपतीबुवा ताहराबादकर यांचे समकालीन होते.

इसवी-सनाचे १८ वे शतक् हा उत्तर पेशवाईचा काळ ज्यात कर्मकांड करणाऱ्या लोकांचे महत्त्व वाढले होते. खऱ्या वेदज्ञानापेक्षा पाठांतर करून विद्या ग्रहण केलेल्या तथाकथित विद्याविभूषितांनी अशिक्षित व अल्प शिक्षित् अश्या सर्व जातीच्या लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला. ज्यांनी पेशवाईच्या उत्तरार्धाचा इतिहास वाचला आहे त्यांना हे चांगलेच माहीत आहे. या सर्व बाबींचे वर्णन डॉ. अनिल सिंगारे यांनी आपल्या इतिहास संशोधन पत्रिकेच्या सातव्या खंडात प्रकाशित झालेल्या “पेशवेकालीन ब्राम्हणाची दक्षिणा – नव्हे खंडणी” या लेखात केले आहे. या उन्मत्त लोकांना हे चुकीचे आहे असे सांगणारे त्यांच्याहून श्रेष्ठ असे कोणी नव्हते. त्यांच्या विद्वत्तेमूळे व शाप कोप या भीतीने त्यांच्या विरोधात जाण्यास कोणी धजत नव्हते.

संत तुकाविप्र अभंगांचे अवलोकन केले असतं हे लक्षात येते की अशा परिस्थितीत संत तुकाविप्र यांनी  स्वतः जातीने ब्राम्हण असूनही केवळ ज्ञानाची पूर्ण जाणीव असल्याने या सर्व बाबींना आपल्या कीर्तनांद्वारे वाचा फोडली. एवढेच नाही तर या कर्मकांडांशीवाय मोक्ष देणारा मार्ग म्हणजे भक्ति मार्ग हे पूर्वापार चालत आलेले सत्य परत एकदा लोकांच्या मनात कीर्तन या सर्व सामान्य लोकांना भावणाऱ्या आणि पटणाऱ्या माध्यमातून रुजवले.

मराठी विश्वकोशाच्या इतिहास या section मधील भारतीय इतिहास या sub section मधील मराठा अंमल या प्रकरणात संत तुकाविप्र यांचा उल्लेख – बोरबनचे तुकाविप्र यांनी समाजात आपल्या कवनांद्वारे जागृती केली असा आहे.

संत तुकाविप्र यांच्या जनजागृतीच्या कार्याचा ओझरता उल्लेख सातारा गॅझेट मधील संस्कृति व साहित्य विभागात आढळतो

12 संत तुकाविप्र यांचे चरित्र, अभंग आणि त्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके

[संपादन]

12.1 स्वातंत्रपुर्व काळात संत तुकाविप्र यांच्यावर झालेले लिखाण[१३]

[संपादन]
अनु क्रमांक वर्ष अंक क्रमांक साहित्याचे नाव प्रकार / संख्या संकलक पान नंबर
४६ १-४ ज्ञानेश्वर चरित्र ओव्या -२५० रा ग हर्षे २५-३६
२३ द्रौपदीचा धावा अभंग -१५ रा . तु जगदाळे ६५-६७
२३ भक्तिपर अभंग अभंग -११
१२ भक्तिपर अभंग अभंग -२० १६३-१६५

 या शिवाय संत तुकाविप्र यांच्या साहित्यावर अभ्यास करून जे विविध लेख प्रकाशित झाले ते असे

लेखक/ अभ्यासक प्रकाशन विषय वर्ष अंक पान क्रमांक
कृ. वि आचार्य भारत इतिहास संशोधन मंडल त्रैमासिक संत तुकाविप्र कृत अभंग १२ १६०-१६५
पा न पटवर्धन भारत इतिहास संशोधन मंडल इति. संत तुकाविप्र यांचा प्रयाण काळ कोणता? शके १८३४ ७९-८०
भा रा भालेराव मुमूक्षु (नवे) संत तुकाविप्र व त्यांचा वंश  १९२२ मार्च १७
रा. ग. हर्षे ज्ञानदेवी – (चिकित्सक व भाषाशास्त्रीय आवृत्ती) प्रास्तविक विवेचन - श्री भगवत गीता व्याख्यान १९४७ पुणे २९

