हुता हिंडोचा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सविता देवजीभाई ऊर्फ हुता हिंडोचा (१९३१, पूर्व आफ्रिका – १७ नोव्हेंबर, २०११:पाँडिचेरी, भारत) या आफ्रिकन भारतीय लेखिका, चित्रकार आणि संग्राहक होत्या.

जीवन व कार्य[संपादन]

श्रीमाताजी यांच्या एक निकटवर्ती अनुयायी म्हणून ओळखल्या जातात. श्रीमाताजींनी सर्वात जास्त पत्रे हुता यांना पाठविली होती, अशी नोंद स्वतः श्रीमाताजींनी केली होती.[१]

हुता १० फेब्रुवारी १९५५ रोजी किशोरवयातच कायमस्वरूपी श्रीअरविंद आश्रमात दाखल झाल्या. आणि श्रीमाताजींनी दि १७ नोव्हेंबर १९७३ रोजी देह ठेवला तोपर्यंत त्या त्यांच्या निकट वैयक्तिक संपर्कात होत्या. हुता म्हणजे ‘आपले जीवन जिने समर्पित केले आहे अशी व्यक्ती.’ १७ फेब्रुवारी १९५५ रोजी हुता हे नाव श्रीमाताजी यांनी त्यांना दिले होते.[२] [३]

श्रीअरविंद लिखित सावित्री या महाकाव्यावर आधारित, चित्रांचा प्रकल्प त्यांनी पूर्ण केला. तो प्रकल्प ‘मेडिटेशन्स ऑन सावित्री’ या नावाने ओळखला जातो. या प्रकल्पासाठी त्यांना श्रीमाताजींचे मार्गदर्शन लाभले होते. ती सावित्रीच्या अभ्यासकांना, साधकांना उपयुक्त ठरतात. ऑक्टोबर १९६१ ते फेब्रुवारी १९६७ या कालावधीमध्ये हुता यांनी ४७२ चित्रे काढली. ऑरोविलमध्ये सावित्री भवन येथे ही चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.[४]

ऑरोविल या उषा-नगरीचा पहिला शहर-आराखडा श्रीमाताजींनी हुता यांनाच दाखविला होता.[५]

मार्च १९६७ मध्ये हुता यांनी श्रीअरविंदांच्या काही कविता चित्रांच्या माध्यमातून व्यक्त करण्याचे काम सुरू केले. श्रीमाताजींच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली त्यांनी कवितांच्या आधारावर चौपन्न चित्रे पूर्ण केली.

ग्रंथसंपदा[संपादन]

त्यांनी काही पुस्तकांचे लेखनही केले आहे. त्यामध्ये खालील पुस्तकांचा समावेश होतो.

०१) द स्पिरीट ऑफ ऑरोविल - (इंग्रजी) ISBN: 81-67372-07-9, हव्यवाहन ट्रस्ट

०२) व्हाईट रोझेस - (इंग्रजी) - प्रथम आवृत्ती १९६३.

श्रीमाताजींनी हुता यांनी वेळोवेळी जे संदेश दिले, पत्रे लिहिली त्यावर आधारित हे पुस्तक आहे. तमिळ, फ्रेंच, इटालियन, रशियन, हिंदी या भाषांमध्ये याची भाषांतरे प्रकाशित झालेली आहेत.[४]

१९८१ साली या पुस्तकास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. [६]

०३) श्वेत गुलाब - (गुजराथी) - व्हाईट रोझेस या पुस्तकाचे स्वतः म्हणजे हुता यांनीच केलेले हे भाषांतर[४]

०४) द स्टोरी ऑफ अ सोल (इंग्रजी) -हे पुस्तक हुता यांच्या सन १९५४ ते १९७३ या कालावधीतील जीवनावर आधारित आहे. आत्मचरित्रात्मक असलेल्या या पुस्तकातील काही भाग क्रमश: मदर इंडिया या मासिकातून प्रकाशित होत असे.[४]

०५) व्हिक्टरी ऑफ द ट्रुथ (इंग्रजी) - ISBN 81-87372-01-X, हव्यवाहन ट्रस्ट, चौथी आवृत्ती - २००६ - तारा जौहर यांनी श्रीमाताजींच्या हातांच्या सात मुद्रांची जी छायाचित्रे काढली होती, त्याचा आध्यात्मिक अर्थ, श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांची संबंधित अवतरणे यांचा समावेश या पुस्तकात आहे.

०६) मदर, यु सेड सो (इंग्रजी) - श्रीमाताजी व हुता यांच्या संवादावर आधारित हे पुस्तक.[४]

०७) अबाऊट सावित्री (इंग्रजी) - जानेवारी १९६८ ते ऑगस्ट १९७० या कालावधीमध्ये श्रीमाताजींनी सावित्रीचा अर्थ हुता यांना उलगडून दाखविला, तो येथे शब्दबद्ध करण्यात आला आहे. चार भागांमध्ये त्याचे प्रकाशन करण्यात आले.[४]

०८) द स्टोरी ऑफ अ सोल (इंग्रजी) - भाग ०२, हव्यवाहन ट्रस्ट (२००९) [७]

०९) जेम्स फ्रॉम द मदर टू हुता (इंग्रजी) - १९५८ साली हुता आफ्रिकेत आपल्या मूळ गावी काही काळ वास्तव्यासाठी गेल्या असताना श्रीमाताजींनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली ३६० वचने हुता यांना पाठविली होती. त्या वचनांचा संग्रह नंतर अनेक वर्षानंतर प्रकाशित करण्यात आला. जगभरातील साहित्यातील, विविध काळातील वचनांचे हे संकलन श्रीमाताजींनी केलेले होते.

हव्यवाहन ट्रस्टची स्थापना[संपादन]

पुस्तकांच्या प्रकाशनासाठी हुता यांनी, श्रीमाताजींच्या प्रेरणेने दि.२४ नोव्हेंबर १९९५ रोजी हव्यवाहन ट्रस्टची स्थापना केली. [५]

बाह्य दुवे[संपादन]

०१) हुता यांची पुस्तके

०२) हुता यांचे लेखन

०३) मेडिटेशन्स ऑन सावित्री - येथे सावित्री महाकाव्यामधील उतारा, त्यावर श्रीमाताजी यांनी काढलेले रेखाचित्र, श्रीमाताजींनी केलेले त्या उताऱ्याचे वाचन आणि त्यावर हुता यांनी काढलेले चित्र अशा क्रमाने मांडणी केलेली आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "The Story of a Soul - Book by Huta : Read online". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2023-10-17 रोजी पाहिले.
  2. ^ K.R.Srinivasa Iyengar (1952). On The Mother. Pondicherry: Sri Aurobindo International Centre of Education. ISBN 81-7058-036-6.
  3. ^ "incarnateword.in".
  4. ^ a b c d e f "Overman Foundation – India's leading research institute dedicated to the ideals of Sri Aurobindo and Mother" (इंग्रजी भाषेत). 2023-02-25 रोजी पाहिले.
  5. ^ a b "The Spirit of Auroville - Book by Huta : Read online". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2023-03-20 रोजी पाहिले.
  6. ^ "The Incarnate Word". incarnateword.in. 2023-12-14 रोजी पाहिले.
  7. ^ "The Incarnate Word". incarnateword.in. 2023-05-26 रोजी पाहिले.