Jump to content

महाभारतातील संवाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्यास व गणपती

श्रीकृष्णाची दुसरी पत्नी सत्यभामा हिने स्त्रीने तिचे गृहिणीपद कसे सांभाळावे व पतीची मर्जी कशी संपादन करावी याबाबत द्रौपदीकडून सल्ला घेतला होता. द्रौपदीने एका गृहिणीचे निरनिराळ्या परिस्थितीमधे कसे आचरण असावे, याबाबत सत्यभामेला मार्गदर्शन केले होते. द्रौपदी व सत्यभामेमधील या संवादालाच द्रौपदी-सत्यभामा-संवाद असे म्हणतात. महाभारत या ग्रंथाच्या वन पर्व या तिसऱ्या खंडामधे द्रौपदी सत्यभामा संवादाचे स्वतंत्र असे पर्व ९ व्या क्रमांकावर आहे.

आदिपर्वातील निवडक संवाद

[संपादन]

(१) व्यास - ब्रह्मदेव

व्यासांनी ब्रह्मदेवाकडे चिंता व्यक्त केली की मी महाभारताची रचना केली आहे पण ह्या सर्व समावेशक काव्याला योग्य असा लेखक मला पृथ्वीवर आढळत नाही. ब्रह्मदेवाने गणपतीचे नाव सुचविले. महाभारतात सर्व, सर्व, विषयांचा समावेश आहे याचा इथे उल्लेख आहे. "व्यासोच्छिष्टम् जगत् सर्वं" या उक्तीचा उगम येथे आहे.[]

(२) व्यास - गणपती
व्यासांची विनंती गणपतीने मान्य केली. पण एक अट घातली."माझी लेखणी क्षणभरही थांबणार नाही, याची तू काळजी घेतली पाहिजेस." व्यास म्हणाले, " मान्य. पण तू लिहिताना श्लोकाचा अर्थ मनात आणून मग लिहिले पाहिजेस." महाभारतात काही कूट श्लोक आहेत. त्यांचा अर्थ लावणे अवघड जाते. व्यासांना जेव्हा थोडा अवधी पाहिजे असेल त्यावेळी गणपती अर्थ लावण्यात वेळ काढेल अशा अर्थाने हा संवाद झाला

(३) धृतराष्ट्र - संजय
आदिपर्वात धृतराष्ट्र व संजय यांचा संवाद दिला आहे. त्यात युद्धोत्तर सर्व कौरव मेल्यानंतर धृतराष्ट्र शोक करतो व संजय त्याची समजूत घालतो अशी मांडणी आहे

(४) ऋषि - सौति
आदिपर्वात नैमिषारण्यात जमलेल्या ऋषींनी तेथे आलेल्या सौतीला कथा सांगण्यास सांगितले व त्याने महाभारत कथेचा उपोद्धात केला. - आदिपर्व, अध्याय पहिला

(५) ऋषि - सौति
सौति ऋषींच्या विचारण्यावरून त्यांना समंतपंचक वर्णन, अक्षौहिणीचे परिमाण, भारताचा विस्तार, मुख्य पर्वे, व महाभारचे फल सांगतो. आदिपर्व, अध्याय दुसरा.

(६). उत्तंक - पौष्य राजा (१)
अद्याय तीनमध्ये गुरू-शिष्य यांच्या गोष्टी आहेत व तेथे त्यांचे संवाद आहेत. इथे उत्तंकाच्या कथेतील दोन संवाद बघू. गुरूपत्नीच्या इच्छेप्रमाणे उत्तंक पौष्य राजाकडे राणीच्या कुंडलांची मागणी करतो. राजा त्याला " अंतःपुरात जाऊन माझ्या पत्नीपाशी ती माग " असे सांगतो. संवाद लहान असला तरी एक महत्त्वाची गोष्ट कळते की स्त्रीधनावर पतीचा हक्क नव्हता. देणे न देणे राणीच्या इच्छेवर अवलंबून होते.