12.2 स्वातंत्र्यानंतरच्या काळात संत तुकाविप्र यांच्यावर झालेले लिखाण []

[संपादन]

·       मराठवाड्यातील संतांची जीवन गंगा – सुहास प्रकाश पुणे

·       विद्वत परिमल – मोरेश्वर जोशी येळंबकर

·       संत तुकाविप्र यांचा परिचय – संतकृपा प्रकाशन

·       संत तुकाविप्र यांचा समाधी योग – विप्र कुटुंबीयांनी प्रकाशित केले

·       शेवट शतकोटीचा -  विप्र कुटुंबीयांनी प्रकाशित केले

·       तुकाविप्रांचा आनंदयोग – नचिकेत प्रकाशन

·       तुकाविप्र विजय – नचिकेत प्रकाशन

·       तुकाविप्र कृष्णेकाठी – नचिकेत प्रकाशन

·       कामधेनू – नचिकेत प्रकाशन

·       संत तुकाविप्र यांचा हरिपाठ - नचिकेत प्रकाशन

·       नाम गाती तया - नचिकेत प्रकाशन                     

·       संत तुकाविप्र रचित ज्ञानेश्वर चरित्र – विप्र कुटुंबीयांनी प्रकाशित केले

·       संत तुकाविप्र - संत सद्गुरू जीवन दर्शन - विप्र कुटुंबीयांनी प्रकाशित केले

·       संत तुकाविप्र अभंगलीला - नचिकेत प्रकाशन

·       पंढरपूर येथील विप्र दत्त - विप्र कुटुंबीयांनी प्रकाशित केले.  

12.3 संत तुकाविप्र यांच्यावर सादर झालेले शोधनिबंध[१४]

[संपादन]

·       संत तुकाविप्र व्यक्ति आणि वाड्मय – सौ संध्या भोयरेकर – निपाणीकर – बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद

·       संत कवि तुकाविप्र यांच्या समग्र काव्याचा अभ्यास  – श्री. देविदास श्रीमंत गुरव – सोलापूर  विद्यापीठ सोलापूर

13 शिष्य परंपरा[१५]

[संपादन]

संत तुकाविप्र यांना गुरू मानणारे लोक अनेक ठिकाणी असणार हे त्यांच्या महाराष्ट्रभर जनजागरणांसाठी केलेल्या भ्रमंतीतून जाणवते. अनेक सरदार हे त्यांचे शिष्य होते यांचा उल्लेख मराठी वाङ्मय कोशात आहे. संत तुकाविप्र यांनी असिधारा वृत स्वीकारले होते म्हणून त्यांना संतती नव्हती. सासवड येथील सरदार बाबुराव पुरंदरे यांना संत तुकाविप्र यांच्या कृपा आशीर्वादाने संतती झाली होती त्यातील मोठा मुलगा म्हणजे पांडुरंग हा संत वय वर्षे 10 पासून संत तुकाविप्र यांच्या सेवेशी होता. तोच त्यांचा परमशिष्य होता. ते पुढे बापूसाहेब या नावाने ओळखले जात. संत तुकाविप्र यांच्या सेवेशी असल्याने पांडुरंग आपले नाव पांडुरंग पुरंदरे न लावता पांडुरंग गुरू तुकाविप्र असे लावायचे. संत तुकाविप्र यांचा साहित्यिक व आध्यात्मिक वारसा हे बापूसाहेब विप्र यांचे वंशज जे विप्र या आडनावाने ओळखले जातात हे जतन करत आहेत.

14 पसायदान []

[संपादन]

संत तुकाविप्र यांनी अनेक प्रकारच्या साहित्य रचना केल्या. संत तुकाविप्र यांनी संत ज्ञानेश्वर यांच्या प्रमाणे जनतेच्या कल्याणासाठी ईश्वराकडे पसायदान देखील मागितले.

