Jump to content

अरविंद घोष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(योगी अरविंद या पानावरून पुनर्निर्देशित)
अरविंद घोष
अरविंद घोष
जन्म १५ ऑगस्ट १८७२
मृत्यू ५ डिसेंबर १९५०
पाँडिचेरी, भारत
निवासस्थान कलकत्ता, दार्जीलिंग, लंडन, बडोदा, पाँडिचेरी
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे श्रीअरविंद
प्रशिक्षणसंस्था किंग्ज कॉलेज, लंडन
प्रसिद्ध कामे वंदे मातरम्, आर्य, धर्म, कर्मयोगिन इ. वृत्तपत्रे
मूळ गाव कलकत्ता
जोडीदार मृणालिनी देवी
वडील डॉ. कृष्णधन घोष
आई स्वर्णलता देवी
स्वाक्षरी

अरविंद घोष ऊर्फ श्रीअरविंद ऊर्फ ऑरोबिंदो (१५ ऑगस्ट १८७२ - ५ डिसेंबर १९५०) हे विसाव्या शतकातील एक क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि योगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्‍ज्ञ, भाषांतरकार, लेखक, संपादक आणि कवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात.

जीवन

[संपादन]

अरविंदांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णधन घोष आणि आईचे नाव स्वर्णलता घोष होते. प्रसिद्ध ब्रह्म समाजाचे अध्वर्यू असणारे ऋषी राजनारायण बोस यांच्या त्या कन्या. विनयभूषण व मनमोहन हे श्रीअरविंद यांचे थोरले बंधू होते. सरोजिनी ही धाकटी बहीण आणि बारीन्द्र घोष हा धाकटा भाऊ, असे हे कुटुंब होते.[] इंग्लंडमधील वास्तव्यात कृष्णधन यांच्या मनावर तेथील जीवन पद्धतीचा व विचार पद्धतीचा खूप परिणाम झाला. त्यांना इंग्लिश शिक्षण, त्यांच्या चालीरीती ही सर्व आदर्श वाटू लागली. मुलांवरही तेच संस्कार व्हावेत या हेतूने त्यांनी मुलांना बालपणीच शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवून दिले. भारतीय धर्म, संस्कृती व जीवन पद्धतीचा वाराही मुलांना लागू नये म्हणून त्यांनी मुलांना बंगाली ही त्यांची मातृभाषासुद्धा शिकू दिली नाही.

शिक्षण

[संपादन]

लहानपणापासूनच त्याच्या विचारांवर इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी आणि गॅरिबाल्डी यांची छाप होती. वयाच्या सातव्या वर्षी म्हणजे १८७९ साली आपल्या दोन वडील-बंधुंसमवेत अरविंद शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. १८८४ साली लंडन येथील सेंट पॉल शाळेत ते शिकू लागले. लहान वयातच त्यांनी लॅटिन, इंग्लिश, ग्रीक या भाषांमध्ये नैपुण्य मिळविले. फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इटालियन ह्या भाषाही ते तेथे शिकले. १८९० साली वरिष्ठ शिष्यवृत्ती मिळवून ते केंब्रिज येथील किंग्ज कॉलेजमध्ये शिकू लागले.[]

केंब्रिजला शिकत असताना त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली. ते 'इंडियन मजलिस' या संघटनेचे कार्यवाह बनले. अल्पावधीतच ते एक जहाल देशभक्त म्हणून ओळखले जाऊ लागले. आपल्या मुलाने आय.सी.एस. ची परीक्षा उत्तीर्ण करावी ही वडिलांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. ते आय.सी.एस. ही परीक्षा पास झाले होते, पण अश्वारोहणाच्या परीक्षेस बसले नाहीत आणि त्यामुळे ते त्या सेवेसाठी बाद ठरले.[] इंग्लंडमधील १४ वर्षांचे वास्तव्य संपवून दि. ०६ फेब्रुवारी १८९३ मध्ये अरविंद घोष भारतात येऊन पोहोचले.

व्यावहारिक जीवन

[संपादन]

भारतात परतल्यानंतर ते बडोदा संस्थानच्या नोकरीत रुजू झाले. त्यांनी इ.स. १८९३ ते १९०६ हा तेरा वर्षांचा कालखंड बडोदा संस्थानाच्या सेवेत घालविला. सुरुवातीला महसूल खात्यात काम करत असत. बडोद्यास सयाजीराव गायकवाड यांच्या सचिवालयात त्यांनी काम केले होते.३० एप्रिल १९०१ रोजी अरविंद घोष यांचा विवाह श्री. भूपालचंद्र बोस यांच्या कन्येशी, मृणालिनी देवी यांच्याशी झाला. महाविद्यालयात फ्रेंच व इंग्रजीचे प्राध्यापक आणि कॉलेजचे उपप्राचार्य म्हणूनही काम केले. येथे ते बंगाली, मराठी, गुजराती, तमिळ आणि संस्कृत या भाषा शिकले. तेथे त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचे वाचन केले. वेद, उपनिषदे, महाकाव्ये इ. संस्कृत ग्रंथांचा सखोल अभ्यास करून, त्यातील निवडक साहित्याचे त्यांनी इंग्रजीत अनुवाद केले.