(७) उत्तंक - पौष्य राजा (२)
नंतर एका गैरसमजावरून राजा व उत्तंक एकमेकांना शाप देतात. गैरसमज दूर झाल्यावर उत्तंक शाप मागे घेतो पण राजा तसे करू शकत नाही. या संवादात राजा म्हणतो की ब्राह्मणाचे अंतःकरण मृदु असते तर क्षत्रियाचे तीक्ष्ण असते. अध्याय तीसरा

(८) पुलोम राक्षस - -अग्नी
पुलोमाला भृगु ऋषीच्या पत्नीला पळवून न्यावयाचे होते. त्याकरिता त्याला अग्नीची साक्ष काढावयाची होती. ह्या संवादात अग्नीला खरे बोलावयास सांगतो. अग्नी ’नरो वा कुंजरो वा" अशी साक्ष देतो. देवांना देखील शब्दात पकडू शकता असे इथे दिसते. अध्याय पांचवा

(९) रुरू - देवदूत
रुरूची पत्नी मरण पावल्यवर तो शोक करत फिरत असतांना त्याला एक देवदूत भेटतो व रुरूला सांगतो की ’तू तुझे अर्धे आयुष्य तिला दे, ती जिवंत होईल". त्याप्रमाणे होते. त्या काळी असे शक्य आहे यावर विश्वास होता. अध्याय नववा

(१०) रुरू - डुंडुभ
रुरूची पत्नी जिवंत झाली परंतु तो तेव्हापासून दिसणाऱ्या प्रत्येक सापाला मारत सुटला. त्याला एक डुंडुभ (निर्विष, दुतोंड्या साप) दिसला. रुरू त्याला मारण्यास निघाला, तेव्हा डुंडुभाने त्याला त्याची चूक लक्षात आणून दिली. समाजातील एकाच्या चुकीबद्दल सर्वांना शिक्षा करणे योग्य नव्हे असा संदेश. अध्याय दहावा

(११) जरत्कारू - पितर
जरत्कारू हा एक ब्रह्मचारी, महान तपस्वी होता. तो हिंडत फिरत असतांना एका मोठ्या गर्तेसमीप आला. तेथे त्याने काही पुरुष खाली डोके-वर पाय अश्या स्थितीत एका गवताच्या पुंजक्याला धरून लोंबकळतांना पाहिले . त्याने विचारल्यावर त्यांनी सांगितले की " आम्ही तुझे पितर आहोत. तू विवाह न केल्यास संतानक्षय होऊन आम्हाला सद्गती मिळणार नाही."

त्या काळी मनुष्यसंख्या वाढण्याची गरज असल्याने लग्न करून, वंश वाढवून "पितृऋण" फेडले पाहिजे अशी समजूत होती. अध्याय तेरावा आदिपर्व

(१२) गरुड - विनिता
विनिता ही गरुडाची आई. गरुडाचा जन्म झाल्यावर त्याला भूक लागली. विनिताने त्याला समुद्रकिनाऱ्यावरील निषाद (कोळी) खावयास सांगितले. मात्र त्यावेळीच "ब्राह्मण खाऊ नकोस " अशी सूचनाही दिली. त्या प्रमाणे गरुडाने निषाद भक्षण करत असतांना तोंडात सापडलेल्या एका ब्राह्मणाला व त्याच्या पत्नीला सोडून दिले.

महाभारतात बऱ्याच ठिकाणी ब्राह्मणाच्या श्रेष्ठत्वाची महती सांगितली आहे. काही ठिकाणी तर येथल्यासारखी ओढून ताणून.. अध्याय अठ्ठाविसावा आदिपर्व

(१३)शेष - ब्रह्मदेव
शेष हा सर्व सर्पांमधील मोठा भाऊ. त्याला आपल्या भावांचा स्वभाव पसंत नसल्याने त्याने सर्वांना सोडून दूर तपश्चर्या सुरू केली. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिले व लोककल्याणाचे काम म्हणून त्याला डळमळणारी पृथ्वी डोक्यावर धारण करावयास सांगितले पाताळातील शेष पृथ्वी डोक्यावर धारण करतो या समजुतीची सुरुवात येथून झाली. - अध्याय छत्तिसावा. आदिपर्व

