पैनगंगा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पेनगंगा नदी ही महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी आहे. ही नदी अजिंठा डोंगररांगेत बुलढाणा जिल्ह्यात मढ या गावाच्या शिवारात बुद्नेश्र्वर महादेवाच्या मंदिरापासून उगम पावते. उगमानंतर ती आग्नेयकडे बुलढाणा वाशीमअकोला या जिल्ह्यांच्या दक्षिण भागातून, बुलढाणा व यवतमाळ पठारावरून पूर्वेकडे वाहत जाते. पुढे ती यवतमाळ-नांदेड या जिल्ह्यांच्या सरहद्दींवरून वाहत जाऊन यवतमाळच्या पूर्व सरहद्दीवर बल्लारपूर (चंद्रपूर) येथे वर्धा नदीस उजव्या तीराला येऊन मिळते. ही नदी वाशीम व यवतमाळ जिल्ह्यांची दक्षिण सीमा आहे. पैनगंगाची लांबी ४९५ किमी आहे. सर्व उपनद्यांसह एकूण जलवाहनक्षेत्र २३,८९८ चौ. किमी.पुढे वर्धा आणि पैनगंगा यांचा संयुक्त प्रवाह वैनगंगेला मिळतो.

पेनगंगेच्या उजव्या तीराला येऊन मिळणारी एकमेव नदी कयाधू ही आहे,तर डाव्या तीराला येऊन मिळणाऱ्या नद्यांपैकी पूस, अडाण, आरना, वाघाडी, खुनी या पेनगंगेच्या मुख्य उपनद्या आहेत. जलसिंचनाच्या दृष्टीने ही नदी उपयोगी असून, अप्पर पैनगंगा प्रकल्पानुसार या नदीवर इसापूर धरण यवतमाळ जिल्ह्यात इसापूरजवळ बांधले आहे. ते १९६८मध्ये बांधले. या धरणाची क्षमता ९६४ दशलक्ष घनमीटर इतकी आहे, या धरणाचा उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत, या कालव्यामुळे नांदेड यवतमाळ हिंगोली या जिल्ह्याला जिल्ह्यातील शेती उपयोग झाला आहे. एवढेच नाही तर या कालव्याचे पाणी आंध्रप्रदेशात पर्यंत पण गेलेली आहे त्यापासून शेतीस पाणीपुरवठा होतो. देऊळघाट, वणी, पुसद, पांढरकवडा, चिखली, मेहेकर ही पैनगंगा नदीखोऱ्यातील प्रमुख शहरे आहेत.  

पेनगंगा नदी वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याच्या अगदी मध्यभागातून वाहते. पैनगंगा अभयारण्य हे यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्हा  यांना विभागणाऱ्या पेनगंगा नदीच्या दोन्ही बाजूंस असलेल्या संरक्षित वनास दिलेले नाव आहे. तीन बाजूंनी पाण्यानं वेढलेले एकमेव अभयारण्य आहे. पैनगंगा अभयारण्याची स्थापना १ जानेवारी १९९६ रोजी झाली. याचे क्षेत्रफळ सुमारे ३२५ किमी इतके आहे. अभयारण्यात साग हा प्रमुख वृक्ष आहे. या नदीमुळे यवतमाळ जिल्ह्याला अलौकिक वनसंपदा लाभली आहे. पेनगंगा नदीच्या दुसऱ्या तीराला नांदेड जिल्हा आणि त्यातले किनवट अभयारण्य आहे.

किनवट तालुक्‍यात, पेनगंगा नदीवर सहस्रकुंड नावाचा धबधबा आहे. नदीचा प्रवाह खडकांमधून विभागला आहे, त्यामुळे पाणी खाली कोसळताना दोन वेगवेगळ्या धारा पडतात. सोनधाबी आणि सहस्रकुंड धबधबा हे पैनगंगा अभयारण्याचे प्रमुख आकर्षण आहे.

पेनगंगा नदी आणि जिल्हा सीमा

१.यवतमाळ-नांदेड २.यवतमाळ-हिंगोली ३.यवतमाळ-चंद्रपूर