योगसाधनेस आरंभ

[संपादन]

इंग्लंडवरून भारतात परतल्यावर, अपोलो बंदर, मुंबई येथे पहिले पाऊल ठेवल्यावरच त्यांना आध्यात्मिक अनुभव यायला सुरुवात झाली. भौतिक क्षेत्राला अनंत व्यापून आहे, असा त्यांना अनुभव आला.[] काश्मीरमध्ये शंकराचार्य टेकडीवर (तख्त-ए-सुलेमानच्या पर्वतरांगा) फिरत असताना त्यांना शून्य अनंताचा अनुभव आला. इ.स.१९०२ मध्ये पुण्यामध्ये पर्वतीवर त्यांना अनुभव आला.[] हिलटॉप टेम्पल ही त्यांची कविता याच अनुभवावर आधारित आहे. [] नर्मदाकाठी चांदोदच्या कालीमातेच्या मंदिरात त्यांना कालीच्या जिवंत उपस्थितीचा अनुभव आला.[] हे सारे अनुभव साधनेविना आलेले होते.

बडोदा येथे असताना त्यांच्या योगसाधनेस प्रारंभ झाला. त्यांच्या योगसाधनेचा प्रारंभ प्राणायामापासून झाला. त्यामुळे त्यांना उत्तम आरोग्य, विचारशक्तीमधील वृद्धीचा अनुभव आला. [] आध्यात्मिक साधना आणि राजकीय चळवळ या दोन्ही गोष्टी साध्य करता याव्यात असा त्यांचा प्रयत्न होता. जीवनाचा परित्याग करायला भाग पाडेल अशी साधना त्यांना नको होती. पुढे विष्णु भास्कर लेले या महाराष्ट्रीयन योग्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांच्याकडून त्यांनी योगाचे प्राथमिक धडे गिरविले. श्री.लेले यांनी त्यांना मन निर्विचार कसे करायचे याचे धडे दिले. अवघ्या तीन दिवसांत श्रीअरविंद यांना ती स्थिती प्राप्त झाली. तेव्हा त्यांना शांत ब्रह्म-चेतनेचा अनुभव आला आणि पुढेही तो अनुभव अनेक दिवस कायम तसाच टिकून राहिला, असे ते सांगतात. योगमार्गातील त्यांची प्रगती पाहून स्वतः लेलेदेखील स्तिमित झाले.[]

स्वातंत्र्यलढ्यात सहभाग

[संपादन]

इ.स.१९०५ साली झालेल्या वंगभंगाच्या चळवळीच्या निमित्ताने त्यांनी जाहीररित्या राजकीय आंदोलनात भाग घेतला. ते राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढले गेले. ते लोकमान्य टिळकांचे सहकारी बनले. राष्ट्रीय आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले. त्यांनी मुंबईच्या इंदुप्रकाश साप्ताहिकमध्ये लेख लिहून आपली राजकीय मतेही मांडली. अल्पावधीतच ते हिंदुस्थानातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक बनले. हिंदुस्थानातील राजकीय कृतिकार्यक्रमाचे ध्येय ’संपूर्ण आणि निरपवाद स्वातंत्र्य‘ हे आहे ह्याचा उघडपणे जाहीर उद्घोष करणे आणि सातत्याने वृत्तपत्रांच्या पानापानांमधून त्यावर जोर देत राहणे, हा तेव्हा श्रीअरविंदांच्या आस्थेचा पहिला विषय होता; अशा प्रकारचा जाहीर उद्घोष करण्याचे धाडस असणारे हिंदुस्थानातील पहिले राजकीय नेते म्हणजे श्रीअरविंद होते आणि लगेचच ते यामध्ये यशस्वीही झाले.[] इ.स. १९०७ साली सुरत येथे झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षस्थानी अरविंद घोष होते.

त्यांनी वंदे मातरम्‌ वृत्तपत्र सुरू केले. ते वंदे मातरमचे कार्यकारी संपादक होते. इ.स. १९०७ ते १९०८ या कालावधीत वंदे मातरम् या दैनिकास त्यांचे पूर्ण मार्गदर्शन लाभले होते. अगदी थोडक्या कालावधीत या दैनिकाने भारताच्या राजकीय विचारसरणीत पूर्णतः परिवर्तन घडवून आणले होते.[] आपल्या विचारांच्या प्रसारार्थ अरविंद घोष यांनी दोन साप्ताहिके चालविली. इंग्रजीमध्ये कर्मयोगिन् आणि बंगालीमध्ये साप्ताहिक धर्म ही साप्ताहिके ते चालवीत असत.[१०] बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे प्रवर्तक असताना, इंग्रज सरकारने त्यांना एका खटल्यात गोवले. त्यांना १९०७ मध्ये एका वर्षाची कैद झाली. त्यांना अलिपूर येथे कारावासात ठेवण्यात आले होते.