काय मागावे नुमजे | द्यावे तुम्हा साजे

भक्तिपरायण व्हावे लोक | सर्वकाळ सर्व सुख

शांती क्षमा दया पीक | ब्रीद मुख्य भूषण

सत्यवाणी नाम गर्जो | ब्रीद भूषण तुम्हा साजो

काम क्रोध निंदा विझो | द्वेष बुझो अहंता

माझे मागणे किती | तुम्ही उदार चक्रवर्ती

ओला चातकाचा कंठ | करिता मेघा काय कष्ट

करिता चकोराचा सोहळा | न्यून नोहे चंद्रकला

विप्र म्हणे नारायणा | थेंबे सिंधु नोहे उणा

15 समाधी [१६]

[संपादन]

संत तुकाविप्र – समाधी योग या पुस्तकात वर्णन केल्या प्रमाणे संत तुकाविप्र यांनी अंजनवती – जिल्हा – बीड येथे 14 दिवस सतत कीर्तन करत आपला देह पंचतत्त्वात विलीन केला. संत तुकाविप्र यांचा योगविद्येचा अभ्यास होता हे त्यांच्या तत्त्वमसि या ग्रंथाचे अवलोकन करताना लक्षात येते.

16 हस्तलिखीत[]

[संपादन]

संत तुकाविप्र यांच्या हस्तलिखिताचा फोटो दिला आहे

संत तुकाविप्र यांचे हस्ताक्षर
संत तुकाविप्र यांचे हस्ताक्षर

17 बाह्य दुवे

[संपादन]

मराठी वर्ल्ड

राजाराम प्रसादि कृत संत तुकाविप्र चरित्र[permanent dead link]

श्रीक्षेत्र पंढरपूरातील मठांचा इतिहास

18 संदर्भ  [१७]

[संपादन]

·       मराठवाड्यातील संतांची जीवन गंगा – सुहास प्रकाश पुणे

·       विद्वत परिमल – मोरेश्वर जोशी येळंबकर

·       संत तुकाविप्र यांचा परिचय – संतकृपा प्रकाशन

·       संत तुकाविप्र यांचा समाधी योग – विप्र कुटुंबीयांनी प्रकाशित केले

·       संत तुकाविप्र - संत सद्गुरू जीवन दर्शन - विप्र कुटुंबीयांनी प्रकाशित केले

·       संत तुकाविप्र अभंगलीला - नचिकेत प्रकाशन

[१८]

[१९]

[२०]

[२१]

http://santeknath.org/shishya%20parampara.html Archived 2013-12-06 at the Wayback Machine.

  1. ^ a b c d "saint tukavipra facebook page".
  2. ^ a b संत सद्गुरू तुकाविप्र जीवन दर्शन.
  3. ^ a b मराठवाड्यातील संतांची जीवन गंगा.
  4. ^ a b "tukavipra katha" (PDF).
  5. ^ a b c d "शोध निबंध" (PDF).
  6. ^ a b c d e f संत सतगुरू तुकाविप्र जीवन दर्शन.
  7. ^ a b श्री क्षेत्र पंढरपूरातील मठांचा इतिहास.
  8. ^ संत सतगुरू तुकाविप्र जीवन दर्शन.
  9. ^ संत सतगुरू तुकाविप्र जीवन दर्शन.
  10. ^ "दैनिक प्रभात".
  11. ^ "sant tukavipra facebook page".
  12. ^ "marathi vishvakosh".
  13. ^ "matathi vishvkosh".
  14. ^ "Shodhganga".
  15. ^ "sant tukavipra facebook page".
  16. ^ संत तुकाविप्र – समाधी योग.
  17. ^ "sant tukavipra facebook page".
  18. ^ "महाराष्ट्र राज्य - पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग" (PDF).
  19. ^ "मराठी विश्वकोश".
  20. ^ मराठवड्यातील संतांची जीवन गंगा. सुहास प्रकाशन पुणे. 1960. pp. 245 तो 256.
  21. ^ "Sant Kavi Tukavipra Yancha samagra kavyacha abhyas".