(१४) शमीक - शृंगी
शृंगी हा शमीक ऋषीचा मुलगा. शमीक मौनव्रत धरून बसला असताना परीक्षित राजाने त्याच्या खांद्यावर एक मृत साप टाकला. शमीक काही बोलला नाही परंतु शृंगीला हे कळल्यावर त्याने " सात दिवसात तक्षक तुला चावेल व तू मरशील " असा परीक्षित राजाला शाप दिला. शमीकाला हे कळल्यावर त्याने शृंगीला उपदेश केला की राजाने अपराध केला असला तरी प्रजाजन ब्राह्मणाने क्रोधाचा अवलंबन करून शाप देऊ नये. शांती धारण करणे व क्षमा करणे हा तपस्व्यांचा धर्म आहे. अध्याय एकेचाळिसावा-बेचाळिसावा आदिपर्व

(१५) काश्यप - तक्षक
परीक्षित राजाला मिळालेल्या शापाचे वृत्त कळल्यावर काश्यप नावाचा एक मंत्रविशारद ब्राह्मण राजाला वाचवून द्रव्य मिळवावे म्हणून राजाकडे निघाला असताना वाटेत त्याला तक्षक भेटतो. काश्यपाचे मंत्रसामर्थ्य पाहिल्यावर तक्षक त्याला वाटेतच भरपूर द्रव्य देऊन परत पाठवतो. त्या काळी मंत्रसामर्थ्यावर सर्वांचा विश्वास होता. अध्याय पन्नासावा. आदिपर्व

(१६) उपरिचर- इंद्र
उपरिचर नावाचा राजा तपाचरण करून इंद्रपदाला योग्य झाला. इंद्राने व इतर देवांनी त्याला दर्शन देऊन त्याला तपाचरणापासून परावृत्त केले व इंद्राने पृथ्वीचे राज्य करावयास सांगितले व त्याला प्रेमाची खूण म्हणून एक वेळूची काठी साधूप्रतिपालनार्थ दिली. इंद्राचे उपकर स्मरून त्याने ससंवस्तराचे शेवटी ते जमिनीत पुरून ठेवली.

गुढी पाडव्याची प्रथा येथून सुरू झाली. अध्याय त्रेसष्टावा आदिपर्व

(१७) दुष्यंत - शकुंतला
कण्व ऋषी आश्रमात नसतांना दुष्यंत राजा तेथे येतो व शकुंतलेला पाहून मोहित होऊन तिला मागणी घालतो. शकुंतला ती मान्य करते.पण एक अट घालते, " मला होणारा मुलगा युवराज झाला पाहिजे". इथे दोन महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. (१) वडील नसतांनासुद्धा मुलीला वर निवडण्याची परवानगी होती. (२) वधू काही अटी घालू शकत होती. अध्याय त्र्याहात्तरावा, आदिपर्व

(१८) शकुंतला - दुष्यंत
भरत जन्मानंतर शकुंतला त्याला घेऊन दुष्यंताकडे येते. दुष्यंत तिला नाकारतो पण नंतर आकाशवाणी झाल्यावर तिचा स्वीकार करतो. तो अमात्यादींना म्हणतो "मला हे सर्व विदित होते पण हिच्या सौंदर्याकडे पाहून मी हिचा स्वीकार केला असे आपणास वाटू नये म्हणून मी प्रथम नाकारले". महाभारतात शाप, माशाने अंगठी गिळणे, वगैरे काही नाही. अध्याय चौऱ्याहत्तरावा आदिपर्व

