उपरिचर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उपरिचर हा कुरुवंशीय राजा होता. कुरुवंशातील सुधन्वन् राजाच्या वंशशाखेतील कृतयज्ञ राजाचा हा पुत्र होता[१]. याचे मूळ नाव वसु होते, परंतु इंद्राने भेट दिलेल्या दिव्य विमानातून हा भ्रमण करू लागल्याने यास उपरिचर या उपाधीने ओळखले जाऊ लागले. इंद्राच्या निर्देशावरून याने यादवांकडून चेदी देश जिंकून घेतला[१]. याला गिरिका नावाची एक पत्नी होती.

तपस्या[संपादन]

उपरिचराने दीर्घ काळ तपस्या करून इंद्राला प्रसन्न करून घेतले. प्रसन्न झालेल्या इंद्राने त्याला आपला मित्र मानले आणि एक दिव्य विमान, तसेच कधीही न सुकणाऱ्या फुलांची वैजयंतीमाला त्यास भेट म्हणून दिली. वैजयंतीमालेच्या योगाने युद्धामध्ये तू कायम अवध्य राहशील, असा वरही इंद्राने त्याला दिला[१]. इंद्राचा मित्र असल्यामुळे त्याला "इंद्रसख", तसेच इंद्राने दिलेल्या वैजयंतीमालेमुळे त्याला "इंद्रमालिन्" अशा उपाध्यांनीही ओळखले जाऊ लागले.

मत्यराज आणि मत्स्यगंधेचा जन्म[संपादन]

एकदा पत्नी गिरिकेच्या ऋतुप्राप्तीच्या दिवशी पितरांच्या आज्ञेमुळे उपरिचरास मृगयेसाठी वनात जावे लागले. शिकारीसाठी वनात गेला असताना गिरिकेच्या आठवणीने उत्तेजित होऊन त्याचे रेत सांडले. ते रेत एका द्रोणात भरून आपल्या पत्नीकडे, म्हणजे गिरिकेकडे, घेऊन जाण्यासाठी त्याने एका श्येन पक्ष्यास पाठवले. उपरिचराने पाठवलेल्या ससाण्याची वाटेत अन्य एका ससाण्याशी झटापट झाली आणि त्या झटापटीत द्रोणातील रेत यमुनेच्या पात्रात पडले. ते रेत पूर्वजन्मी अद्रिका नामक अप्सरा असणाऱ्या मासोळीने गिळले[१]. कालौघात ती मासोळी एका धीवरास सापडली. धीवराने जेव्हा त्या मासोळीचे दोन तुकडे केले, तेव्हा तिच्या पोटातून एक मुलगा आणि एक मुलगी बाहेर पडले. धीवराने त्या दोन्ही मुलांना राजाच्या, म्हणजे उपरिचराच्या, पायी घातले. उपरिचर राजाने मुलाचा "मत्स्य" या नावाने स्वीकार केला, तर मुलगी धीवराला देऊन तिचा सांभाळ करण्याची आज्ञा केली. धीवराला दिलेली ही मुलगी पुढे मत्स्यगंधा ऊर्फ सत्यवती नावाने प्रख्यात झाली, जिच्या पोटी पुढे व्यास पाराशराचा जन्म झाला.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ a b c d चित्राव, सिद्धेश्वरशास्त्री, ed. (१९६८). "उपरिचर वसु". भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश. भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे. p. १४८.