गोल्डन चॅरियट
गोल्डन चॅरियट ही भारतीय रेल्वेची एक आलिशान पर्यटन प्रवासी रेल्वेगाडी आहे. ही गाडी दक्षिण भारतामधील कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू व पुडुचेरी ह्या राज्यांतून धावते. जांभळ्या व सोनेरी रंगांत रंगवलेली ही १९ डब्यांची गाडी २००८ सालापासून चालू आहे. पॅलेस ऑन व्हील्स व डेक्कन ओडिसीच्या धर्तीवर प्रवाशांना आरामदायी व आलिशान सेवा पुरवणारी गोल्डन चॅरियट कर्नाटक राज्य पर्यटन विकास महामंडळाद्वारे चालवण्यात येते.
मार्ग
[संपादन]गोल्डन चॅरियटचे दोन मार्ग आहेत. दोन्ही प्रवास कार्यक्रम ८ दिवस व ७ रात्री चालतात.
स्प्लेंडर ऑफ द साउथ
[संपादन]हा मार्ग दक्षिणेमधील प्रमुख शहरांमधून फिरतो. बंगळूर (पहिला दिवस), चेन्नई (दुसरा दिवस), पुडुचेरी (तिसरा दिवस), तंजावर (चौथा दिवस), मदुराई (पाचवा दिवस), तिरुवनंतपुरम (सहावा दिवस), अलेप्पी व कोची (सातवा दिवस) व बंगळूरला परती (आठव दिवस) असा हा कार्यक्रम चालतो.
प्राईड ऑफ द साउथ
[संपादन]हा मार्ग प्रामुख्याने कर्नाटकातच धावतो. बंगळूर (पहिला दिवस), म्हैसूर (दुसरा दिवस), नागरहोळे राष्ट्रीय उद्यान (तिसरा दिवस), हासन, बेलूर व हळेबीडु (चौथा दिवस), हॉस्पेट व हंपी (पाचवा दिवस), ऐहोळे, पट्टदकल व बादामी (सहावा दिवस), गोवा (सातवा दिवस) व बंगळूरला परती (आठव दिवस) असा हा कार्यक्रम चालतो.