(१९) कच- देवयानी
देवयानीचे कचावर प्रेम असल्याने तिने वडिलांना गळ घालून कचाला जिवंत केले. पण नंतर कचाने आपण शुक्राचार्यांच्या पोती जन्मलो, म्हणून आपण दोघे भाऊ-बहीण आहोत असे सांगून तिला नाकारले व तिचा शापही स्वीकारला. अध्याय सत्याहत्तरावा, आदिपर्व

(२०) शुक्र - देवयानी
दैत्याचा राजा वृषपर्वा याची मुलगी शर्मिष्ठा व देवयानी यांचे भांडण झाले व शर्मिष्ठाने देवयानीला विहिरीत ढकलून दिले. रागावलेल्या देवयानीची समजूत घालतांना शुक्राचार्य शांतीचे महत्त्व सांगतात तर देवयानी भाग्यहीन मनुष्याला मृत्यू आलेला उत्तम असे सांगते. अध्याय एकोण्यांयशीवा आदिपर्व

(२१) ययाति - पुरू
शुक्राचार्यांच्या शापामुळे ययातीला वृद्धत्व प्राप्त झाले. ते त्याच्या सांगण्यावरून त्याचा मुलगा पुरू याने घेतले. एक हजार वर्षांनी ययातीने ते पुरूकडून परत घेतले. त्या वेळी पुरू त्याला म्हणाला ’महाराज, आपणास पाहिजे असेल तर मी अजून जरा घेतो." त्यावेळी ययाति त्याला पुढील सुप्रसिद्ध सिद्धान्त सांगतो " न तु काम कामानां उपभोग्येन शाम्यति." आदिपर्व अध्याय पंचाऐंशी.

(२२) यायाति - इंद्र
ययाति नंतर घोर तप करून स्वर्गात जातो. काही वर्षांनंतर इंद्र त्याला विचारतो " तपश्चर्येमध्ये तू कोणाबरोबर आहेस ? " ययाति म्हणतो " त्रिभुवनात माझ्या बरोबरीचा कोणी नाही " या प्रौढीमुळे रागावून इंद्र त्याला सांगतो की तुझ्या पुण्याचा क्षय झाला आहे " ययातीचे स्वर्गातून पतन होते. इतरांना क्षुद्र लेखल्याने तुमच्या अनेक वर्षे केलेल्या तपाचा नाश होतो. आदि पर्व, अध्याय अठ्यायशी

(२३) ययाति - -त्याचे नातू
ययाति स्वर्गातून पतन झाल्यावर पृथीवार एक यज्ञ चालू असतो तेथे पोचतो. तो यज्ञ ययातीचे चार नातू करत असतात. पण ययाति व नातू एकमेकांना ओळखत नाहित. ययातीने आपली कथा सांगितल्यावर ते सर्व आपले पुण्य त्याला देऊन त्याला परत स्वर्गाला पाठवण्याचे ठरवतात. पण ययाति म्हणतो की " क्षत्रियाला दान घेण्याचा अधिकार नाही. तो फक्त ब्राह्मणाला आहे." विद्या मिळविणे व ती शिष्याला देणे यात वेळ जाणाऱ्या ब्राह्मणाला धनार्जन करणे शक्य नसाल्याने हा अधिकार फक्त त्यालाच दिला होता. आदिपर्व, अध्याय त्र्याण्यवावा

(२४) गंगा - वसु
गंगा व अष्टवसु यांना पृथ्वीवर जन्म घेण्याचे शाप मिळाले होते. वसु गंगेला विनंती करतात की "आम्हाला पृथ्वीवरील स्त्रीच्या पोटी जन्म घेण्याची इच्छा नाही. आम्ही तुझ्या उदरी जन्म घेऊ व जन्मल्याबरोबर तू आम्हाला पाण्यात टाकून दे म्हणजे आम्हाला या पृथ्वीवर पापाची निष्कृति करीत बसावे लगणार नाही." गंगेने ते मान्य केले पण ती म्हणाली " एक मुलगा तरी राहिलाच पाहिजे कारण पुत्रेच्छेने माझ्याशी झालेला संबंध व्यर्थ होऊं नये".वसु ते मान्य करतात पण पुढे म्हणतात "त्याची संतति मनुष्यलोकात रहाणार नाही." हा मुलगा, भीष्म निपुत्रिक राहिला. देव चलाखच दिसतात. शाप तर भोगला पाहिजेच पण त्यातून पळवाट काढावयाचीच. (हल्लीचे वकील) आदिपर्व, अध्याय शहाण्णवावा

