Jump to content

सावित्री: एक आख्यायिका आणि एक प्रतीक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सावित्री: एक आख्यायिका आणि प्रतीक हे महाभारतातील सावित्रीच्या आख्यानावर आधारित श्रीअरविंद ऊर्फ अरविंद घोष यांनी इंग्लिश भाषेत लिहिलेले एक महाकाव्य आहे.

लेखन - इतिहास

[संपादन]

श्रीअरविंदांनी देह ठेवल्यानंतर चार वर्षांनी, म्हणजे दि. १५ ऑगस्ट १९५४ रोजी, Savitri, a Legend and a Symbol या ग्रंथाचे श्रीअरविंद आश्रमातर्फे प्रकाशन करण्यात आले. हे महाकाव्य श्री अरविंद आपल्या हयातीत ५० वर्षे लिहीत होते. `सावित्री’चे पहिले उपलब्ध हस्तलिखित इ.स.१९१६ मधील आहे. इ.स.१९३० च्या सुमारास, त्याचा अधिक विस्तार करून आणि त्याला सखोल प्रतीकात्मकता देऊन, त्यांनी त्याचे महाकाव्यामध्ये रूपांतर करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला वर्णनात्मक कविता एवढेच स्वरूप असलेल्या या काव्यावर नंतर अनेक परिष्करणे करण्यात आली. आपल्या चढत्या-वाढत्या आध्यात्मिक अनुभवानुसार श्री अरविंद या महाकाव्याच्या रचनेत उत्तरोत्तर बदल करीत होते. इ. स. १९४० च्या उत्तरार्धात, जेव्हा त्यांना त्यांचे डोळे साथ देईनासे झाले तेव्हा ते केवळ नोंदी करून ठेवत असत आणि नंतर अगदी अंतिम टप्प्यावर ते तो मजकूर निरोदबरन नावाच्या साधकाला सांगून, त्याच्याकरवी लिहून घेत असत. डिसेंबर १९५० मध्ये झालेल्या महासमाधीच्या थोडेच दिवस आधी श्रीअरविंदांनी`सावित्री’ या महाकाव्याची रचना पूर्ण केली होती.

मध्यवर्ती कल्पना

[संपादन]

मरणाधीन झालेल्या सत्यवानाचे प्राण यमराजाच्या पाशातून खेचून आणणाऱ्या सावित्रीचे महाभारतातील आख्यान सर्वश्रुत आहे. श्रीअरविंदांनी या कथेचे रूपक वापरून, आध्यात्मिक जीवनाच्या वाटचालीचा प्रवासच आपल्याला ज्ञात करून देण्याचा प्रयत्न 'सावित्री' या महाकाव्याच्या माध्यमातून केला आहे.

प्रेमाचा मृत्यूवरील विजय व आत्म्याचा अंतिम विजय आणि जीवनाचे रूपांतरण ही या महाकाव्याची मध्यवर्ती कल्पना आहे. ही संकल्पना चेतनेच्या उत्क्रांतीचे पूर्णत्व आणि पृथ्वीवरील अतिमानसिक जीव-वंशाचा उदय याच्याशी संबंधित आहे. मानवाच्या अभ्युदयासाठी दिव्य शक्तीचे पृथ्वीवरील अवतरण हा सावित्रीचा गाभा आहे.

सावित्रीमधील व्यक्तिरेखा आणि त्यांची प्रतीकात्मकता

[संपादन]
  • अश्वपती = अश्वपती हे सावित्रीचे मानव जन्मातील वडील आहेत, ते तपस्येचे देव आहेत. मर्त्यतेकडून अमर्त्य अशा प्रतलावंर चढून जाण्यासाठी साहाय्य करणाऱ्या आध्यात्मिक प्रयासांच्या घनीभूत ऊर्जेचे ते प्रतीक आहेत.
  • सत्यवान = ‘सत्यवान' हा स्वतःच्या अंतरंगामध्ये दिव्य सत्य बाळगणाऱ्या आत्म्याचे प्रतीक आहे पण तो मृत्यू आणि अज्ञानाच्या कचाट्यामध्ये सापडलेला आहे.
  • सावित्री (सत्यवानाची सावित्री) = 'सावित्री' ही दैवी वाणी आहे, ती सूर्याची पुत्री आहे आणि ती परमसत्याची देवता असून ती तारणहार म्हणूनच या भूतलावर अवतरली आहे; जन्माला आली आहे.
  • द्युमत्सेन = ते सत्यवानाचे वडील आहेत. द्युमत्सेन हे दृष्टीचे दिव्य साम्राज्य हरल्यामुळे, वैभवाचे साम्राज्यदेखील गमावलेल्या, आणि येथे अंध होऊन पडलेल्या दिव्य मनाचे प्रतीक आहे.[]
  • नारद मुनी
  • यम (मृत्यूदेव)

