लोहगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लोहगड

लोहगडचा किल्ला
लोहगडचे ठिकाण दाखविणारा नकाशा
लोहगडचे ठिकाण दाखविणारा नकाशा
लोहगड
नाव लोहगड
उंची ३४२० फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव लोणावळा,मळवली
डोंगररांग मावळ
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


लोहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ. स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]

भौगोलिक स्थान[संपादन]

लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे. त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर अथवा संबळगड. लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते. पलीकडेच तिकोना उर्फ वितंडगड नावाचा अजून एक किल्ला आहे. तुंग उर्फ कठीणगडही येथेच आहे. नाणे मावळ आणि पवन मावळ यांच्यामधील पर्वतराजीत हा दुर्ग वसलेला आहे.

इतिहास[संपादन]

लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.पू. २००० वर्षांपूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, यादव या राजवटी या किल्ल्याने पाहिल्या.

इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक किल्ला होय. इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुऱ्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड–विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला.

इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला.

पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स. १७१३मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंग्र्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा : "शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली." नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुऱ्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले व नंतर १८०२ मध्ये त्यांच्या पत्‍नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना गड रिकामा करायचा हूकुम सोडला. तेथून अनिच्छेनेच मराठे मागे फिरले.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे[संपादन]

गडावर चढतांना सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते.

१. गणेश दरवाजाः- ह्याच्याच डाव्या – उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती. येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.[ संदर्भ हवा ]

२. नारायण दरवाजाः- हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई.

३. हनुमान दरवाजाः- हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.

४. महादरवाजाः- हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्या दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले. महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखान्याचे भग्र अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याची घाणी आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ काही हौशी दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथऱ्यात बसवली आहे. अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी लागते. या कोठीत राहण्याची सोय होती. कोठीत अनेक खोल्या आहेत. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवट्याचा भाग आहे. तेथे एक शिवमंदिर आहे. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. हे तळे अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे. हे तळे सोळाकोनी आहे. मोठा तळ्याच्या पुढे विंचूकड्याकडे जातांना वाड्यांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. हा विंचूकाटा म्हणजे पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचूकाटयावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते . गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात. या भागात पाण्याची उत्तम सोय आहे. गडाच्या आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्याचा उपयोग होत असावा. गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेणी आवर्जून पहावीत.

लोहगडावरच्या इमारती पडलेल्या आहेत. १०० लोक झोपू शकतील एवढी एक गुहासुद्धा गडावर आहे. लोहगडाचे उत्तरेकडचे टोक निमुळते होत गेले आहे. विंचूकाट्याच्या खाली दाट जंगल आहे.

लोहगडाचा उपदुर्ग असलेल्या विसापूरवर मोठी सपाटी आहे. तशीच मोठी दगडी तटबंदी आहे. प्राचीन शिलालेखही आहेत. डोंगराच्या पोटात भाज्याची लेणी आहेत. ती इसवी सनापूर्वी कोरलेली आहेत.

लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट. अशी रेखीव वाट फार कमी दुर्गांवर पहावयास मिळते. लोहगडवाडी पार केली की ही सर्पाकार वाट सुरू होते. एकदा का कोणी या वाटेवर पाय टाकला की मग तो माणूस वर येईस्तो पहारेकऱ्यांच्या नजरेआड जात नाही. तो व्यवस्थित हेरला जातो. वाटेवर वेगवेगळे बुरूज आहेत. त्यावरून बाहेरून येणाऱ्या माणसावर नजर ठेवता येते. वाटेवर गणेश दरवाजा, दुसरा नारायण, तिसरा हनुमान आणि चौथा महादरवाजा असे चार दरवाजे आहेत. हनुमान दरवाजा जुना आहे. इतर तीन दरवाजे आणि एक उत्तम रेखीव जिना नाना फडणीस यांनी बांधून घेतला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दरवाज्यांच्या मधील भागात जकीरा करण्याची भुयारे आहेत.

लोहगडाचा हा द्वारसमूह आगळावेगळा आहे आणि विचारांती बांधलेला आहे. गडावर गेल्यावर वरच्या बुरजावरून हा सर्व मार्ग न्याहाळता येतो. कड्याच्या टोकावरचे हे बांधकाम खूप सुंदर आहे.

विंचू कडा:- विंचू च्या नांग्या सारखी दिसणारी ही कडा अती लांब आहे म्हणून यास विंचू कडा असे संबोधले जाते

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

लोहगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. १) पुण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या शेजारच्या मळवली स्थानकावर पॅसेंजर गाडीने किंवा लोकलने उतरावे. तेथून एक्सप्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी. वाट मोठी आणि प्रशस्त आहे.तिथून दीड तासांच्या चालीनंतर ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलीकडेच एक गाव आहे त्याचे नाव लोहगडवाडी. खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास आणि डावीकडे वळले म्हणजे माणूस विसापूर किल्ल्यावर पोहचतो. या मार्गे लोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.

२) लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडवाडीपर्यंत जाता येते. लोणावळा-भांगरवाडी-दुधिवरे खिंड-लोहगडवाडी. पवना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो तेथून ३ ते ४ किलोमीटरवर लोहगडवाडी आहे. उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत. साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे. मात्र येथे एस.टी. महामंडळाची सोय नाही. स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्यातून ट्रॅक्सने जाता येते मात्र ट्रॅक्सभाडे १००० रु. आहे.

३) काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे.तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो.पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेक टेकडीवर जातो तेथून एक मळलेली पायवाट आपणास लोहगडवाडीत घेऊन जाते. या टेकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात. पुणे-पौड-कोळवण-तिकोना पेठ-दुधिवरे खिंड-लोहगडवाडी. तेथून अर्ध्या तासात लोहगड चढता येतो. वाटेत हडशीचा सत्यसाई आश्रम, प्रतिपंढरपूर हे देऊळ आणि पवना धरण बघता येते.

तेथे पोहोचण्यासाठी अनेक शॉर्टकट आहेत. आपण सहजपणे शोधू शकता. कृपया रिक्षा किंवा इतर खाजगी वाहनांचा वापर करू नका. आपण चालत चालत सहज तेथे पोहोचू शकता.

छायाचित्रे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "गॅझेट नोटिफिकेशन" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2016-03-07. १२ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

संदर्भ[संपादन]

बाहय दुवे[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]