(२५) गंगा - शंतनु
भीष्माच्या जन्मानंतर गंगा शंतनूला सोडून, भीष्माला घेऊन स्वर्गाला गेली होती. छत्तीस वर्षांनतर शंतनु गंगाकाठी हिंडत असतांना गंगा त्याला परत भेटली. तिने भीष्माला शंतनूच्या हवाली केले व म्हणाली " हा तुझा मुलगा. स्वर्गात ह्याचे शिक्षण झाले आहे. वेद आनि वेदांगे हा वशिष्ठांकडून शिकला आहे; धनुर्विद्या परशुरामाकडून, बृहस्पतीकडून राजधर्म व शुक्राचार्यांपासून अर्थशास्त्र. गंगेने आपल्या मुलाकरिता सर्वश्रेष्ठ गुरू निवडले. शरपंजरी भीष्म पडले असतांना श्रीकृष्ण युधिष्टराला म्हणतात " तुला जे काही प्रश्न विचारवयाचे असतील ते आता भीष्मांना विचारून घे. भीष्मांनतर ज्ञान लोप पावणार आहे." .. आदिपर्व . अध्याय शंभरावा. ..

(२६) यमधर्म - मांडव्यऋषि
मांडव्य ऋषींना सुळाचे टोक पोटात अडकल्याने त्रास भोगावा लागला होत. त्यांनी यमाकडे जाऊन त्याचे कारण विचारले. यमधर्म म्हणाला "तू लहानपणी एका पतंगाला काडी टोचली होतिस, त्याचे हे फळ." मांडव्य म्हणाले "बालपणी अजाणतेपणाने केलेल्या दुष्कृत्याबद्दल जीवाला शिक्षा होऊं नये. या पुढे वयाच्या चौदा वर्षआच्या आतील मुलाकडून घडलेल्या दुष्कृत्याबद्दल जीवास दंड असू नये." आदिपर्व, अध्याय एकशें आठवा

(२७) धृतराष्ट्र - ब्राह्मण आणि विदुर
दुर्योधनाच्या जन्मकाळी क्रूर व हिंस्र पशु व कोल्ही ओरडू लागली. हा अपशकून पाहून ब्राह्मणांनी धृतराष्ट्राला सांगितले की हा मुलगा कुलक्षय करणारा निघेल, .तू याचा त्याग कर."

त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् !
ग्रामं जानपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीं त्यजेत् !! हा श्लोक येथे आहे.
आदिपर्व, अध्याय एकशें पंधरावा

(२८) पांडु - ऋषी, पांडु - कुंती
पांडूला ऋषीच्या शापामुळे संतती होण्याची शक्यता मावळल्यामुळे काळजी वाटू लागली, की पितृऋण कसे फेडावयाचे. त्याने वनवासात बरोबर असलेल्या ऋषींना या बाबत प्रश्न विचारला, त्यांनी नियोग पद्धती हा धर्माचार आहे असे सांगितले. त्या प्रमाणे पांडू कुंतीस पुत्रप्राप्ती करून घेण्यास सांगतो. कुंती साफ नकार देते. पण नंतर पांडूस दुर्वास ऋषींच्या वराबद्दल सांगते. पांडूच्या आज्ञेने तिला तीन मुले होतात. पांडूला आणखी मुले पाहिजे असतात पण कुंती नकार देते व म्हणते की "आणखी मुले ही वेश्यावृत्ती होईल." मग माद्री तिला म्हणते की "मला मंत्र दे, मी निपुत्रिक मरू इच्छित नाही." त्याप्रमाणे माद्रीला दोन मुले होतात.
आदिपर्व, अध्याय १२०-१२४

