बाजी प्रभू देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पन्हाळ्यावरील बाजी प्रभूंचा पुतळा

बाजी प्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले. बाजीप्रभूंचा जन्म चांद्रसेनीय कायस्थ प्रभू परिवारामध्ये झाला.

जीवन[संपादन]

बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजी प्रभू हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पिली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते.

घोडखिंडीचा लढा[संपादन]

पावनखिंडीतील लढाईपूर्वी शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू देशपांडे यांच्या मधील संभाषण.

सिद्दी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते.बाजीप्रभू हे बांदल यांचे सरदार होते. रायाजी बांदल[१],फुलाजी प्रभू आणि सुमारे ६०० बांदल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते[२]. त्या वेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापुरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्दीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

सिद्दी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. ही घटना दिनांक १३ जुलै, १६६० रोजी घडली.

मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी - फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. .

माध्यमांतील आविष्कार[संपादन]

घोडखिंडीचा लढा आणि बाजी प्रभू देशपांड्यांची स्वामिनिष्ठेची कथा मराठ्यांच्या जनमानसावर शेकडो वर्षे अधिराज्य गाजवत आहेत. या कथेवर विपुल लिहिले गेले आहे. बाबूराव पेंटर यांनी 'बाजी प्रभू देशपांडे' या चित्रपटाच्या (१९२९) माध्यमातून बाजीप्रभूंच्या पराक्रमाच्या स्मृती जतन करून ठेवल्या आहेत. दिग्पाल लांजेकर यांनी ' पावनखिंड ' (२०२२) या चित्रपटाच्या माध्यमातून बाजी प्रभू व घोडखिंडीत वीरमरण पत्करलेल्या संपूर्ण बांदल सेनेच्या पराक्रमावर भव्यदिव्य असा चित्रपट तयार केला आहे, जो प्रचंड यशस्वी ठरला.

पुस्तके[संपादन]

  • वीरश्रेष्ठ बाजीप्रभू देशपांडे (पंडित कृष्णकांत नाईक)
  • शिवरायांचे शिलेदार बाजीप्रभू देशपांडे (प्रभाकर भावे)
  • वीर रत्न बाजी प्रभू देशपांडे यांचे चरित्र - बाळकृष्ण सखाराम कुळकर्णी, १९२५

बाजी प्रभू नावाच्या संस्था[संपादन]

  • बाजीप्रभू उद्यान (माहीम-मुंबई)
  • बाजीप्रभू चौक (डोंबिवली पूर्व)
  • बाजीप्रभू देशपांडे चौक :जुने नाव - रामनगर चौक (रायपूर)

संदर्भ[संपादन]

  1. ^ बांदल घराण्याची तक्रीर (राजा शिवछत्रपति - गजानन भा. मेहेंदळे)
  2. ^ जेधे शकावली