वैशिष्ट्ये

[संपादन]
  • सावित्रीच्या काव्यविस्ताराची कल्पना येण्यासाठी त्यातील ओळींचा विचार करता येईल. या महाकाव्यामध्ये २३८१३ पंक्ती असून, ही इंग्लिश भाषेतील सर्वांत मोठी अशी दीर्घ कविता आहे. श्री. निरोदबरन हे या महाकाव्याचे लेखनिक झाले.
  • ‘सावित्री’मधील पंचपदी मुक्तछंदात्मक काव्याची रचना ही एकमेवाद्वितीय आहे, इंग्रजी काव्यात सर्वसाधारणतः मुक्तछंदात्मक काव्यरचनेचा जो आराखडा असतो त्याच्यापेक्षा ही रचना वेगळी आहे.
  • या काव्यातील प्रत्येक पंक्ती स्वतंत्र आहे आणि जास्तीत जास्त पाच ते सात पंक्तींचे मिळून एक वाक्य आहे. वाक्यामध्ये सहसा एक, दोन, तीन किंवा चार पंक्ती येतात, अगदी क्वचित पाच किंवा सहा किंवा सात पंक्ती येतात.
  • प्रत्येक पंक्ती स्वतंत्रपणे आस्वाद्य होऊ शकेल इतपत सशक्त असली पाहिजे आणि त्याच वेळी, जणूकाही एका चिऱ्यावर दुसरा चिरा रचावा त्याप्रमाणे ती एखाद्या वाक्यामध्ये किंवा एखाद्या परिच्छेदामध्ये, अगदी समर्पकपणे रचलीदेखील गेली पाहिजे, अशी या महाकाव्याची रचना आहे. []
  • सावित्री म्हणजे आधुनिक काळातील वेद होय असे म्हणले जाते. या महाकाव्यात अध्यात्माचा इतिहास, तत्त्वज्ञान, गूढवाद, परलोकज्ञान, भविष्याचे दर्शन या गोष्टी आहेत.[]

मांडणी

[संपादन]
  • या महाकाव्यामध्ये एकूण ३ खंड आहेत. यातील पहिला भाग - अश्वपतीचा योग, दुसरा भाग - सावित्री आणि तिसरा भाग - सावित्री व यम संवाद यास वाहिलेला आहे.
  • यामध्ये १२ पर्व असून ४९ अध्याय आहेत. त्यांची मांडणी पुढीलप्रमाणे आहे -
खंड पर्व पर्वाचे शीर्षक अध्याय अध्यायांची शीर्षके
०१ ०३ प्रारंभ ०५ प्रतीकात्मक उषा, संघर्षाचा विजय, राजाची योगसाधना, आत्म्याच्या बंधमुक्तीचा योग, गुह्य ज्ञान, राजाची योगसाधना -आत्मचैतन्याची बंधमुक्ती व महानता यांचा योग
लोकलोकांतराचा प्रवासी १५ वैश्विक जगतांमधला प्रवासी, विविध जगताची शिडीसारखी मांडणी, सूक्ष्म-तरल वास्तव पदार्थाचे राज्य, जीवनाचे वैभव व पतन, लहानखुरे जीवन असणारी राज्ये, लहान जीवनाच्या देवता, अधिक उच्च जीवनाची राज्ये व देवता, महारात्रीच्या आतमध्ये शिरकाव, असत्याचे जग, दुष्टपणाची माता व अंध:काराचे पुत्र, जीवनाच्या देवतांचे नंदनवन, लहानखुऱ्या मनाची राज्ये व त्यांची देवत्वे, उच्चतर मनाची राज्ये व त्यांची देवत्वे, आदर्शाचे स्वर्ग, मनाच्या आत्म्याच्या ठिकाणी, जगदात्मा, अधिक श्रेष्ठ ज्ञानाचे प्रदेश
दिव्य माता ०४ अज्ञेयाचा शोध, दिव्य मातेची आराधना, आत्म्याचे निवासस्थान व नवनिर्मिती, दिव्य दर्शन व वरप्राप्ती
०२ ०५ जन्म आणि शोध ०४ दिव्य ज्योतीचा जन्म व बालपण, दिव्य ज्योतीची वाढ,शोधकार्याविषयी आंतरिक आवाजाची प्रेरणा, शोधकार्य
प्रेम ०३ भेटीचे विधिलिखित स्थळ, सत्यवान, सत्यवान व सावित्री
प्रारब्ध (कर्म) ०२ नियतीचा शब्द, नियतीचा मार्ग व वेदनेचा प्रश्न
योग ०७ आत्म्याच्या शोधासंबंधीची कथा, आंतरिक प्रदेशांमध्ये प्रवेश, आत्म्याचे तिहेरी सामर्थ्यप्रवाह, आत्म्याचा शोध व साक्षात्कार, निर्वाण व सर्व-नकारात्मक एकमेवाद्वितीयाचा शोध
मृत्यू ०१ अरण्यातील मृत्यूची घटना
०३ ०४ शाश्वत रात्र ०२ काळ्याकभिन्न महा-रिक्ततेच्या दिशेने, शाश्वत महारात्रीतील प्रवास व महाअंधकाराचा आवाज
दोन संधिप्रकाश ०४ आदर्शाच्या संधिप्रकाशाचे स्वप्न, मृत्युविषयीचे सत्य व आदर्शांसंबंधीचा व्यर्थ पोकळपणा, प्रेम व मृत्यू या विषयावर चर्चा, पृथ्वीवरील सत्याविषयीचा स्वप्नवत संधिप्रकाश
शाश्वत दिन ०१ शाश्वत दिवस - आत्म्याने केलेली निवड व परम ग्रास
उपसंहार. ०१ पृथ्वीवर पुनरागमन