(२९) कुंती - माद्री
पांडूच्या मृत्यूनंतर कुंती म्हणाली " मी महाराजांबरोबर सती जाते." त्यावर माद्री म्हणाली " माझ्याच्याने समभावाने, वंचना न करिता मुलांचे संगोपन होणार नाही. माझ्या दोन मुलांचा संभाळ तुम्ही स्वतःचे मुलांप्रमाणेच कराल असा माझा विश्वास आहे. तेव्हा मीच सती जाते." आदिपर्व अध्याय एकशें पंचविसावा

(३०) कुंती - विदुर
दुर्योधनाने भीमाला विष पाजून गंगा नदीत सोडून दिले. भीम परत आला नाही म्हणून काळजीत पडलेल्या कुंतीने विदुराला भेटून आपली काळजी व्यक्त केली. विदुराने तिचे समाधान करून सांगितले की "तुझी मुले दीर्घायुषी आहेत. भीम परत येईल पण तू आता आरडाओरडा केलास तर तुझ्या इतर मुलांनाही धोका पोचेल." आदिपर्व, , अध्याय एकशें एकूणतिसावा

(३१) द्रुपद - द्रोण[]
द्रुपद व द्रोण हे एकाच गुरूकडे आश्रमात शिकले, खेळले व जिवलग मित्र झाले. त्यावेळी द्रुपदाने " मी राजा झाल्यावर मी, माझी मुले माझी संपत्ती तुझ्या स्वाधीन राहतील " असे सांगितले होते., पुढे द्रोण द्रुपदाकडे गेला व " मी तुझा मित्र आलो आहे " असे म्हणाला द्रुपदाने द्रोणाचा अपमान करून त्याला अनेक उदाहरणे देऊन एक सत्य सांगितले की "मैत्री बरोबरींच्यातच होऊ शकते. आदिपर्व अध्याय एकशें एकतिसावा

(३२) दुर्योधन - भीम
कौरव-पांडव यांच्या परीक्षेच्या वेळी कर्णाला जरी राज्याभिषेक झाला होता तरी त्याचा पिता अधिरथ सूत आहे हे कळल्यावर भीमाने त्याचा पाणउतारा करून "चाबूक घेऊन रथ हाक" असे त्याला सांगितले .त्या वेळी दुर्योधन भीमाला क्षत्रिय कुणाला म्हणावे, वंशशुद्धता कशी अस्तित्वात नाही हे उदाहरणे देऊन सांगतो. तो म्हणतो "शूराचे कूळ व नदीचे मूळ कधी मिळणार नाही " हल्ली शूराचे ऐवजी ऋषीचे कूळ असे आपण म्हणतो. आदिपर्व अध्याय एकशें सदतिसावा

(३३) धृतराष्ट्र - कणिक
पांडवांचा उत्कर्ष पाहून धृतराष्ट्र चिंताक्रांत झाला व कणिक नावाच्या एका राजनीतितज्ज्ञ ब्राह्मणाला बोलावून त्याला सल्ला विचारला. या संवादाला "कणिकनीति" म्हणतात. आजच्या राजकर्त्यांनाही मोलाचा वाटेल असा हा उपदेश. आदिपर्व अध्याय एकशें चाळिसावा

(३४) विदुर - युधिष्ठिर
वारणावतातील लाक्षागृहात पांडवांना जाळून मारावयाची कौरवांची कुटिल नीति ओळखून विदुर युधिष्ठिराला त्याची कल्पना देतो व त्यातून कसे सुटावयाचे हेही सांगतो. हे तो म्लेंच्छ भाषेत सांगतो जी फक्त तो व युधिष्ठिर जाणत असतात आदिपर्व अध्याय एकशें शेचाळिसावा.

