श्रीधरस्वामी नाझरेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रीधर ब्रम्हानंद नाझरेकर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

श्रीधरकवी नाझरेकर (जन्म : इ.स. १६५८च्या आसपासचा) हे इ.स.१७ व्या शतकातील एक प्रसिद्ध आख्यानकवी होते. त्यांचे मूळ गाव नाझरे. काशीच्या आनंद संप्रदायातले हे आठवे वंशज. ह्यांचे घराणे मोगलाईतील खडकी येथील होते. आडनाव खडके म्हणत, पण यांच्या घराण्यातील एक पुरुष घोडदळात अधिकारी बनल्याने घोडके आडनाव पडले. त्यानंतर राघोपंत नाझर एका महालाचे कुलकर्णी बनल्यावर त्यांना नाझरेकर म्हणू लागले. श्रीधरांचे वडिलांचे नाव ब्रम्हानंद होते. आईचे नाव सावित्री. इ.स. १६७८ मध्ये हे वडिलांसोबत पंढरपूर क्षेत्री आले. येथेच त्यांचे पुराणे, पंचकाव्ये, रामायण, भागवत आदी ग्रंथाचे अध्ययन झाले व संतकवींची कविताही त्यांनी वाचली. त्यांनी एकूण ५८ हजारावर ओळींचे ११हून अधिक काव्यग्रंथ रचले आहेत.

श्रीधरस्वामी नाझरेकरांनी लिहिलेल्या शिवलीलामृत या ग्रंथाला २३ फेब्रुवारी २०१९ रोजी ३०० वर्षे झाली. काशी विश्वेश्वराच्या देवळात बसून त्यांनी हा ग्रंथ लिहिला. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील शिवभक्त या ग्रंथाची पारायणे करतात. शिवलीलामृतात १४ अध्याय असून एकूण २४५० ओव्या आहेत. सोवळ्याविना वाचता येईल असा, कोणताही विशिष्ट अध्याय वाचण्याचे बंधन नसलेला, स्त्रियांनाही पारायण करता येईल असा हा लोकप्रिय ग्रंथ आहे. शिवलीलामृताची भारतातील अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत. मूळ हस्तलिखिताची मुद्रित प्रत १८९२ सालापासून मिळू लागली.

श्रीधरस्वामींचे शेवटचे वास्तव्य पंढरपुरात होते. त्याच घरात सध्या (२०१९ साली) त्यांची नववी पिढी राहते आहे. त्यांच्याकडे श्रीधरस्वामींच्या हस्ताक्षरातील शिवलीलामृत आणि मल्हारी माहात्म्य या पोथ्या आजही (२०१९ साली) जपून ठेवलेल्या आहेत.

श्रीधरस्वामी नाझरेकरांनी लिहिलेले काही ग्रंथ[संपादन]