आवृत्त्या

[संपादन]
  • इंग्रजी आवृत्त्या
  • (इंग्रजी) अरबिंदो घोष, श्री अरबिंदो आश्रम (1954) ASIN B0007ILK7W
  • (इंग्रजी) लोटस प्रेस (1995) आयएसबीएन 0-941524-80-9
  • मराठी आवृत्त्या
  • मराठीमध्ये सावित्रीचा अनुवाद करण्याचे आजवर दोन प्रयत्न झालेले आहेत. सौ.शैलजादेवी वहिनीसाहेब प्रतिनिधी यांनी केलेला अनुवाद “सावित्री - एक आख्यायिका आणि एक प्रतीक”, श्रीअरविंद आश्रम, पुडुचेरी यांच्यातर्फे प्रकाशित झालेला आहे. तो छंदोबद्ध भावानुवाद आहे. हा अनुवाद १९९३ साली प्रकाशित झाला. ISBN 81-7058-334-9
  • दुसरा अनुवाद कवी नृसिंहाग्रज यांनी केला आहे. तो अनुवाद “श्रीअरविंद सावित्री” या नावाने प्रकाशित झाला आहे. १९९५ साली प्रकाशित झालेले हे पुस्तक मुक्तछंदात अनुवादित करण्यात आलेले आहे.

सावित्रीची समीक्षा

[संपादन]
  • एक पाश्चात्त्य तत्त्वज्ञ व समीक्षक, मि. रेमंड फ्रँक पायपर याने लिहिले आहे - श्रीअरविंदांनी निर्माण केलेले हे महाकाव्य कदाचित इंग्लिश भाषेतील सर्वांत महान महाकाव्य असावे... आजवर झालेल्या रचनांपैकी सर्वात जास्त सर्वसमावेशक, समग्र, सुंदर आणि परिपूर्ण वैश्विक काव्यरचना म्हणून ‘सावित्री’चा उल्लेख करता येईल, असे विधान करण्याचे मी धाडस करत आहे. यामध्ये प्रतीकात्मक रितीने अगदी आदिम वैश्विक शून्यापासून, पृथ्वीच्या अंधकार आणि संघर्षातून प्रवास करत करत, अतिमानसिक आध्यात्मिक अस्तित्वाच्या उच्चतम क्षेत्रापर्यंतच्या सर्व श्रेणी आलेल्या आहेत आणि त्यामध्ये मनुष्याच्या प्रत्येक समस्येवर अतुलनीय अशा विशाल, भव्य आणि रूपकात्मक तेजस्वी श्लोकांच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. []

संबंधित साहित्य

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

अधिक वाचनासाठी

[संपादन]
  • सावित्री - एक दर्शन (अभीप्सा मराठी मासिक - जानेवारी २०२२ विशेषांक)
  • सावित्री महाकाव्याच्या कथानकाचा सारांश (अभीप्सा मराठी मासिक - जानेवारी २०२३ विशेषांक)

संदर्भ सूची

[संपादन]
  1. ^ Collected Works of Sri Aurobindo Vol 33-34, Author's Note
  2. ^ R.Y. Deshpande (2000). (Perspectives of Savitri - Part I. Aurobharati Trust, Pondicherry.
  3. ^ (मराठी) डॉ.ग.ना.जोशी, महाकवी श्रीअरविंद यांच्या सावित्री महाकाव्यातील तत्त्वज्ञान, मॅजेस्टिक प्रकाशन, पृष्ठ ४६४
  4. ^ Raymond F. Piper, The Hungry Eye, pp. 131 - 132. See Perspectives of Savitri.
  5. ^ पंडित, माधव (१९९९). संक्षिप्त सावित्री. पुणे: सुहास टिल्लू.