जीवनाला कलाटणी

[संपादन]

तेथे त्यांनी योगसाधना केली. त्यांना तेथे सर्वत्र वासुदेवाचे दर्शन झाले, असे म्हणतात. हा त्यांचा अनुभव त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. दरम्यान, त्यांच्या बचावाचे काम देशबंधू चित्तरंजन दास यांनी केले. श्रीअरविंद यांची यथावकाश निर्दोष सुटका झाली. झालेल्या या साक्षात्कारानंतर, भारताच्या स्वातंत्र्याविषयी ते निःशंक झाले. इ.स.१९१० मध्ये राजकारणातून निवृत्ती घेऊन, ते समग्र मानव जातीच्या परिवर्तनाच्या दिशेने स्वतःला कार्यप्रवृत्त करते झाले. ब्रिटिशांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते गुप्तपणे प्रथम चंद्रनगरला आणि नंतर १९१० मध्ये पॉंडिचेरी येथे गेले. ब्रिटिशांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी या प्रवासामध्ये जतींद्रनाथ मित्र हे नाव धारण केले होते.[११] ते १९५० पर्यंत म्हणजे अखेरपर्यंत ते तेथेच राहिले. पॉंडिचेरी ही त्यांची कर्मभूमी, योगभूमी ठरली. मानवाची प्रगती आणि आध्यात्मिक उत्क्रांती याविषयी त्यांचे स्वतंत्र चिंतन नंतर प्रसिद्ध झाले. इ.स. १९१४ मध्ये मिसेस मीरा अल्फासा (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.पॉल रिचईस यांच्या समवेत श्रीअरविंद यांनी 'आर्य' या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. श्रीअरविंदांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी साहित्य प्रथम आर्य मासिकामधून क्रमश: प्रसिद्ध झालेले आहे. इ.स. १९२० साली मिसेस मीरा अल्फासा या पॉंडिचेरी येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आल्या आणि त्यांच्या सहयोगाने इ.स. १९२६ साली श्रीअरविंद आश्रम याची स्थापना झाली. आश्रमाची सारी सूत्रे त्यांनी श्रीमाताजींकडे सोपविली आणि ते उच्चतर साधनेसाठी एकांतात गेले. पुढे इ.स. १९३८ साली त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि त्यानंतर त्यांनी साधकांशी होणारा पत्रव्यवहारही थांबविला आणि पृथ्वीचेतनेमध्ये अतिमानासाचे अवतरण घडविण्याच्या आपल्या कार्यावर आणि सावित्रीच्या लेखनाकडे लक्ष वळविले.[१२] भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी श्रीअरविंदांचा ७५ वा वाढदिवस होता. दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला संदेश तिरूचिरापल्लीच्या ’ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला.[१३]

निधन

[संपादन]

५ डिसेंबर १९५० रोजी अरविंद घोष यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतरही ४ दिवसपर्यंत त्यांचा देह विघटन न होता, तसाच सचेत अवस्थेमध्ये टिकून होता. ९ डिसेंबर १९५० रोजी श्रीअरविंद आश्रमात त्यांची समाधी बांधण्यात आली. पुढे इ.स. १९७३ सालापर्यंत श्रीमाताजींनी ऊर्फ मीरा अल्फासा यांनी श्रीअरविंद यांच्या कार्याची धुरा सांभाळली होती.

शिक्षणविषयक विचार

[संपादन]

हिंदुस्थानातील पहिल्या नॅशनल कॉलेजचे म्हणजे बेंगाल नॅशनल कॉलेजचे (सध्याचे जादवपूर विद्यापीठ) प्राचार्य झाले. त्यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक विचारांमुळे ते शिक्षणतज्‍ज्ञ म्हणून ओळखले जातात.

  • श्रीअरविंद यांनी राष्ट्रीय शिक्षणाला महत्त्व दिले आहे. भूतकाळ हा आपला पाया, वर्तमान हे आपले साहित्य आणि भविष्य हे आपले उद्दिष्ट आणि शिखर असते. शिक्षणाच्या राष्ट्रीय पद्धतीमध्ये प्रत्येकाला त्याची, त्याची स्वाभाविक जागा, त्याचे योग्य स्थान मिळालेच पाहिजे, अशी त्यांची विचारसरणी होती.
  • त्यांनी प्रतिपादित केलेली त्रिसूत्री खालीलप्रमाणे -[१४]
    • १) काहीही शिकविता येत नाही हे खऱ्या शिक्षणाचे पहिले तत्त्व आहे. शिक्षक हा माहिती देणारा किंवा मुलांना काम करायला लावणारा (गृहपाठ देणारा) नसतो तर तो मदतनीस आणि मार्गदर्शक असतो. लादणे नाही तर सुचविणे हे त्याचे काम असते. तो खरंतर विद्यार्थ्याचे मन घडवित नाही. ज्ञानसाधने परिपूर्ण कशी बनवायची हे तो दाखवितो आणि या प्रकियेत तो विद्यार्थ्याला मदत करतो, प्रोत्साहन देतो. तो विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाही तर स्वयंअध्ययन करून ज्ञान कसे मिळवायचे याची पद्धत तो शिकवितो. विद्यार्थ्यांच्या अंतरात दडलेल्या ज्ञानाचे तो कारण ठरत नाही तर ते ज्ञान कोठे दडलेले आहे आणि त्याला पृष्ठभागावर आणण्याची सवय कशी लावायची हे तो दाखवितो.
    • २) मनाच्या विकासासाठी मन विचारात घेणे आवश्यक आहे हे दुसरे तत्त्व आहे. आईवडिलांच्या किंवा शिक्षकाच्या इच्छेनुसार विद्यार्थ्याला ठाकूनठोकून घडविणे, त्याला आकार देणे ही कल्पना म्हणजे एक क्रूर आणि अडाणीपणाची अंधश्रद्धाच आहे. त्याचा जो मूळ स्वभाव आहे, प्रकृती आहे त्याचा स्वाभाविक विकास घडविण्यासाठी त्याने स्वतःलाच प्रवृत्त केले पाहिजे. एखाद्या पूर्वनियोजित (पालकांनी ठरविलेल्या) व्यवसायासाठी त्याला तयार करणे किंवा आपल्या मुलाने हे विशिष्ट गुण, क्षमता, कल्पना, सद्गुण संपादित केले पाहिजेत असे पालकांनी आधीच ठरविणे ही पालकांची घोडचूक ठरेल.विकसनशील जीवामधील जे सर्वोत्तम आहे ते (प्रकट होणे) बाहेर काढणे आणि त्याचा भल्या(चांगल्या, उमद्या) कामासाठी उपयोग होण्यासाठी ते विकसित करणे हेच शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
    • ३) जवळून दूराकडे, जे आहे त्याकडून जे पाहिजे त्याकडे वाटचाल हे शिक्षणाचे तिसरे तत्त्व आहे.

