अरविंद घोष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
श्री ऑरोबिंदो
rahmenlos

ऑरोबिंदो ऊर्फ योगी अरविंद घोष हे विसाव्या शतकातील एक महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि महायोगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्‍ज्ञ, आणि महाकवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात.

जीवन[संपादन]

अरविंदांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णधन घोष आणि आईचे नाव स्वर्णलता होते. इंग्लंडमधील वास्तव्यात कृष्णधन यांच्या मनावर तेथील जीवन पद्धतीचा व विचार पद्धतीचा खूप परिणाम झाला. त्यांना इंग्लिश शिक्षण, त्यांच्या चालीरीती ही सर्व आदर्श वाटू लागली. मुलांवरही तेच संस्कार व्हावेत या हेतूने त्यांनी मुलांना बालपणीच शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवून दिले. भारतीय धर्म, संस्कृती व जीवन पद्धतीचा वाराही मुलांना लागू नये म्हणून त्यांनी मुलांना बंगाली ही त्यांची मातृभाषासुद्धा शिकू दिली नाही.

लहानपणापासूनच त्याच्या विचारांवर इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी आणि गॅरिबाल्डी यांची छाप होती. वयाच्या सातव्या वर्षी अरविंद शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. लहान वयातच त्यांनी लॅटिन, इंग्लिश, ग्रीक या भाषांमध्ये नैपुण्य मिळविले. केंब्रिजला शिकत असताना त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली. ते 'इंडियन मजलिस' या संघटनेचे कार्यवाह बनले. अल्पावधीतच ते एक जहाल देशभक्त म्हणून ओळखले जाऊ लागले. आपल्या मुलाने आय.सी.एस. ची परीक्षा उत्तीर्ण करावी ही वडिलांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. ते आय.सी.एस. ही परीक्षा पास झाले होते, पण अश्वारोहणात नापास झाले. फेब्रुवारी १८९३ मध्ये योगी अरविंद भारतात येऊन पोहोचले.

कार्य[संपादन]

भारतात परतल्यानंतर ते बडोदा संस्थानच्या नोकरीत रुजू झाले. बडोद्यास सयाजीराव गायकवाड यांचे सचिव म्हणून त्यांनी काम केले. महाविद्यालयात फ्रेंच व इंग्रजीचे प्राध्यापक आणि कॉलेजचे उपप्राचार्य म्हणूनही काम केले. येथे ते बंगाली आणि संस्कृत या भाषा शिकले. तिथे असतानाच त्यांनी वेदांचा अभ्यास केला व योगसाधनेस प्रारंभ केला. तेथे त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचे वाचन केले. विष्णू भास्कर लेले या महाराष्ट्रीयन योग्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांच्याकडून त्यांनी योगाचे प्राथमिक धडे गिरविले. योगमार्गातील त्यांची प्रगती पाहून स्वतः लेलेदेखील स्तिमित झाले.

स्वातंत्र्यलढ्यात सहभाग[संपादन]

याच काळात ते राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढले गेले. ते लोकमान्य टिळकांचे सहकारी बनले. राष्ट्रीय आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले. त्यांनी मुंबईच्या 'इंदुप्रकाश वृत्तपत्र' या वर्तमानपत्रात लेख लिहून आपली राजकीय मतेही मांडली. अल्पावधीतच ते हिंदुस्थानातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक बनले. बंगालच्या 1905 मध्ये झालेल्या फाळणीनंतर ते हिंदुस्थानातील पहिल्या नॅशनल कॉलेजचे प्राचार्य झाले. त्यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक विचारांमुळे ते शिक्षणतज्‍ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्याच वर्षी त्यांनी वंदे मातरम्‌ वृत्तपत्र सुरू केले. बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे प्रवर्तक असताना, इंग्रज सरकारने त्यांना एका खटल्यात गोवले. त्यांना १९०७ मध्ये एका वर्षाची कैद झाली. त्यांना अलिपूर येथे कारावासात ठेवण्यात आले होते.