(३५) ब्राह्मण - -त्याचे कुटुंबीय
एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी पांडव रहात होते. त्या नगरातील प्रथेप्रमाणे प्रत्येक घरातील एका व्यक्तीला बकासुराकरिता बळी जावे लागे त्या घरावर पाळी आल्यावर वडील, आई, मुलगा व मुलगी प्रत्येक जण "मी जाणार " असे म्हणतात. अतिशय वाचनीय संवाद. एक उल्लेखनीय नोंद म्हणजे ब्राह्मण म्हणतो " मुलीवर माझा हक्क नाही. ब्रह्मदेवाने तिच्या पतीची ठेव म्हणून ती मजपाशी ठेविली आहे " आदिपर्व अध्याय १५७,१५८,१५९

(३६) कुंती - ब्राह्मण
कुंती ब्राह्मणाला "माझा मुलगा बकासुराकडे जाईल" असे सांगते. ब्राह्मणाला ते पटत नाही. आपल्या घरात आलेल्या पाहुण्याने आपला जीव द्यावा याला तो नाकारतो. तेव्हा कुंती त्याला सांगते की " माझा मुलगा मलाही प्रिय आहे. तो बकासुराला मारेल याची मला खात्री आहे. त्याला मंत्रसिद्धी प्राप्त झाली आहे " मग ब्राह्मण कबूल होतो. इथे "मंत्रसिद्धी"वरील लोकांचा विश्वास उल्लेखनीय आहे. आदिपर्व अध्याय एकशें एकसष्टावा

(३७) कुंती - युधिष्ठिर
भीमाने बकासुराकडे जाणे युधिष्ठिराला अजिबात पसंत नव्हते. तो कुंतीला दोष देतो. त्यावेळी कुंती त्याला सांगते की "ब्राह्मणाने आपल्याला आश्रय दिला त्याच्या उपकाराची परतफेड आपण दसपटीने केली पाहिजे. आदिपर्व अध्याय एकशें बासष्टावा

(३८) व्यास - पांडव
एका स्वरूपसुंदर ऋषिकन्येने पति मिळावा म्हणून तप केले. प्रसन्न झालेल्या शंकराने तिला पांच पति मिळतील असा वर दिला. द्रौपदीला पाच पति कसे मिळाले त्याची कथा. - आदिपर्व अध्याय एकशें एकूणसत्तरावा

(३९) धृतराष्ट्र - दुर्योधन,कर्ण भीष्म, द्रोण, विदुर
द्रौपदी विवाहानंतर दुर्योधन वगैरे परत आले व त्यानंतर पुढे काय करावयाचे या विषयी त्यांनी व भीष्मादींनी धृतराष्ट्राबरोबर बोलणी केली. कर्ण-दुर्योधन यांच्या विरोधात तिघांनी पांडवांना अर्धे राज्य द्यावे असे मत मांडले. - आदिपर्व अध्याय २०१, २०२, २०३, २०४, २०५,

(४०) युधिष्टिर - - नारद
यात नारद पांडवांना एकोप्याने रहाण्याची सूचना देतात व सुंदोपसुंदांची कथा सांगतात. - आदिपर्व अध्याय २०९,२१०, २११, २१२

उद्योगपर्वातील संवाद

[संपादन]

१) धृतराष्ट्र आणि सनत्सुजात संवाद या संवादाची सुरुवात धृतराष्ट्र - विदुर संवादातून सुरू होते, विदुर धृतराष्ट्राच्या काही अध्यात्मविषयक प्रश्नांना उत्तर देण्यास सनत्सुजातास पाचारण करतात. " आत्मज्ञानी मनुष्याकरिता मृत्यू असे काही नसतेच , मृत्यू हा प्रमाद आहे (प्रमाद म्हणजे बहुतेक जे नाही त्यावर आहे असा आरोप करणे.) ज्याला ब्रह्मं सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः हे उमगले आहे त्याला मृत्यू असूच शकत नाही " अशा प्रकारचा अद्वैतवादी तर्क सनत्सुजात मांडतात.[][ दुजोरा हवा]




संदर्भ

[संपादन]