श्रीअरविंदांचे प्रतीक

[संपादन]
श्रीअरविंदांचे प्रतीक
श्रीअरविंदांचे प्रतीक

श्रीअरविंदांचे प्रतीक असणाऱ्या ह्या चिन्हामध्ये अधोमुख त्रिकोण हा सत्-चित्-आनंद यांचे प्रतीक आहे. तर त्याच्या स्वीकारासाठी उन्मुख असणारी प्राण, प्रकाश व प्रेम या स्वरूपातील पार्थिव तत्त्वाची अभीप्सा, ऊर्ध्वमुख त्रिकोणाने दर्शविली आहे. दोन्ही त्रिकोण जेथे मिळतात तो मध्यावरील चौरस म्हणजे संपूर्ण आविष्काराचा दर्शक आहे, त्याच्या केंद्रस्थानी असणारे कमळ हे परमश्रेष्ठाचा अवतार आहे. चौरसातील पाणी हे वैविध्यपूर्ण निर्मितीचे, सृष्टीचे प्रतीक आहे.

तत्त्वज्ञान

[संपादन]
श्री अरविंद आश्रम, पुददुचेरी
  • अतिमानसाच्या उच्चतम शिखरावर पोहोचून त्याचा साक्षात्कार करून घेणे आणि जडभौतिक अस्तित्वामध्ये त्याचे अवतरण घडविणे हे श्रीअरविंदांच्या पूर्णयोगाचे ध्येय होते.[१५]
  • कर्म, ज्ञान, आणि भक्ती यांच्या समन्वयावर आधारित 'पूर्णयोगा'ची मांडणी त्यांनी केली. पूर्णयोग तत्त्वज्ञानामध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती यांच्या समन्वयातून, भौतिक जीवनामध्ये दिव्यत्व आणण्याच्या प्रयत्न करण्यावर भर आहे.
  • 'माणूस हा उत्क्रांतीतील शेवटचा टप्पा नाही, त्यानंतर अतिमानसाचा (Supermind) उदय व्हायचा आहे'; यासंबधीची तार्किक आणि तात्त्विक मांडणी त्यांनी 'दिव्य जीवन' या ग्रंथातून केली आहे.
  • श्रीअरविंद हे एक समन्वयकारी, संश्लेषणकारी आणि समग्रतेने विचार करणारे विचारवंत आहेत. ते पूर्व व पश्चिम, बुद्धिवाद व धर्म, विज्ञान व अध्यात्म, शरीर व आत्मा, इहलोक व परलोक, आधिभौतिक व आध्यात्मिक यांच्यात भेद व द्वैत आहे असे मनात असले तरी त्यांच्यात विरोध व वैर आहे असे ते मानत नाहीत. उलट ही सर्व परस्परपूरक बनली पाहिजेत आणि त्यांनी परस्परांना पूरक व पोषक भूमिका असली पाहिजे असते त्यांचे मत आहे.
  • त्यांच्या तत्त्वचिंतनात वेदांताचा परमात्मा व परमेश्वर तसेच अचल, स्थिर, अविकारी, अविनाशी परब्रह्म, त्रिगुणातीतता, सांख्यांची प्रकृती, शाक्तांची शक्ती आणि शक्तीशीलत्व, वैष्णवांचा वासुदेव, बौद्धांचे अप्रतिहत परिवर्तन व संभवन या सर्वांना परस्परांशी विरोध न होता स्थान मिळालेले आहे.[१६]

ग्रंथसंपदा

[संपादन]

श्रीअरविंदांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी साहित्य – Synthesis of Yoga (योगसमन्वय), Essays on the Gita (गीतेवरील निबंध), Isha Upanishad (ईश-उपनिषदावरील भाष्य), Life Divine (दिव्य जीवन), The foundation of Indian Culture (भारतीय संस्कृतीचा पाया), The secret of the Veda (वेदरहस्य) The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) इ. सर्व साहित्य ‘आर्य’मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे.

श्रीअरविंद यांनी लिहिलेले सर्वांत प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे सावित्री: एक आख्यायिका आणि एक प्रतीक. सुमारे २४ हजार ओळींचे हे खंडकाव्य म्हणजे दिव्य आध्यात्मिक चिंतन आहे. सुमारे ५० वर्ष ‘सावित्री’चे इंग्रजीत लेखन सुरू होते. पुढे मराठीसह अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले.