जीवनाला कलाटणी[संपादन]

तेथे त्यांनी योगसाधना केली. त्यांना तेथे सर्वत्र वासुदेवाचे दर्शन झाले, असे म्हणतात. हा त्यांचा अनुभव त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. दरम्यान, त्यांच्या बचावाचे काम देशबंधू चित्तरंजन दास यांनी केले. त्यांची यथावकाश निर्दोष सुटका झाली. झालेल्या या साक्षात्कारानंतर, भारताच्या स्वातंत्र्याविषयी ते निःशंक झाले. राजकारणातून निवृत्ती घेऊन, ते समग्र मानव जातीच्या परिवर्तनाच्या दिशेने स्वतःला कार्यप्रवृत्त करते झाले. ब्रिटिशांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते गुप्तपणे प्रथम चंद्रनगरला आणि नंतर १९१० मध्ये पॉंडिचेरी येथे गेले. ते १९५० पर्यंत म्हणजे अखेरपर्यंत ते तेथेच राहिले. पोंडिचेरी ही त्यांची कर्मभूमी, योगभूमी ठरली. मानवाची प्रगती आणि आध्यात्मिक उत्क्रांती याविषयी त्यांचे स्वतंत्र चिंतन नंतर प्रसिद्ध झाले. इ.स. १९१४ मध्ये मिसेस मीरा अल्फासा (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.पॉल रिचईस यांच्या समवेत श्री.अरविंद यांनी आर्य या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. श्रीअरविंदांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी साहित्य प्रथम [१]आर्य मासिका]] मधून क्रमश: प्रसिद्ध झालेले आहे. इ.स. १९२० साली मिसेस मीरा अल्फासा या पॉंडिचेरी येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आल्या आणि त्यांच्या सहयोगाने इ.स. १९२६ साली श्रीअरविंद आश्रम याची स्थापना झाली. पुढे इ.स. १९७३ सालापर्यंत श्रीमाताजींनी श्रीअरविंद यांच्या कार्याची धुरा सांभाळली होती.

तत्त्वज्ञान[संपादन]

श्री अरविंद आश्रम, पुददुचेरी

योगी अरविंद यांनी कर्म, ज्ञान, आणि भक्ती यांच्या समन्वयावर आधारित'पूर्णयोगा'ची मांडणी त्यांनी केली. पूर्णयोग तत्त्वज्ञानामध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती यांच्या समन्वयातून, भौतिक जीवनामध्ये दिव्यत्व आणण्याच्या प्रयत्न करण्यावर भर आहे.'माणूस हा उत्क्रांतीतील शेवटचा टप्पा नाही, त्यानंतर अतिमानसाचा (Supermind) उदय व्हायचा आहे'; यासंबधीची तार्किक आणि तात्त्विक मांडणी त्यांनी 'दिव्य जीवन' या ग्रंथातून केली आहे.

योगी अरविंदांनी लिहिलेली आणि मराठीत उपलब्ध असणारी ग्रंथसंपदा[संपादन]

सेनापती बापट यांनी अरविंदांच्या काही महत्त्वाच्या इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले आहे.

  • दिव्य जीवन
  • भारतीय संस्कृतीचा पाया
  • योग समन्वय
  • वेद रहस्य
  • सावित्री (महाकाव्य)
  • गीतेवरील निबंध

सेनापती बापट यांच्याशिवाय इतर अनुवादकांनी केलेली अन्य साहित्याची भाषांतरेही उपलब्ध आहेत. यामध्ये अनुवादक भा.द.लिमये, विमल भिडे, डॉ.केतकी मोडक यांचा समावेश आहे. त्यांनी केलेला अनुवाद संजीवन आणि अभीप्सा मासिक या दोन मराठी मासिकांमधून प्रकाशित होत असतो.

योगी अरविंदांची चरित्रे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  • श्री अरविंदांचे तत्त्वचिंतन (लेखक - डॉ.गजानन नारायण जोशी; पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९८२)
  • राष्ट्र रचनेचे ईश्वरी कार्य (संकलन - गजानन गोखले)

बाह्य दुवा[संपादन]