श्रीअरविंद यांनी विपुल लेखन केले आहे. श्रीअरविंद घोष यांचे साहित्य Complete Works of Sri Aurobindo या नावाने ३६ खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्याची पृष्ठसंख्या २१५०० च्या आसपास आहे. या खंडांमधील काही महत्त्वाच्या इंग्रजी ग्रंथांचे सेनापती बापट यांनी मराठीत भाषांतर केले आहे.

सेनापती बापट यांच्याशिवाय इतर अनुवादकांनी केलेली अन्य साहित्याची भाषांतरेही उपलब्ध आहेत. यामध्ये अनुवादक भा.द.लिमये, विमल भिडे, डॉ.केतकी मोडक यांचा समावेश आहे. त्यांनी केलेला अनुवाद संजीवन आणि अभीप्सा मासिक या दोन मराठी मासिकांमधून प्रकाशित होत असतो.

श्रीअरविंद आणि महाराष्ट्र व मराठी माणूस यांचा अनुबंध

[संपादन]
  • श्रीअरविंद याांच्या राजकीय विश्लेषणाचा आरंभ मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या इंदुप्रकाश या नियतकालिकातील लेखाने झाला. [१७]
  • इंदुप्रकाशचे चालक श्री. देशपांडे हे श्रीअरविंद घोष यांचे केम्ब्रिजमधील मित्र होते. त्यांच्या विनंतीवरूनच श्रीअरविंद यांनी New Lamps for Old (न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड) ही लेखमाला इंदुप्रकाशमध्ये लिहिली होती. ०७ ऑगस्ट १८९३ ते ०६ मार्च १८९४ या कालावधीत नऊ लेखांची मालिका प्रकाशित झाली होती. [१८]
  • लोकमान्य टिळक हे श्रीअरविंद यांचे राजकीय सहकारी होते. त्याची साक्ष टिळकांच्या लेखसंग्रहास श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत व टिळकांवरील मृत्युलेखात मिळते.
  • श्रीअरविंद योगमार्गाकडे वळण्याची सुरुवात श्री.विष्णु भास्कर लेले यांच्यापासून झाली. त्यांच्या मार्गदर्शनाने केलेल्या साधनेमुळे श्रीअरविंद यांना अवघ्या तीन दिवसांत शांत ब्रह्माचा साक्षात्कार झाला होता.

श्रीअरविंद यांच्यावरील मराठीतील लेखन

[संपादन]

चित्रदालन

[संपादन]

इतर मान्यवर यांचा अनुबंध

[संपादन]

अरविंद घोष हे शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये असताना त्यांचा तेथे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याशी परिचय झाला. आणि त्यातून त्यांना बडोद्याच्या सेवेची संधी प्राप्त झाली. बडोदानरेशांच्या सचिवालयात त्यांनी काही काळ नोकरी केली. कोणते एखादे महत्त्वाचे पत्र, आदेश, खलिता, किंवा ब्रिटिश शासनाशी पत्रव्यवहार किंवा त्यासंबंधी कागदपत्रे असतील तर अरविंदांना बरेचदा बोलावणे धाडण्यात येत असे. काही भाषणे तयार करून देण्यासाठी सुद्धा ते महाराजांना मदत करत असत. त्यांच्याबरोबर ते काश्मीर दौऱ्याला सचिव म्हणून गेले होते.[]

श्रीअरविंद आणि लोकमान्य टिळक

[संपादन]

अहमदाबाद येथे इ.स. १९०२ साली झालेल्या कांग्रेस परिषदेमध्ये अरविंद घोष हे लोकमान्य टिळक यांना प्रथम भेटले. पुढे १९०७ सालच्या सुरत कांग्रेसमध्ये लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून ते कार्यरत होते. सुरत कांग्रेसच्या अध्यक्षस्थानी अरविंद घोष होते. त्यांनीच टिळकांशी सल्लामसलत न करता मवाळांच्या संमेलनास जाण्यास नकार दिला, आणि परिणामतः कांग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ अशी दुफळी निर्माण झाली.[२३]

अरविंद घोष आणि लोकमान्य टिळक एक प्रकारे समानधर्मा असल्याने, त्यांच्यामध्ये विलक्षण अनुबंध निर्माण झाला होता. त्यांनी लोकमान्य टिळकांचे व्यक्तिचित्र रेखाटणारा लिहिलेला सोळा पानी दीर्घ लेख याची साक्ष देतो. तसेच लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर अरविंद घोष यांनी 'A GREAT MIND, A GREAT WILL' या शीर्षकाचा मृत्युलेख लिहिला होता. [२४] १९१७ साली प्रकाशित झालेल्या 'लो.टिळकांचे लेख नि भाषणे' या ग्रंथास श्रीअरविंद यांची प्रस्तावना आहे. [२५]

लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर, नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती करण्यासाठी (पुढील काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक झालेले) डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि (पुढील काळात भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक झालेले) डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे हे दोघेही अरविंद घोष यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांना त्यांनी स्पष्टपणे नकार देत म्हणले, ''मी टिळकांचे स्थान घेऊ शकेन असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची निवड साफ चुकली असे मला स्पष्ट म्हणावेसे वाटते. मी तर सोडाच, पण त्यांची जागा घेऊ शकेल अशी कोणतीच व्यक्ती मला तरी दिसत नाही.''[२६]

श्रीअरविंद आणि रवींद्रनाथ टागोर

[संपादन]

दि. ०८ सप्टेंबर १९०७ रोजीच्या वंदे मातरमच्या अंकामध्ये गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर यांनी बंगालीतून लिहिलेली अरविंदांना अभिवादन करणारी कविता प्रकाशित झाली होती. 'Salutation' या नावाने असलेल्या या कवितेमध्ये त्यांनी अरविंदांना उद्देशून ‘देशमित्र’, ‘अवतारी व्यक्तिमत्त्व’, ‘भारताचा आत्मा’ अशी विविध विशेषणे योजिली आहेत.[२७]

श्रीअरविंद आणि स्वामी विवेकानंद

[संपादन]

अलिपूरच्या कारागृहात असताना श्रीअरविंद यांना स्वामी विवेकानंद यांची वाणी ऐकू येत असे. श्रीअरविंद यांनी याविषयी असे म्हणले आहे, कारावासामध्ये असताना, एकांतात माझी जी ध्यानसाधना चालत असे त्या दरम्यान एक पंधरवडा मला सातत्याने विवेकानंदांची वाणी ऐकू येत असे, त्यांची उपस्थिती जाणवत असे. आध्यात्मिक अनुभवाच्या एका विशिष्ट, मर्यादित परंतु अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राबद्दल ती वाणी माझ्याशी बोलत असे आणि त्या विषयासंदर्भात जे काही सांगण्यासारखे होते ते सांगून पूर्ण झाल्याबरोबर ती वाणी लुप्त झाली. [२८]

श्रीअरविंद आणि भगिनी निवेदिता

[संपादन]

भगिनी निवेदिता बडोद्याला व्याख्याने देण्यासाठी आल्या असताना त्यांची व अरविंद घोष यांची पहिली भेट झाली. कालीभक्त आणि शक्तीवर श्रद्धा असणारा म्हणून, म्हणजेच एक क्रांतिकारक म्हणून निवेदिता त्यांना ओळखत होत्या. निवेदितांचे ‘काली द मदर’ हे पुस्तक अरविंद यांनी वाचले होते. या भेटीदरम्यानच त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले.[२९]

ब्रिटिश सरकार अरविंद घोषांना अटक करण्याच्या प्रयत्नात आहे, याची खबर भगिनी निवेदितांनी त्यांना दिली. आणि आता त्यांनी ब्रिटिश भारतामध्ये राहू नये, असा सल्लाही दिला होता, पण अरविंदांनी तो सल्ला मानला नाही. पुढे ईश्वरी आदेशानुसार अरविंद फ्रेंच वसाहतीमध्ये असलेल्या चंद्रनगरला निघून गेले, तेव्हा ते संपादन करत असलेल्या 'कर्मयोगिन्' या इंग्रजी साप्ताहिकाची जबाबदारी आपल्या पश्चात निवेदितांनी घ्यावी, असा संदेश त्यांनी निवेदितांना पाठविला आणि निवेदितांनीही ती जबाबदारी या प्रकाशनाच्या अखेरपर्यंत सांभाळली होती.[३०]

श्रीअरविंद भारतात आल्यानंतर त्यांनी तत्कालीन राजकारणाचा धांडोळा घेतला पण, त्यांना तत्कालीन काँग्रेसची मवाळ भूमिका मानवली नाही. तेव्हा दि. ०७ ऑगस्ट १८९३ ते ०५ मार्च १८९४ या दरम्यान त्यांनी इंदुप्रकाशमध्ये “New lamps for old” ही लेखमाला चालविली. त्यातून ते काँग्रेसच्या मवाळ धोरणाविषयी टीका करत होते. कोणत्याही भारतीयाने आजवर इतक्या उत्तम इंग्रजीमध्ये इतके ओजस्वी लिखाण तोपर्यंत केलेले नव्हते त्यामुळे जेव्हा हे लिखाण प्रकाशित होऊ लागले तेव्हा सर्वांचेच विशेषतः इंग्रज सरकारचे लक्ष त्याकडे वेधले गेले. तेव्हा ह्याच पार्श्वभूमीवर तत्कालीन समाजधुरिण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी श्री. के. जी. देशपांडे (इंदुप्रकाशचे चालक) यांच्या मार्फत असे जहाल लिखाण लिहू नये, असा निरोप श्रीअरविंदांना पाठविला. तसे लिखाण प्रसिद्ध केल्यास लेखकाला अटक होण्याची शक्यता आहे अशी आशंका त्यांनी व्यक्त केली. तेव्हा आपल्याला जो आशय ज्या पद्धतीने मांडायचा आहे, तसा तो मांडता येणार नाही, अशी शक्यता लक्षात आल्यावर, त्यांनी ती लेखमाला बंद केली आणि राजकारणाच्या तत्त्वज्ञानाविषयी लिखाण करावयास सुरुवात केली.[२०] “What would Maharashtra of today have been without Mahadev Govind Ranade and what would India of today be without Maharashtra?” असे गौरवोद्गार श्रीअरविंद यांनी रानडे यांच्याविषयी काढले होते. [२५]

श्रीअरविंद आणि देशबंधू चित्तरंजन दास

[संपादन]

अरविंद घोष यांना जेव्हा इ.स. १९०७ मध्ये अटक झाली तेव्हा दास यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. खटल्याच्या दरम्यान न्यायाधीशांसमोर अपील करताना देशबंधू चित्तरंजन दास यांनी श्रीअरविंदांविषयी जे उद्गार काढले ते प्रसिद्ध आहेत. ते म्हणाले होते, ”हे सगळे वितंडवाद जेव्हा शांत झालेले असतील, ही सगळी धामधुम, ही सगळी आंदोलने थंड झाली असतील, जेव्हा श्रीअरविंद निधन पावलेले असतील तेव्हा देशभक्त कवी, राष्ट्रवादाचे प्रणेते आणि मानवतेचे प्रेमी म्हणून ते ओळखले जातील. ते गेल्यानंतरही त्यांचे शब्द पुनःपुन्हा या भारतातच नव्हे, तर दूरदेशी आणि साता समुद्रापारही घुमत राहतील.“[३१]

पुढे घोष यांची निर्दोष सुटका झाली. देशबंधू चित्तरंजन दास यांच्या 'सागर संगीत' या बंगाली काव्याचा अरविंद घोष यांनी Songs of the Sea या काव्यामध्ये अनुवाद केला होता.[३२]

उल्लेखनीय अनुयायी

[संपादन]

श्री.नोलिनी कांत गुप्ता (१८८९–१९८३) - नोलिनी कांत गुप्ता हे क्रांतिकारक, भाषाशास्त्रज्ञ, विद्वान, समीक्षक, तत्त्वज्ञानी आणि योगी होते. श्रीअरविंद यांच्या ज्येष्ठ अनुयायांपैकी ते एक होते. श्रीअरविंद यांच्यासमवेत ते क्रांतिकार्यात सहभागी होते. पुढे धर्म आणि कर्मयोगिन या श्रीअरविंद संचालित नियतकालिकांचे ते सह-संपादक म्हणून काम पाहत होते. श्रीअरविंद आश्रमाचे सचिव व विश्वस्त होते. त्यांनी इंग्रजीमध्ये १६ आणि बंगाली भाषेत ४४ पुस्तके लिहिली आहेत.[३३]

श्री. निरोदबरन (१९०३–२००६) - एडिनबर्ग येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले डॉक्टर होते. श्रीअरविंद यांनी निरोदबरन यांच्यासोबत केलेल्या तोंडी व लेखी संवादामधून, पूर्णयोगासंबंधीचे अनेक पैलू सहजतेने स्पष्ट झालेले आहेत. Correspondence with Sri Aurobindo (दोन भाग) आणि Talks with Sri Aurobindo (तीन भाग), Twelve years with Sri Aurobindo ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्रीअरविंद यांच्या 'सावित्री' या महाकाव्याचे लेखनिक होण्याची संधी श्री.निरोदबरन यांना प्राप्त झाली होती.[३४]

श्री. माधव पु. पंडित (१९१८ – १९९३) - हे आध्यात्मिक लेखक, शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. त्यांनी श्रीअरविंद आश्रम आणि श्रीमाताजी यांचे सचिव या नात्याने जबाबदारी सांभाळली होती.

श्री. पवित्र (१८९४ – १९६९) - मूळ नाव - फिलीप बार्बियर सेंट हिलरी (Philippe Barbier Saint-Hilaire), हे पॅरिस निवासी, शिक्षण व व्यवसायाने अभियंता होते. झेन आणि तंत्रशास्त्राचा अभ्यास करून १९२५ साली श्रीअरविंद आश्रमात आले आणि पुढील सर्व जीवन तेथेच व्यतीत केले. नव्याने स्थापन केलेल्या Sri Aurobindo International University Centre च्या संचालकपदाची जबाबदारी श्रीमाताजींनी त्यांच्याकडे सोपविली, ती त्यांनी १८ वर्षे सांभाळली. ते श्रीअरविंद आश्रमाचे जनरल सेक्रेटरी म्हणूनही कार्यरत होते. [३५]

श्री. दिलीपकुमार रॉय (१८९७ – १९८०) बंगाली गायक, कादंबरीकार, कवी आणि निबंधकार.[३६]

श्री. टी.व्ही. कपालीशास्त्री (१८८६ – १९५३) हे संस्कृतचे विद्वान अभ्यासक होते, सुविख्यात लेखक होते. १९२९ साली ते श्रीअरविंद आश्रमात दाखल झाले, त्यांनी श्रीअरविंद यांच्या विचार-प्रकाशात वेदांवर भाष्य केले.

श्री. सत्प्रेम (१९२३ – २००७) हे फ्रेंच लेखक होते आणि श्रीमाताजींच्या निकटवर्ती शिष्यांपैकी एक होते. त्यांचे श्रीमाताजींबरोबर झालेले संवाद 'मदर्स अजेंडा' या नावाने प्रकाशित झाले आहेत. त्याचे १३ खंड आहेत.

श्री. इंद्रा सेन (१९०३ – १९९४) सर्वांगीण मानसशास्त्र आणि सर्वांगीण तत्त्वज्ञान यावर लेखन करणारे ते पहिले लेखक होत.

श्री. के. डी. सेठना (१९०४ – २०११) ऊर्फ अमल किरण - मदर इंडिया या इंग्रजी पाक्षिकाचे संस्थापक, संपादक

श्रीमती मार्गारेट वूड्रो विल्सन (१८८६ – १९४४) - यांना श्रीमती निष्ठा या नावाने संबोधले जात असे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मि.वूड्रो विल्सन यांच्या या कन्या होत्या. त्या १९३८ साली श्रीअरविंद आश्रमात वास्तव्यास आल्या आणि अखेरपर्यंत तेथेच राहिल्या. [३७]


संदर्भ सूची

[संपादन]
  • श्री अरविंदांचे तत्त्वचिंतन (लेखक - डॉ.गजानन नारायण जोशी; पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९८२)
  • राष्ट्र रचनेचे ईश्वरी कार्य (संकलन - गजानन गोखले)
  • महायोगी अरविंद, (लेखक - दिवाकर, रं. रा. अनु. आपटे, शि. शं.) मुंबई, १९५६.
  • वंदे मातरम् - (श्रीअरविंद घोष यांच्या प्रेरक लेखांचा संग्रह), महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, १५ ऑगस्ट १९९७

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b डॉ.जोशी, गजानन नारायण (१९८२). श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन. पुणे: पुणे विद्यापीठ.
  2. ^ Sri Aurobindo. Collected Works of Sri Aurobindo - Vol 36. Sri Aurobindo Ashram Trust.
  3. ^ a b Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 05
  4. ^ Collected Works of Sri Aurobindo - Vol 35 : Pg 234-235
  5. ^ a b c Purani, A.B. (1995). Evening Talks with Sri Aurobindo. Sri Aurobindo Ashram Trust. pp. Pg No. 302. ISBN 81-7060-093-6.
  6. ^ अभीप्सा मराठी मासिक - ऑगस्ट २०२२ चा अंक.
  7. ^ Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 110
  8. ^ Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 55
  9. ^ Collected Works of Sri Aurobindo, Vol 36 : Pg 06-07
  10. ^ Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 61
  11. ^ Nolini Kant Gupta (1969). Reminiscences. Mother India, Sri Aurobindo Ashram, Pondicherry. p. 51.
  12. ^ Sri Aurobindo (1972). On himself. Sri Aurobindo Ashram Trust.
  13. ^ Collected Works of Sri Aurobindo, Vol 36 : Pg 474-477
  14. ^ Collected Works of Sri Aurobindo : Vol 01
  15. ^ Perspectives of Savitri - Part I, Edited by R.Y.Deshpande : 183, (Written by K.D.Sethana)
  16. ^ डॉ.जोशी, गजानन नारायण (१९८२). श्री अरविंदांचे तत्त्वचिंतन. पुणे विद्यापीठ.
  17. ^ डॉ. ग. मो. पाटील; डॉ. न. ब. पाटील; श्री. गो. ब. सरदेसाई; श्रीमती लता राजे; डॉ. रवींद्र रामदास (१५ ऑगस्ट १९९७). वंदे मातरम् (श्रीअरविंद घोष याांच्या प्रेरक लेखाांचा सांग्रह). मुंबई: महाराष्ट्र राज्य साणहत्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.
  18. ^ THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. 06-07. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. 2002.
  19. ^ Life of Sri Aurobindo by A.B.Purani
  20. ^ a b A.B.Purani (1982). Evening talks with Sri Aurobindo. Pondicherry. ISBN 81-7060-093-6.
  21. ^ "घोष, अरविंद". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2023-05-27 रोजी पाहिले.
  22. ^ मराठी पुस्तके सूची २०१५. नवी दिल्ली: नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया. २०१५.
  23. ^ Collected Works of Sri Aurobindo - Vol 35 : Pg 26
  24. ^ THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO - Vol 01. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.
  25. ^ a b THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. 01. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. 2003.
  26. ^ THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO - Vol 36. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.
  27. ^ K.R.Srinivasa Iyengar (1945). Sri Aurobindo - a biography and a history. Pondicherry - 605 002: Sri Aurobindo International Centre of Education. ISBN 81-7058-813-8.CS1 maint: location (link)
  28. ^ Collected Works of Sri Aurobindo, Vol 36 : Pg 98-99
  29. ^ Collected Works of Sri Aurobindo - Vol 36 : Pg 99
  30. ^ The Complete Works of Sri Aurobindo : Vol 36. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.
  31. ^ (Mother’s chronicles Book Five by Sujata Nahar : 478-479)
  32. ^ Perspectives of Savitri - Part I by R.Y. Deshpande
  33. ^ Nolini_Kanta_Gupta. "en.wikipedia.org/".
  34. ^ Nirodbaran. "en.wikipedia.org".
  35. ^ Pavitra. "en.wikipedia.org/".
  36. ^ "DilipKumar Roy".
  37. ^ Margaret_Woodrow_Wilson. "en.wikipedia.org/".

बाह्य दुवे

[संपादन]
पुरस्कार व सन्मान

भारत सरकारने योगी श्रीअरविंद यांच्या स्मरणार्थ व गौरवार्थ वेळोवेळी पोस्टाची तिकीटे काढली आहेत.

श्रीअरविंद यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट
श्रीअरविंद यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट
श्रीअरविंद जन्मशताब्दी निमित्त पोस्टाचे तिकीट
श्रीअरविंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पोस्टाचे तिकीट